मंगळवार, २१ जून, २०२२

व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?

’व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?’ हा प्रश्न अनेकांकडून- विशेषत: हवी ती मुलगी भाव देत नसल्यामुळे व्यथित झाल्यामुळे स्वत:ला गुड बॉईज समणार्‍यांकडून, विचारला जात असतो. परवा फेसबुकवरच कुणाच्या तरी प्रतिसादात वाचला आणि काही काळापूर्वी पाहिलेल्या एका मालिकेची आठवण झाली.

GoodGirlBadBoy
www.shutterstock.com येथून साभार.

स्टार्स हॉलो नावाचे एक लहानसे शहर. अशा ठिकाणी असते तसे साधारण कम्युनिटी लाईफ, शहरीकरणातून आलेल्या व्यक्तिकेंद्रित आयुष्याचा प्रवाह तितकासा बलवान झालेला नाही. इथे लोरलाय नावाची एक स्त्री आपल्या मुलीसह राहते आहे. ही रोरी १६ वर्षांची अतिशय गोड मुलगी, आसपासच्या सर्वांची आवडती. अमुक बाबतीत, अमुक व्यक्तीबाबत इतके सहानुभूतीने वागण्याची वा सक्रीय मदतीची काय गरज होती?’ या प्रश्नावर ’यू नो, इट्स रोरी’ हे उत्तर पुरेस व्हावे इतके तिचे ते व्यक्तिमत्व घट्ट होऊन गेलेले.

सगळ्यांशीच चांगले वागणारी, आपल्याबद्दल कुणाचे वाईट मत असू नये यासाठी आटापिटा करणारी माणसे 'खरोखरच सहृदयी असतात की संघर्षाला, मानसिक ताणाला घाबरुन तसे वागत असतात, पडते घेऊन संघर्ष टाळतात?' असा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. रोरीच्या बाबत ती सहृदयी असल्याचे - ते ही तिच्या आईने तसे म्हटल्यामुळे - सुरुवातीला झालेले मत पुढे तिचे आजी-आजोबा तिला ज्या प्रकारे मॅनिप्युलेट करतात, ते पाहता बदलले. इतकेच नव्हे तर पुढे इतरांपुढे सतत पडते घेण्याची तिची वृत्ती चांगुलपणापेक्षाही भित्रेपणाची अधिक दिसू लागली.

अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा सतत चांगुलपणाचा ताण असहय होऊन सोयीच्या ठिकाणी तिचा स्फोट होतो नि माफक बंड करुन पुन्हा मूळ पदावर येतो. अशा व्यक्तिंना सुरक्षित वातावरणाची आस असते. वयाच्या सोळाव्या वर्षी मातृत्वाला सामोरे गेलेल्या नि पुढचे सारे आयुष्य इतर कुणाच्याही मदतीखेरीज कणखर उभ्या राहिलेल्या तिच्या आईने ते तिला दिले आहे. पण त्याचमुळे कदाचित तिला संघर्षाची सवय नाही.

शहर लहान असले तरी अमेरिकेतील. त्यामुळे टीनएजर असून बॉयफ्रेंड नाही ही ’माथा आळ लागे’ अशी गोष्ट. तसा रोरीलालाही एक बॉयफ्रेंड आहे, डीन. रोरी अभ्यासातही हुशार, उच्चशिक्षण हे फक्त हार्वर्ड युनिव्हर्सिटीत घेणार हे तिने फार लवकर ठरवून टाकले आहे. त्या तुलने डीन अभ्यासात सर्वसाधारण. रिटेल स्टोअरमध्ये काम करता करता शिक्षण घेणारा. हार्वर्ड सोडा पण कुठल्याही प्रथितयश खासगी शिक्षणसंस्थेऐवजी कम्युनिटी कॉलेजमध्येच शिकण्याची आपली कुवत असल्याची खूणगाठ बांधलेला. अतिशय सौम्य प्रकृतीचा नि सर्वांना मदत करण्यास तत्पर. पण त्याने आपल्या या मैत्रिणीसाठी एक एक पार्ट जमवून कार तयार केली आहे.

या गावात जेस नावाच्या एका मुलाचा प्रवेश होतो. हा जेस अत्यंत उद्धट नि माणूसघाणा. त्याच्या दुर्वर्तनाने कंटाळून त्याच्या आईने मामाकडे राहून काही सुधारला तर पाहावे म्हणून सक्तीने इथे पाठवल्याने उद्दामपणाची भर पडलेली. लवकरच त्या छोट्या शहरात परस्परांशी बव्हंशी सौहार्दाने राहणार्‍या बहुसंख्य लोकांमध्ये तो अप्रिय होतो. पण रोरी सगळ्यांशीच चांगले वागावे अशा वृत्तीची. त्यामुळे आपल्या आईचा अपमान केलेल्या जेसशीही ती औपचारिक का होईना पण चांगुलपणानेच वागते. सतत इतरांमध्ये चांगले शोधण्याचा आव आणत प्रत्यक्षात त्याच्या/तिच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी धागा शोधणार्‍या रोरीला जेसमध्ये असे धागे सापडतात.

रोरी शालेय हुशारीच्या जोडीला पुस्तकातील किडा. इंग्रजी भाषेतील बहुतेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचली आहे. हा जेस एकलकोंडा. इतर कुणाशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो पुस्तके वाचतो. ही गोष्ट पुस्तकी किडा असलेल्या रोरीचे लक्ष वेधून घेते. वाचणारे विचारी वा बुद्धिमान असतात असा खुद्द वाचणार्‍यांचा स्वत:चा गैरसमज अनेकदा असतो (आणि ते नसतात असे वाचनाचा कंटाळा असणार्‍यांचे ठाम मत असते. एकुणात आम्हीच बरोबर ही वृत्ती सार्‍यांचीच.) त्यामुळे ’देअर इज सम गुड इन एव्हरी मॅन’ या उक्तीनुसार जेसमध्येही काही चांगले असावे असा समज रोरी करुन घेते.

त्यातच तिचा बॉयफ्रेंड डीन हा फारसा वाचत नाही. एरवी त्याचे अनेक गुण या एका गोष्टीमुळे जेसच्या तुलनेत धूसर होतात. रोरी जेसकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागते. डीन हा सौम्य प्रवृत्तीचा... रोरी जेसकडे आकर्षित झाली आहे हे लक्षात येऊनही तिला समजून घेतो, ’ती बुद्धिमान आहे, स्वत:च यातून ती बाहेर येईल’ असे समजून तो कोणताही आततायीपणा करत नाही. उलट जेस हा आक्रमक, ’मला हवे ते मिळाले तर ठीक नाहीतर जग गेले उडत’ अशा वृत्तीचा. रोरी लक्ष देत नाही म्हणून तो थेट दुसर्‍या मुलीला घेऊन हिंडतो, अनेकदा मुद्दाम तिच्यासमोरच या ’तात्पुरत्या-प्रेयसी’ची चुंबने घेतो, तिला मिठीत घेतो, तिच्या मनात असूया निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

’दुसर्‍याकडे आहे ते खेळणे आपल्याला हवे’ ही बालपणीची वृत्ती पौगंडावस्थेवतही बरीचशी शिल्लक असते, फक्त खेळण्याचे स्वरूप बदलते इतकेच. त्याला अनुसरून रोरी आपल्याकडे आकर्षित होईल हा जेसचा आडाखा अचूक ठरतो. अनेकदा बेफिकिरीला बेडरपणा समजण्याची चूक केली जाते तशीच रोरीने केली असावी. त्यातच एरवी कोणतीही जबाबदारी न घेणारा जेस अपवादात्मक प्रसंगी आपल्या मामाचे काही काम करुन टाकतो. त्यामुळे ’देअर इस सम गुड इन हिम’ या रोरीच्या सोयीच्या दाव्याला अधिक बळकटी येते, इतरांसमोर त्याचे समर्थन करण्याची सोय झाली असा रोरीचा समज होतो.

अशा ’बॅड बॉईज’कडे लौकिकार्थाने गुड गर्ल्स असणार्‍या मुली आकर्षिक होण्याचे मुख्य कारण असते ती आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी आणि आव्हान स्वीकारण्याची वृत्ती. आधीच गुणी असलेल्या बॉयफ्रेंडसाठी काही केल्याचे श्रेय त्याच्या गर्लफ्रेंडला मिळत नसते.

यावरुन आठवले. आमच्या एका निर्व्यसनी, व्यासंगी, शाकाहारी, संगीतप्रेमी, आयटीमध्ये बक्कळ पगाराची नोकरी, एकुलता एक मुलगा वगैरे लौकिकार्थाने सर्व डिझायरेबल वर-गुण असलेल्या एका मित्राला नकार देताना एका मुलीने म्हटले होते, ’तुझ्याकडे सगळेच गुण आहेत. म्हणजे तुझी बाजू नेहमीच वरचढ ठरणार.’ मला तेव्हा हसू आले असले, तरी तिचे म्हणणे चुकीचे नव्हते. सोबत आयुष्य काढायचे असेल तर काहीवेळा - कदाचित- चुकीची वा दुय्यम असूनही तिची निवड वा बाजू स्वीकारली जायला हवी, ही तिची अपेक्षा अनाठायी नव्हती... फक्त ती स्वीकारली जाणार नाही हे तिचे गृहितक चुकले होते.

उलट जेससारख्या बॅड बॉयमधील दुर्गुण आपल्या प्रेमाने/प्रभावाने नष्ट वा कमी करुन, इतरांकडून दुर्लक्षित केलेले नि फक्त मलाच दिसलेले सद्गुण अधिक ठळक करुन, तो बॅड बॉय नव्हे तर ’अ बॉय मिस अंडरस्टुड’ आहे नि मीच त्याला सर्वात आधी समजून घेतले, वळणावर आणले हे श्रेय मिरवायची इच्छा असते. एका सर्वसाधारणपणे चांगल्या बॉयफ्रेंडपेक्षा ही ट्रॉफी अधिक अभिमानाने मिरवता येते कारण तिच्यासाठी अधिक कष्ट घेतलेले असतात, ती आपली निर्मिती असते.

अर्थात यात यशाचे प्रमाण किती असणार हे त्या मुलीच्या चिकाटीवर आणि त्या मुलाचे ’बॅड बॉय’ असणे परिस्थितीवश किती नि मूळ स्वभावात किती या दोन्हींवर अवलंबून राहाते. कारण माणूस आहे तसा स्वीकारणे सोपे असते. याउलट त्याला आपल्याला अपेक्षित अशा व्यक्तिमत्वाकडे ढकलत नेण्यासाठी स्वीकारण्यामध्ये संघर्ष अधिक तीव्र असतो. ’त्याला सामोरे जाण्याची इच्छा नि कुवत आपल्याकडे आहे का’ याचा अदमास घेण्याइतपत समज रोरीच्या वयात असत नाही. त्यामुळे असे आव्हान स्वीकारणे ही अंधारात घेतलेली उडीच ठरण्याची संभाव्यता अधिक असते.

दुसरीकडे एकदा जवळ आले की या ’बॉयफ्रेंड’च्या (आपल्याकडे लगेचच त्याचा नवराही होतो, हातून निसटण्याची असुरक्षिततेची भावना आपल्याकडे अधिक आहे.) बेफिकीरीला बेडरपणा, क्रौर्याला शौर्य, हट्टीपणाला लीडरशिप क्वालिटी, एकांगीपणाला दृढनिश्चयीपणा वगैरे समजले जाऊ लागते आणि कदाचित बॅड बॉयला 'गुड बॉय-टॉय'मध्ये परिवर्तित करु इच्छिणारी ही प्रेयसी त्याला न बदलता स्वत:चे दृष्टिकोनच बदलून घेऊ लागते. अर्थात तिचा पुढे भ्रमनिरास झाला नाही तर, तिला पूर्वी अपेक्षित असलेल्या पद्धतीने नसले तरी ते नाते टिकून राहू शकते. पण रोरीसारख्या हुशार मुलीबाबत हे संभवत नसते.

जेसला पुस्तकात रस असणे हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा केवळ एक भाग आहे. त्या एका गुणाच्या आधारे त्याचे सारे व्यक्तिमत्व बदलता येत नसते. जगाला फाट्यावर मारण्याची वृत्ती, गर्लफ्रेंड ही एक 'मिळवण्याची गोष्ट' आहे हा समज, अंगभूत उद्धटपणा हा केवळ रोरीने त्याचा स्वीकार करण्याने बदलत नाहीतच. उलट डीनचे तिच्या आयुष्यात रस घेणे, तिच्या आवडी समजून घेणे, या गुणांच्या तुलनेत जेसचे तिने त्याच्यासाठी कॉलेजला जाऊ नये वा त्याला हवे तसे वागाचे या (एरवी त्याच्या दृश्य प्रवृत्तीशी सुसंगत) आग्रही वृत्तीचे चटके रोरीला बसत राहतात. आणि मागे सोडून आलेल्या डीनचे गुण प्रकर्षाने दिसू लागतात.

आता लगेच इथे ’रोरीचा निर्णय चुकला, डीन कित्ती गुणी’ असा निवाडा द्यायचा नसतो. डीनच्या सामान्य आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक स्थितीमुळे रोरीच्या आजोबांनी त्याला आधीच नाकारलेले असते. हार्वर्डला जाऊ इच्छिणार्‍या मुलीला तिचे आयुष्य पुढे सरकेल तसतसा डीनही लोढण्यास्वरूपच होणार हा तर्क करण्यास फार बुद्धिमान असण्याची गरज नाही. त्याचं ’गुड बॉय’ असणं रोरीला आयुष्याची सोबत करण्यास पुरेसं नसतंच. किंबहुना म्हणूनच पहिला बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड हा ब्रेक-अप करण्यासाठीच असतो अशी खूणगाठ अमेरिकन टीन-एजर बांधून ठेवत असतात. विशीच्या आत असलेल्यांच्या आयुष्याची दिशा अद्याप निश्चित झालेली नसते. आणि ती जसजशी ठळक होत जाते, तसतसे दोघांचे मार्ग भिन्न होण्याची संभाव्यता वाढत जाते. अशा वेळी दूर होणे दोघांच्या हिताचे असते.

हे डीनला समजते नि तो समजूतदारपणे स्वत:च दूर होतो. पण जेस मात्र हट्टाने रोरीचा मार्ग वळवून आपल्या दिशाहीन मार्गाला मिळावा म्हणून आततायीपणा करत राहतो. ’देअर इज सम गुड इन एव्हरी मॅन’ या उक्तीला, रोरीच्या समजाला न नाकारताही असे म्हणता येईल की लौकिकार्थाने गुड बॉईज नि बॅड बॉईज म्हटल्या जाणार्‍यांमध्ये हा एवढा फरक नक्की दिसतो. आणि हे रोरीसारख्या ’गुड गर्ल्स’नी समजूनच बॅड बॉईजच्या दिशेने पाऊल टाकायचे असते.

---

चित्रपटाच्या तुलनेत मालिकेमध्ये व्यक्तिमत्व विस्ताराला वाव असतो. अर्थात प्रत्येक ठिकाणी तो घेतला जातो वा घेणार्‍याला जमतोच असेही नाही. रोरीचे कथानक तसे ’रन ऑफ द मिल’ असले (खरंतर साहित्यापासून दृश्यकलांपर्यंत सर्वत्र चांगुलपणा हा अवास्तव समजण्याच्या प्रघात असल्याने तसे म्हणता येईल का शंका आहे.) तरी ही तीन व्यक्तिमत्वे नीट उभी करणे, त्या संदर्भात रोरीच्या व्यक्तिमत्वातील संभ्रमासह विविध कंगोरे उभे करणे ’गिल्मोर गर्ल्स’च्या लेखक-दिग्दर्शकाला शक्य झाले.

- oOo -


संबंधित लेखन

४ टिप्पण्या:

  1. लेख चांगला आहे. नेहमीप्रमाणेच, लिहायचं निमित्त सिरीज हे असलं तरी तरी माणसाच्या स्वभावाची, वागण्याची, प्रतिक्रियांची वीण उसवून सांगायची तुझी शैली बाकी व्वा आहे.

    उत्तर द्याहटवा

  2. मला वाटतं, मी हा लेख पूर्वी वाचलाय किंवा कुठेतरी तुमचा यासंदर्भातील प्रतिसाद वाचला आहे. आज युसूफचा लेख वाचताना सहज ब्लॉगवर रेंगाळले आणि हा लेख परत वाचनात आला.
    'मी त्याच्यावर प्रेम करून त्याला माणसात आणते पाहा', वाला हट्ट आणि त्याविषयीचं निरीक्षण एकदम खरं आहे. कित्तीतरी बायकांना नवऱ्यांच्या चुकीच्या किंवा चटकन कुणाला आवडत नसतील अशा सवयी सांगण्याची सवय असते, त्यामागचा सुप्त हेतू हाच असावा. 'बघा तरी मी म्हणून याच्याशी संसार करतेय' एखादी बाई तिच्या नवऱ्याच्या तक्रारी सांगत नसेल किंवा सासरच्या तक्रारी सांगत नसेल तर तिच्याकडे अनेकजणी चक्क, ही कोण परग्रहवासी या अर्थाने पाहतात किंवा ही उगाच देखावा करतेय, असं मानून घेतात.
    पुरुषांच्यात काय असतं मला माहिती नाही.
    अर्थात या 'पहा मी त्याला माणसात आणते की नाही', वाल्या बाया आणि 'लग्न झालं की पोरगा सुधारेल' असले दिव्य समज असलेले लोक यांचं एकमेकांत सॉलिड कनेक्शन आहे....
    गिल्मोर गर्ल्स घडतं तो तर प्रगत देश आहे. आपल्याकडच्या बायांना तर ग्राऊंडलेव्हलचे प्रश्न असतात. तरीही अनेकजणी उभ्या राहतात, खमक्या बनतात.(यात गिल्मोर गर्ल्सपेक्षा आपल्या बाया भारी असलं काही म्हणण्याचा उद्देश्य नाही.) मागे मी कुणाच्यातरी एका कवितेवर प्रतिसाद लिहीला होता. बायांच्या डोळ्यात करुणेचं तळं... अशा अर्थाची कविता होती. तेव्हा मी जे म्हटलं होतं तेच मला वाटतं. बायांना डोळ्यातलं करुणेचं तळं आटवण्याची गरज आहे. असली करुणा, तथाकथित अपार प्रेम, स्त्रीसुलभ भावना वगैरेच्या पाण्याने डोळ्यांपुढचं चित्र धूसर होतं. त्यामुळे व्यवहारवाद आणि आपलं हित कशात आहे, हे अंजन जरा डोळ्यात घातलं तर जगभरातल्या बऱ्याचशा बायकांच्या डोळ्यातलं खारं पाणी कमी होईल, कदाचित

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thanks स्वाती. हा मुद्दा प्रथम फेसबुकवर पोस्ट म्हणून लिहिला होता. मग विस्तार करुन इथे पोस्ट केला आहे.

      ‘बायांना करुणेचं तळ आटवण्याची गरज आहे.’ हे एकदम पटलेलं आहे. मी स्वत: रोरीची दोन व्हर्शन्स पाहिलेली आहेत. बोलबचन म्हणा की आयुष्याबद्दल फारसे गंभीर नसलेल्या पण आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या सह-विद्यार्थ्याच्या प्रेमात पडून पुढचे आयुष्य -वाया नाही तरी- त्यांच्या गुणवत्तेहून, माझ्या मते त्यांना मिळायला हवे होते त्याहून सामान्य दर्जाचे आयुष्य जगताना पाहतो आहे. या दोघीही विलक्षण हुशार होत्या, आयुष्यात बरेच काही करू शकल्या असत्या असे मला वाटते. आज कुठलीशी सर्वसाधारण नोकरी करतात. दोघींचेही नवरे अनिश्चित स्वरूपाचे रोजगार करतात. अजूनही ते आयुष्याकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत असे मला वाटते.

      काही तरुण लग्नाळू तरुणी फार व्यवहारी झाल्या आहेत अशा तक्रारी करतात तेव्हा मला उलट समाधान वाटते. आपल्या आयुष्याची व्यवहारी बाजू त्यांना महत्त्वाची वाटू लागली असेल तर हिंदी चित्रपटाने रुजवलेल्या स्वप्नाळू जगातून त्या बाहेर येत आहेत हे चांगलेच आहे. भाई-दादांच्या फ्लेक्सवर चमकण्यात धन्यता मानणारे, जात-धर्माचे फेट मिरवणारे आणि अजूनही ‘इम्प्रेशन मारून पोरी पटवायच्या’ या मानसिकतेमधून तरुणांनाही असेच बाहेर येण्याची गरज आहे.

      त्या कुठल्याशा सिनेमात ’मैं तुम्हारे दिल में रह लूँगी’ म्हणणार्‍या हीरोईनला तिचा सासरा ’अरे गांडी, बनिये का बिल आएगा ना तब ये दिल वगैरा का भूत उतर जाएगा’ म्हणतो तो छोटासा प्रसंग मला चांगलाच लक्षात राहिला आहे. हे शहाणपण हवंच.

      हटवा