मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा

आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’

हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार्‍या वीज, वीज-निर्मिती व वितरण व्यवस्थेचा शोध लावणारे मला सांगत असतील, ‘हे सारे पदार्थविज्ञानातील अमुक भागावर अवलंबून आहे.’ तर मी म्हणेन ‘ओके बाबा. तू म्हणशील तसं.’

जोवर त्यांच्या मी त्या दाव्यावर विश्वास ठेवतो आहे, तोवरच माझ्या घरात दिवे लागतील अशी काही त्यांच्या व्यवस्थेची अट नाही. त्यामुळे मी त्यांच्या दाव्यावर विश्वास न ठेवताही त्याचे व्यावहारिक उपयोग करू शकतोच. मी इलेक्ट्रॉन नामे कणाच्या अस्तित्वाच्या आधारे माझ्या आयुष्याचे निर्णय करत नसतो, त्याच्या व्यावहारिक अंगाचा वापर करत असतो जो माझ्या अनुभवसिद्ध असतो. वारंवारतेच्या नियमाने कार्य-कारणसंबंध सिद्ध झालेला असतो.

MouseWithALamp

उद्या एखाद्याने मला सांगितले, की ‘अरे इलेक्ट्रॉन वगैरे काही नसते, तुमच्या बोर्डमध्ये प्रत्येक बटनामागे एक उंदीर बसलेला असतो. तू बटन दाबलेस, की एक छोटी टाचणी त्याला हलकेच टोचली जाते. मग तो उठतो नि विजेच्या पट्ट्यांमधून/नळ्यांमधून (जिथे तुमच्या वायर्स आहेत असे हे विज्ञानवाले तुम्हाला खोटे सांगतात) तुझ्या ट्यूबपर्यंत जातो आणि तिथेच ठेवलेल्या पिटुकल्या काडेपेटीतून एक काडी ओढून तिथला तेलाचा दिवा पेटवून देतो...’ तुम्ही विचाराल ‘हॅ: तिथे दिवा कसा असेल, तेल कोण घालेल?’ तो सांगेल, ‘अहो रात्री तुम्ही झोपलात की हे सारे उंदीर बोर्डमधून बाहेर येतात आणि वीज(?) कंपनीने गुप्तपणे ठेवलेल्या तेलाच्या बुधल्यांतून तेल आणून सगळे दिवे साफ करुन त्यात भरुन ठेवतात.’

अशाच प्रकारचे दावे करत एक तर्कसंगती तो तुम्हाला देऊ शकतो जी (कल्पनाविस्तार म्हणू. पण-) एक शक्यता म्हणून तुम्हाला ती मान्य करावी लागते. मग तुम्ही याच्या व्यवहार्यतेचा विचार करता, मग अनुभवाच्या, मग वारंवारतेच्या... आणि पडताळणीच्या अखेरीस ही शक्यता असंभाव्य म्हणून सोडून देता.

उलट इलेक्ट्रॉन वगैरेच्या संकल्पनेच्या आधारे अशीच एक शक्यता तुमच्यासमोर ठेवलेली असते. जिचा अनुभवाच्या नि निरीक्षणाच्या आधारे पाठपुरावा केला असता ती अधिक संभाव्य आहे असे तुम्हाला दिसते. पण संभाव्य म्हणजे वास्तव नव्हे!

वास्तव हा शब्द आपण एकुणच सैलपणे वापरतो. वास्तव म्हणताना त्या वास्तवाची सारी अनुषंगे आपल्या अनुभवाचा भाग असायला हवीत. प्रत्येक अनुषंगांच्या आकलनातूनच आपले वास्तव सिद्ध होत असते. इथे एक ग्राहक म्हणून, वापरकर्ता म्हणून इलेक्ट्रॉन हा माझ्या अनुभवाचा भाग नाही, त्यामुळे तो माझ्या वास्तवाचा भागही नाही. परंतु तरीही अनुभव-साखळीच्या आधारे मी त्याला सर्वाधिक संभाव्य शक्यता म्हणून नोंदवत असतो. निरीक्षणे ही नेहमीच मूळ कारणाच्या परिणामस्वरूप असतात, ती स्वत:च कारणे नसतात. त्यामुळे त्या दोहोंना जोडणारा तर्काचा संबंध आधी सिद्ध केलेला असावा लागतो.

उंदीर दिवे पेटवतात असे समजणारा आणि इलेक्ट्रॉनमुळे दिवे प्रकाशमान होतात असे समजणारा, दोघेही बटण दाबून दिवा वा पंखा लावतात नि त्यांचा वापर करुन घेतात. दोघांच्या जगण्याच्या बाजू सारख्याच राहतात. फरक इतकाच की उंदीर-श्रद्धावाले नि इलेक्ट्रॉन-श्रद्धावाले फौजा बांधून एकमेकांचे खून करत ‘खरे विज्ञान’ लिहिण्याचा आटापिटा करत नाहीत.

आणि हो, आणखी एक फरक. इलेक्ट्रॉनवाल्यांना त्यांच्या त्या दाव्याच्या आधारे केवळ विजेचेच नव्हे तर इतर अनेक अनुभवांचे विश्लेषण करणे शक्य होते. उलट ‘उंदीर-श्रद्धा’वाल्यांना कार्य-कारण संबंध सिद्ध तर करता येतच नाही, पण अनुभव-वारंवारतेच्या निकषावरही ते वारंवार नापास होत राहतात. त्यामुळे त्या संकल्पनेच्या आधारे अन्य कुठला कृती-परिणाम संबंध सिद्ध होणे शक्यतेच्या टप्प्यावरही पोचत नाही.

जेव्हा ते त्यांच्या ‘उंदीर-श्रद्धे’चा संबंध अनुभवांशी ‘वारंवार’(!) जोडून दाखवतील तेव्हा मी माझ्या इलेक्ट्रॉन-श्रद्धेप्रमाणेच ‘उंदीर-श्रद्धे’ला नाही तरी त्याच्यावर आधारित कृती-परिणाम संबंधांना मान्य करुन माझ्या जगण्यात त्याचा वापर करुन घेईन.

पण जर ‘तुम्ही बटणच नीट दाबले नाही.’,‘दारे घट्ट बंद करुन झोपल्यामुळे उंदरांना तेल आणायला रात्री बाहेर जाता आले नाही. तेव्हा दोष तुमचाच आहे.’ वगैरे तर्क देऊन अनुभवातील खोट भरून काढणे सुरू झाले, तर ‘हा कृती-परिणाम संबंध बर्‍याच अटींवर सिद्ध होतो नि इतर अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो आहे’ हे सिद्ध होते. म्हणजे दिवा पेटणे हा बटण दाबणे या एकाच कृतीचा परिणाम नाही असे दिसून येते, आणि त्याचा व्यावहारिक वापर मला दुरापास्त होत जातो. त्यामुळे जगण्याचा आधार म्हणून स्वीकारण्यासाठी मला त्याहून अधिक व्यावहारिक वारंवारता असणार्‍या कृती-परिणामांच्या जोडीच्या शोधात जावे लागते.

थोडक्यात इलेक्ट्रॉन-श्रद्धेला अनुभवाची जोड मिळून ती माझ्यासारख्या सामान्याच्या दृष्टीने शक्यतेमधून संभाव्यतेच्या परिघात येते, तर उंदीर-श्रद्धेला तर्कसंगती म्हणून शक्यतेच्या पातळीवरच सोडून द्यावे लागते. एखादी शक्यता तपशीलवार, तर्कसंगत मांडली म्हणून ती संभाव्य होत नाही, वास्तव ठरणे तर दूरची गोष्ट आहे. श्रद्धेलाही तर्कसंगती असतेच, फक्त ती पडताळायोग्य नसते.

- oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा