-
(कथा, प्रसंग नि एक पात्र काल्पनिक असले तरी अनुभव वास्तव आहे.)
काल घरातील धुलाई निर्जंतुकीकरण द्रव्य (laundry disinfectant) संपले होते. ते आणायचा होते. इतरही लहान-सहान गोष्टी आणायच्या होत्या म्हणून सकाळी-सकाळी अॅमेझॉनच्या दुकानात शिरलो.
आत शिरताक्षणीच तेथील प्रतिनिधीने धडाधड माझ्या मागच्या खरेदी सूचीतल्या वस्तू समोर टाकायला सुरुवात केली. मी म्हटलं, “राजा थांब जरा. मला काय हवे ते मी पाहातो.” तर तो पुन्हा आतल्या दिशेन धावला बरीचशी माहितीपत्रके घेऊन परतला नि डिस्काउंट, एकावर-एक फ्री वगैरे स्कीम्सची माहिती देऊ लागला.
मी म्हटलं, “मला फक्त लॉण्ड्री डिसइन्फेक्टन्ट हवा आहे. बाकी किरकोळ गोष्टी माझ्या मी घेईन.”
“ओ: शोअर सर,” दोन्ही हात कमरेजवळ एकावर एक असे ठेवत तो अदबीने म्हणाला, कंबरेत किंचित झुकून त्याने एक पाऊल मागे घेतले नि धावत जाऊन (या संपूर्ण वाक्यतुकड्याला इथून पुढे मी शॉर्टमध्ये ‘विक्रीअदबनृत्य’ असे म्हणणार आहे) सॅव्हलॉनचा डिसइन्फेक्टन्टची बाटली घेऊन आला. त्याच्या गुणवत्तेबाबत पाच मिनिटे सलग, न थांबता बोलला.
त्याला कसाबसा थोपवून म्हणालो, “अरे मी हा वापरला आहे पूर्वी. मला हाच हवा होता. फुका तोंडची वाफ का दवडतो आहेस?”
“ओ: नो प्रॉब्लेम सर. इट्स माय डूटी सर.” तो पुन्हा विक्रीअदबनृत्य करीत म्हणाला.
“अरे पण तुमचा स्टोअर ब्रॅंड असलेल्या ‘प्रेस्टो’चाही चांगला असतो. तो ही चालेल मला.” पुन्हा विक्रीअदबनृत्य करत तो गेला.
परत आल्यावर ओशाळ्या चेहर्याने म्हणाला, “सर तो आउट-ऑफ-स्टॉक आहे सर.”
“काय लेको, तुमचा स्वत:चा ब्रॅंड आउट-ऑफ-स्टॉक? तुम्हाला धंदा करण्याची अक्कल...”
पुणेकर नि एकारान्त असल्याने मला काडीची अक्कल नसलेल्या ‘व्यावसायिकता’ या मुद्द्यावर मी ही पाच मिनिट पतंग उडवून घेतले नि त्याच्या पाच मिनिटांची परतफेड केली.“बरं ते असू दे. या वेळेसे मी लिक्विड डिटर्जंट पण ट्राय करेन म्हणतो. मला टॉप-लोड वॉशिंग मशीनसाठी लिक्विड डिटर्जंट दे पाहू.”
पुन्हा... विक्रीअदबनृत्य... तो प्लॅस्टिकच्या दोन बाटल्या घेऊन आला.“अरे मला दोन नको आहेत. एकच पुरे.” मी विनोद करण्याचा प्रयत्न केला.
“ओह नो सर. हा कॉम्बो आहे. कॉम्बो म्हणजे दोन्ही जोडीने विकत घ्यायचे,” (तो ही पुण्याचा असावा. त्यानेही शब्दाने माझ्या समजुतीच्या धोतराची एक निरी फेडली.) “१ लि. डिटर्जंट नि १ लि. डिशवॉशर लिक्विड. दोन्ही मिळून तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मध्ये मिळेल.”
“अरे मला डिशवॉशर लिक्विड नको आहे...”
माझे बोलणे पुरे होण्याच्या आत त्याने मागच्या रॅकवरुन तिसरी बाटली उचलली. “सर, १ लि. डिटर्जंट नि १ लि. बाथरुम क्लीनर. १२.५ टक्के डिस्काउंट.” पुन्हा विक्रीअदबनृत्य.“अरे पण अधिक डिस्काउंट मिळूनही मागच्या जोडीइतकेच पैसे द्यायचे आहेत मी.” मी ‘कसं पकडलं’च्या विजयी मुद्रेने म्हणालो.
(विक्रीअदबनृत्य) “नो प्रॉब्लेम सर. मग तुम्ही हा कॉम्बो घ्या. १ लि. डिटर्जंट आणि ५०० मिली सरफेस क्लीनर सर. बेस्ट सेलर सर. लायझॉलपेक्षाही जास्त खपतो. आता तुम्हाला कमी पैसे द्यावे लागतील.”
“... पण लिक्विड अर्धा लीटरच मिळेल.” मी ‘जागरुक ग्राहक’ असल्याचे दाखवून दिले.(विक्रीअदबनृत्य) “नो प्रॉब्लेम सर. तुम्ही असं करा एक लि. डिटर्जंट नि पाच किलो डिटर्जंट पावडर आहे. हे कॉम्बो बेस्ट आहे. पुढच्या तीन महिन्यांत तुम्हाला डिटर्जंट खरेदी करायची गरज नाही. प्री-बजेट किंमतीत खरेदी.” तो विजयी मुद्रेने म्हणाला.
“अरे माणसा, सहा किलो की लीटर की काहीतरी एकदम घेऊन पैसे अडकवून ठेवण्याइतका पैसेवाला नाही मी. बरं ते जाऊ दे. ते बघ, तिथे मला ‘फ्रंट-लोड’ वॉशिंग मशीनसाठी लिक्विड डिटर्जंट बॉटल, रिफील नि पावडर हे तीनही सुटे-सुटे विकले जाताना दिसत आहेत. मला तसे टॉप-लोडचे हवे आहे, ती ही फक्त बॉटल.”
(विक्रीअदबनृत्य) “ओ शुअर सर. दॅट रिमाइंड्स मी. सर टॉप-लोड नि फ्रंट-लोड अशी दोन्ही लिक्विड डिटर्जंट कॉम्बो घेतलात, तर फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट सर.”
“अरे भामट्या, माझ्याकडे एकच वॉशिंग मशीन आहे नि ते टॉप-लोड आहे; मग त्या फ्रंट-लोडच्या डिटर्जंटने मी काय तुला धुवून काढू?” माझी सहनशक्ती सीमेजवळ पोहोचली होती.(विक्रीअदबनृत्य) ‘आय अंडरस्टॅंड सर. सर तुम्ही ती दुसरी बॉटल फ्रंट-लोड वॉशिंग मशीन वापरणार्या एखाद्या शेजार्याला देऊ शकता सर...”
“अरेऽऽऽ पण त्याला हा ब्रॅंड वापरायचा नसेल, तो ‘पतंजलीचा साबणचुराच कसा बेष्ट’ म्हणणारा असेल तर त्याचे काय करु?” मी वैतागाने खेकसलो.(विक्रीअदबनृत्य) (अचानक आयडिया सुचल्याच्या स्वरात...) “सर सध्या ‘समर बोनान्झा’ मध्ये फ्रंट-लोड वॉशिंग मशीन्सवर भरपूर डिस्काउंट चालू आहेत. एलजी...”
“... तुमच्या दुकानात धुपाटणे मिळते ना?” मी जमेल तितक्या जरबेच्या स्वरात विचारले.
अदब विसरुन तो फाफलला नि “येस सर, शोअर सर; थर्ड विंग... सेकंड रॅक...” असं काहीसं पुटपुटला.“अरे माणसा. मला फक्त नि फक्त प्रेस्टोचा टॉप-लोड वॉशिंग मशीनचा लिक्विड डिटर्जंट, सोबत काहीही नाही, असे तू देऊ शकत नाहीस का?” मी जोरात ओरडलो. ते ऐकून कोट घालून इकडे तिकडे उगाचच फिरत असलेला त्याचा मॅनेजर दचकला. काय झाले पाहायला तो धावत आला नि त्याच्या कानी लागला. हा पुन्हा विक्रीअदबनृत्य करीत आत गेला नि एक मोठा कॅन घेऊन परतला. विजयी मुद्रेने मला म्हणाला, “सर हा पाहा, पाच लिटरचा कॅन आहे तुमच्यासाठी.”
आता माझा संयम संपला. “तू नि तुझा तो स्टोअर ब्रॅंड खड्ड्यात जा. मला माझी ती लॉण्ड्री डिसइन्फेक्टंटची बाटली तेवढी दे. बास झालं.”
(विक्रीअदबनृत्य) “ओके सर. एका बाटलीची किंमत दोनशे आठ रुपये तेवीस पैसे. सोऽऽऽ, दोन बाटल्यांची... अम्म्म्म्... चारशे सोळा रुपये छप्पन्न पैसे.”
“गधड्या छप्पन्न नव्हे सेहेचाळी... एक मिनिट. दोन बाटल्या? मला दोन बाटल्या नको आहेत. मी एकच घेतली आहे.”
“सर मिनिमन ऑर्डर दोन बॉटल्सची असते सर.”
मी काउंटर सोडून आत घुसलो नि धुपाटणे विक्रीला ठेवलेले रॅक शोधू लागलो.
-oOo-
टीप:
हा प्रासंगिक अनुभव असला तरी एकुणात अॅमेझॉन हे माझ्यासाठी खर्या अर्थाने अमेझिंग आहे. अनेक समस्या सोडवणारी गॅजेट्स नि वस्तू त्याने मला उपलब्ध करुन दिल्याने माझे आयुष्य बर्याच प्रमाणात सुखकर झाले आहे यात शंका नाही.
शनिवार, २९ मार्च, २०२५
अमेझिंग अॅमेझॉन
संबंधित लेखन
अनुभव
अर्थकारण
प्रासंगिक

स्ट्रँड, पॉप्युलर आणि पुस्तक-व्यवहार
मुंबईच्या प्रसिद्ध ‘स्ट्रँड’ पाठोपाठ पुण्यातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होत असल्याची बातमी वाचायला मिळाली*. मी मुंबईकर नसल्याने स्ट्रँडचा अनुभव नाही, ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कुरकुरीत
उत्तर द्याहटवा