शनिवार, १७ मे, २०१४

जस्मिन क्रांती, सॅफ्रन क्रांती वगैरे वगैरे...

काही काळापूर्वी ट्युनिशियामधे प्रसिद्ध 'जस्मिन क्रांती' वगैरे झाली. (आपल्या देशात येणार्‍या वादळांनाही लाडाची 'कत्रिना' वगैरे नावे ठेवणार्‍यांनीच हे नाव प्रचलित केले होते, यावरून तिची प्रेरणाही चटकन लक्षात यावी.) त्याला जोडूनच इजिप्तमध्येही क्रांती(?) झाली. तिला January Revolution म्हटले गेले.

या दोहोंमध्ये सोशल मीडियाचा सहभाग बराच होता म्हणून बराच गुलाल उधळला गेला. फेसबुकी क्रांतिकारक लगेचच भारावून गेले. (तसे ते नॉस्ट्राडेमसच्या भाकितानेही भारावून जातात नि त्याच वेळी फेसबुकवरच्या आपल्या प्रोफाईलबाबत काही अघटित घडेल अशी भीती दाखवत त्यावर सोपा उपाय सुचवणार्‍या पोस्टस् वाचून देखील. पण ते असो.) त्यांना भारतातही अशी क्रांतीबिती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. असाच एक फेसबुकी क्रांतिकारक लिहिता झाला "आता असे काही आपल्याकडेही घडावे अशी जनतेची इच्छा आहे." (आता जनतेची इच्छा या फेसबुककोंबड्याला* कशी समजली असे विचारायचा मोह मी टाळला.) पण त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेले इथे देतो आहे.

---

JasmineRevolution

'असे म्हणजे काय घडायला हवे आहे? लोकशाही इथे आधीच आहे, कोणीही निरंकुश सत्ताधारी नाही. खुद्द राष्ट्रपतींना 'भांडी घासण्याबद्दल ते पद मिळाले' असे विधान करणारा एक मंत्रीच आहे नि तो अजूनही जिवंत आहे. म्हणजे पुरेसे मतस्वातंत्र्यही आहे. नियमित निवडणुका होतात. त्यातून सरकारे बदलतात. अहिंसक मार्गाचा मुख्य प्रणेताही याच भरतभूमीत होऊन गेला. नि नेल्सन मंडेलांपासून अनेक स्वातंत्र्यसैनिक त्याने दाखवलेल्या मार्गानेच चालत आहे. म्हणजे तो मार्ग - योग्य की अयोग्य त्यावर ज्यांना पुन्हा नव्याने वाद घालायचा असेल त्यांनी घालावा - इजिप्तकडून शिकायची गरज नाही. मग आता त्या म्या पामराला सांगा की भारताने यातून नक्की काय शिकायचे नि काय करायचे?

यावरून एक आठवले. दानिश कनेरिया जेव्हा नुकताच पाकिस्तान क्रिकेट संघात निवडला गेला होता तेव्हा एका मराठी वृत्तपत्रात त्याची मुलाखत आली होती. त्यात तो असे म्हणाला की संघातील एकमेव हिंदू असूनही त्याला इतरांसारखेच वागवले जाते. हे लिहून ती बातमी देणार्‍या दिवट्या पत्रकार महोदयांनी लिहिले होते 'भारतीय संघाने पाक संघाकडून हे शिकले पाहिजे'.

म्हणजे अब्बास अली बेग, मन्सूरअलीखान पतौडी, सलीम दुराणी, सय्यद किरमाणी पासून ज्या क्षणी बातमी आली होती तेव्हा नुकत्याच निवृत्त केलेल्या अजहरुद्दीनपर्यंत जे खेळले ते खोटे मुसलमान होते? का त्यांना संघाने वाईट वागणून दिली होती? यातले पतौडी नि अजहरुद्दीन तर भारतीय संघाचे कर्णधार होते. (आजच्या भारतीय संघातही ज़हीर खान, मुनाफ पटेल, युसुफ पठाण सारखे मुस्लीम खेळाडू आहेतच.) एकुण काय लिहिताना फारसा विचार न करता उगाच एखादा फटकारा मारून द्यायचा.

इजिप्तमधे जे घडले ते सध्या तरी केवळ 'सत्तांतराची सुरवात' एवढेच म्हणता येईल. हे सत्तांतर नाही, क्रांती तर मुळीच नाही. क्रांती म्हणजे एखादा आमूलाग्र बदल. नवा नेता - जेव्हा समोर येईल तेव्हा- असे काही करेलही, पण ते आज घडलेले नाही. किंबहुना दीर्घकाल टिकलेले सत्ताधारी जातात तेव्हा खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे इजिप्तची जनता नि नवे सत्ताधारी कसे देतात यावर जे घडेल त्याचे स्वागत करायचे की पस्तावा करायचा हे ठरेल. काही ठळक मुद्दे मांडतोय, विस्तार करत बसत नाही.

१. दीर्घकाल एकच सत्ताधारी असल्याने प्रबळ राजकीय पक्ष नाहीत. एखादा समर्थ पर्याय देण्यासाठी पुरेसे नेतेच नाहीत.

२. मध्यपूर्वेत बहुतेक इस्लामबहुल राष्ट्रात (तुर्कस्तानचा एखादा अपवाद वगळता) प्रामुख्याने सल्तनत/राजेशाही वा हुकुमशाही व्यवस्था आहे त्यामुळे इथे लोकशाहीचे रोल मॉडेल अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकशाही आपल्यासाठी नाही ते पाश्चात्त्यांचे खूळ आहे हा मूलतत्त्वद्यांकडून होणारा प्रचार मोडून काढणे अवघड आहे.

३. मध्यपूर्वेतील बहुतेक शासनव्यवस्थांवर धार्मिक मतांचा मोठा पगडा आहे. (अपवाद फक्त तुर्कस्तान नि इजिप्त). जिथे नाही, तिथे ती ही प्रामुख्याने अमेरिकेची बटीक सरकारे आहेत (उदा. अफगाणिस्तान, कुवेत, नि आता इराक) त्यांना जनतेचा पाठिंबा आहे की नाही याबाबत शंका घेता येऊ शकेल. मुबारक यांनी जरबेत ठेवलेली ’मुस्लीम ब्रदरहुड’ सारखी संस्था या निमित्ताने - नेपाळमधील माओवाद्यांप्रमाणे - मुख्य प्रवाहात सामील होण्याचे नाटक करून विस्तार करेल नि लोकशाही आपल्याला पुरेशी अनुकूल होत नाही म्हणता पुन्हा आपल्या मूळ मार्गावर जाईल ही भीती मोठी आहे.

४. निव्वळ सत्ता उलथण्याने क्रांती होत नाही, त्यासाठी सत्तांतरापश्चात व्यवस्थेचा आराखडा नि त्या आराखड्याला अंमलात आणणारे नेते आवश्यक असतात. सध्या इजिप्तमधे या दोन्हीचा मागमूस दिसत नाही.

५. आणि अखेरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इजिप्तचे पाकिस्तान होणे. मूलतत्त्ववाद्यांच्या हातात देश जाईल ही भीती घालत जसे मुबारक सत्तेवर राहिले, 'तसेच पुरेसे लायक नेते नाहीत त्यामुळे लोकशाही पुरेशी परिपक्व नाही' असा दावा करत लष्कर सत्ता आपल्या हातात राखू शकते. यातून एखादा नवीन मुबारक, सद्दाम वा झिया-उल-हक निर्माण होईल.

---

आजही 'क्रांती झाली' वगैरे वल्गना ऐकल्या नि आमचा हा जुना प्रतिसाद आठवला. यथावकाश माझी इजिप्तबाबतची भीती खरी ठरली नि इजिप्त मुस्लिम ब्रदरहुडच्या हाती गेला हे वास्तव जाता जाता नोंदवून ठेवायला हरकत नाही! 

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा