-
तो म्हणाला, मी कवी होणारच! मग त्याने कवी होण्याचे प्लॅनिंग केले मार्केट रिसर्च एजन्सीला गाठले, काव्य-बाजाराचा कानोसा घेऊन खपाऊ विषयांवर अॅन्युअल रिपोर्ट बनवून देण्याचे काँट्रॅक्ट दिले सर्वात प्रथम सौंदर्यवादाचा अंगरखा त्याने लपेटून घेतला गारवा, पारवा, मारवाच्या जुड्या बांधून जय्यत तयार ठेवल्या हिरव्या माडांच्या एका बनात वळणावळणाच्या लाल वाटेवर प्राजक्तापासून सायलीपर्यंत, बहाव्यापासून पिंपळापर्यंत सारे समोर राहतील अशा एका घरात मुक्काम हलवला सुलभ मराठी व्याकरणाचे एक स्वस्त पुस्तक आणले मग शब्दांचे मात्रांशी, मात्रांचे आकड्यांशी गणित ठाकून ठोकून जुळवत कविता लिहायला लागला यथावकाश शंभरेक कविता अगदी नेटाने खरडून झाल्या फेसबुकवर शे-सव्वाशे लाईक जमा करू लागल्या एका प्रसिद्ध कवींशी केलेली सलगी एकदाची फळली, आणि कवीने एका काव्यमंचावरुन आपली पहिली कविता म्हटली इतके होताच संग्रहाचे वारे कवीच्या मनात वाहू लागले प्रकाशकाच्या नि ग्राहकाच्या शोधात त्याचे जोडे झिजू लागले संभाव्य ग्राहक नव-कवींशी कवी सलगी करु लागला सुमार कवितांना ’प्रतिभे’चे हार अगदी नित्यनेमाने चढवू लागला. चोख दाम घेऊन पुस्तक छापणार्या एका प्रकाशकाने कवीला स्वत:हून संपर्क केला कवीला स्वर्ग दोन बोटे उरला ’येत आहे, येत आहे’ पुस्तकाची फेसबुकवर जाहिरात उमटली ’वा: वा: किती प्रतिभावंत तू’ प्रतिसादांची माळ खाली लागली पुस्तक एकदाचे हाती आले आपल्या संग्रहाचा एक ग्राहक फिक्स करण्यासाठी ’शेजारी’ कवींनी हातोहात विकत घेतले. नवा एम-आर रिपोर्ट आला सौंदर्यवादाची सद्दी संपून बटबटीत वास्तववादाची बोली वाढल्याचा कल आला. वृत्तांचा जमाना संपल्याच्या खुणाही समीक्षी दिसू लागल्या सौंदर्यवादाचा सदरा उतरवला आणि कवी छंदातून मुक्त झाला वास्तववादाच्या जर्द पिंका 'मुक्तच्छंदातल्या कविता' म्हणून हातोहात खपवू लागला, ’कित्ती धाडसी लेखन’च्या चिठ्या जमा करु लागला. पुन्हा नव्या संग्रहाचे वारे आता कवीच्या मनी वाहू लागले ग्राहकांसाठी आपली स्ट्रॅटेजी बदलणे त्याला भाग पडले जमवलेला कवी-ग्राहकांचा गट आता त्याला जुनाट वाटू लागला ’ओल्ड जेनेरेशनवाले हे’ म्हणत कवी आता नव्या कवितेच्या भिडूंशी सलगी करु लागला लवकरच नवा रिपोर्ट येईल इथून पुढे जमाना कदाचित अनुवादित कवितांचा येईल. सुलभ मराठी व्याकरणासोबत हिंदी, उर्दू, इंग्रजी व्याकरण कवी पुन्हा घोकू लागेल. पुन्हा ठोकठोक करत करत रोखठोक कविता लिहू लागेल आणि नव्या ग्राहकांच्या शोधात कवितेचा विक्रेता फिरु लागेल. - रमताराम
- oOo -
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
मी कवी होणारच!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा