गेल्या पंचवीस-एक वर्षांचा काळ हा आपल्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवणारा ठरला. नव्वदीच्या दशकात बंदिस्त व्यवस्थेच्या काही खिडक्या उघडल्या जाऊन 'जागतिकीकरण' या नव्याच व्यवस्थेने या देशात हातपाय पसरायला सुरुवात केली. या बदलाचा एक मोठा भाग व्यापला तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीने. गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात आपल्या दारी आलेल्या संगणकाने आणि या शतकाच्या सुरुवातीला जणू आपल्या हाताला सहावे बोट असावे असा चिकटून राहू लागलेला 'मोबाईल' या दोन महत्त्वाच्या आयुधांनी आपल्या जगण्याचे आयाम बदलले, व्याप्ती बदलली.
जुन्या व्यवस्थेच्या पाईक असलेल्यांना हे बदल कुठे रुचेनासे झाले, 'माणसे -मोबाईल नि संगणकावर - खूप बोलू लागली आणि संवाद कमी झाला' असा आक्षेप या नव्या जीवनपद्धतीवर घेतला जाऊ लागला. पण या पलिकडे जाऊन तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलही घडवले. माहिती क्रांतीने अभ्यासाचा, संशोधनाचा वेग कमालीचा वाढला, इतर सुखसोयी नि आर्थिकदृष्ट्या अनेक बदल घडले. कुणी याला समृद्धी म्हटले तर कुणी या समृद्धीच्या विषम वितरणावर बोट ठेवले. अशा या साधकबाधक चर्चेमधून सर्वसामान्य लोक या नव्या जगण्याकडे पहात असताना साहित्याच्या क्षेत्रातही लोक याकडे कुतूहलाने पाहू लागले होते.
या बदलांच्या आर्थिक, व्यावहारिक परिणामांबरोबरच कौटुंबिक, सामाजिक परिणामांनाही तपासून पाहू लागले होते. जगण्याच्या कक्षा रुंदावल्या असे म्हणताना त्याच कारणांनी जगण्याची खोली मात्र उणावली का असा मार्मिक प्रश्नही विचारला जाऊ लागला. या नव्या व्यवस्थेच्या संदर्भात काही जुन्या जाणिवा, काही इजम, काही संकेत आणि काही रूढी व्यवस्था नव्याने तपासून पहायला हव्यात याची जाणीव कवितेसह अन्य साहित्यातूनही दिसून येऊ लागली.
उत्पलची कविता हे जगण्याचे नवे संदर्भ घेऊन उभी आहे. परंतु ती निव्वळ संदर्भ नवे आणत जुन्याच जाणिवांच्या नव्या आवृत्त्या समोर मांडत नाही तर निव्वळ मुद्द्यांपलिकडे जाऊन त्याबरोबर येणार्या जाणिवा साथीला घेऊन उभी राहताना दिसते. ढोबळमानाने पाहिले तर तिला सामाजिक जाणिवेची कविता म्हणता येईल, त्यात अधेमधे मार्क्सवादी जाणीवही स्पष्टपणे दृग्गोचर होते. परंतु त्यातही स्वतःला पडताळून तपासून पाहताना ती वैयक्तिकही होते.
जुन्या काही चौकटींना, काही विचारव्यूहांना गैरलागू ठरवण्याइतपत आजचं सामाजिक वास्तव खरंच बदललं आहे का? समृद्धीच्या, नव्या व्यवस्थेच्या रेट्यामधे त्यात खरंच इतका मूलभूत बदल झालेला आहे का की ती पार्श्वभूमीच धूसर झालेली आहे किंवा नष्ट झालेली आहे? हे आणि असे प्रश्न नव्या-जुन्या जगण्याच्या चौकटींसंदर्भात उत्पल विचारतो आहे आणि त्यांच्या अनुषंगाने त्याच्या कवितेची वाटचाल होते आहे.
आजच्या आपल्या जगण्यातल्या अन्य व्यावहारिक भाषांच्या प्रभावाखाली असलेल्या संभाषणभाषेचाच वापर कवितेसाठी केला आहे. सामान्यपणे आपण ज्या भाषेत संभाषण करतो त्याच भाषेत ते समोरच्यापर्यंत अधिक सुलभतेने पोहोचते. तेव्हा इथे कवितेला प्रमाणभाषेचे वळण देण्याचा दुराग्रह टाळला आहे. निव्वळ व्यावहारिक भाषाच नव्हे तर नव्या जगण्याचे बरेच संदर्भ घेऊन ही कविता उभी राहते आहे. एका बाजूने अनुभवाशिवाय आवृत्त होत परिणामशून्य होत जाणारी कविता नि दुसरीकडे नवतेचे अवडंबर माजवत अट्टाहासाने नव्या संदर्भांची ठिगळे जोडत जुन्याच जाणिवांना सादर करणारी बनचुकी कविता या दोन्हींच्या वाटे न जाता संदर्भाबरोबरच नव्या जाणीवाही घेऊन उत्पलची कविता उभी राहिली आहे.
जसे ती वापरून गुळगुळीत झालेल्या प्रतिमांना, विशेषणांना, कल्पनाविस्ताराला फाटा देते तशीच ती कोणतीही नवी परिभाषा अथवा प्रतिमासृष्टी निर्माण करत नाही. निव्वळ नोंदवत जाण्याच्या आणि त्यातल्या मथितार्थाकडे निव्वळ अंगुलिनिर्देश करण्याच्या साध्यासोप्या शैलीतूनही कविता परिणामकारक होते.
ही कविता असली तरी रुढार्थाने काव्य नाही. हिची पठडी तशी मुक्तच्छंदाला प्राधान्य देणार्या नवकवितेचीच. पण असे असतानाही यात प्रश्नांना विध्वंस, विद्रोहाचे अथवा धिक्काराचे उत्तरे देणारी, त्यांना जणू अपरिहार्य मानणारी अगतिकता किंवा विचारहीन प्रतिक्रियात्मताही नाही. ही कविता प्रश्नांची आहे, अनुभवांची आहे तितकीच जाणिवेची नि विचारांचीही. भवतालाशी निगडीत असलेल्या आपल्या बंधांची, त्या भवतालातील घटकांप्रती आपल्या संबंधांविषयी, कार्यकारणभावाविषयी प्रश्न निर्माण करत त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ती करते आहे, क्वचित निव्वळ साक्षीभावानेच जगल्याची खंतही ती व्यक्त करते आहे.
ही कविता निव्वळ शाब्दिक मांडणीपलिकडे जाऊन अनुभूतीच्या पातळीवर नेणारी आहे. विषय अनेकदा आपल्या परिचयाचा, त्यातून होणारी अनुभूती व्यक्त करणारे, इतरांपर्यंत पोचवणारे शब्द मात्र सहजता 'मागुते' येत नाहीत असे बहुधा घडत असते. उत्पलला मात्र ही समस्या भेडसावत नसावी. 'अर्थामागुन शब्द' सहजपणे येताना दिसतो. 'स्वतःत गुंतून पडलेलं राजस सुख' तर कधी 'आकाशाकडे कढंत डोळ्यांनी पाहणारं दु:ख' असो (कविता-१, पृ. १९). तो कढंत हा शब्द इतका नेमका भाव दाखवतो की तुकड्यांची गोधडी होऊन पडलेल्या जमिनीवर बसून नितळ आकाशाकडे डोळे लावून बसलेला सुकल्या शरीराचा, भकास नजरेचा, हताश चेहर्याचा एखादा अभागी शेतकरी चटकन डोळ्यासमोर उभा राहतो. याआधी सुखासाठी वापरलेले 'राजस' हे विशेषण हा विरोधाभास अधिकच टोकदार करून जाते. 'कधी कुणावर तुटून पडणारं जन्माचं निलाजरं सत्य' असं म्हणतो तेव्हा त्या दाहक अनुभूतीला किमान पण नेमक्या शब्दांचं कोंदण देऊन जातो.
दिवसेंदिवस आत्मकेंद्रित, लहानशा वर्तुळात बंदिस्त करत नेणार्या जगण्याला 'कवितेचा कागद' म्हणणे ही एक अपूर्व कल्पना आहे. कवितेमधून उमटणारे विषय, जाणीवा, विचार हे ज्या जगण्यातून येतात ते जणू त्यावरच उमटतात असे म्हणता येईल. या पाठोपाठ 'कागद आखडू दे, कविता नको' असे म्हणताना या जगण्याच्या आखूड होत चाललेल्या वर्तुळाने माझ्या जाणिवांचा विस्तारही आखूड होऊ नये अशी आशा तो व्यक्त करतो आहे. (कविता-२ पृ. २०) घोडा हे एक दु:ख पचवणार्या पण मूक राहणार्या जनतेचे दु:ख मांडणारे प्रतीक. भवताली जमणारे नि त्याच्या दु:खावर कोणताही उतारा न काढता निव्वळ चर्चाच करत बसणारे वीर हे आजच्या जगाचे एक प्रातिनिधिक चित्रच बनून जातात.
संगणक हा आजच्या जगाच्या जवळजवळ दुसरा प्राणवायूच ठरू पाहतो आहे. ब्राऊजरच्या खिडकीतून सार्या जगाकडे पाहणारी आजची पिढी साहजिकच जगण्याचा विचारही त्या संदर्भात, त्या परिभाषेत करू लागली आहे. याचा सुरेख आविष्कार 'टॅबबाधा' या कवितेमधून उमटला आहे. संगणकाच्या ब्राउजरवर एकाच वेळी एकाहुन अधिक 'टॅब्ज' चालू करता येतात, ज्यात एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांच्या, दृष्टिकोनांचा, माहितीचा स्रोत असणार्या साईट्स पाहता येऊ शकतात. ब्राउजर प्रमाणेच मल्टि-टास्किंग (multi-tasking) हा आजच्या जगण्यातील अपरिहार्य भाग होऊ पाहतो आहे. एकरेषीय, एकदिश जगणे हळूहळू मागे पडते आहे. त्या बहु-आयामी जगण्याचे विपरीत परिणामही भेडसावू लागले आहेत. या सार्यांची जाणीव करून देताना उत्पलने याला 'टॅबबाधा' असा विलक्षण समर्पक शब्द वापरला आहे.
जागतिकीकरणाने जसे भूगोलाच्या सीमा ओलांडून अनेक देशांना व्यापाराच्या धाग्याने बांधून घातले नि देशांच्या भिंती संकेतार्थाने का होईना मोडून टाकल्या, तसेच दूरचित्रवाणी ऊर्फ टीवीच्या शोधाने 'महंमदाला पर्वताकडे जायचे' कष्ट न देता पर्वतच महंमदाच्या दिवाणखान्यात येऊन बसू लागला. त्याचा पुढचा टप्पा असलेला संगणक तर त्या पर्वताला माणसाच्या मुठीतच घेऊन आला. या टेलिविजन नावाच्या क्रांतिकारी उपकरणाने अनेकांना एकाच वेळी एकाच कार्यक्रमाचा, सादरीकरणाचा आस्वाद घेता येऊ लागला. त्यातून उमटणार्या संवाद-चित्रांतून काही तुमच्या आमच्या जगण्यातही रुजू लागले.
संस्कार, वारसा आणि शिक्षण या पलिकडे जगण्याला आकार देणारे, किमान त्याचे एक प्रतिबिंब दाखवणारे एक माध्यम माणसाच्या हाती लागले. याचा आणखी एक फायदा असा की दोन तासांच्या चित्रपटांत न बसवता येणारे दीर्घ व्याप्तीचे विषय अनेक 'एपिसोड्स' मधून मांडता येण्याची सोय झाली. 'फ्रेंडस' ही अशीच एक प्रसिद्ध मालिका. यातून अर्वाचीन अमेरिकेतील तरुण पिढीचे जगणे, विशेषतः त्यांचे कौटुंबिक, लैंगिक आधार, त्यासंबंधीचे दृष्टीकोन यावर मार्मिक भाष्य केले गेले आहे. उत्पलच्या विचक्षण दृष्टीने या 'फ्रेंडस'च्या जगण्याला भारतीय जगण्याच्या शेजारी आणून उभे केले आहे. त्यातून 'टु द फ्रेंड्स' नावाची एक विलक्षण धारदार दीर्घकविता आकाराला आली आहे. या मालिकेतल्या 'या सहा जणांजवळ जरा बरं वाटत असतं' असं म्हणताना कवी आम्हा सर्वसामान्यच नव्हे तर थोडे जागरुक असणार्यांच्याही मानसिकतेवर अचूक बोट ठेवतो. फ्रेंड्स'मधील त्या सहा पात्रांचे जगणे, कोणत्याही इजम, वारसा वा पुस्तकाच्या बाता न मारता समोर येतील त्या प्रश्नांना भिडणे, परस्पर सहकार्याने त्यावर उपाय शोधणे, ते अंमलात आणणे याच्यासह तो समोर ठेवतो.
'काल्पनिक असले तरी प्रातिनिधिक आहेत' हे बजावतानाच त्या पार्श्वभूमीवर इथे काय सापडते हे तपासताना 'या भूमीत सहजीवन मेलं, लग्न टिकून राहिलं' हे वास्तव नोंदवून जातो. "या भूमीने अध्यात्म सांगितलं | आणि विधवांना जाळलं'|" किंवा 'या भूमीने विचार दिले | आणि विचारांना अग्नीही दिला..." असा या भूमीपुत्रांच्या वर्तनातील विरोधाभास दाखवतो आणि त्याच वेळी "या भूमीत संशोधन फुटकळ होत गेलं | आणि संशोधनाचा उपभोग घेणारे वाढत गेले | या भूमीत आयफोन अवतरले | तेव्हा स्क्रीनसेवर म्हणून बुवा-महाराज अवतरले|" असं या त्यांचं नवतेला स्वार्थापुरतेच जवळ करत भूतकाळाच्या, परावलंबित्वाच्या कर्दमातले रुतलेपणही.
अर्वाचीन कविता कवितेच्या पारंपारिक चौकटी, संकेत मोडू पाहते. शृंगारालाही मागे सारत ती संभोगाबद्दल थेट भाष्य करते. त्याही पुढे जाऊन त्या संभोगालाच चरितार्थाचे साधन बनवून त्याला देहव्यापाराच्या पातळीवर आणून बसवणार्या जगण्याबद्दलही बोलते. उत्पलची कविता त्या जगातल्या स्त्रियांबद्दल बोलताना, त्याचे विविध आयाम तपासताना ती अडखळत, चाचरत हातचे राखून तर बोलत नाहीच पण चौकटी तोडण्याच्या कोणत्याही नेमक्या दृष्टिकोनाशिवाय उमटणार्या निव्वळ अभिनिवेशी, विद्रोही वा विध्वंसाची होऊन रहात नाही. जाणिवेचे नि विचाराचे अस्तर घेऊनही ती उभी आहे. ती निव्वळ भद्र समाजाला नकोसे वास्तव अंगावर फेकून त्यांचा मुखभंग करण्यात समाधान मानणारी नाही. एका विचक्षण दृष्टीने त्या वास्तवाकडे पहात त्याच्याशी कुठेतरी जोडून घेऊ पाहणारी, ते उमजून घेऊ पाहणारी आहे.
देहव्यापार करणार्या स्त्रियांच्या जगण्याचा वेध घेणार्या, त्यातील विदारकतेला मांडणार्या, क्वचित त्यातील रोकठोकपणाला सुखवस्तू आयुष्यातील दांभिकतेशेजारी मांडून पाहणार्या कविता अनेकदा वाचण्यात येतात. पण त्याहीपलिकडे जाऊन त्या स्त्रियांच्या नजरेला नजर देत त्यांच्यातील माणूस, त्यांच्या जाणिवा जाणून घेण्याचा प्रयत्न उत्पल करतो आहे. त्या रोकठोक व्यवहारासमयीदेखील मनात धडका देणारा मार्क्स, फेमिनिजम आणि मुख्य म्हणजे गांधी यांच्या प्रयत्नांतून एका लख्ख क्षणी त्या उपभोग्य वस्तूमागचं दिसलेलं हाडामासाचं माणूस, त्याच्या जाणिवेचे तिच्याही मनात उमटलेले प्रतिबिंब म्हणजे 'अवस्था' ही कविता. त्याच माणसाचे एक स्त्री म्हणून आसुसलेपण, लहानग्या प्रती दिसलेली आणि निव्वळ साक्षीभावानेच अनुभवता येणारी ती ओढ 'खूप लोक' मधून मांडली जाते तर 'सवाष्ण' आणि 'बुधवार पेठ' या कविता आणखी काही पैलूंचा वेध घेतात.
तिच्या गृहित सामाजिक स्थानापलिकडे - किंवा त्याच्या अभावाकडे - असलेल्या तिच्या स्थानाचा अथवा 'रोल'चा वेध घेतात आणि तिच्या त्या अस्तित्वाच्या उरलेल्या समाजाशी मिसळून गेलेल्या पण त्याच समाजाकडून अनुल्लेखाने दडपल्या जाणार्या धाग्यांचाही. 'बाईच बायको | बाईच वेश्या | रूपे न कुणास | टोचतात' असे म्हणताना भूमिका कोणतीही असली तरी शेवटी तिच्याकडे पाहण्याची नजर अनेकदा तिच्याकडे निव्वळ बाई म्हणूनच पाहते असे हे सनातन सत्य सांगून जाते तर याच संदर्भात 'म्हणावे रांड | हरवावी माया | अन् शोधावी मुक्ती | धर्मग्रंथी |' असे म्हणत समाजमनाच्या दुभंग मानसिकतेवर बोट ठेवते.
'सत्य म्हणजे काय?' स्वतःला विचारशील समजणार्या मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातील कदाचित सर्वात सनातन प्रश्न असेल. उत्पलने नव्या जगाच्या, नव्या व्यवस्थेच्या संदर्भात आपल्या कवितेच्या माध्यमातून त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. दोन भागात लिहिलेली अभंगांच्या पठडीतली 'सत्य' ही कविता एकाच वेळी व्यापक नि खोलही. कवितेचे माध्यम असल्याने नकळत येणारी शब्दसंख्येची मर्यादा अशा विस्तृत व्याप्तीच्या नि मूलगामी स्वरूपाच्या विषयाबाबत जाचक ठरणे साहजिकच आहे. त्याच बरोबर नव्या धकाधकीच्या जीवनपद्धतीला अनुसरून अल्पाक्षरी होत जाणारे साहित्य हा अपरिहार्य परिणाम आहेच.
त्यातच अभंगाच्या धाटणीने लिहित असल्याने शब्दसंख्येचा अचूक वापर करण्याचे भान सांभाळावे लागते. उत्पलची 'सत्य' ही कविता व्याप्ती आणि खोली या दोन्ही बाबतत पुरेपूर न्याय देते असं म्हणावं लागेल. आठदहा शब्दांत एक एक विषय, एक संदर्भक्षेत्र मांडून दाखवणे हे शिवधनुष्य त्याने लीलया पेललेले दिसते. 'सत्य पंचतत्त्व | सत्य गुणसूत्र | सत्य अणुस्फोट | पृथ्वीवरी |' अशी त्याची अमर्याद व्याप्ती अजमावत असतानाही 'रक्तनलिका सत्य | रक्तपात सत्य | रक्तद्वेष सत्य | अंतरात |' अशी जगण्याच्या मूलभूत प्रेरणांवरही भाष्य करत जाते. पुढे राष्ट्रवाद, भूकबळी, शेतकर्यांच्या आत्महत्या, वांशिक हत्या, भाषित्/विभागीय/ जातीय भेदाभेद इ. विषयानाही स्पर्श करते. निव्वळ घटना, वास्तव यांच्यापाशीच न थांबता 'सत्य मुक्त नाही, मेंदूचा तुरुंग| सत्त्याची सीमा, सापेक्षता|' असे भाष्य करते किंवा 'रॅशनल सत्य | नोशनल सत्य | अंतिम क्लॅरिटी | कम्फ्यूजन|' असे म्हणत त्या शोधाची परिणतीही मांडून जाते आहे.
'रिव्हेंज' ही एक अफलातून कल्पना आहे. कविता लहानशीच नि कल्पनाही. पण त्यातून उमटणार्या अनुभूतीची व्याप्ती जितकी मोजाल तितकी व्यापक. जगाच्या रहाटगाडग्यामधे अनेक संदर्भ लुप्त होतात, व्यवस्थांचे नीतीनियम बदलतात, त्या व्यवस्थांचे भागधारक बदलतात, किंवा ते भागधारक तेच राहून त्यांचे फक्त गुणधर्मच बदलतात. पाहता पाहता 'जुने' काही नव्या व्यवस्थेशी विसंगत, विसंवादी, संदर्भहीन, गैरलागू (redundant) ठरत जाते नि हळू हळू निष्प्रभ, पराभूत होत अडगळीत जाऊन पडते. मग आता या 'जुन्या'कडे आपले अस्तित्व, आपली किंमत टिकवून धरण्यासाठी, त्या अडगळीतून बाहेर येण्यासाठी काय पर्याय राहतात.
एक म्हणजे निमूटपणे आपले भागधेय मान्य करून ते अडगळीतील स्थान स्वीकारायचे. पण हे बहुधा तितके सोपे नसते. खास करून आधीच्या व्यवस्थेत मानाचे पान असलेल्याला तर हे खूपच ताण निर्माण करणारे ठरते. मग तो त्या व्यवस्थेचा निर्माता असेल तर हा अनुभव अधिकच वेदनादायी ठरतो. दुसरा पर्याय म्हणजे अपरिहार्यपणे नव्या व्यवस्थेशी जुळवून घेणे, त्यातल्या नव्या तत्त्वांचा स्वीकार करणे आणि त्यायोगे आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करणे.
या सार्या जगताचा निर्माता, नियंता असलेला देवही आज 'पैसा' या नव्या नियंत्रक व्यवस्थेने पदच्युत केला आहे नि केविलवाणेपणे आपले स्थान किमान पातळीवर टिकावे यासाठी त्यानेच निर्माण केलेल्या त्या जगाला चालवण्यासाठी नव्या व्यवस्थेने तयार केलेल्या निर्बुद्ध, आळशी पण पैसा बाळगून असलेल्या माणसाकडेच नाईलाजाने, लाचारपणे पैसे मागताना दिसतो. हा नव्या व्यवस्थेने जुन्या व्यवस्थेवर घेतलेला एक सूडच आहे. निव्वळ पारलौकिक देव असे न मानता देव हा जुन्या व्यवस्थेचा निर्माता, नियंत्रक नि सामान्य माणूस ही त्या जुन्या व्यवस्थेची निर्मिती, तिनेच पोसलेला घटक या दृष्टीने पाहता ही कविता व्यावहारिक पातळीवर वेगळेच अर्थ समोर ठेवून जाते.
मुख्यतः अर्वाचीन संदर्भांची नि सामाजिक जाणिवांची असली तरी या कवितेला शृंगारविषयाचंही वावडं नाही. पण चंद्र, चांदणे, पाऊस, मोगरा, केवडा वगैरेंना वेठीस धरणार्या पारंपारिक कवितेच्या वाटेने ती जात नाही. "तुझे लांब केस पाहून गुळगुळीत झालेली वाक्य आठवायची | तुझे विभ्रम पाहून जे आठवायचं ते सुद्धा बहुधा क्लिशेच " असं शृंगाराच्या वाटेवरचे आगळे अनुभव मांडत जाते. त्या धुंद, उत्कट, हरवल्या क्षणातही जे उमटलं ते क्लिशे अथवा अगदीच पारंपारिक आहे हे जाणवण्याइतके भानावर असलेल्या कुण्या प्रेमिकाची ही कविता सनातन विषयाला नव्या अनुभवाचे परिमाण देऊन जाते. हे भानावर राहणे कवितेच्याच संदर्भात अनुभवताना "विशेषणांच्या कारखान्यात शिरतानाही | आम्हाला उन्माद असतो सर्वकाही आकळल्याचा | विशेषणे सापडतात आणि इथेही अर्थ निसटत जातात." ("उन्माद") अशी खंत व्यक्त करत जाते.
या सार्या अर्वाचीन कवितेच्या वाटेने प्रवास करताना अचानक 'अवधान' मधेच भेटते. प्रार्थनेचा बाज असलेली ही कविता 'बुद्धिजन्य स्वार्थास माझ्या | दयाघना, अवधान दे' म्हणताना 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी' म्हणणार्या मर्ढेकरांची आठवण करून देते. जगण्याचे नवे संदर्भ टिपत त्याबद्दल विचक्षण दृष्टीने भाष्य करत असतानाच जाणिवेच्या पातळीवर खोल उतरत जाते.
- डॉ. मंदार काळे
(पूर्वप्रकाशितः 'परिवर्तनाचा वाटसरु' एप्रिल २०१५)
- oOo -
पुस्तकः सायलेंट मोडमधल्या कविता
कवी: उत्पल व. बा.
अमलताश बुक्स, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा