मंगळवार, ३ मे, २०२२

मांजराचे काय, माणसाचे काय

आपण लहान असताना सोडाच, पण मोठे झाल्यावरही एखादे मांजर दिसले तर त्याला उचलून घ्यावे त्याच्या मखमली शरीरावरुन हळूच हात फिरवून पाहावा असं वाटत नसणारे विरळाच.

शिवाय कुत्र्यापेक्षा मांजर आणखी एका दृष्टीने बरे. कुत्रे बिचारे जीव लावून बसते. त्याचा माणूस-मित्र त्याच्याकडे लक्ष देईना झाला तर उदास होऊन बसते, खाणे दिले नाही तर उपाशी राहते. याउलट तुम्ही भाव दिला नाहीत तर मांजर ’गेलास उडत’ म्हणून चालते होते. घरचे खाणे मिळाले नाही तर बाहेर जाऊन होटेलमधून किंवा स्विग्गीवरून एखादा उंदीर, एखादा पक्षी मागवून आपले पोट भरते. माणूस-मित्राची इच्छा म्हणून भुके राहण्याचा वेडगळपणा वगैरे करत नाही. त्यामुळे त्याला पालक-मित्रालाही त्याबाबत फार टेन्शन घेण्याची गरज नसते

IAmTheGod

कालच आमचा एक मित्र सांगत होता (बहुधा हिचिन्सचे वाक्य) की ’कुत्र्याला तुम्ही खाऊ घातलेत, निवारा दिला, त्याची/तिची काळजी घेतलीत की ते तुम्हाला - म्हणजे माणसाला - देव समजू लागते. (’व्हाईट फॅंग’ या कादंबरीमध्ये त्यातील लांडग्याच्या पिलाची मनोभूमिका विशद करताना जॅक लंडनने नेमका हाच विचार मांडला आहे.) पण मांजराबाबत तुम्ही हेच सारे केलेत, तर ते स्वत:ला तुमचा देव समजू लागते.’

लहानपणी मी दमेकरी असल्याने केसाळ प्राण्यांपासून दूर राहणे सक्तीचे होते. शिवाय दहा बाय आठच्या खोलीत माणसांनाच जेमतेम जागा होती, तिथे मांजर कुठे पाळणार. पुढे शिक्षण-रोजगार वगैरेच्या धबडग्यात त्या 'आणखी एका जिवाला आपल्यावर अवलंबून कशाला ठेवावं' या विचाराने मांजर पाळण्याच्या फंदात वगैरे पडलो नाही. रोजगाराच्या सापळ्यातून फार लवकर सुटका करुन घेतल्यावर त्याबाबत पुन्हा विचार करु लागलो होतो. पण अलिकडचे काही अनुभव पाहिले नि ती हौस फिटली.

दोन-अडीच वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये एक मांजर दिसू लागली. लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या बच्चे कंपनीला एक विरंगुळा झाला. तिच्याशी खेळणे, दूध वगैरे देणे सुरु झाले. त्यातच तिला दोन पिले झाली. मुले आणखी खुश झाली. आता खिडकीबाहेरील ग्रिलमध्ये त्यांच्यासाठी बिछाना वगैरे करुन पिलांना राहायला घर मिळाले. त्या दोन्ही बोक्यांचे नामकरण वगैरे झाले... आणि मांजरी स्वत:ला देव मानू लागली...! आणि जीवसृष्टीच्या निर्मितीचे आपले काम निष्ठेने करु लागली !

बाईंनी पुढची वीण दिली ती थेट पाच पिल्लांची, ती ही एकाच्या घरातच. तिला पाच पिलांना पोसेल इतके दूध हवे म्हणून तो बिचारा तिला चिकन वगैरे आणून खाऊ घालू लागला. तिचा माणूस-मित्र चिकनची वा खाण्याची पिशवी घेऊन बाहेरून आला, की पार्किंगमध्ये कुठेतरी पिलांसोबत बसलेली ही बया तुरुतुरु त्याच्या पुढे पुढे चालत त्याच्याआधी त्याच्या घरात प्रवेश करु लागली.

आता आपण सोसायटीचीच नव्हे तर त्यातील प्रत्येक घराचीच आपण देवता आहोत असे तिला वाटू लागले असावे. त्यामुळे तो एकटाच नव्हे तर सोसायटीमधील कुणीही पिशवी घेऊन आलेले दिसले की हाच कार्यक्रम होऊ लागला. इतकेच नव्हे तर दिवसभर कुठेही उंडारत असली, तरी खाण्याच्या वेळी न चुकता त्याच्या दारी जाऊन जोरदार आवाजात खाण्याची मागणी करते. पोट भरले की बाई परत गाव कोळपायला बाहेर.

सहा महिन्याच्या अंतराने सात पिले म्हटल्यावर सोसायटीत थोडी खळबळ झाली खरी. पण आसपास पोरासोरांना पत्ता लागल्याने कुणी कुणी घेऊन गेल्याने पिले ’दिल्या घरी’ सुखी झाली असे समजून सगळे निवांत झाले.

पण बाईंना उसंत नव्हती. पुन्हा सहा महिन्याच्या आत दोन पिले. पाठोपाठ आणखी पाच पिले घेऊन एका घरात ठिय्या दिला. त्यांनीही नाईलाजाने ती पिले ठेवून घेतली, अजून पोसत आहेत. पुढची वीण चारची. थोडक्यात सोसायटीच्या या मालकीणबाई आतापावेतो अठरा पिलांचे मातृत्व मिरवून आहेत... पुढच्या पिढीची तयारी झाली आहे! इतकेच नव्हे तर ही माऊली आजी होण्याच्याही मार्गावर आहे.

या बाईंचा नवरोबाही इतका निष्ठावान आहे, की तो रोज सकाळी सातच्या सुमारास एक फेरी मारून आपला हा घरोबा ठाकठीक आहे ना याचा आढावा घेऊन जातो. लॉकडाऊनमुळे तो ही बेरोजगार असल्याने फारच क्रियाशील झाला असावा नि दोन वर्षांत अठरा पोरांचा बाप होऊन बसला असावा. 

एखादे दिवशी त्याच्या भेटीला उशीर झाला, तर बाईसाहेब जातीने पलिकडच्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्याला घेऊन येतात. कुंपणावरुन चालणारी माऊ नि तिच्या मागे मान खाली घालून येणारे ’जावईबापू’ हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. ’मुडद्या इतका पोरवडा जन्माला घातलास, त्यांच्या पोटात दोन घास कसे घालायचे याची अक्कल नाही ती नाही; निदान त्यांना दिवसातून एकदा बापाचे तोंड तरी दिसू दे.’ असा दम देऊन त्याला घेऊन आल्यासारखा त्याचा चेहरा पडलेला असे.

पुढच्या पिढीच्या मागे आणखी दोन बोके फेर्‍या मारू लागले आहेत. माडगूळकरांच्या ’सत्तांतर’चा पुढचा भाग इथे लिहिला जाईल अशी शक्यता बरीच आहे.

’अति झालं नि हसू आलं’ ही म्हण सार्थ व्हावी असा हा अनुभव. सोसायटीमध्ये सतत बारकी मांजरे फिरत असतात. बरे ती माणसांना इतकी निर्ढावली आहेत की कुणी आले की दचकून बाजूला सरकण्याच्या फंदात पडत नाहीत, आपणच त्यांच्यावर पाय पडू नये याची काळजी घ्यायची. शिवाय पिले बारकी असली की त्यांना घाण करण्याची समज नसते. त्यामुळे रात्री ज्याच्या दारासमोर ताणून देणार तिथेच घाण करुन मोकळे. सकाळी दार उघडताच डोके भणभणून टाकणारा विष्ठेचा वास. ती साफ करणे हे एक जास्तीचे काम.

मी दोन तीन वेळा सर्वांना विनंती केली की ज्यांना पाळायची असतील त्यांनी ती आपल्या घरात पाळा, त्यांच्यासाठी सॅंडबॉक्स ठेवा, भाटी असेल तर ऑपरेशन करुन आणा... पण ते ही नको. मग सोसायटी खर्चाने हे करुन घेऊ म्हटले तर ते ही नको.

एक शहाणे तर त्याहून पुढचे. म्हणे ’ती मांजर उंदीर मारते त्यामुळे गाडीच्या वायरी कुरतडणारे उंदीर अनायासे मरतात.’ तोटा एवढाच की ते उंदीर, मारलेले कबूतर ती कुणाच्याही दाराशी आ्णून ताव मारते, पोरांना देते. ती एक जास्तीची घाण. पण ते साफ करायला घरच्या स्त्रिया आहेत ना. मग हे वीर गाडीची वायर कुरतडणार्‍या उंदराचे निर्दालन करणार्‍या मांजरीचे पाठीराखे होतात यात नवल काय. पण मग त्या मांजराचे ऑपरेशन करुन आण म्हटले की ’मी कुठे पाळले आहे त्याला’ म्हणून हात वर करायला मोकळे. फायद्याचे खासगीकरण आणि तोट्याचे सार्वत्रिकीकरण ही क्रॉनि-कॅपिटॅलिस्ट मेंटॅलिटी माणसाने वैय्यक्तिक आयुष्यातही पुरेपूर अंगीकारल्याचे हे उदाहरण आहे.

मांजराने कुठेही विष्ठा-विसर्जन करण्यात माणसाचाही मोठा दोष आहे, त्याबद्दलही बोलले पाहिजे. 'सर्व काही स्वत:च्या सोयीने असायला हवे' हा माणसाचा अट्टाहास इतका वाढला आहे, की बहुतेक सोसायट्यांमध्ये इमारतीच्या आसपासची जागा ही फरशा टाकून, कोबा करुन वा इंटरलॉकिंग ब्लॉक टाकून तिचे सपाटीकरण केलेले असते. माणसाची मातीशी नाळ इतकी तुटली आहे, की सोसायट्या एक कणभर मातीचे ढेकूळ उघडे न ठेवता सगळीकडे काँक्रीट ओतून ठेवतात. शहरांचे तपमान वाढत जाण्यामागे या प्रचंड तापणार्‍या आणि रात्री लवकर थंड न होणार्‍या काँक्रीटचा मोठा वाटा आहे.

आठ-दहा वर्षांपूर्वी कामानिमित्ताने सिअ‍ॅटल या मायक्रोसॉफ्टच्या शहरी धावती भेट झाली. मायक्रोसॉफ्टच्या ज्या ऑफिसमध्ये माझे काम होते, ते माझ्या राहण्याच्या जागेपासून अगदी दहा मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर होते. रहदारीही नगण्य असल्याने मी पहिल्या दिवशी रमतगमत निघालो. एके ठिकाणी रस्ता जवळजवळ काटकोनात वळला होता, तिथे वळलो आणि असे दिसले की मी एका पुलावर आहे आणि खालून त्यांचा फ्री-वे (आपल्याकडे ज्याला हायवे म्हणतात तो) जात होता. डावीकडे सहा नि उजवीकडे सहा मार्गिका असलेला अवाढव्य रस्ता. एवढी विशाल रुंदी असलेल्या काँक्रीटचा पट्टा, पार दूरवर गेलेला होता. दोन्ही बाजूला, मध्ये कुठेच एक हिरवे पान नव्हते (एरवी सिअ‍ॅटल डोंगरउतारावरचे शहर असूनही शहरात बर्‍यापैकी झाडोरा आहे.) तो भगभगीत पांढरा पट्टा पाहून मी प्रचंड दचकलो होतो. अमेरिकन मंडळींची ऑफिसेसही अशीच भकास भिंतींची, कामाशिवाय कोणताही अन्य रंग चढू न देणारी नीरस अशी असतात हे पुढे दिसून आले. (माणसाला भौतिक प्रगतीची खायखाय सुटली की त्याचे सौंदर्यभान, कलाजाणिवा, नि सामाजिक भान नाहीसे होते याचे अमेरिका हे ढळढळीत उदाहरण आहे. किंबहुना म्हणून तिथे सोशल मीडियासारख्या कृत्रिम गोष्टीचा शोध लागला असावा.)

आपणही त्यांची री ओढू लागलो आहोत. आता सर्व शहरी घरे तर आरसीसी स्ट्रक्चरची असतातच, पण रस्तेही काँक्रीट ओतून निर्मम बनवून ठेवले आहेत. लहान लहान बोळसुद्धा काँक्रीटचे केले आहेत. त्यामुळे पाणी मुरण्याच्या जागा नाहीशा झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी ड्रेनेज डक्ट्स नाहीत. गल्लीबोळातून पाणी वाहात येते ते मुख्य रस्त्यावर आणि तिथे त्याचा प्रचंड लोंढा होतो, त्यातून बराच जड कचराही जमिनीपासून उचलला जावा इतका रेटा तयार होतो. हा कचरा वाहात जाऊन कुठेतरी अडथळ्यापाशी त्याचे बंधारे तयार होतात नि माणसाची वस्ती जलमय होऊन जाते. गेल्या चार पाच वर्षांतला हा नियमित येणारा अनुभव.

याचा ताप मांजरांनाही होतो. पिले मोठी झाली आणि विष्ठा-विसर्जनप्रक्रियेची त्यांची मूळ जाणीव जागी झाल्यावरही खड्डा करण्यास मातीची जमीनच शिल्लक नसल्याने ही मंडळी इथे तिथे घाण करुन ठेवतात. त्यांचाही नाइलाज असतो. माणसाने निसर्गाला आपल्या सोयीने पार बदलून टाकला आहे. मांजरांसारख्या विपरीत परिस्थितीतही तग धरून राहण्याचे कौशल्य असलेल्या प्राण्यानेही माणसाच्या या हपापलेपणापुढे हात... आय मिन पंजे टेकले आहेत

पुलंच्या ’पाळीव प्राणी’मध्ये त्यांनी अशाच वेगाने त्यांच्या घरात वाढलेल्या मार्जारसंख्येबद्दल लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "... मांजरही घर सोडिनात; मग आम्हीच सोडलं." आमच्यावरही तीच वेळ येऊ नये अशी त्या ईजिप्तमधल्या फॅरोंच्या मार्जारदेवीच्या चरणी प्रार्थना आहे.

- oOo -


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. भाटीचे ऑपरेशन नाही केलें तर फार प्रॉब्लेम येतो... सोसायटीने एकत्रित करणे एवढे अवघड नव्हते खरं तर.. पण असो

    उत्तर द्याहटवा