आप्पा भिंगार्डे१ एक सत्शील, पापभीरू माणूस. त्यांची बाबा आडवळणीनाथांवर नितांत श्रद्धा. देवघरात बाबांची मानसमूर्ती होती. तिची सकाळ-संध्याकाळ षोडशोपचारे पूजा होत असे. वर्षांतून दोनदा घरी बाबांचा सत्संग असे.
आप्पा भिंगार्डे पिढीजात कारकून. त्यामुळे ऑफिसमधून आणलेल्या स्टेशनरीवर दररोज शंभर वेळा बाबांचा जप लिहिला जात असे. पुढे ऑफिस स्टेशनरीच्या अपहाराबद्दल मेमो मिळाले, सस्पेंड झाले, पण त्यांनी आपला नेम सोडला नाही.
मागच्या चाळीतील बाबूने सायक्लोस्टाईल का काहीतरी मशीन आणले. त्यावर खते, दस्त यांच्या प्रती काढून देण्याचा व्यवसाय सुरू केला. आप्पांनी ही संधी साधली आणि बाबांच्या एकपानी चरित्राच्या प्रती काढून नाक्यावर उभे राहून येणार्या-जाणार्याला वाटून ते आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करु लागले.
सामान्यांच्या पत्रसंवादाच्या सोयीसाठी सरकारने पाच पैशांत पोस्टकार्ड द्यायला सुरुवात केली. आप्पांनी नवे माध्यम तात्काळ आत्मसात केले. बाबांचा उपदेश मूढ जनांना देऊन त्यांना शहाणे करण्यासाठी दरमहा पन्नास पोस्टकार्डे पाठवू लागले.
आप्पांच्या मुलाने एकदा हिंदी हीरोचा स्टीकर कुठूनतरी - बहुधा मित्राचा ढापून - आणला. आप्पांनी कुतूहलाने तो प्रकार पाहिला. मग शाळेजवळ स्टीकर विकायला बसलेल्या धोंडूकडून स्टीकर तयार करुन देणार्या कारखान्याचा पत्ता मिळवला. आर्थिक स्थितीचा विचार करता जास्त स्टीकर बनवणे नि वाटणे परवडणारे नव्हते. कमी स्टीकर्स छापले तर महाग पडत होते. साधकबाधक विचार करुन त्यांनी अखेर पन्नास स्टीकर्सवर भागवले.
पहिला स्टीकर देव्हार्यात नि दुसरा दाराच्या चौकटीच्या वर गणेशपट्टीवर लागला. मुलाच्या सायकलवर लावलेला स्टीकर ’शाळेत चोरीला गेला’ असे मुलगा सांगत आला. बाबांचा स्टीकर कुणाला तरी चोरावासा वाटला म्हणून आप्पा खुश झाले, त्यांनी दुसरा स्टीकर तिथे लावला. पण स्टीकर वारंवार ’चोरीला जाऊ लागले’ नि आप्पांनी तो क्रम बंद केला.
आप्पा मध्यमवयाला ओलांडून ज्येष्ठतेकडे झुकू लागले. मुलगा हाताशी आला. त्याने रोजगार सुरु करताच प्रथम एक संगणक विकत घेतला. आप्पांचे कुतूहल जागृत झाले नि त्यांनी त्याचे तंत्रही हळूहळू शिकून घेतले. डेस्कटॉप इमेज आणि स्क्रीनसेव्हर मध्ये बाबा विराजमान झाले. तसे या इमेज अधूनमधून गायब होत. ’संगणक हा प्रकार नवीन आहे. अधूनमधून त्याच्याकडून चुका होतात.’ असं मुलगा सांगे. मान डोलावून आप्पा बाबांची पुन:प्रतिष्ठापना करत. मग इंटरनेट आले नि आप्पांना ईमेल या प्रकाराचा शोध लागला. ते खुश झाले नि मुलाला म्हणाले, ’हे चांगले झाले. पत्रके छापण्याचा खर्च वाचला.’
आता मोबाईलचा जमाना आहे. आप्पांच्या मोबाईलवर बाबांची स्क्रीन इमेज आहे; रिंग ट्यून आणि कॉलर ट्यून म्हणून बाबांची आरती आहे. बाबांचे ज्ञानामृत घोट घोट पाजणारे, बाबांच्या मठाने तयार केलेले अॅप आहे. रोख सुटे पैसे घेऊन वीजबिलभरणाकेंद्राच्या समोरील रांगेत उभे असताना मोबाईलच्या स्पीकरवर अॅपवर ’आजचे प्रवचन’ लावून रांगेतील इतर लोकांना ते बाबांनी दिलेले ज्ञानकण लाभ फुकट वाटताना दिसतात.
माणसाच्या तांत्रिक प्रगतीचा प्रत्येक टप्पा आप्पांनी असा लीलया आत्मसात केला आहे. पस्तीस वर्षे एकाच ऑफिसमधून, एकाच पदावर काम करुन आप्पा निवृत्त झाले. त्यांच्या निरोपसमारंभात त्यांच्या पाठोपाठ निवृत्त होऊ घातलेल्या एका सहकार्याने त्यांना ’तांत्रिक आप्पा’ अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.
आप्पा आता थकले आहेत. पण निजधामाला जाण्यापूर्वी चंद्रावर बाबांचा पुतळा उभारण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. ते कधी शक्य होईल हे त्यांना इलॉन मस्कला विचारून घ्यायचे आहे. कुणाकडे त्याचा संपर्क क्र. असेल तर आप्पांना कळवा प्लीज.
- oOo -
१. हे पात्र नि पुलंच्या ’असा मी असामी’ यातील एक पात्र यांचे नाव एकच असले तरी हे ते नव्हेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा