काही महिन्यांपूर्वी डॉ. राजीव नाईक यांचे रा.श्री. जोग स्मृती व्याख्यानमालेतील 'आजः नाटक आणि भाषा' या विषयावरील व्याख्याने एका मित्रासोबत ऐकली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या 'बंदिश' या आगामी नाटकाचा ओझरता उल्लेख केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या 'विनोद दोशी स्मृती नाट्यमहोत्सवा'त या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.
एक दोन महिन्यांनंतर एनएसडी'च्या 'Appreciating Theatre' या शीर्षकाखाली झालेल्या कार्यशाळेत हे नाटक पुन्हा एकदा सादर झाले. तिथे नाटकानंतर नाटककार, दिग्दर्शक नि सहभागी कलाकार यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम होता. नाटकासंबंधी काही पैलू इथे तपासले जातील, काही अधिक समजेल म्हणून त्या संवाद-कार्यक्रमालाही उपस्थिती लावली होती. 'मुक्त शब्द'च्या अंकात 'बंदिश'ची संहिता वाचण्यात आली नि त्या निमित्ताने त्या नाटकाबाबतच्या विचारांची पुन्हा एकवार उजळणी झाली.
या तीन अनुभवातून सुटेसुटे वा एकत्रितपणे नक्की काय हाती लागले याचा थोडा वेध घेताना त्यातून निश्चित काही हाती लागले का याबाबत मी साशंक आहे. कदाचित काही अनाम, अपारंपारिक स्वतंत्रपणे नात्यांची वेगवेगळी वर्तुळे तपासण्याचा प्रयत्न असावा असा तर्क करण्यास वाव आहे आणि त्यामुळे एकसंध असे काही चित्र निर्माण झाले नसेल अशी शक्यता आहे. हे खरे असेल, तर तो नाटककाराच्या हेतूचा भाग असल्याचा दावा करता येईल नि तो अगदीच नाकारता येईल असे नाही. काटेकोर मांडणीचे दिमाखदार नेपथ्य - कणेकरांच्या भाषेत 'मोहन वाघांचं असतं, असं त्यांना वाटतं’ तसं - पाहायचे असेल तर अवश्य हे नाटक पहावे हे मात्र नक्की.
निखिल एक मध्यमवयीन विधुर प्राध्यापक, त्याच्या आयुष्यात असणार्या तीन स्त्रिया (आयुष्यात असणे याचा अर्थ स्त्री-पुरुष, नर-मादी, जोडीदार या मर्यादित अर्थाने घ्यायचा नाही!), तिघी वेगवेगळ्या वयोगटातल्या. त्यांच्या पलिकडे सामाजिक, भौगोलिक दृष्ट्या काहीशा अप्रगत पार्श्वभूमी असलेला आणि आरोग्यासाठी हवापालट म्हणून प्राध्यापकांकडे आलेला एक धडपड्या पण काहीस 'अन-पॉलिश्ड' किंवा ज्याचं व्यक्तिमत्व अजून पुरेसं आकाराला आलेलं नाही असा व्यक्तिमत्त्वाचा एक तरुण. या पाच माणसांच्या नात्यांभोवती नाटक विणले आहे, फिरते असे म्हणणे जरा चुकीचे ठरेल.
सुलभा ही एक बर्यापैकी श्रीमंत वर्गातली प्रौढा, तिच्या पतीला पैसे मिळवण्यातून फुरसत नाही. तिची भावनिक, वैचारिक उपासमार होते आहे. ती भरून काढण्यासाठी ती प्राध्यापकांचा आधार शोधते. त्यांच्याकडून विविध प्रकारची पुस्तके ती वाचायला नेऊन एका बाजूने ती आपला वेळ सत्कारणी लावते आहे. तर दुसरीकडे त्यावर प्राध्यापकांशी काही संवाद साधून आपली वैचारिक, सांस्कृतिक भूक भागवू पाहते आहे.
सुलभा मुख्यतः 'क्राईम फिक्शन' वाचते. पण अशी पुस्तके ग्रंथालयातून सहज मिळतात. तिच्या आर्थिक स्थितीबाबत जे सूचित होते त्याचा विचार करता ती पुस्तके सहजपणे विकतही घेऊ शकते. असे असता ती पुस्तके निखिलकडून वाचायला नेते हे काहीसे तिच्या सहवासाची, संवादाची भूक भागवण्याच्या हेतूला सुसंगत दिसते. पण निखिलसारखा प्राध्यापक अशी पुस्तके - वाचण्याबाबत एक वैयक्तिक आवड म्हणून वाचत असेल इतपत ठीक आहे, पण - इतरांना रेकेमेंड करताना त्यात यांचा अंतर्भाव करेल का असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. (की तोही आपल्या न्यूनगंडावर उतारा म्हणून अशा पुस्तकी हिरोंच्या डिटेक्टिव कथा वाचतो आहे असे सुचवायचे आहे?)
तन्वी निखिलच्याच वयाची, त्याच्यासारखीच एकटी पण त्याच्याप्रमाणे एकाकी नव्हे. निखिल या सार्यांमधे राहूनही फक्त स्वतःचा, स्वतःच्या विचारव्यूहातून जखडलेला. त्या अर्थाने या कोणाचाच होऊ न शकणारा. याउलट तन्वी एकटी असली तरी आपल्या पायावर ताठ उभी आहे एवढेच नव्हे तर खुद्द निखिललाही भावनिक आधार तिनेच दिला आहे. त्या नात्याला ती काहीशा औपचारिक, समाजमान्य वा निव्वळ भावनिकतेच्या पलिकडे जाऊन व्यवहारी जगण्याच्या पातळीवरही नेऊ पाहते आहे असे म्हणता येईल.
आजही अविवाहित असलेल्या तन्वीबाबत निखिलच्या मनात पूर्वीपासून कोमल भावना होत्या. परंतु तिला प्रपोज करण्याचे धाडस त्याच्या अंगी नाही. दरम्यान त्याच्या भिडस्त वृत्तीचा फायदा आपल्या मनातील भाव भीडभाड न ठेवता व्यक्त करणार्या बीनाला होतो नि तिच्या लग्नाच्या प्रस्तावाला तो होकार देतो. आज आयुष्याच्या मध्यावर आपल्या त्या भिडस्तपणाने गमावलेल्या वर्षांबाबत त्याला रुखरुख आहे. तसे त्याच्या मनावर आणखी काही खंतींचे, न्यूनगंडांचे अस्तर आहेच, तो त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे.
असे असूनही त्याचा पुरुषी अहंकार अगदीच नाहीसा झालेला दिसत नाही. त्याने बीनाशी लग्न केल्यानंतर तन्वीचे कुण्या सलीमशी भावबंध जुळले होते याची खदखद आज इतक्या वर्षांनंतर, खुद्द तन्वी त्या आठवणी सहज मागे सोडून आल्यानंतरही त्याच्या मनात अजूनही ताजी आहे. तसं पाहिलं तर निखिल हा काहीसा माणूसघाणा नि आत्ममग्न असा माणूस असावा असा प्रथमदर्शनी ग्रह होतो. पण त्याचे हे माणूसघाणेपण हा देखील न्यूनगंडातून येणारा आव आहे का अशी शंका घ्यायला वाव आहे.
'लोकांना मी बोललेलं कळत नाही; त्यांना मी आवडत नाही', 'तसा मी खरंच अनपॉप्युलर आहे. लोक तुच्छतेने बघतात माझ्याकडे' अशी निखिलची तक्रार असते. पण त्याबाबत आपण काही करू शकतो का, किंवा कसे याबाबत तो काहीच बोलत नाही. त्यावर 'त्यांच्याकडे नसलेलं तुमच्याकडे असलं की लोक वैतागतात' अशी समजूत तन्वी घालू पाहते. पण हे तन्वीचे समजावणे वरवरचे किंवा कदाचित पेट्रनायजिंग पातळीवरचे. याशिवाय तो नसलेल्या आरोग्याच्या तक्रारी करत असतो.
त्याला स्वतःच्या कॉलेजच्या दिवसातील आठवणीही नकोशा वाटतात. खरंतर हा काळ बहुतेकांच्या आयुष्यात सर्वाधिक संस्मरणीय असा काळ असतो. शारीरिक नि मानसिक पातळीवर सर्वाधिक सक्षम असल्याचा हा काळ. नव्या जाणीवांच्या, नव्या क्षमतांच्या ओळखी होण्याचा हा काळ. पण निखिलला मात्र त्या काळात आपण काहीच केलं नाही हा गंड सतावतो. त्याअर्थी तो एक 'crying baby' असल्याची भावना नाटकातून उमटते. असं असूनही हे चार लोक त्याच्या भोवती जमतात, त्याचा सहवास त्यांना हवासा वाटतो ही परिस्थिती नक्की कशी निर्माण झाली हे नीटसे उमगत नाही.
एक तन्वीचा अपवाद वगळता इतरांबाबत हे अधिकच प्रकर्षाने जाणवते. त्या बाजूने निखिलचे व्यक्तिमत्व काहीसे धूसर झाले आहे असे वाटते. तन्वी एके ठिकाणी त्याला म्हणते तसा हा एक प्रकारचा paranoia आहे. ती म्हणते 'पूर्वी मुद्दे घेऊन भांडायचास सार्यांशी, आता फक्त माझ्याशी भांडतोस आणि त्यात मुद्देही नसतात. त्यावर त्याचे उत्तर असते 'मी स्वतःशी भांडतो आता.' तेव्हा हा काहीसा संभ्रमावस्थेचा काळ दिसतो. निखिलचे वय विचारात घेता आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे इतर कंगोरे ध्यानात घेता हा आयुष्यमध्याचा घोटाळा (mid-life crisis) असू शकतो.
आजूबाजूला निर्माण झालेल्या एकाहुन अधिक नातेवर्तुळात तो असतो. पण त्यावर त्याचा प्रभाव आहे, त्यात त्याचा काही निश्चित सहभाग आहे का याबाबत मी साशंक आहे. एकप्रकारे या सार्या पसार्यात तो केवळ अस्तित्वमात्र असल्याचीच भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.
जानकी नुकतीच शिक्षण संपवून बाहेरच्या जगात प्रवेश करू पाहणारी, उद्योगपती वडिलांच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतःचे असे स्थान जगात निर्माण करण्याची धडपड करणारी. त्यासाठी प्राध्यापकांशी बोलताना आपले विचार, धोरणे तपासून पाहणारी नि म्हणून त्याला बराचसा फ्रेंड- फिलॉसफर-गाईड या भूमिकेत पाहणारी नि तरीही अधेमधे भावनिक नात्याचे जांभळे मोह अनुभवणारी.
नव्वदीच्या दशकानंतर उदयाला आलेल्या नव्या व्यवस्थेतील नागर पिढी अधिक आत्मविश्वासाने वावरणारी. आपल्याला काय हवे, काय करायचे आहे याबाबत निर्णयाचे स्वातंत्र्य राखू इच्छिणारी आणि त्यामार्गे व्यक्तिस्वातंत्र्याचे नवे आयाम अंगीकारू लागलेली. 'आपली ओळख' निर्माण करण्याची प्रचंड ऊर्मी असलेल्या या पिढीची प्रतिनिधी असलेली जानकी. हवे असलेले स्वातंत्र्य मिळवतानाही ज्यांच्यापासून ते मिळवायचे त्यांच्याकडून येणारे फायदे मात्र नाकारण्याइतकी मनाची तयारी न झालेली. ते फायदे आपल्या गुणवत्तेचा परतावा असल्याची ठाम समजूत बाळगणारी नि इतरांनीही तसेच समजावे असा आग्रह धरणारी.
नाटकाच्या अखेरीस ती या संभ्रमातून, या त्रिशंकू अवस्थेतून निर्णायकरित्या बाहेर पडते असे म्हणता येत नसले तरी त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकते इतके नक्की. परंतु या संक्रमणाचा कार्यकारणभाव मात्र नीटसा स्पष्ट होत नाही. (कदाचित तो तसा शोधणे अपेक्षित नसावे.) नाटकातील कोणत्या प्रसंग, चर्चेचे मुद्दे, अनुभव यातून तिचा प्रवास पुढे जातो हे सुसंगतपणे सामोरे येत नाही. एक मात्र नक्की की व्यक्तिस्वातंत्र्याच्या नव्या जाणीवा घेऊन उभी असलेली ही तरुण मुलगी समूहात, वारसा-परंपरेत आपली ओळख शोधण्याचे नाकारून पुढे जाऊ पाहते आहे.
तशी स्वातंत्र्याची आस ही जानकीप्रमाणेच सुलभालाच्याही मनात आहेच. पण ती आधीच आयुष्याच्या उत्तरार्धात पोहोचली असल्याने जानकीच्या नि तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना नि तिच्या त्यापासून असलेल्या अपेक्षाही जानकीच्या अपेक्षांहून भिन्न असाव्यात.
या सार्यांमधे पाचवा आहे तो योधन, तो तर केवळ हवापालटासाठी म्हणून निखिलकडे रहायला आलेला. सामान्य परिस्थितीतून वर आलेला. त्यामुळे नवी जागा नि तिथले अभिजन, त्यांचे पॉलिश्ड जगणे यात काहीसा घुसमट अनुभवणारा. त्याची सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी त्याच्यामधे एक न्यूनगंड होऊन अवतरली आहे. परंतु निखिलप्रमाणे तो स्वतःशी कुढत बसणारा नाहीच. उलट त्याचा न्यूनगंड आक्रमकतेचे रुप घेऊन अधूनमधून बाहेर पडतो.
या तथाकथित प्रगत लोकांच्या मनात 'चंद्रपूर' हे मागास गाव असल्याची धारणा असल्याचा संशय त्याला असतो. एक दोनदा संदर्भाच्या बाजूने निदान जानकीच्या बाबत तो खराही दिसतो, आणि 'तिच्याकडून' - एक समवयस्क भिन्नलिंगी व्यक्तीकडून - म्हणून तो अधिक खुपतोही. तेव्हा आपला गाव मागास नाही, आपले आईवडीलही - बहुधा हे शहरी लोक समजतात तसे - शेतकरी वगैरे नाहीत, नोकरदार आहेत, चंद्रपुरातही सीसीडी आहेत हे तो आक्रमकपणे सांगू पाहतो. म्हणजे नकळत का होईना त्याने या तथाकथित पुढारल्या लोकांच्या जगण्याचे मापदंड स्वीकारल्याचे दिसते.
पण असे असूनही या सार्यांपैकी तो एकटाच असा आहे तो भावनिक दृष्ट्या कमकुवत नाही, तो बाह्य आधार शोधत नाही. फारसे विचारपूर्वक स्वीकारलेले नसेल पण त्याने आपल्यापुरते आपले आयुष्य कसे असावे हे पाहिले आहे नि ते आपल्याच बळावर उभे करावे लागेल याची अभिनिवेशहीन जाणीव असणारा तो एकटाच आहे. त्याचबरोबर जानकीच्या 'सारे काही असण्याच्या' जिण्याशी स्वतःचे जगणे थोडे ताडून पाहताना 'आपले पुढे काय होणार ?' हा न्यूनगंड त्याच्या मनात आहेच.
पण यात गंमत अशी की योधन आणि जानकी दोघेही तरुण आहेत, भविष्याबद्दल आशावादी असण्याच्या टप्प्यावर आहेत. असे असूनही ते परस्परांशी आपल्या भूतकाळाबद्दल बोलतात, वर्तमानाबद्दल बोलतात पण भविष्याबद्दल बोलताना दिसत नाहीत. हे सहेतुक आहे का मला ठाऊक नाही. एक शक्यता म्हणजे कदाचित त्या भविष्यात आपण परस्परांसोबत नसू ही भीती, तो धोका त्यांना नेणिवेच्या पातळीवर जाणवत असेल का? त्यामुळेच त्यांचा संवाद नकळत तो विषय टाळत पुढे जात असेल असेही शक्य आहे.
निखिल काहीसा आत्ममग्न वा माणूसघाण्या प्रवृत्तीचा असूनही ही चार माणसे त्याच्याभोवती फिरतात, त्याच्या आयुष्याचा भाग होतात. भले त्या नात्यांना नाव नसेल पण निरनिराळ्या पातळीवर त्याला बांधून घेतात. हे घडताना त्यातील निखिलचा वाटा किती? त्याचा स्वभाव पाहता हे बंध कसे निर्माण होतील याबाबत थोडा तर्काचा आधार घेऊन विचार करून पाहता फारशी संगती हाती लागली नाही.
मुळात आर्टस्चा विद्यार्थी असलेला योधन नि फिजिक्सचा प्राध्यापक असलेला निखिल, त्यांच्या वयात वीसेक वर्षांचे अंतर, दोघांची सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी वेगळी. असे असताना ते दोघे नक्की कुठल्या संदर्भात एकत्र आले असावेत नि ते बंध अगदी निखिलसारख्या तुसड्या माणसानेही योधनला आजारपणानंतर हवापालटासाठी आपल्या घरी राहण्यास येण्याचे आमंत्रण देण्याइतपत दृढ कसे झाले असावेत याची काही संगती लागत नाही. असेच काहीसे सुलभा आणि जानकीबाबत म्हणता येईल.
इथे निखिलच्या घरात हे सारे एकत्र येतात हे खरे असले, तरी निखिल त्यांच्यातला निव्वळ दुवा आहे, मध्यवर्ती पात्र नव्हे. हे जरा तर्काने जाणून घ्यावे लागले. कारण नाटकाच्या मांडणीत सुरवातीच्या भागाचा तपशीलवार विस्तार पाहता नि तुलनेने पुढे येणार्या परस्पर नात्यांच्या मांडणीचा वेगवान आणि थोडा विस्तार पाहता निखिल हे मध्यवर्ती पात्र असल्याचेच मनावर ठसले असे म्हणावे लागेल.
कारण निखिल जरी निमित्तमात्र असला तरी इतर सारेच परस्परांशी वेगवेगळ्या नात्याने बांधले गेले आहेत. यातले दोघे-दोघे, तिघे-तिघे एका ठिकाणी असलेली त्यांची स्वतंत्र वर्तुळेही निर्माण झाली आहेत. तो योधन आणि जानकी यांच्यात काहीसे भिन्नलिंगी आकर्षणाचा पदर असला तरी नात्यात बराचशी निर्भरताही दिसते. प्रथमपासूनच त्या नात्यातली तात्कालिकता दोघांना पुरेपूर ठाऊक असावी असे समजण्यास वाव आहे.
तन्वी आणि सुलभा या दोघी प्रौढ स्त्रियांच्या नात्यातही कुठे प्राध्यापकांच्या संबंधाने स्पर्धा-भावना दिसून येत नाही. जरी दोघींच्या नात्याचे स्वरूप भिन्न असले तरी त्या नात्यातून येणारी वर्चस्वाची भावना निदान सूक्ष्मरूपात उमटतेच. अगदी माय-लेकींमधेही स्पर्धा असते, बाप-लेकामधे स्पर्धा असते, सासू-सुनेत तर असतेच असते. अशीच स्पर्धा मित्रा-मित्रांमधे असते. मित्र-मैत्रिणींच्या एका गटात एखाद्याला आपण झुकते माप देतो या समजातून दुसर्या कुणाच्या मनात अढी असू शकते. या ना त्या प्रसंगी त्याचे प्रत्यंतर येत असते. तिचा पूर्ण अभाव नि त्या दोघींत पूर्ण सामंजस्य ही काहीशी न पटणारी मांडणी निदान मला तरी वाटली.
नात्यांच्या या सार्या गुंफणीत हक्काच्या, स्वामित्वाच्या भावनेचा पूर्ण अभाव हा काहीसा आश्चर्यजनक वाटला. इतक्या प्रकारच्या नात्यांमधे एकाही नात्यामधे अशी भावना निर्माण होऊ नये हे काहीसे अवास्तव वाटले. अर्थात नात्यांचे सारे बंध तपासण्याचा हेतू नाटककाराच्या दृष्टीकोनाचा भाग नसेलही. खरंतर हाच मुद्दा आहे की नाटकाची दिशा, दृष्टीकोन नीटसे स्पष्ट न झाल्याचे नक्की कशाची अपेक्षा ठेवावी हे ठरवणे अवघड होऊन बसले.
चौथा प्रवेश सर्वस्वी तात्त्विक चर्चेचा दिसतो. पण त्या चर्चेला निश्चित अशी दिशाच दिसत नाही. निव्वळ एका मुद्द्यातून दुसरा निघत जातो. 'सेक्सला इमोशनल अस्तर असते' किंवा 'शरीराला मनाचा सपोर्ट नको का?' किंवा 'संस्था नको वाटतात आणि व्यक्ती पुरत नाहीत' यासारखी वाक्ये चर्चेत येतात पण त्यांना आधार देणारे कोणतेही संदर्भ उभे रहात नाहीत. तेव्हा मग वपुंच्या कथेत काहीवेळा येणार्या चमकदार वाक्यांसारखी ती उपरी होऊन राहतात.
संस्था किंवा गट यांच्या संदर्भात तन्वी एकदा म्हणते 'तू वन टू वन ओके असतोस तर एकत्रितांचे वावडे का?' हा तिचा प्रश्न चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकू पाहतो पण तिथेच थांबतो. 'पण असं (एकत्रित असं) असतं का काही?' हा प्रश्न विचारण्यापलिकडे निखिल काहीच बोलत नाही. तेव्हा तो समूहाच्या अस्तित्वाबाबतच प्रश्न निर्माण करतो आहे का असे वाटू शकते, पण पुढे त्याच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे जसजसे स्पष्ट होऊ लागतात, तसे हा प्रश्न वैचारिक नसून आत्मसंभ्रमाशी निगडित असावा का असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
नैतिकतेच्या, सेक्सच्या न-नैतिकतेच्या इ. विविध विषय पात्रांच्या बोलण्यात येतात, पण त्यातील एकाही विषयाचा कुठे विस्तार होताना दिसत नाही. इतके चर्चाविषय येऊन जातात, पण कुठल्याच बाबतीत ते खोलात शिरताना दिसत नाहीत. वरवरची विधाने करत निश्चित कोणत्याही दिशेविना एका मुद्द्यावरून दुसर्या मुद्द्यावर उड्या मारत गेल्यासारखे भासते. मुळात हे नाटक असल्याने दीर्घ चर्चा करणे हा हेतू नसेल हे समजण्यासारखे आहे पण निदान मुद्दा ससंदर्भ उभा रहावा इतकी अपेक्षा अगदीच अस्थानी म्हणता येणार नाही.
बरं इतक्या अॅकॅडेमिक पातळीवरच्या चर्चा अचानक 'सर गप्प बसले की झाडेही गप्प बसतात' किंवा 'या घराचं नाव पारिजात कुणी ठेवलं' वगैरे अतिभावनिक कल्पनांपाशी कशा पोचतात हे अनाकलनीय. बरं या भिन्न पातळीवरील चर्चा वेगवेगळ्या वर्तुळात घडल्या, तर त्यावर त्या त्या वर्तुळातल्या नात्यांच्या जातकुळीचा प्रभाव म्हणता होईल. वेगवेगळ्या वर्तुळातील नात्यांचे पदर, त्यातील फरक हे देखील नेमकेपणे उभे राहात नाहीत.
या अशा अनौपचारिक नि निश्चित विषयाशी बांधील न राहता घडणार्या चर्चा कॉलेजच्या कट्ट्यावर, कदाचित एखाद्या नेहेमीच्या अड्ड्यावर, एखादा कार्यक्रम उरकल्यावर रात्रीच्या कोलाहलविरहित वेळेला जमतात. त्यातून काही उमटतं, फारच थोडं शिल्लक राहतं नि बाकीचं सांडून जातं.
पण जेव्हा अशी चर्चा नाटकाचा वा एखाद्या संहितेचा भाग होते तेव्हा तिला इतके दिशाहीन राहणे परवडेल का? इतक्या वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत चर्चा होतात - किंवा त्यासंबंधीची चार वाक्ये उच्चारली जातात, प्रश्न विचारले जातात, उत्तरे दिली जातात, प्रतिवादही केले जातात - पण त्यात नाटकाची दिशा, हेतू स्पष्ट होत नाही. या पाचांचे भावनिक नातेसंबंधांची वर्तुळे तपासणे, त्याचे रंग उलगडणे हा हेतू असेल, तर अनेक रुक्ष अॅकॅडेमिक विषयावरचे मुद्दे मधेच का येतात हे उमगेनासे होते. आणि हे सारेच अनौपचारिकच असेल तर मग सार्या नाटकाचे प्रयोजन तरी नक्की काय असा प्रश्न निर्माण होतो.
केवळ संवादाच्या बळावर उभे असलेले नाटक शब्दबंबाळ होत गेले असा माझा समज झाला. एकमेकांच्या नात्याबाबतही सारे काही शब्दातूनच व्यक्त होत गेल्याने ते प्रत्यक्षात काही निर्माणच झाले नाही. या सार्या नात्यांच्या सरमिसळीचा, permutationsचा वेध घेणे, त्याची मांडणी करणे हा नाटककाराचा मूळ हेतू असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. पण या नात्यांच्या शक्यता उभ्या करताना नेमका हाच भाग तांत्रिक अंगाने आणि अतिशय वेगवान पद्धतीने सादर केल्याने हा गाभाच नीटसा ठसत नाही.
नाटक घटनाप्रधान नसल्याने कदाचित पण रंगमंचावरचा वावर दिसावा म्हणून अधेमध्ये आलेल्या क्रिया (actions) अगदीच ठिगळे लावल्यासारख्या भासल्या. प्राध्यापकांचे अधूनमधून मद्य घेणे हे जरी त्याच्या एकाकी असण्याचा निदर्शक म्हणून आले असले, तरी अधेमधे येणारे कॉफीचे संदर्भ (लांबून दिसत नाही पण तिथे प्रत्यक्ष कॉफी ओतली जाते असा दावा दिग्दर्शक मोहित टाकळकरांनी केला. ’ते मद्यही खरे मद्य आहे का हो” असा प्रश्न माझ्या मनात लगेच उमटून गेला.), अधूनमधून पात्रांचे काही ना काही खात पीत असणे याचा सांधा मूळ नाटकाशी कुठेच जुळत नाही. केवळ दिग्दर्शकाची चूष म्हणून हे तिथे होते असा समज कुणी करून घेतला तर तो अगदीच अस्थानी म्हणता येणार नाही. (मी स्वतः फूडी असल्याने मी ते त्यात आणले असा मोहितचा दावा होताच.)
'एनएसडी'च्या कार्यशाळेत आयोजित केल्या गेलेल्या 'संवाद' कार्यक्रमाबाबत मात्र पुरा भ्रमनिरास झाला असंच म्हणावे लागेल. 'मला काय सांगायचंय हे नीट्सं स्पष्ट नव्हतं पण काय दाखवायचं आहे हे नक्की माहित होतं' या एका वाक्याचे व्याकरणनियमानुसार वेगवेगळे सादरीकरणच नाटककाराकडून ऐकायला मिळाले.
मुलाखतकारानेही 'याबाबत तुम्हाला काय वाट्तं?' 'आणि तुमचा अनुभव कसा होता?' या दोन प्रश्नांशिवाय काहीच विचारले नाही. आणि सर्व सहभागी कलाकार 'आम्हाला आधी काही कळत नव्हतं. मग आम्ही सगळे मिळून वाचू लागलो तेव्हा समजत गेलं' याची versions फक्त ऐकवत होते.
आता कळलंय तर जरा त्यावर तपशीलाने बोला की असं सांगावंसं वाटत होतं.
नाटकाचे नावही 'बंदिश' असे का?' या माझ्या - नि बहुधा माझ्या आसपासच्या अनेकांच्या - मनात असलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वेगवेगळ्या स्वरांच्या लडींतून जशी स्वराकृती निर्माण होते तसे नातेसंबंधांच्या शक्यतांमधून तयार होणारा पट असा अर्थ अभिप्रेत असावा असं मला वाटलं नि नाटककारानेही दुजोरा दिला असा माझा समज झाला. परंतु पण बंदिश नि ख्याल यातील फरक दाखवून 'तुम्ही ज्याला बंदिश म्हणत आहात त्या संकल्पनेला 'ख्याल' म्हणतात. तेव्हा कदाचित इथे तुम्ही ज्या अर्थी तो वापरला आहे तो सुसंगत दिसत नाही' या आक्षेपाबाबत सहमती/असहमतीबाबत निश्चित बोलणे नाईक यांनी टाळले.
तेव्हा एकुण नाटकातून काय मिळाले याबाबत विचार करताना 'तिथे काहीतरी असावे, पण नीटसे समोर येत नसावे' असा तर्क करून थांबावे असे काहीसे झाले. किंवा मोहितच्याच ’कॉफी’बद्दलच्या विधानाचा आधार घेऊन म्हणायचे तर 'तिथे रंगमंचावर बहुधा प्रत्यक्ष कॉफी आहे पण प्रेक्षकांना ती दिसत नाही' असे म्हणावे लागेल.
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा