-
(कालच्या नागपूर दंगलीच्या निमित्ताने...)
Photo by Maan Limburg on Unsplashहे जे काही भयंकर घडते आहे ते ‘त्यांच्यामुळे’ यावर समस्तांचे एकमत झाले... . . ... प्रत्येकाच्या मनात ‘ते’ कोण याची व्याख्या वेगळी होती इतकंच. कुणी म्हणाले हे मुस्लिमांचे पाप (आणि रमताराम अर्बन नक्षल आहेत) कुणी म्हणाले हे हिंदुत्ववाद्यांचे पाप (आणि रमताराम छुपे संघी आहेत) कुणी म्हणाले हे बामणांचे पाप (आणि रमताराम मनुवादी आहेत) कुणी म्हणाले हे फ्रस्ट्रेटेड बहुजनांचे पाप (आणि रमताराम ब्रिगेडी आहेत) कुणी म्हणाले हे पुरोगाम्यांचे पाप (आणि रमताराम अंधभक्त आहेत) कुणी म्हणाले, हे मध्यमवर्गीयांचे पाप (आणि रमताराम वर्गद्रोही आहेत) --- रमताराम म्हणाले: तुमच्या बीजातच विष आहे! वांझ राहा रे, वांझ राहा. तुमच्या मेंदूतून, भुजांतून, आणि ज्याच्याभोवती तुमच्या सुखाच्या सार्या कल्पना घोटाळत राहातात, एकशेचाळीस कोटींच्या देशातील तुम्ही ज्याला एकमेव उत्पादक अवयव मानता, त्या जननेंद्रियांतूनही उगवलेल्या, पसरलेल्या मानवी विषवृक्षाच्या फांद्या, मुळ्या सडून, विरुन जाऊ द्या. तुमच्या बीजाला पुन्हा अंकुरण्यास कणभरही ओलावा मिळू देऊ नका. मग ही जमीनही काही काळ वांझ राहील. मग कदाचित नव्या सुज्ञ जमातीचे बीज त्यावर पडेल त्यातून काही काळ– टोळी म्हणून का होईना, बांधिलकी असणारा समाज काही काळ जगेल. मग समाज नावाचे नवे वृक्ष रुजतील, त्यावर आकर्षक रंगांची फुले फुलतील. आता त्यांचे रंग कदाचित भगवे, हिरवे नसतील; लाल असतील, निळे असतील, जांभळे असतील; कदाचित ते आकाशाच्या रंगाचे असतील, कदाचित पळसाच्या लालभडक रंगाची उधळण करतील. ती फुले आकर्षक दिसतील, माणसांना त्यांचा मोह पडेल, ते हात उंचावून त्यांना स्पर्श करतील. त्यांचा हात लागताच, रुईची केळ फुटावी तशा असंख्य म्हातार्या त्यातून हवेत सूर मारतील, आपल्या बुडाला लगडलेल्या नव्या विषवृक्षाच्या बियांसह ज्याला दिशा नाहीत, वाटा नाहीत, पण रुजण्याचे निश्चित उद्दिष्ट मात्र आहे अशा प्रवासाला निघतील या हजारो, लाखो, कोट्यवधी बिया सुज्ञजन आपल्याच हातांनी रुजवतील रंगीबेरंगी फुलांच्या मोहाने मग रुजलेल्या बीजांतून कोट्यवधी विषवृक्ष पुन्हा जोमाने आकाशाकडे झेपावतील... मग रमताराम पुन्हा म्हणतील... वांझ राहा रे, वांझ राहा ! #नागपूर - oOo -
मंगळवार, १८ मार्च, २०२५
वांझ राहा रे
संबंधित लेखन
कविता
राजकारण
समाज
हिंसा

‘ऑल दॅट आय वॉन्ना डू’ : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास
'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या ‘द स्ट्रेंजर’च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रव...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा