रविवार, ७ जुलै, २०१३

दोन रंगकर्मी दोन आत्मचरित्रे: १ (आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड)

आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्‍याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या welcome - आनंदाने स्वीकाराव्यात अशा - ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्‍याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची 'नैया पार' झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित्रे आणि दोनही रंगकर्मींबाबत मला सारखाच आदर. तेव्हा त्या अनुभवातून जाताना जे गवसलं ते इथे थोडक्यात मांडतो आहे.

पहिले हाती लागले ते डॉ. लागूंचे 'लमाण'. खरंतर हे पुस्तक तसे दहा वर्षांपूर्वीचे, पण कोण जाणे कसे राहून गेलेले. अलिकडे 'रूपवेध' आणल्यानंतरच आपण ’लमाण’ वाचले नाही याची जाणीव झाली. त्याच सुमारास कार्नाडांचे 'आडाडता आयुष्य' देखील उमा कुलकर्णीच्या अनुवादाच्या माध्यमातून अतिशय वाजतगाजत अवतीर्ण झाले. तेव्हा ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी 'गृहप्रवेश' करती झाली. हा योगायोग अतिशय चांगलाच ठरला म्हणावे लागेल. कारण यामुळे ती दोन्ही आगेमागे वाचण्याचा फायदा उठवता आला.  पहिल्या भागात लिहितोय ते खरंतर मागाहून वाचलेल्या पुस्तकाबाबत, 'आडाडता...' बाबत, नि पुढच्या भागात लिहिन ते 'लमाण' बाबत. मांडणीच्या दृष्टीने हे अधिक सोयीचे वाटले इतकेच. 

गिरीश कार्नाड यांचे 'तुघलक' काही काळापूर्वी माधव वझे यांनी रंगभूमीवर आणलेले पाहिले होते. इतिहासाने 'मूर्ख' अशी संभावना करून सोडून दिलेल्या तुघलकाच्या आयुष्याचा एक वेगळाच अन्वयार्थ लावून कार्नाडांनी समोर ठेवला होता, तो पाहून मी स्तिमित झालो होतो. (अशीच काहीशी अवस्था जीएंनी मांडलेला 'डॉन किहोटे' वाचून झाली होती.) तेव्हाच प्रथम या माणसाच्या लेखनाचा मागोवा घ्यायला हवा अशी खूणगाठ मी बांधून ठेवली होती. पुढे मग 'ययाती'. 'हयवदन', 'नागमंडल' यांच्या मार्फत तो प्रवास पुढे चालू राहिला. मागल्याच वर्षी लागू दांपत्यांतर्फे रंगकर्मींना दिला जाणारा 'तन्वीर सन्मान' जेव्हा कार्नाडांना देण्यात आला तेव्हा या दोन व्यक्तींचा चाहता असल्याने तिथे उपस्थित असणे अनिवार्यच होते. तेव्हा 'आडाडता...' च्या अनुवादाच्या जाहिराती सुरू झाल्या तेव्हापासून माझी उत्सुकता ताणली गेली होती. प्रत्यक्ष पुस्तक हाती लागले नि आधाशासारखे वाचून काढले. थोडक्यात सांगायचे तर या चरित्राने माझी पूर्ण निराशा केली असे खेदाने म्हणावे लागेल.

कार्नाडांनी कौटुंबिक नि वैयक्तिक आयुष्याची बाजू अतिशय तपशीलवार नि प्रांजळपणे मांडलेली आहे. आपल्या जन्मापूर्वी आपले आईवडील 'हे मूल नको' या निर्णयाप्रत येऊन गर्भपाताची तयारी करत होते नि केवळ डॉक्टरीणबाई न आल्याने आपला या जगात प्रवेश झाला हे ऐकून स्वतःला बसलेला धक्का, त्यातून 'हे जग आपल्याविनाही असेच चालू राहिले असते' हा - अस्वस्थ करणारा - झालेला बोध अतिशय प्रत्ययकारी उमटला आहे. (सदर आत्मचरित्र त्या अनुपस्थित राहून आपल्या अस्तित्वाला कारण ठरलेल्या डॉ मधुमालती गुणे यांनाच अर्पण केले आहे.) एकुणच कथनाचा सूर सर्वसाधारण आत्मचरित्रात असतो त्याहून खूपच प्रांजळ नि प्रामाणिकपणाचा. अगदी आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधांबाबत (ते ही भावनिक बाजूचा पूर्ण अभाव असलेले) कोणताही गंड (एका बाजूने अपराधगंड नाही तसेच आपण स्त्रिया कशा 'पटवल्या' वगैरे सांगण्यातला अभिनिवेश वा अहंगंडही) न बाळगता केलेले कथन. भारतीय समाजातच काय अगदी तुलनेने याबाबत अधिक स्वतंत्र विचाराच्या मानल्या जाणार्‍या कलाक्षेत्रातदेखील हे उदाहरण दुर्मिळ मानावे लागेल. परंतु हे सारे कुठेही त्यांच्या जगण्याशी धागा जुळवून घेत नाही. तात्कालिक मानसिक असमतोलातून सावरण्यापलिकडे त्या संबंधातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कोणताही प्रभाव त्यातून पडलेला दिसत नाही. त्या अर्थाने त्यांचे चरित्रातील स्थान गौणच मानावे लागेल.

ऑक्सफर्डमधील दिवसांचे वर्णनही असेच खोगीरभरती स्वरूपाचे. एकुणच पुस्तकाचे स्वरूप आठवणींची मोळी बांधल्यासारखे. कथनप्रवाहाच्या अधेमधे वाट वाकडी करून, कालविपर्यास करून एखाद्या व्यक्तिमत्त्वाबाबत, त्याच्या जडणघडणीबाबत काही अधिक तपशील देऊन ती व्यक्ती, ती घटना, तो परिणाम अधिक नेमका वा ठसठशीत करणे हा बव्हंशी प्रस्थापित झालेला कथनप्रकार आहे. परंतु या कथनातील मूळ कालानुक्रमाचा, घटनाक्रमाचा धागाच अधिक ठळक दिसायला हवा, अन्यथा वाचकाचा गोंधळ उडू शकतो. 'आडाडता...' मधे बरेचदा असे घडते आहे. बरे इंग्रजीत ज्याला डीटोऽर (detour) म्हटले जाते तसे हे तात्कालिक वळण मूळ कथनाच्या वाटेवरचे काही धागे ठळक करत असेल तर त्याचे प्रयोजन सफल झाले म्हणावे. उगाचच एखाद्या पात्राची कुटुंबाची माहिती, पूर्वीचे आयुष्य, पुढचे आयुष्य याची भरताड देऊन परत गाडं रुळावर येत असेल तर त्या व्यक्तिमत्त्वाचा एकुण कथनात,  चरित्रनायकाच्या वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये कुठे प्रभाव असेल, काही निर्णायक वळणावर त्याचा सहभाग असेल तर हे सारे अपसव्य कामी आले असे म्हणता येईल. 'आडाडता...' मधे अशी भरताड भरपूर असली तरी ती बहुधा पुढे कुठेच न दिसणार्‍या, परिणाम घडवणार्‍या पात्रांबाबत अथवा घटनांबाबत आहे.

कार्नाडांच्या वैचारिक जडणघडणीचा प्रवास यात फारसा दिसत नाही.  कलाक्षेत्रातील प्रवासात वाटेवर आलेल्या आपल्या अपयशांची, कळत न नकळत आपण केलेल्या अन्यायाची वा चुकांची थेट कबुली त्यांनी प्रांजळपणे दिलेली असली त्याची डॉ. लागूंनी 'लमाण' मधे केली तशी कारणमीमांसा वा चिकित्सा केलेली दिसत नाही. त्यामुळे त्यातून त्यांच्या विचारसरणीवर, पुढील वाटचालीवर झालेला परिणाम त्यांनी स्वतःच न तपासल्याने वाचकाला उपलब्ध होणे दूरच राहिले आहे. गिरीश कार्नाड म्हटले की मिथकांची वर्तमानाशी सांगड घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या अजोड नाटकांची आठवण होणारच. यातील 'ययाती' नि 'तुघलक' तर भारतीय नाट्यक्षेत्रात मैलाचे दगड ठरलेली नाटके. कलाक्षेत्रात सर्वात उशीरा दाखल झालेल्या चित्रपटाच्या वावटळीत नाटकांचे स्थान नि वैशिष्ट्ये घट्ट टिकवून ठेवणारी जी मूठभर नाटके होती त्यात या दोन नाटकांचे स्थान फार मोठे आहे. याशिवाय 'हयवदन' सारखे जगण्यातील मूलभूत प्रश्नांना भिडणारे नाटक, 'नागमंडल', 'अग्नि मत्तु मळै' (ज्यावर 'अग्निवर्षा' नावाचा हिंदी चित्रपटही येऊन गेला, त्याची दखलही कुणी घेतली नाही हे अलाहिदा) आणि 'इन्सेस्ट' सारखा नाजूक विषय मांडणारे 'अन्जु मळिगे' सारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर अतिशय सखोल जाणिवेची नाटके लिहिणारे कार्नाड त्या नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेबाबत बोलतील, त्या वेळच्या आपल्या वैचारिक आंदोलनांची, त्यावर परिणाम घडवणार्‍या व्यक्तिंची, घटकांची, विचारव्यूहाची मांडणी करतील अशी अपेक्षा होती, ती गैर नसावी. परंतु या बाबत हे आत्मचरित्र पूर्ण निराशा करते. ययाती नि तुघलक चा निर्मितीचा केवळ फक्त कालक्रम सांगून नि त्यातील व्यावहारिक तपशील देऊन इतर नाटकांना तर जवळजवळ पूर्णपणे उपेक्षित ठेवले आहे. केवळ जाताजाता आयुष्यात भेटलेल्या एखाद्या व्यक्तिचे वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधी घडलेली घटना याचा उपयोग वा परिणाम एखाद्या नाटकाशी असेल तर तेवढा एक दोन वाक्यात नोंदवून ते पुढे जाते. कार्नाड नि नाटक यांचे असलेले अतूट नाते लक्षात घेता हे फारच निराशाजनक ठरते.

अपवाद आहे तो अनंतमूर्तींच्या 'संस्कार' नि 'वंशवृक्ष'  या भैरप्पांच्या कादंबरीवरील चित्रपटांवरील प्रकरणाचा. फक्त एवढ्या एकाच ठिकाणी या आत्मचरित्राने माझे थोडेफार समाधान झाले असे म्हणू शकेन. चित्रपटाच्या प्रवासाचे अतिशय विचक्षण भूमिकेतून मूल्यमापन कार्नाडांनी केलेले दिसते. यात प्रत्यक्ष कादंबरीतील पात्रांचा, पार्श्वभूमीचा विचार वगैरे अभ्यासपूर्ण भाग येतो तसेच चित्रपटाशी संबंधित निर्मितीमूल्ये, कलेशी संबंधित विवेचन, चित्रपटाशी संबंधित व्यक्तिंचे मानापमान, त्यातून होणारे संघर्ष नि या खडतर प्रवासातून तयार होऊन सर्वत्र नावाजलेल्या चित्रपटाबाबत सकारण व्यक्त केलेले असमाधान. हे एकच प्रकरण अतिशय भावले असे म्हणावे लागेल.

उमा कुलकर्णींच्या अनुवादाचा दर्जा देखील धक्कादायक रित्या घसरलेला दिसून आला. यापूर्वी त्यांनी केलेल्या भैरप्पांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद अतिशय वाचनीय झाले होते. परंतु इथे त्यांच्या भाषेवर व्यवहारात प्रचलित होऊ पाहणार्‍या काहीशा संकरित भाषेचा प्रभाव पडू लागल्याचे जाणवले. उदाहरणादाखल एक वाक्य असे आहे 'तेव्हा वसंतदादा अविवाहित होता.' तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य बरोबर असले तरी 'अविवाहित असणे' ही वाक्यरचना बहुधा जन्मभर अविवाहित असणार्‍यांच्या संदर्भात वापरली जाते, यात ही आजन्म स्थिती अपेक्षित असते. इथे साधारणपणे 'तेव्हा वसंतदादाचे लग्न झालेले नव्हते.' अशी वाक्यरचना केली जाणे - मला तरी - अपेक्षित होते. हे एक किंवा दुसरे एक वाक्य 'माझ्या जीवनातली ही घटना अशा काही मोजक्या घटनांपैकी आहे, ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला.' आधी दिलेल्या वाक्यावर हिंदी वाक्यरचनेचा प्रभाव तर इथे इंग्रजी. इथे साधे सोपे मराठी वाक्य असे काहीसे लिहिता आले असते 'ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला अशा माझ्या जीवनातील काही मोजक्या घटनांपैकी ही एक आहे.' यामुळे जागोजागी वाचताना अडखळत होतो नि वाचनाच्या गतीला खीळ बसत होती.

जिथे अपेक्षा अधिक असतात तिथे अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक तीव्र असते हे ओघाने आलेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा