बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

पुलं, पुरस्कार आणि पोंक्षे

(’अक्षरनामा’ या पोर्टलवर जयवंत डोळे यांनी लिहिलेल्या ’गांधीवादी पुलंच्या नावचा पुरस्कार ’नथुराम’ पोंक्षे यांना?’ या लेखावरील प्रतिक्रिया)

पहिला महत्वाचा हरकतीचा मुद्दा हा की पुलंना ’गांधीवादी’ हे लेबल लावणे चुकीचे आहे. माझ्या मते पोंक्षे नामक महाभागाची विचारधारा आणि पुलंची विचारधारा यात टोकाचा फरक आहे इतके नोंदवून थांबता आले असते.

एक पुलंप्रेमी म्हणून आणि पुलंनी विविध व्यासपीठांवरुन, लेखनातून मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत असलेली एक व्यक्ती म्हणून मला डोळॆ यांचा आक्षेप पटला आहे हे नमूद करतो. पण...

पुलंच्या नावाचा पुरस्कार पुलं परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन या तिघांतर्फे देण्यात येतो आहे हे मी विसरत नाही. पुरस्कार देणारे जेव्हा एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या नावे पुरस्कार देऊ करतात तेव्हा त्यात त्यांचा स्वार्थ, दृष्टीकोन मिसळलेला असतोच. अहो, हल्ली पोलिस, लष्कर, न्यायव्यवस्थेतही अनेकदा निवृत्तीकडे झुकलेले लोक राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य देणारे निर्णय घेताना दिसतात... त्यातील अनेकांची निवृत्तीनंतरची सोय लावली जाते हे ही आपण पाहतो. भारतीय माणसे, राजकारणी, तथाकथित समाजसेवक हे इतिहासातील घटना, व्यक्ती यांचा उदोउदो करतात ते त्याच्या आडून आपली पोळी भाजून घेण्यासाठीच.

उठता बसता शिवाजी महाराजांच्या, राम-कृष्णांच्या, शाहू महाराजांच्या, आंबेडकरांच्या नावच्या जपमाळा ओढणारे चोख स्वार्थी असतात. देवळात देवाच्या पायाशी दानपेटी असते, तसे या थोरांच्या पायी हे लोकांचे दान झेलायला बसलेलेच असतात. इतकेच नव्हे तर जाताजाता हे स्वयंघोषित पुजारी, पंडे, गुरव, मानकरी त्या व्यक्तीचे, घटनांचे रुपडे बदलून आपल्या सोयीचेही करुन घेत असतात.

आपले सणसणीत विरोधक असलेल्या पटेलांना भाजपने बळेच डोक्यावर घेऊन त्यांचा उदो उदो चालवला आहेच. उद्या डोक्यावरचे पटेल खांद्यावर, खांद्यावरचे कमरेवर आणि कमरेवरचे पायदळी जातील यात शंका नाही. कॉंग्रेसनेही गांधी टोप्या घालून गुंड-पुंडांचे, सरंजामदारांचे राजकारण केले आहेच. शाहू-फुले-आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे सणसणीत जातीयवादी आसपास सापडतीलच. भाजपने सावरकरांना डोक्यावर घेताना त्यांचा विज्ञानवाद पायदळी तुडवून सोयीस्करपणे फक्त हिंदुत्ववाद तेवढा स्वीकारला. ’गोरक्षण नव्हे, गोभक्षण करा’ म्हणणार्‍या सावरकरांचा उदो उदो करताना ’गोहत्याबंदी’ सारखा प्रतिगामी निर्णय घेतला.

थोडक्यात काय दिवंगतांना खांद्यावर घ्यायचे ते स्वत:चे घोडे दामटण्यासाठी. एखाद्या देखण्या दगडी मूर्तीला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवा रंग फासून तिला अधिक 'सेलेबल' करणार्‍या देवस्थान समितीमध्ये आणि असे पुरस्कार देणार्‍यांमध्ये फार फरक समजता कामा नये. भांडवलशाहीने एक शिकवले आहे, खिशात पैसा किती येतो, नफा किती मिळतो हे महत्वाचे. तसेच पुलंच्या नावे आमचा टीआरपी किती वाढतो हे महत्वाचे असते. त्यात पुलंनी त्यांची भूमिका थोडी अ‍ॅडजस्ट करुन घेतली तर कुठे बिघडले. बाजारात सध्या हिंदुत्ववादी पुलंना गिर्‍हाईक जास्त आहे. तर आम्ही त्यांच्यावर पोंक्षेंचा रंग फासून त्यांना विकू. हाय काय न नाय काय. उद्या कम्युनिस्टांचे राज्य आले तर आम्ही कॉम्रेड पुल असे व्हर्शन विकू. शेवटी काय, कार्यक्रमासाठी आम्हाला स्पॉन्सर मिळण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी जो रंग द्यायचा तो देऊ की. एवढी कटकट कशापायी करता म्हणे.

तुम्ही कलेच्या क्षेत्राशी कितपत संबंधित आहात मला ठाऊक नाही. 'कट्यार काळजात घुसली' म्हणून दारव्हेकरांचे एक संगीत नाटक आहे. चार सहृदयी आणि परस्परांबद्दल नितांत आदर नि आपुलकी असणार्‍या व्यक्तींमधला व्यवस्थेने निर्माण केलेला संघर्ष आणि त्यातून प्रत्येकाची होणारी तडफड याचे सुरेख दर्शन त्यात घडते. सुष्ट-दुष्ट अशी मांडणी करुनच जगाकडे पाहणार्‍या करंट्यांच्या जगात सुष्ट सुष्टांमधलाच संघर्ष रंगवणारे दुर्मिळ नाटक. त्याचा चित्रपट करताना त्याचे 'हिंदू सर्व गुणी बालके आणि एक अपवाद वगळता सगळे मुस्लिम वैट्टं राक्षस' असले भिकार चित्रण आम्ही पाहिले. दारव्हेकर जिवंत असते तर तेंडुलकरांसारखे ’मला पिस्तुल द्या’ म्हणू लागले असते याची मला खात्री आहे.

याच कारणाने माणसाने आपला वारसा काय असेल यावर आपले डोके खपवू नये. कारण पुढचे लोक तो पुसून त्यांना हवा तो वारसा तुमचा म्हणून हट्टाने रुजवून देतात. आसपास किती विचारहीन, कणाहीन माणसे त्यांनी जमा केली आहेत त्यावर ते रुजेल की नाही ते ठरते. बुद्धिहीनांचा जमाव वाढला की निर्बुद्धालाही आईन्स्टाईनपेक्षा हुशार असल्याचे सर्टिफिकेट मिळून जाते. आणि त्याच्या शाळकरी कल्पनांना इनोवेटिव वगैरे म्हणत त्यांचे भाट व्हॉट्स अ‍ॅपवर पसरवत राहतात. त्याला आधीच दिवंगत होऊन बसलेले आपण काहीही करु शकत नसतो.

फारतर लेख, व्याख्याने, आंदोलने ही हत्यारे घेऊन लढणार्‍या आपण प्रॉपगंडा नावाचे एक हत्यार दुर्लक्षित केले. हे मान्य करायला हवे. स्वत: न वापरणे हा मुद्दा वेगळा नि इतर कुणी वापरणार नाही हा मुद्दा वेगळा हे इथे मुद्दाम नमूद करतो जरी ते अपवित्र असले म्हणून आपण नाकारले तरी विरोधक वापरणार नाहीत असे गृहित धरता येत नाही. हळू हळू एक एक आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्र काबीज करण्यासाठी त्याचा वापर केलेला पाहूनही आपण लेख लिहिण्यापलीकडे काही करु शकत नाही हा आपला दोष आहे. हे आपण मान्य करायला हवे.

आणि ज्याच्याशी ७०-८०% विचार जुळतात अशा एखाद्या विचारवंताची एखाद्या विषयातली मांडणी आपल्या पटत नाही म्हणून त्याला दूर ढकलून विरोधकांच्या गटात अनायासे पोचवणारे अस्पृश्यतावादी करंटेपणही तुम्हा-आम्हा पुरोगाम्यांचेच. मग पुलं म्हटले की त्यांच्या कुठल्यातरी व्यक्तिचित्रणातले उल्लेख शोधून ’ते श्रद्धेचे उदात्तीकरण करतात’ म्हणून नाक मुरडणारे पुरोगामी मुखंड मला ठाऊक आहेत. या मार्गाने आपणच पुलंना प्रतिगाम्यांच्या गोटात का ढकलत आहोत असा प्रश्न त्या विद्वानाला पडला नव्हता. असे चार-दोन दिवटे निघाले की बाहेर फेकले गेलेले पुलं अल्लदपणे झेलून त्यांच्यावर सोयीचा रंग चढवणे सोपे जाते. त्याची सुरुवात पोंक्षेंना सोबत घेऊन झाली आहे असे म्हणू या.

विठोबाला जसा बहुजनांकडून हिसकावून त्याचा वैष्णव देव केला, विवेकानंदांना हिंदुत्ववादी संत अशी इमेज बनवली, अनेक सांस्कृतिक परंपरा या आपले रंग फासून आपल्याच असा दावा करत पचवल्या, त्यांच्यासाठी पुलं एक किरकोळ प्यादे आहे हे ध्यानात घ्या.

तेव्हा डोक्याला त्रास करुन न घेता पुलंच्या नावच्या पुरस्कार पोंक्षे नामक समाजवाद्याला दिल्याबद्दल तीनही प्रायोजकांना उदंड धन्यवाद द्यावेत हे उत्तम नाही का?

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा