रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

गिव एव्हरी डेविल हर ड्यू

मला राजकीय मते आहेत हे उघडच आहे. ती मी कधीच लपवली नाहीत. पण याचा अर्थ मी एक बाजू घेऊन ती बाजू पवित्र नि योग्य, त्या बाजूच्या माणसाने, पक्षाने, नेत्याने म्हटले ते तंतोतंत खरे असे म्हणत तलवारी घेऊन कुणावर हल्ले केले नाहीत. शाब्दिक हल्ले नक्कीच केले आणि करतही राहीन, पण ते माझ्या स्वत:च्या मतांसाठी, इतर कुणाच्या मला मनातून न पटलेल्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी नाही.

अमुक मत माझ्या बाजूच्या बहुसंख्येचे, जातीचे, धर्माचे, पक्षाचे, नेत्याचे आहे ’म्हणून’ माझे असायला हवे, नि मला पटत नसून खाली डोके वर पाय करुन, एक डोळा मुडपून, एक तिरळा करुन, नाकपुड्या फेंदारून अष्टवक्रासनात बसून कसे बरोबर दिसते, अशा मखलाशा करणे यात काही शहाणपणा आहे असे मला वाटत नाही.

मी माझीच मते मांडतो. ती इतर कुण्या व्यक्तीच्या, गटाच्या, गावच्या, गल्लीतल्या, पेठेतल्या, ओसाडगावच्या व्यक्तीशी मिळतीजुळती आहेत, यानुसार ती व्यक्त करावीत की नाही हे ठरत नाही. मग सोबत असलेल्या एखाद्याने "तू असे ’त्यांच्या’ सोयीचे मत कसे व्यक्त करु शकतोस?" असा प्रश्न विचारला की काळेंच्या पद्धतीने (सेनेच्या पद्धतीने असते, मनसे पद्धतीने असते तर काळेंची का नसावी?) त्याचा समाचार घेतला जातो. माझे मत अमुक असेच असायला हवे ही अपेक्षा मी माझ्या जवळच्या माणसांचीही कधी पुरी केलेली नाही.

प्रत्येकाच्या बुद्धीला असतात तशा माझ्या बुद्धीलाही मर्यादा आहेतच. आणि माझ्याहून असंख्य बुद्धिमान लोक या जगात आहेत याची जाणीव आहेच. पण त्यांचेही मत मी ’प्रमाण’ मानणार नाहीच. त्याला चॅलेंज करण्याचा माझा हक्क, आकलनाच्या माझ्या मर्यादेत जगण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे. ’आपल्याला काय कळतंय. आपण सामान्य माणसं.’ असं म्हणत कुणी ’इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इक्वल टु मोअर इन्फिनिटी’ असे तारे तोडणार्‍या किंवा गटाराच्या गॅसवर चहाचा ठेला लावणार्‍या किंवा वडे तळून उरलेल्या तेलावर वाहने चालवण्याची अफाट क्रांतिकारी आयडिया देणार्‍यासमोर लोटांगण घालणार्‍यांच्या झुंडीचा भाग मी नाही. तसेच उलट दिशेने, त्या उदाहरणांमुळे ती व्यक्ती एका क्षणात पूर्ण मूर्ख ठरते असा दावा करणारे दुसर्‍या बाजूच्या झुंडीतले लोकही मला पूर्णपणे आपले वाटत नाहीत...

मी कुठल्या बाजूचा आहे की तटस्थ आहे की आणखी कसा याची फिकीर मी करत नाही. आपल्या विचाराशी एकनिष्ठ असले, संभाव्य चुकांचे भान असले, कुणाचे गुलाम नसले आणि प्रवाहाबरोबर वाहात न जाण्याचे भान असले की इतरांच्या जगण्याची उठाठेव करणार्‍या टिनपाट फेसबुकीं एककल्ली भक्तांना वा दुराग्रही विरोधकांना महत्व द्यायचे कारण नाही.

CuteDevil
https://joepalmer.wordpress.com/ येथून साभार.

माझे कायमचे धोरण हेच आहे, ’मला तुझे हे म्हणणे मान्य, वा पटले, वा पटले नाही. या पलिकडे संपूर्ण व्यक्ती म्हणून माझे तुझ्याबद्दल उलट मतही असू शकेल.’ (तटस्थतेचा आव आणण्यासाठी मला हे करावेच लागणार ना. :) ) माझे एक मत तुम्हाला पटले, म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही पाठवून सोबत आलात, की 'आता मी फक्त तुमच्या बाजूचीच मते उचलून धरावीत हा तुमचा भ्रम आहे, माझा दावा नाही' हे तुम्ही समजून घ्यायला हवे. तुम्हाला न पटणारे मी काही लिहिले, की मी ’तटस्थतेचा आव आणतो’ असा हेत्वारोप करणे हे तुम्हाला मतभिन्नता मानवत नसल्याचे लक्षण आहे.

गंमत म्हणजे अनेकदा हा आरोप उलट दिशेने आधीच केला जातो. आपल्या शेरेबाजीला आपले विचार वा विश्लेषण समजणारे हे लोक केवळ प्रात:स्मरणीयच असतात. (माझाच नियम तोडतो आहे, माफ करा: एक सद्गृहस्थ शेरेबाजी करणार्‍या, हेत्वारोप करणार्‍या ’केवळ तीन शब्दांच्या’(!) जोरावर अनेक वर्षे मैला-मैलाच्या प्रतिक्रिया देत असतात नि वर समोरच्याला ’तुम्हाला मतभिन्नता मानवत नाही तर आपली तळी उचलणारेच लोक जमवा.’ असा कांगावाही स्वत:च करतात.) राजकारण्यांकडून, गुन्हेगारांकडून 'प्रिएम्टिव स्ट्राईक' नावाचा प्रकार सामान्य माणसेही उत्तम शिकली आहेत याचे हे लक्षण आहे. :)

फेसबुक हे गण्याला गणपतराव करणारा फिल्टर आहे. चार लाईक्स मिळू लागल्या की प्रत्यक्षातही आपण गणपतरावच आहोत असा भ्रम त्याला होतो आणि आपल्या कुवतीपेक्षा मोठा घास तो घेऊ लागतो. सामाजिक माध्यम म्हटले की, शृंगारिक अर्थाने नसले तरी वर्चुअल अर्थाने तोंडाला तोंड लागतेच. त्यातून वैतागही पदरी येतो. ’अरे तुझी लायकी काय बाबा. चवथी पास मुलाची समज नाही आणि कुणाची अक्कल काढतोस?’ असे अनेकदा म्हणण्याची इच्छा झाली आहे. पण त्या चवथी पास प्राण्याने ज्या खरोखरच्या लायक माणसाची अक्कल काढली त्याचे लढे त्यालाच लढू द्यावे म्हणून बहुधा गप्प राहिलो आहे. कुणाची वकीली करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

हे समाज-माध्यम म्हणून ओळखले जात असल्याने संवाद महत्वाचा असतो. आणि त्यातून विसंवाद आलाच आणि पाठोपाठ भांडणही. पण विसंवादाला आपल्या सुरक्षित क्षेत्रात, आपल्या वॉलवर नेऊन आपली झुंड जमवून आपले मत वाजवणारे पाहिले की समाजात विचारापेक्षा जमाव जमवून आपले खरे करण्याला किती महत्व आहे हे दिसते.

हे पाप माझ्या हातून घडू नये म्हणून काही मंडळींनी नाव घेऊन, काहींनी नाव न घेता माझी टिंगलटवाळी करणारी, टीका करणारी, कुत्सित शेरेबाजी करणारी पोस्ट केली तरी त्याची दखल घेतलेली नाही. इथले कुणीही माझे सुहृद नाही की कुणी शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी पोस्ट लिहावी इतके महत्व मी क्वचितच कुणाला देतो. त्यातही एका विशिष्ट मानसिकतेचा, मताचा आढावा वा टीका यासाठी. नाव न घेता जनरलाईज पोस्ट करायची पण रोख एका विशिष्ट व्यक्तीवर, हा बुरख्यातला पळपुटेपणा मी कधीही केला नाही. त्यामुळे असले प्राणी गेले तर उनकी जै जै म्हणून सोडून देत आलो आहे.

काही लोक तर फक्त तुमच्याशी पंगा घेण्यासाठीच तुमच्याशी जोडून घेतात. अशा व्यक्तींची मानसिकता नक्की काय असते याबाबत कुतूहल आहे. म्हणजे आयुष्यातील आपल्या दगदग, कामाचे, घरचे ताण यातून आपण समाजमाध्यमावर येतो. तिथे पुन्हा हटकून वाद घालण्याची सोय करण्याची, डोक्याचा ताप आणखी वाढवण्याची उठाठेव हे लोक का करत असतील? माझे म्हणणे मान्य तंतोतंत मान्य करत नाहीस तोवर तू पुरेसा तटस्थ नाहीस, तिकडचा आहेस. दुसरीकडे 'तिकडच्यांच्या सोयीचे दहा टक्के तू बोलतोस म्हणून तू आमचा नाहीस' हे तिकडचे म्हणणार. ’माणूस हा बुद्धी विकसित झालेला, पण अक्कल अजूनही खुरटलेला प्राणी आहे’ असे मी म्हणतो ते त्यासाठी.

दाऊद इब्राहिमला उत्तम गाता येत असते तरी मी त्याची त्याबद्दल प्रशंसा केली असती. त्यातून त्याच्या कृष्णकृत्यांचे समर्थन करता असे म्हणणार्‍या विचारशून्यांच्या मताला मी हिंगलून विचारले नसते. अडवानींनी मला समाजवाद उत्तम समजावून दिला असता, तर मी त्याबद्दल त्यांची वाखाणणी केली असती. मार्क्सची सारी मते पटत नसली, तरी त्याने त्याला अपेक्षित व्यवस्थेसाठी प्रथमच वापरलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनासाठी (holistic approach) मी त्याला दाद दिली.

संघाची नि माझी वैचारिक झटापट सर्वज्ञात असून त्यांचे एकमेवाद्वितीय असे संघटनकौशल्य डोके ठिकाणावर असलेल्या कुणालाही नाकारता येणार नाही. अलिकडे अर्धवट पुरोगाम्यांकडून सतत माफीवीर (ऐतिहासिक तथ्याबद्दल माझे काही म्हणणे नाही, आक्षेप वृत्तीबद्दल आहे) म्हणून हिणवले जाणारे सावरकर हे हिंदुत्ववादी असले म्हणून मला प्रात:स्मरणीय वगैरे अजिबात नसले, तरी त्यांनी भाषाशुद्धीच्या क्षेत्रातील, साहित्याच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मी नाकारणार नाही.

राजकारणाच्या क्षेत्रात नेहरूंइतके उत्तुंग, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व भारतात दुसरे एकही सापडणार नाही असे माझे मत आहे. पण त्याचवेळी ते जनतेचे नेते असले तरी, काँग्रेस पक्षांतर्गत बहुसंख्येचे नेते नव्हते हे नाकारत नाही. पण असे म्हणताना बहुसंख्येने निवडलेला नेता कर्तृत्ववान असता असा अपलाप करणार्‍या नेहरुद्वेष्ट्यांशीही मतभेद व्यक्त करतो.

गांधीबाबाने राजकारणाची धर्माशी घातलेली सांगड मला मान्य नाही. पण 'माणूस नैतिक पातळीवर बदलला नाही तर कोणतीही व्यवस्था उभी राहाणार नाही' या त्याच्या दृष्टिकोनाशी मी तंतोतंत सहमत आहे. भांडवलशाहीच्या ’निकोप स्पर्धाव्यवस्था’ संकल्पनेला आणि दुसर्‍या टोकाला असलेल्या कम्युनिस्टांना अपेक्षित जनसंघटनांच्या स्वरूपातील समाजाला स्थिर ठेवायचे असेल, तर त्याचा पाया गांधीबाबाच्या या तत्त्वाने जाऊनच बळकट होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. अन्यथा 'निकोप स्पर्धा' नावाचे काही अस्तित्वात राहात नाही, (ज्याचा अनुभव आपण पदोपदी घेतच असतो) आणि ’एकमेका साह्य करु’ या गृहितकावर उभ्या असलेल्या साम्यवादी समाजाला स्वार्थाची वाळवी केव्हाच पोखरुन जमीनदोस्त करते. दंडशक्तीच्या आधारे एखादी व्यवस्था स्थिर ठेवता येईल यावर, ज्यांच्या हाती ती दंडशक्ती आणि इतरांचे मेंदू आहेत केवळ त्यांचाच विश्वास असू शकतो.

थोडक्यात काय सर्व रंगाच्या, इझमच्या, बाजूच्या लोकांच्या दृष्टीने मी एक तंतोतंत परका माणूस आहे. माझी मानसिक जडणघडणच तशी आहे. विचाराने नास्तिक (वैफल्याने नव्हे!) झालेल्याला जसे पुन्हा आस्तिक होणे शक्य होत नाही तसेच ही घडण बदलणे मला शक्य नाही.

तेव्हा एक मत पटले म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची किंवा न पटले म्हणून याला चांगला फैलावर घेऊ म्हणून वादाच्या खुमखुमीनेही पाठवू नका बाबांनो, तायांनो. पुढच्या अपेक्षाभंगातून वादंग, कुत्सितपणा, भांडणे, अक्कल काढणे होणार असेल तर (फेसबुकने) दिल्या भिंतीवर सुखी राहा. आम्हीही राहतो.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा