’वेचित चाललो...’ वर नवीन:   

प्रतीक्षा       सत्तांतर       हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

रविवार, १५ मे, २०२२

लेखक याचक आणि राजा वाचक ?

(बरेच दिवस लिहून ठेवलेले काही मुद्दे आज मित्रवर्य प्रकाश घाटपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे एकदाचे पार लागले.)

आकलनाची, उकल करण्याची खाज हा माझा जुना आजार. त्यातच गणित नि शक्यताविज्ञान (Statistics) या विषयांत झालेले शिक्षण यांमुळे जगण्यातले प्रत्येक गणित सोडवण्याचा आटापिटा वाढीसच लागला. मग कालानुरूप आपल्या विचारांत, आकलनात, विश्लेषण पद्धतीमध्ये बदल होतो का, कसा होतो नि का होतो... हे जास्तीचे प्रश्न वाढत्या वयाबरोबर सोबत आले.

अनुभवसिद्धता हा शक्यताविज्ञानाचा गाभा, त्यातून निर्माण होणारी माहिती व डेटा, त्याचे मूल्यमापन आणि निष्कर्ष ही आकलनपद्धती मी स्वीकारलेली. काही काळानंतर त्याच समस्येला, गणिताला सामोरे जातात उत्तर वेगळे येते का, का वेगळे येते याचा वेध घेणे भलतेच रोमांचक असते, असे लक्षात आल्यावर त्या त्या वेळचे आकलन, विचारव्यूह नोंदवून ठेवण्यास सुरुवात केली. भविष्यात याच्याकडे परतून आल्यावर जणू अन्य कुण्या लेखकाचे लेखन म्हणून पाहणे शक्य होते, आणि त्यातून आपणच आपले मूल्यमापन करु शकतो हा मोठा फायदा. ही नोंद सुरक्षित राहावी आणि केव्हाही उपलब्ध असावी या दृष्टीने ब्लॉग सुरू करुन या नोंदी तिथे साठवून ठेवू लागलो. (त्या सार्‍या प्रवासालाही ’माझी ब्लॉगयात्रा’ या सहा भागांच्या मालिकेत नोंदवून ठेवले आहे.)

चार वाक्ये लिहिली की आपल्याला अंतिम सत्य सापडले असा भ्रम प्रत्येक पहिलटकर लेखकाला होतो. मग ते जगाला द्यावे अशी कंडही निर्माण होते. त्यानुसार ते इतरांबरोबर शेअरही करू लागलो. शेअर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अगदी अपरिहार्यच आहे. व्हॉट्स-अ‍ॅप आणि फेसबुक हे सोयीचे. तिथे ब्लॉगवरील लिंक शेअर करु लागलो. या शेअरिंग दरम्यान काही मजेशीर अनुभव आले आणि त्यातून काही नवे प्रश्नही या जिज्ञासानंदासमोर दत्त म्हणून उभे राहिले. या लेखात त्याबद्दल थोडा उहापोह करतो आहे.

सामान्यपणे लेख लिहून झाला, नि तो ब्लॉग वा अन्य ऑनलाईन माध्यमांत प्रसिद्ध झाला, की त्याची लिंक मी फेसबुकवर शेअर करत असे. आणि जेव्हा तिथे सक्रीय नव्हतो तेव्हा लेखाच्या विषयानुसार जास्तीत जास्त आठ-दहा मित्रांना व्हॉट्स-अ‍ॅपवर पाठवत असे.

EReading

अशाच एका मित्राने एक दिवस सल्ला दिला, ’अरे तू लिंक देऊ नको. त्याने फार लोकांपर्यंत पोचत नाही लेखन. लोक लिंक उघडून पाहात नाहीत. सारा लेखच इथे फेसबुकवर पेस्ट कर. अधिक पोचतो.’ माझ्या गणिती डोक्याला ही अंधश्रद्धा पटेना. तशी ती आहे हे मी माझ्यापुरते पडताळा घेऊन सिद्धही केले. त्यांच्यात काहीही अन्योन्य संबंध नाही. अनेकदा फेसबुकर ढीगभर लाईक्स पण ब्लॉगवर चौथा हिस्सासुद्धा वाचने नाहीत असे घडले. तसेच आठ-दहा लाईक्स पण ब्लॉगवाचने तीस-चाळीस असाही प्रकार घडत आलेला आहे.

शिवाय मोठा लेख फेसबुकवर पोस्ट केला, तर मोजका मजकूर दिसून पुढे See more... ची लिंक दिसते. जी क्लिक करावी लागतेच. मग ती क्लिक करायला तुमचा माऊस परवानगी देतो, पण ब्लॉग-लिंकला नाही असे असते का?

एका भेटीत दुसरा एक मित्र म्हणाला, ’तुझे लेखन असे जाताजाता वाचण्याजोगे नाही. ते निवांत वाचण्यासाठी मी ठेवून दिले आहे.’ आज पंधरा वर्षांनंतरही त्याला तो निवांतपणा मिळालेला नाही. (न मिळो बापडा. त्याचे चांगले चालू असले म्हणजे झाले,)

आणखी एका मित्राने सल्ला दिला (फेसबुकवर सल्लागार मंडळाची कमतरता भासत नाही.) की ’हल्ली लोकांचे वाचन कमी झाले आहे. त्यांना व्हिडिओ पाहायला आवडते. यू-ट्यूब चॅनेल सुरू कर नि तुझ्या लेखनाचे छोटे व्हिडिओ तिथे टाक. तुझे लेखन अधिक लोकांपर्यंत पोचेल.’ मी स्वत: जागरुक आयटीवाला असल्याने मी हसून सोडून दिले. एकतर माझे लेखन हे शब्दप्रधान, विचारप्रधान असल्याने त्याला दृश्य बाजू नाही. आणि यू-ट्यूब व्हिडिओ म्हणजे केवळ कॅमेर्‍यासमोर बसून आपले लेखन वाचणे नव्हे, याचे भान मला होते. पुन्हा असे व्हिडिओ टाकण्यासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी यू-ट्यूबचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे होते. माझे लेखन आणि एकुण कंटेंट पाहता हिट्सच्या आधारे मिळणारे यू-ट्यूब उत्पन्न नगण्यच नव्हे, तर शून्यच असणार होते. अशा वेळी खिशातून पैसे घालून हा कारभार करणे म्हणजे ’चार आण्याची कोंबडी नि बारा आण्यांचा मसाला’ असा प्रकारच होणार होता. साहजिकच मी त्या नादी लागलो नाही.

असे असले तरी पुढे 'वेचित चाललो...’ वर मी स्वत:चे नाही पण चित्रपट, मालिका, चलच्चित्रे यांच्यातील एखादा तुकडा शेअर करुन त्या अनुषंगाने माझे भाष्य लिहिण्याची शैली वापरायला सुरुवात केली.

इथेच मला फेसबुक-पोस्ट ऐवजी स्वत:चा ब्लॉग वापरण्याचा फायदाही अधोरेखित करायचा आहे. फेसबुक-पोस्टमध्ये मला अन्य मीडिया समाविष्ट करता येत नाही. फोटो जोडला तरी तो मजकुराच्या खाली जातो. मजकुर-सुसंगत अशी (एकाहुन अधिक) फोटो, चित्र वा व्हिडिओची मांडणी मला ब्लॉगपोस्टमध्ये करता येते. फेसबुक त्याबाबत गलथान आहे.

तिसरे एक मित्रवर्य म्हणाले, ’हे असे व्हिडिओ पाहणे म्हणजे डोळ्याला त्रास होतो. त्याऐवजी तू स्टोरीटेलसारखे ऑडिओबुक तयार कर. किंवा पॉडकास्ट चालू कर. मी काय करतो, एकीकडे क्रिकेटची मॅच पाहताना साऊंड म्यूट करुन दुसरीकडे पॉडकास्ट किंवा ऑडिओबुक ऐकत असतो. तसेही समोर स्क्रीनवर स्कोअर दिसत असताना कमेंटरीची गरज काय. एकाच वेळी दोन्ही होते.’ थोर माणूस!

सार्‍या अनुभवांवरुन माझ्या पीएच.डी थीसिसमध्ये ग्राफ टाकावेत म्हणजे तो आकर्षक होईल असा फुकट सल्ला देणारा एमबीए गडी आठवतो. बिचार्‍याला गणित, सैद्धांतिक शक्यताविज्ञान आणि त्याच्या कस्टमर प्रेजेंटेशन पीपीटी मधील फरक माहित नव्हता हा त्याचा दोष नाही. तसंच कोणते लेखन शब्दप्रधान, कोणते आशयप्रधान आणि कोणते दृश्य वा श्राव्य माध्यमांना अनुकूल याचा विचार न करता ही मंडळी बेफाट सल्ले देत असतात.

थोडक्यात माझे लेखन त्यांना हवे त्या फॉर्ममध्ये, हवे त्या माध्यमामध्ये रूपांतरित करण्याचा सल्ला मला मिळत गेला. गोळाबेरीज ही की ’मला तुझे लेखन वाचायची फार्फार इच्छा आहे रे, पण मी नं, यू नो, इतका सोऽ बिज्जी असतो की समोर आले तेवढेच वाचले जाते.’ दरम्यान ही माणसे फेसबुकवर राजकारणावरची भंकस, तरुण तर सोडाच अगदी मध्यमवयीन स्त्रियांच्या फोटोवर व्यक्त होत ’चर्चा’ करताना दिसत होती.तेव्हा ते बिज्जी वगैरे नसावेत, किंवा त्याच गोष्टींत बिजी आहे असे त्यांना म्हणायचे असावे.

पहिली गोष्ट म्हणजे मी लिहितो ते इतरांनी वाचावे अशी माझी इच्छा नक्कीच असते. पण त्यासाठी मी कुणाला आग्रह करणार नाही. त्याला राजकारणावरची भंकस (जी मी ही करतो), स्त्रियांच्या फोटोंवर साधकबाधक चर्चा करणे (जी करता यावी अशी माझीही फार्फार इच्छा असते, अजून तरी जमत नाही. जमेल कधी ना कधी.) माझ्या लेखनापेक्षा महत्वाचे वाटत असेल- नव्हे माझे लेखनच त्याने वाचण्याच्या लायकीचे वाटत नसेल तरी त्याबद्दल माझी तक्रार नाही. प्रत्येकाची रुची भिन्न असते. मंदार काळेंची उच्च नि इतरांची दुय्यम अशी उद्दाम भूमिका माझी नाही. पण ’मला तुझे लेखन वाचायची इतकी जोराची इच्छा आहे पण तू मला हवे तशा स्वरूपात ते देत नाहीस, म्हणून मला ते वाचता येत नाही.’ हा कांगावा कशाला? माझे लेखन वाचच असा आग्रह मी आजतागायत कुणाकडे धरलेला नाही, एवढेच कशाला ’वाचलेस का?’ हा प्रश्नही संदर्भाशिवाय विचारलेला नाही. मग माझ्या लेखनातील आपली रुची मला पटवून देण्याचा आटापिटा का बाबा/बाई?

या सगळ्या सल्ल्यांमध्ये, अनुभवांमध्ये एक सूर मला सतत जाणवतो तो म्हणजे ’लेखक हा उत्पादक आहे, लेखन हे त्याचे उत्पादन आहे नि त्यानेच ते खपवायला हवे. आम्ही ग्राहक आहोत, राजे आहोत, उत्पादकाने आमच्या नाकदुर्‍या काढल्या पाहिजेत. आमचा अटेन्शन स्पॅन लक्षात घेऊन छोटे लिहिले पाहिजे, व्हिडिओ दिले पाहिजेत, क्लिक करायला न लावता आख्खा लेख समोर दिसला पाहिजे, ऑडिओ करुन दिले पाहिजे...’ नुसती लिंक दिली तर ’मी लिंक दिली आहे तुम्हाला गरज असेल तर वाचा नाहीतर फुटा’ असा लेखकाचा आविर्भाव असल्याचा गैरसमज वाचकांचा होतो म्हणे. वाचकाच्या वरच्या सार्‍या अपेक्षा पाहता लेखकापेक्षा वाचकाचाच माज कैकपट अधिक आहे असे माझे मत झाले.

माझे लेखन म्हणजे उत्पादन आहे, नि मला ते विकण्यासाठी वाचकांचा मूड सांभाळायला हवा, त्यांच्या दारी जायला हवे ही लाचार वृत्ती मला साफ अमान्य आहे. उलट दिशेने मी काहीतरी कष्ट करुन लिहिले आहे, ते वाचण्याने वाचकालाही काही मिळणार आहे हे ही मी विचारात घेतो. ते फुकट मिळत असेल तर त्याने/तिने किमान एक लिंक क्लिक करण्याचे कष्ट घ्यावेत ही अपेक्षा अनाठायी आहे असे मला वाटत नाही. माझे लेखन वाचकाच्या उपकाराधीन आहे ही ओशाळवाणी वृत्ती माझी नाही.

मी ’गरजेनुसार खरेदी’ या जुनाट मानसिकतेचा माणूस आहे. भांडवलशाहीतील ’गरज निर्माण करण्याच्या’ पद्धतीचा मी समर्थक नाही. ग्राहकाच्या दारात उदबत्तीचे पुडे घेऊन ’घ्या हो घ्या, चारावर एक फ्री देतोय.’ म्हणून गरज नसलेल्यासमोर लाचार उभे राहणे मला मान्य नाही. एखाद्या मित्राला माझे लेखन वाचण्याची गरज वाटत नसेल, त्याला वाचनाची आवडच नसेल. किंवा माझ्या सार्‍या विषयांत त्याला/तिला रुची असावी असेही नाही. अशावेळी केवळ मैत्रीखातर त्याने/तिने सगळेच वाचावे, तशी भीड त्याला/तिला पडावी हे ही मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून व्हॉट्स-अ‍ॅपवर वा तत्सम वैय्यक्तिक संवाद-माध्यमांवर लिंका पाठवून मी शक्यतो कुणाला भीड घालत नाही. विशिष्ट विषयांत रस असलेल्या, आमच्या काही चर्चेचा संदर्भ असलेल्या लेखनापुरतीच माझी शिफारस असते.

छापील पुस्तकांबाबत वा वृत्तपत्रीय लेखनांबाबतही परिस्थिती वेगळी नाही.

बहुतेक लेखक वृत्तपत्रातील आपल्या लेखाच्या लिंकसोबतच संपूर्ण लेख फेसबुकवर पेस्ट करतात. खरेतर हे वृत्तपत्राच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यांच्या साईटला मिळणारा टीआरपी यातून लेखकच काढून घेतो आहे. आता तर वृत्तपत्राच्या वाचकांपर्यंत पोचलाय ना बाबा तुझा लेख. मग या ऑनलाईन वाचकांच्या इतक्या नाकदुर्‍या काढायची गरज काय?

पुस्तकांचेही पाहिले तर एक बैठकीला दोन-तीन पेग उडवून हजारभर रुपयांचा चुना सहज करणारे किंवा आयफोनच हवा म्हणून गरजेहून काही हजार सहज उडवणारे पुस्तक घेताना मात्र तीनशेच्या वर खर्च करताना कां कूं करत असतात. मान्य करा मित्रांनो, की वाचन तुमच्या प्राधान्यक्रमात तळाला आहे. उगा वाचकपण मिरवण्याचा आटापिटा का करता?

माझे उत्पादन हे माझ्या उदरभरणाचे साधन नसल्याने ग्राहकाने त्याच्या गरजेनुसार (नसेल तर माझाही आग्रह नाहीच) माझ्या दुकानी (पक्षी: ब्लॉगवर) येऊन घेऊन जावे ही अपेक्षा अस्थानी नाही. फुकटही हवे नि होम डिलिव्हरीही हा उद्दामपणा मी चालवून घेऊ? आता यांचा पुढचा आग्रह म्हणजे 'तुमचे लेखन वाचण्याबद्दल मलाच पैसे द्या' असा असू शकतो. तेवढाच टप्पा शिल्लक आहे. मी ते ही करावे काय?

’लेखक याचक आणि राजा वाचक’ अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करता माध्यमांची विपुलता, त्यांची मजकुराची खायखाय आणि जोडीला स्वनामधन्य लेखकांची वाचकांकडून लाईक मिळवण्यासाठी घायकुतीला येण्याची प्रवृत्ती हे दोन दोष मला दिसले. छापील कागदावर आपले नाव यावे किंवा डिजिटल माध्यमांत कुठेतरी आपला लेख- फुकट का होईना, छापला यात कृतकृत्यता मानणारे न्यूनगंडी लेखक (लेखन उत्तम असेलही) यांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे.

वाचकाची दादच लेखकाला लेखक म्हणून प्रस्थापित करत असते हे जसे खरे, तसेच मुळात लेखक सर्जनशील आहे, तो निर्माता आहे हे वाचकानेही विसरु नये. वाचकाला आपल्या रुचीनुसारच वाचण्याचा अधिकार आहे. त्याने तो नक्की वापरावा. समोर पुरे लेखन आले ’म्हणून’ ते वाचण्यात वेळ दवडू नये. आपल्या आवडीनिवडीनुसार लेखन निवडून तेच वाचावे. लेखकानेही आपल्या विषयाशी संबंधित नसलेल्या वाचकांचे नाक दाबून (टॅग वगैरे करुन) आपले लेखन त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नये. समाजमाध्यमी लेखक नि वाचक या दोघांच्याही दृष्टीने तेच योग्य ठरेल.


- oOo -
लेखासोबत जोडलेले छायाचित्र https://www.ameshighweb.com/ येथून साभार.

1 टिप्पणी:

  1. सडेतोड, रोखठोक. एवढ्या बाजू लेखन आणि वाचनाला असू शकतात, असा कधी सविस्तर विचार केला नव्हता. नेहमीप्रमाणे, विचारातील सुस्पष्टता आवडली, लेखही पटला. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा