बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

शोले पुन्हा पाहिल्यानंतर

#मीआणिचित्रपट

आयुष्यात सर्वात प्रथम थिएटरला जाऊन पाहिलेला चित्रपट म्हणजे शोले, बॉलिवूडमधील एक माईलस्टोन (चांगल्या की वाईट या अर्थाचे वाद खुश्शाल लढवा तुम्ही. अपुन को इंट्रेस्ट नै.). त्यावेळी अंड्यात असल्याने डोस्क्यात कितपत शिरला आठवत नाही. पण त्यातील लक्षवेधी संवाद नंतर गल्लोगल्ली पोरंटोरं ऐकवू लागल्याने बरेचसे पाठ झाले. त्यापूर्वीच्या सामाजिक, कौटुंबिक वगैरे चित्रपटांची सद्दी खर्‍या अर्थाने संपवून बॉलिवूडला हिंसाचार आणि त्राताप्रधान चित्रपटांकडे नेणारे निर्णायक वळण त्याने दिले.

त्यात काय नव्हते? स्टायलिश डाकू, जोरदार संवाद...

उदा. 'कुत्ते कमीने, मै तेरा खून पी जाऊंगा’ हा धर्मेंद्रचा ट्रेडमार्कच झालेला डॉयलॉग, ’तेरे लिए तो मेरे पैर ही काफी है’, ’ये हाथ मुझे दे दे ठाकूर’, ’तुम्हाला नाम क्या है बसंती?’, आधे इधर जाव, आधे उधर जाव, और बाकी मेरे पीछे आव, ’कितने आदमी थे’, ’अरे ओऽ सांभा’, ’अब गोली खा’, ’किसी जेल की दीवार इतनी मजबूत नहीं जो गब्बर को बीस साल अंदर रख सके.’ ’रामगढवालोंने पागल कुत्तोंके सामने रोटी डालना बंद कर दिया है’, ’ये हाथ नहीं, फॉंसीका फंदा है गब्बर’...

कथानकाला फारसा आधार न देणारे पण तरीही उठावदार असे सीन्स होते ...

उदा. दारू प्यालेला वीरु टाकीवर चढून आत्महत्येची धमकी देतो, जय वीरुच्या वतीने लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो तो सीन...

तसेच दे०मार ढ्वांय ढ्वांय बंदुकबाजी, डोंगराळ नि उंचसखल प्रदेशातून केलेली जोरदार घोडेस्वारी, हिरोईनचा पाठलाग करणारे डाकू, टांग्याची बेफाम दौड, अनेक दिलखेचक फ्रेम्स...

उदा. ठाकूरने गब्बरच्या डोक्याला दोन्ही हातांनी घातलेला त्रिकोणी पेच, इन्स्पेक्टर असलेल्या ठाकूरने डोक्यावरच्या टोपीसह एक हात आडवा धरुन त्याखालच्या पिस्तुलने उंचावरील डाकूला टिपताना दिलेली टिपिकल वेस्टन पोज, दारू पिऊन टाकीवर चढलेला नि त्याच्या कठड्यावरुन अर्धा बाहेर लटकणारा वीरु...

वीरु-बसंतीचा सफल रोमान्स, जय-राधाचे असफल प्रेम, बसंतीचा डान्स, सूरमा भोपाली आणि अंग्रेज के जमाने का जेलर’ची कमेडी, ठाकूरच्या कुटुंबाच्या हत्येतून साकारलेले क्रौर्य, अहमदच्या मृत्यूचे कारुण्य, सहृदयी आणि स्वत:चा हाताशी आलेला मुलगा गमावूनही गावाला प्रेरणा देणारा इमामचाचा, तो मुस्लिम असल्याने धार्मिक एकोप्याचा दिलेला संदेश, आणि अर्थातच जय-वीरूची ’हम नहीं छोडेंगे’ वाली दोस्ती... एकुणात तोवरच्या चित्रपटाला छोट्या किराणामालाच्या दुकानाचे ’सर्व काही मिळेल’ असे मोठे रिटेल स्टोअर बनवणारा नि तो फॉर्म्युला बॉलिवूड-प्रेक्षकाच्या कायमचा बोकांडी बसवणारा चित्रपट.

पण असे असून फॉर ओल्ड टाईम्स सेक असे चित्रपट कधीकधी पाहिले जातात. नवे काही डोक्यात घुसण्यास मेंदूने ’नो व्हेकन्सी’चा बोर्ड लावला की एरवी ’डाऊन विद नॉस्ट्याल्जिआ’ म्हणणारे काळेही, हल्ली काय म्हणतात ते... हां, थ्रोबॅक मोड मध्ये जातात. तसा काल शोले पाहिला. चित्रपटाबद्दलचे आकलन हे त्या त्या वेळच्या वय, बुद्धी, मानसिक नि आसपासची स्थिती (उदा. थिएटरमध्ये पॉपकॉर्न खात बकबक करणारी कॉलेजकुमारांची टोळी, नि त्यातील पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी बेअक्कल टवाळ कमेंट करुन स्वत:च फिदीफिदी असणारे तरुण अतिशय सुरेख तरल चित्रपटांची श्राद्धे घालताना पाहिले आहेत.) त्यामुळे चित्रपट पुन्हा पाहताना आकलनात थोडी थोडी भर पडत जाते.

शोले हा मारधाड चित्रपटांचा मूळपुरूष मानला जात असला तरी त्याहून काही तपशील पाहता येतात. ते कुणाला दिसतात, कुणाला दिसतही नाहीत. कदाचित ते टिपण्यासाठी आपण तेव्हा तयार नसतो असेही असेल. उदाहरण द्यायचे तर मालगाडीचा घोड्यावरुन पाठलाग करणारे डाकू हा हॉलिवूडच्या वेस्टन पटांकडून उसना आणलेला सीन आहे. पुढे शोले हे प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक कुरोसावा’च्या ’सेवन सामुराई’चे वेस्टनायजेशन आहे असे लक्षात येते. त्याहीपूर्वी असरानीचा ’अंग्रेज के जमाने का जेलर’ म्हणजे चार्ली चॅप्लीनच्या ’द ग्रेट डिक्टेटर’मधील डिक्टेटरची कॅरिकेचर आवृत्ती (जे मुळात हिटलरचे कॅरिकेचर) किंवा हिंदीत ज्याला व्यंग्यात्मक रूप म्हणतात तसे आहे हे लक्षात आलेले असते. चार्लीचा डिक्टेटर पृथ्वीचा गोल हात नि पायावर नाचवत असतो, हा जेलर टेबलवर ठेवलेला गोलही दोन वेळा खाली पाडतो. त्याच्या एन्ट्रीला ’ही इज अ जॉली गुड फेलो’ची ट्यून पार्श्वभूमीवर वाजते...

गंमत म्हणजे जय सर्वप्रथम ठाकूरच्या हवेलीतील गेस्ट-हाऊसबाहेर बसून आपल्या हार्मोनिका अथवा माऊथ ऑर्गनवर जी ट्यून वाजवतो ती याच ट्यूनशी नाते सांगणारी आहे, फक्त तिचा पोत आणि भावना वेगळी आहे. इथेच आजवर न जाणवलेला एक तपशील दिसून आला. राधा विधवा आहे नि जय तिच्याकडे आकर्षित झाला आहे. असे असून जय हवेलीसमोर असलेल्या गेस्टहाऊसच्या ओसरीवर बसून जी ट्यून वाजवतो त्यात कारुण्य आहे, वेदना आहे. ती राधाची आहे नि कदाचित जयचीही.

पण आणखी एक तपशील नोंदवून ठेवण्याजोगा आहे. तो म्हणजे जेव्हा जय हार्मोनिकावर ती ट्यून वाजवतो तेव्हा ती वेळ नेहमीच रात्रीची आहे. आणि दोन प्रसंगात त्याची ट्यून ऐकवताना सज्जातील एक एक दिवा राधा मालवत जाते आहे. एका सीनमध्ये तर ती स्वत:च्या खोलीत जाते नि दार लावताना त्याच्याकडे वळून नव्हे, तर स्वत:च्या पाठीमागेच ते लोटून देते. थोडक्यात जय-राधा यांची ही निशब्द प्रेमकहाणी सुफल संपूर्ण होणार नाही याचे संकेत त्यांच्या प्रत्येक भेटीतच मिळत जातात. अखेर जयच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही राधा हवेलीच्या खिडकीतून पाहते आणि एक पाऊल मागे सरते नि दोन्ही हातांनी खिडकी लावून घेते. पण आता खिडकीची दारे लोटताना ती पाठीकडे लोटत नाही, वास्तवाला सामोरे जाते, तोंड देते. संपूर्ण चित्रपटात जय आणि राधा परस्परांशी प्रत्येकी एक वाक्य बोलले आहेत. आणि ती दोनही वाक्ये त्यांच्या मनात एकमेकांबद्दल काही भावना निर्माण होण्यापूर्वीची करकरीत व्यवहारी वाक्ये आहेत. त्यांचे नाते फक्त हार्मोनिकाच्या स्वरांनी आणि विझत्या कंदिलांच्या उजेडातील तिच्या नजरेतूनच उमलत जाते आहे.

एका मारधाड चित्रपटात इतक्या तरल प्रेमाचा आविष्कार कदाचित विरोधाभासामुळॆ अधिकच जाणवून जातो. इतकी अबोल प्रेमकहाणी बॉलिवूडवाल्यांना क्वचितच जमली असेल.

---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा