अमेरिकेमध्ये जसे ’खटला जॉनी डेप जिंकेल, की त्याची भूतपूर्व पत्नी एम्बर हर्ड?’ हा सध्या राष्ट्रीय प्रश्न होऊन बसला आहे, तद्वत ’हनुमानाचे जन्मस्थान कोणते?’ हा विषय भरतभूमीमध्ये सांप्रतकाळी महत्वाचा होऊन बसला आहे. किष्किंधा, अंजनेरी यांच्या वादात आता सोलापुरातील कुगावनेही उडी घेतली आहे. तीनही ठिकाणी ’हनुमानाचा जन्म आमच्या गावी झाला’ अशी श्रद्धा असणारे अनेक लोक आहेत. ते तसे मान्य झाल्याने वाढलेल्या भक्ति-पर्यटनामध्ये त्यातील काहींचे आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असतील, हे ही त्यांच्या ’श्रद्धे’चे कारण असू शकेल. पण अशा माणसांना वगळून आपण ज्यांची खरोखर तशी श्रद्धा आहे अशांचीच बाजू ध्यानात घेऊ.
विषय एका धर्मांतर्गत असल्याने सध्या शास्त्रार्थावर निवाडा अवलंबून आहे. तरीही ज्याच्या गैरसोयीचा निवाडा होईल, ती बाजू तो मान्य करेलच असे अजिबात नाही. श्रद्धेची हीच गंमत असते. निवाडा आमच्या बाजूचा असला तर ’सत्याचा विजय’ आणि गैरसोयीचा झाला की ’आमच्या श्रद्धेच्या क्षेत्रात न्यायालयाने ढवळाढवळ करु नये.’ हा उत्तरार्ध अगदी स्थावर मालमत्तेचा, व्यावसायिक बाजूचा आणि सामाजिक हितसंबंधांचा प्रश्न असला तरी दिला जातो. इथे तर निखळ श्रद्धेचा प्रश्न आहे. (त्यामागच्या अर्थकारणाचा असला तरी तो इथे ऐरणीवर येण्याची शक्यता नाही. श्रद्धेचे कव्हरच मुळी ते झाकण्यासाठी असते.)
अयोध्या विवादाचा निवाडा करताना ’जनभावनेचा आदर’ अशी संज्ञा निकालपत्रामध्ये वापरली आहे, असे मध्यंतरी वाचण्यात आले. ते जर खरे असेल तर इथे निवाडा करताना नक्की कोणाच्या ’जनभावनेचा आदर’ करायचा? एका गावच्या गटाच्या श्रद्धाभावनेचा आदर करायचा, तर इतर दोघांच्या भावनेचा अनादर होतो. बरं इथे अयोध्येसारखा जमीनमालकीचा प्रश्न नसल्याने न्यायालयांनाही यात काही स्थान नाही. त्यामुळे न्यायालयावर सोपवून द्यावा हा पर्यायही नाही. तीनही बाजूंना मान्य असणारा लवाद- धर्मांतर्गतच नेमून त्याचा निवाडा करावा लागेल.
इथे एकाच धर्मांतर्गत विवाद आहे. जिथे एकाहुन अधिक धर्म असतात, तिथे निवाडा कसा करावा? त्यातील एका धर्माने राजकीय सत्ता ताब्यात घेऊन, आपली बाजू आपल्या सोयीच्या निवाडाव्यवस्था उभ्या करुन, आपल्या बाजूने निवाडा करवून घेणे हा जगभरात प्रस्थापित असा मार्ग आहे. अडचण फक्त लोकशाही सरकारांची असते. कारण तिथे निवाडा कुठल्याही बाजूचा झाला, तरी पराभूत बाजू शासनावर पक्षपाताचा आरोप करत दबाव आणते आणि निवाडाव्यवस्थेमार्फत नव्हे तर शासनाच्या अधिकारात तो निवाडा आपल्या बाजूला फिरवण्याचा प्रयत्न करते. पण हे सारे प्रकार पहिले म्हणे अयोध्येसारखे स्थावर अथवा जंगम मालमत्तेच्या मालकीबाबत असतील, आणि दुसरे म्हणजे हा निवाडा एका देशांतर्गत असला तरच उपयुक्त ठरतात.
उद्या इब्राहिम/अब्राहम/एब्राहम हा फक्त आमच्याच धर्माचा असा विवाद जगभरातील बिब्लिकल (ज्यांना अब्राहमिक धर्म असेही म्हटले जाते) धर्मांच्या अनुयायांमध्ये निर्माण झाला, आणि ’पाकिस्तानशी युद्ध करुन काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका बुवा.’ म्हणणार्या आपल्याकडील सुखवस्तूंसारखा या तीनही धर्मियांमधील बर्याच जणांनी निवाड्याचा आग्रह धरला तर...? इथे वादाचा मुद्दा कोणत्याही स्थावर जंगम मालमत्तेच्या मालकीबाबत नाही, आणि हा कोणत्याही एका देशाच्या अंतर्गत मामला नाही. तीनही धर्मांना मान्य असणारा लवाद स्थापून त्यामार्फतच याचा निवाडा करावा लागेल. तो ज्या दोन बाजूंच्या विरोधात जाईल त्या तो मानण्यास तरीही तयार होणार नाहीत याची संभाव्यता बरीच जास्त आहे.
कारण धर्मगटाच्या अंतर्गतही उपगट असतात, त्यांच्यात राजकीय रस्सीखेच चालू असतेच. निवाडा विरोधात गेला, की त्या धर्मातील असे असंतुष्ट गट उठून निवाडाप्रक्रियेत सामील असलेल्या आपल्याच नेत्यांवर धर्मद्रोहाचा आरोप करतील. 'ते आमच्या धर्माचे प्रतिनिधीच नव्हेत, अन्य धर्माला आतून सामील आहेत', 'त्यांचे कुणीतरी नातेवाईक कसे मूळचे अन्यधर्मीय आहेत' वगैरे खर्याखोट्या आरोपांची राळ उडवून देतील.
सामान्यांनाही निवाडा वगैरे कळत नसतो. पुरावे, साधकबाधक विचार, तर्कपद्धती, पडताळापद्धती समजत नसते. त्यांना फक्त 'आपली बाजू हरली' एवढेच समजते. मग ते संतापाने पेटून कुणाचा तरी बळी घेतल्याखेरीज शांत बसणार नसतात. निवाडा प्रक्रियेत सामील असणार्या स्वधर्मीयांचे सामाजिक खच्चीकरण करुन ते आपला सूड उगवतात, नि ’ते नकोत मग कोण?’ म्हणत ती आग पेटवणार्यांच्या हातावर धार्मिक/राजकीय सत्तेचे उदक सोडून पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला लागतात.
जे एकाहून अधिक धर्मगटांचे, तेच एका धर्माअंतर्गत जाती वा पंथांचे, नि तेच एका लोकशाही राष्ट्रातील एकाहुन अधिक धर्मगटांचे. आमची बाजू बरोबर असा निवाडा झाला नाही, तर तो आम्हाला मान्यच नसतो. तो पक्षपाती असतो. निवाडा करणारे न्यायव्यवस्थेचा कितीही सूक्ष्म अभ्यास असलेले असोत, त्यांचा निवाडा चुकलेला असतो नि आमचा निवाडाच बरोबर असतो याची - पुलंच्या भाषेत - महापालिकेत उंदीर मारायच्या विभागात काम करणार्याला बालंबाल खात्री असते.
लोकशाही राष्ट्राअंतर्गत धार्मिकांचे हक्क हा असाच गुंतागुंतीचा मामला असतो. कारण मुळात धर्म ही देखील राष्ट्रेच आहेत. त्यामुळे जमिनीच्या तुकड्याने निश्चित होणारा देश जेव्हा एक राष्ट्र म्हणून उभे राहतो, तेव्हा त्याचा या राष्ट्रांच्या अधिकारक्षेत्राशी छेद जातोच. मग परस्परांच्या अधिकाराचा नि कार्यक्षेत्राचा प्रश्न निर्माण होतो. तिथेही खरेतर वर उल्लेख केलेल्या एकाहुन अधिक धर्मांमधील समस्यांच्या निवाड्यासाठी करावा लागेल तसा एक लवाद परस्परसहमतीने नेमणे आवश्यक आहे. सामायिक अधिकारक्षेत्राच्या क्षेत्रात त्याच्याद्वारे निवाडे केले गेले पाहिजेत.
पण तसे कधीच घडताना दिसत नाही. लोकशाही राष्ट्रांत दंडव्यवस्था न्यायव्यवस्थेसोबतच असल्याने तिची कुरघोडी अधिक असते. त्या बदल्यात धार्मिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढलेला असतो. आणि म्हणून धर्माला प्राधान्य हवे म्हणणारे राजकीय व्यवस्थाच ताब्यात घेऊन, आपल्या धर्माला झुकते माप देणारी व्यवस्था निर्माण करतात. बहुतेक संघटित धर्म हे जमिनीच्या तुकड्याने वेढलेली राष्ट्रे नसली, तरी एक सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशानेच निर्माण झालेल्या व्यवस्था आहेत.एवढेच नव्हे तर संघटित धर्मांना अर्थकारणाचे मोठे अधिष्ठान नि उद्दिष्ट दोन्ही आहे. राजकीय सत्ता ताब्यात घेण्याने ते ही साध्य होत असते. त्यांच्या पूर्वीचे प्राकृतिक धर्म हे नैतिकतेच्या नि समाजधारणेच्या उद्दिष्टावर अधिक आधारलेले होते.
हनुमानाच्या जन्मस्थानाच्या विवादावरुन मी जे 'उड्डाण' केले तो थेट धर्म, राजकीय सत्ता यांच्यावर उतरलो. विवाद धर्मांतर्गत असो वा आंतर-धर्मीय, त्याला आर्थिक आणि राजकीय सत्तेचे छुपे हेतू जोडलेले असतात. सामान्यांना श्रद्धेच्या हरभर्याच्या झाडावर चढवून विवाद निर्माण करणारे आंबराया मात्र आपल्या नावावर करुन घेत असतात. हे जोवर ध्यानात येत नाही, तोवर श्रद्धासिद्धतेचे तर्कशून्य विवाद निर्माण होतच राहणार आहेत, आणि सामान्यांना प्रत्येक विवादामध्ये उगाचच आपण कुठल्याशा श्रेष्ठ साध्यासाठी लढतो आहोत असा भ्रमही होतच राहणार आहे.
अयोध्येच्या निवाड्यानंतर ’आमची श्रद्धा खरी असल्याने आमचा विजय झाला.’ अशी धूर्त वा भाबडी- पण तर्कशून्य प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. आता मला असा प्रश्न पडला आहे, की अंजनेरी, किष्किंधा आणि कुगाव यांच्यापैकी कोणाही एका बाजूने निवाडा गेला तर इतर दोन ठिकाणी असलेल्या भक्तांची श्रद्धा खोटी म्हणायची का? आणि तशी असेल तर निवाड्याने श्रद्धा खरी की खोटी हे ठरवता येते हे मान्य आहे का? नसेल तर वादंगाचा नि निवाड्याचा खटाटोप कशाला? ’वार्यावरची वरात’ मध्ये पु.ल. उपहासाने म्हणतात ’असेल असेल, शेक्स्पिअरचे एक थडगे इंग्लंडमध्ये नि एक अमेरिकेत असेल.’ तसंच 'हे ही हनुमानाचे जन्मस्थान असेल नि ते ही' असे म्हणून दोनही-तीनही ठिकाणी श्रद्धायज्ञ (आणि जोडून अर्थयज्ञ) यथासांग चालू ठेवावा असे का करत नाहीत हे लोक?
आजच कुण्या धर्मपंडिताने हनुमानाच्या विविध ’अवतारांबद्दल’ लिहिले आहे. (सर्वप्रथम वैष्णवांनी चलाखीने वापरलेली ही अवतार-कल्पना भलतीच उपयुक्त आहे. साईबाबांच्या जयंतीला एका चौकात लावलेल्या फ्लेक्सवर साईबाबांच्या अवतारांचा उल्लेख होता. त्यात एका जन्मात ते दत्त होते असे म्हटले होते. काही काळाने सोयीचे काही देव, संत यांची माळ लावून त्यांचेही दशावतार तयार होतील.) त्यातील एक-एक अवतारात त्याचा जन्म या तीन ठिकाणी झाला असे म्हणून हे गणित सर्वांच्या सोयीने का सोडवू नये?
या तीन व्यक्तिरिक्त गेल्या वर्षी कर्नाटकातील गोकर्ण आणि राज्यातील तिरुपतीतील अंजनाद्री शिखरावर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आला होता. आणखी दोन अवतारांमध्ये हनुमानाचा जन्म या दोन ठिकाणी झाला होता असे जाहीर करुन त्या गावांतील श्रद्धाळूंच्या जनभावनेचा आदरही साधता येईल. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या सार्याच राज्यांतील श्रद्धाळूंना गुण्यागोविंदाने अंजनीसुताची भक्ती करणे शक्य होईल.
मुळात पुराणकथांना पुरावे मानण्याची चूक आपण करत आहोत, तोवर वादंगांना तोटा नाही आणि त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणार्यांनाही. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या त्या वज्रांगानेच प्रकट होऊन या सार्यांची टाळकी आपल्या गदेने शेकून काढली तरच कदाचित हे शहाणे होतील. कदाचित आपल्या सोयीचा नसलेला दावा करणारा हा एक तोतया आहे म्हणून त्याच्यावरही खटले भरायला ते कमी करणार नाहीत.
- oOo -
1. https://www.theweek.in/theweek/current/2021/04/29/karnataka-scholars-rubbish-claims-that-hanuman-was-born-in-tirupati.html
2. https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/hanumans-place-of-birth-karnataka-and-andhra-pradesh-engage-in-epic-battle/articleshow/82023239.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा