* मी अयोध्या-विवादाला कधीच बारकाईने अभ्यासलेले नाही.
* भारतीय प्रसारमाध्यमे ही माध्यमे म्हणून केव्हाच निरुपयोगी झालेली आहेत. बातम्या हाच प्रपोगंडा, नाटक, चित्रपट आणि प्रवचन असलेल्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणॆ हा मूर्खपणा आहे असे माझे मत आहे.
* त्यामुळे झाल्या निर्णयावर माझी प्रतिक्रिया आनंद वा दु:ख दोन्हीची असू शकत नाही.
* मी टोळीच्या मानसिकतेचा नसल्याने विचारशून्य होत जन्मदत्त जातीय, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक गटाची बाजू घ्यायला हवी असे मला वाटत नाही.
* सोयीचा निकाल आला की ’न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. तो मानायला हवा.’ आणि गैरसोयीचा आला तर, ’हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यात निवाडा करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही’ असे म्हणणार्यांच्या निरपेक्ष वृत्तीबद्दल मला अतीव आदर आहे.
* मी मूर्खांच्या तोंडी लागत नसल्याने ’आता तुम्हाला दु:ख झाले असेल’ म्हणणार्या वय वाढून बसलेल्या शाळकरी मुलांना माझ्या प्रतिक्रियेस लायक समजत नाही.
* मी श्रद्धाळू वगैरे नाही. त्यामुळे मंदिर झाले, न झाले याचा मला आनंद वा दु:ख नाही.
* मी वादग्रस्त ठिकाणी कधी नमाजही न पढल्याने ती जमीन हिंदूंना दिल्याचे दु:खही नाही.
* तिथे मंदिर झाले म्हणून मी दर्शनाला जाणार नाही, तसेच पर्यायी ठिकाणी झालेल्या मशीदीत नमाज पढायलाही जाणार नाही.
तरीही...
* जनतेचा पैसा खर्चून दीर्घकाळ चाललेला हा खटला एकदाचा संपला याचा मला आनंद आहे.
* पण त्याचवेळी हा शेवट आहे, की त्याआधारे ’फोडा आणि राज्य करा’ पद्धतीचे राजकारण करणार्यांच्या हातात एक कोलित आले आहे याबाबत मी संभ्रमात आहे.
* निवाड्यासाठी आधार मानलेल्या दोन प्रमुख मुद्द्यांमुळे यातून पंडोराचा बॉक्स उघडला जाईल याची मला साधार भीती आहे.
* या निवाड्यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे, त्यातून निर्माण झालेल्या वातावरणामुळे झालेल्या दंगलीत संपत्ती नि प्राण गमावलेल्या दोनही बाजूच्या लोकांचे स्मरण या निमित्ताने होते. आणि आता दोन दशके रखडत राहिलेल्या आणि ज्यातील अनेक आरोपी चक्रनेमिक्रमाने जगून निजधामालाही गेले आहेत अशा त्याबाबतच्या अनेक खटल्यांचे काय, हा प्रश्नही माझ्या मनात पुन्हा वर आला आहे.
* एक मंदिर वा मशीद उभारण्यासाठी अनेक जणांचे जीव गेले तरी बेहत्तर म्हणणारे, ’कुणीतरी त्याग केला पाहिजे’ म्हणणार्यांना माणूस म्हणावे का? या प्रश्नाचे उत्तर माझे मला केव्हाच मिळाले आहे.
* फाटक्या वस्त्रात राहणार्या आणि भिक्षेचा एक कटोरा इतकीच संपत्ती आयुष्यभर राखणार्या संताचे संगमरवरी पुतळॆ नि सोन्याचे सिंहासन असलेल्या मंदिरांचे आध्यात्मिक मॉल उभारणार्यांच्या या देशात, किमान गरजांच्या गोष्टींना प्राधान्य केव्हा मिळणार हा एक सनातन प्रश्न आहे...
...ज्याचे उत्तर कोणतेही न्यायालय कधीच देऊ शकणार नाही.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा