मंगळवार, ३० जुलै, २०१३

काही नि:शब्दकथा

(कथा, प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. परंतु तरीही कोण्या जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनांशी साधर्म्य आढळल्यास लेखकाला ताबडतोब सूचना द्यावी. जेणेकरून त्या कल्पित-वास्तवाच्या तौलनिक अभ्यासासाठी शिष्यवृत्तीची मागणी नोंदवणारा अर्ज करता येईल.)

प्राचीन:

WoldAndTheLamb
https://steemit.com/ येथून साभार

एकदा एक लांडगा नदीवर पाणी पीत होता. पाणी पिता पिता त्याच्या लक्षात आले की प्रवाहाच्या खालच्या बाजूला एक लहानसे कोकरूही पाणी पीत होते. "तू माझ्या पाण्याला तोंड लावून ते उष्टे करत आहेस." लांडगा कोकरावर खेकसला.

"असं कसं होईल वृकराज. मी तर प्रवाहाच्या खालच्या बाजूला पाणी पीत आहे, इकडून पाणी उलट तुमच्या दिशेने कसे जाईल."

"तू तर भलताच उद्धट दिसतोस, वर्षभरापूर्वीही तू माझ्याशी असेच उद्धट वर्तन केले होतेस." लांडगा संतापाने ओरडला.

"छे हो. मी कसा असेन तो, मी तर जेमतेम सहा महिन्याचा आहे हो." भयाने कापत असलेलं कोकरू कसंबसं बोललं.

"तू नाही तुझा बाप असेल तो. " लांडगा गरजला. "शेवटी तू ही त्याचाच मुलगा. त्याच्याहून उद्धट दिसतोस. थांब तुला तुझ्या उद्धटपणाचा चांगलाच धडा शिकवतो आता."

असे म्हणून लांडग्याने एका झेपेत कोकराला खाली पाडले नि त्याचा चट्टामट्टा केला.

आधुनिकपूर्व:

’देवभूमी' म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात देवाच्या कृपेने सारं काही आलबेल होतं. वर्षभर असणारा भक्तांचा राबता नि वर्षातून एकदा होणारी 'वारी' यांची हुशारीने मेंदूपेरणी करून देवाने आपल्या भूमीतल्या लोकांची पोटापाण्याची किमान सोय करून दिली होती.

शिवाय यात हल्ली भरणा झालेल्या हौशी, उच्चशिक्षित वारकर्‍यांचा भरणाही झाल्याने त्यांना आवश्यक असणार्‍या अद्ययावत सोयीदेखील आता तिथे उपलब्ध झाल्या होत्या. शिवाय परकीय चलन म्हणजे जणू 'देवाचा प्रसाद'च मानून त्यासाठी शासनाने, प्रशासनाने बाहेरून येणार्‍या पर्यटकांसाठी हिरव्या डोंगरांवर लाल गालिचा अंथरला होता.

कसं कोण जाणे (कदाचित इंटलिजन्स फेल्युअर असावं) पण - म्हणे - देव या सार्‍यांवर चिडला. त्याने खुद्द वरुणराजाला (त्यातही ही पावर वरुणाची की इन्द्राची यावर दोघांनी शड्डू ठोकले, 'आज या तो तुम नहीं या मैं नहीं' हा निर्वाणीचा इशारा दिला. अखेर देवबप्पाने दोघांना दहा मिनिटे अंगठे धरून उभे राहण्याची शिक्षा दिली नि अखेर वरुणाचे 'टेंडर' मंजूर केले, म्हणे.) आणि या भूमीत अतिवृष्टी करण्याची आज्ञा दिली.

झालं. देवभूमीत न भूतो न भविष्यती असा पाऊस कोसळला. जोडीला धरणीकंप पाठवण्याचा पण विचार होता पण तोवर देवाचा राग शांत झाल्याने पावसावर निभावले. प्रदेशातल्या सार्‍या नद्यांना पूर आले, आसपासच्या प्रदेशाला कवेत घेऊन त्या धावू लागल्या, बाजूच्या डोंगरांना धडका देत त्यांनी त्यांचे अंग-प्रत्यांग ओरबाडून काढले. मोठेमोठे वृक्षराज धराशायी झाले, तिथे त्यांच्यासमोर किडामुंगीसारख्या जगणार्‍या माणसांची काय कथा. हजारो दुर्दैवी भक्तगणांची वाताहत झाली.

जवळजवळ दोन आठवडे पावसाने उसंत दिली नाही. हजारो जीवांना अजस्र प्रवाहांनी गिळंकृत केले. अनेकांचे मृतदेह आसपासच्या प्रदेशात विखुरले गेले. असंख्य लोकांचा पत्ताच लागला नाही. डोंगरकपारीत कसेबसे तग धरून असलेले जीव अनेक दिवसांच्या उपासमारीने नि त्या कराल नि अक्राळविक्राळ संकटाने मृत्यू लवकर यावा यासाठी देवाची प्रार्थना करू लागले.

HelicopterToTheRescue
छायाचित्र: https://www.ibtimes.co.in/ येथून साभार.

सुदैवाने नवे तंत्रज्ञान मदतीला आले. डोंगरकपारीत तग धरून असलेले अनेक जीव अशा जीवघेण्या वातावरणातून बाहेर काढले गेले. तशा परिस्थितीत त्या अडकून पडलेल्या अनामिकांसाठी जीव धोक्यात घालून निष्ठा वगैरे जुनाट कल्पना कवटाळून बसलेल्या काही प्रतिगामी लोकांनी आपले स्वीकृत कार्य पार पाडले.

बंडोपंत हा सारा भयावह घटनाक्रम आपल्या दिवाणखान्यात बसून डिश-टिव्हीच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन वर पहात असल्याने त्यांना सारे तपशील अगदी स्पष्ट दिसत होते. जीव वाचलेल्या काही 'भक्तांची' मुलाखत समोर चालू होती.

"जीव वाचल्यामुळे तुम्हाला आता कसं वाटतंय?" एचडीटीव्हीच्या वार्ताहराने... नव्हे 'करस्पाँडंट'ने नेहमीचा प्रश्न विचारला.

"देवाच्या कृपेनेचे आम्ही वाचलो..." पार्श्वभूमीवर शेवाळी-खाकी कपड्यातले जवान पुढच्या उड्डाणाला सज्ज होताना दिसत होते.

बंडोपंतांमधला विवेकी जागा झाला. "ज्याने जीव वाचवला त्याच्याबद्दल या भामट्याला काहीच नाही, नि ज्याने मुळात संकटात लोटले त्यानेच म्हणे याला वाचवले." त्यांनी संतप्त होत्साते आपले पुरोगामी तत्त्वज्ञान बायकोला ऐकवले, नि त्या संतापाच्या भरात चॅनेल बदलले.

'दांडिया टीव्ही' वरही तीच दृश्ये दाखवली जात होती. त्यांचा करस्पाँडन्ट एका मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या एका अतिशय शोकाकुल अशा व्यक्तीची मुलाखत घेत होता.

"तुमचे वडील या प्रलयात मरण पावले. काय वाटतं तुम्हाला?" त्यानेही 'धडाऽ पहिला' गिरवला.

"देवाची मर्जी. जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला. शेवटी चांगल्या माणसांना देव आपल्याकडे बोलावून नेतो. देवभूमीत त्यांना मरण आलं. सोनं झालं त्यांचं." याच वेळी 'देवभूमीत हेलिकॉप्टर कोसळून चार जवान ठार' अशी ब्रेकिंग न्यूज देणारी लहानशी पट्टी या दृश्याच्या खालच्या बाजूला झळकू लागलेली होती.

या भक्तांचे जीव वाचवण्यासाठी ज्या बायकांचे घरधनी देवभूमीत गेलेल्या त्या प्रतिकूल हवामानाशी झुंज घेत होते त्या जीव मुठीत घेऊन देवाचाच धावा करीत होत्या.

पूर्व-आधुनिक:

"रुपया आज पुन्हा घसरला बघ. आता पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग होणार." हापिसातून नुकतेच घरी येऊन दिवाणखान्यातल्या कोचावर घरंगळलेले बंडोपंत त्यांना पाहताच लगबगीने चहा टाकण्यासाठी किचनमधे घुसलेल्या बायकोला ओरडून सांगत होते. बायकोने कोचावरच सोडलेला रिमोट उचलून दिवसाचा आढावा घेण्यासाठी आल्याआल्या टीव्ही लावायचा हा रोजचा शिरस्ताही त्यांनी बिनचूक पाळला होता.

Bandopant
छायाचित्र: https://www.freepik.com/ येथून साभार.

"सालं हे काँग्रेसचं राज्य म्हणजे गरीबांची परवड नुसती. एखादा हुकूमशहाच यायला हवा आता." गळ्यातली टायची गाठ सैल करता करता त्यांनी निर्णय देऊन टाकला. पावसाळ्याच्या दिवसात सुंठ वा आलं न घालता चहा दिल्याबद्दल बायकोला त्यांनी ताबडतोब एक 'शो-कॉज' नोटिस देऊन टाकली आणि सीआयआयच्या वार्षिक सभेत चालू असलेले अर्थमंत्र्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण ते बिजनेस-टीवी वर लाईव पाहू लागले.

देशांतर्गत डॉलरची मागणी फार वाढल्याने रुपया घसरत असल्याबद्दल अर्थमंत्री चिंता व्यक्त करत होते. यात भारतीयांना असणार्‍या पिवळ्या धातूच्या आकर्षणामुळे त्या धातूची सातत्याने करावी लागणारी आयात नि त्यासाठी खर्ची पडणारे परकीय चलन हे या घसरणीचे एक मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

"बघ. मी तुला म्हणत नव्हतो, उगाचच सोन्याची खरेदी करून जमा करून ठेवल्याने देशाच्या तिजोरीवर ताण पडतो म्हणून." बंडोपंत चहा आणून ठेवणार्‍या बायकोला विजयी मुद्रेने म्हणाले.

"परदेशातून येणार्‍या मित्रांकडून तुमची आवडती इम्पोर्टेड विस्की आणायची बंद केलीत तर जास्त परकीय चलन वाचेल." शोएब अख्तरचा १४० कि.मी. वेगाने उसळून आलेला बाउन्सर सचिन तेंडुलकरने केवळ बॅटच्या एका स्पर्शाने थर्डमॅन सीमेबाहेर फेकून दिला.

"ते महत्त्वाचं नाही..." बंडोपंतांनी ताबडतोब गाडी वळवून मूळ विषयावर आणली. "मुद्दा हा आहे की भारतीयांना पिवळ्या धातूचे अगदी एक विकृत म्हणावे असे आकर्षण आहे. सोने ही सेफ इन्वेस्टमेंट आहे, अडीअडचणीला कामात येते वगैरे खोट्या, कालबाह्य कल्पनांना चिकटून आपण भारंभार सोनं जमा करतो त्यामुळे ही वेळ आली आहे."

विश्लेषक बंडोपंतांचे भाषण सुरू झाल्याने टीवीवर बोलणारे अर्थमंत्री आपले भाषण थांबवून बंडोपंतांचे भाषण ऐकू लागले. "खरं म्हणजे काही काळासाठी सोन्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घातली पाहिजे. म्हणजे ते सारे परकीय चलन वाचेल नि रुपया पुन्हा नियंत्रणात येईल." टीवीवरून बंडोपंतांचं भाषण ऐकणारे अर्थमंत्री बंडोपंतांचा हा उपाय ऐकून एकदम खुश झाले नि तो उपाय अंमलात आणल्याची घोषणा करतच त्यांनी आपले थांबलेले भाषण पुढे सुरू केले.

सोन्यावरील आयात बंदी जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे सर्व थरातून निषेध झाला. ग्राहकांनी आपल्या मूलभूत हक्कांवर अर्थमंत्री गदा आणत आहेत असा ओरडा केला. सराफ बाजाराने लगेच मागणी घटल्याने सोन्याची कारागिरी करणार्‍या गरीब मजुरांच्या उत्पन्नात घट होईल, काही मजुरांना बेकारीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्या हितासाठी सरकारने गरीब मजुरांच्या हिताचा बळी दिल्याचा आरोप करत संसदेत धुमाकूळ घातला नि संसद 'अनिश्चित कालके लिए' तहकूब करायला भाग पाडले.

अपेक्षेप्रमाणे सोन्याचे भाव वाढू लागले. " बघा म्हणत नव्हतो मी, सोनं ही बेष्टं इन्वेस्टमेंट आहे. तुम्हाला सांगत होतो तुम्ही ऐकलं नाही." शेजारचे मेजर सावंत (खरंतर ते मेजर होते की लष्कराच्या क्यान्टिनमधे आचारी अशी शंका त्यांच्या ओघळत्या पोटावरून सार्‍यांनाच येत असे. पण आपण लष्कराच्या चाकरीत मेजर असल्याची ओळख ते करून देत नि वर्षातले दहा महिने घरीच राहून सीमेवरच्या आपल्या शौर्याच्या कथा शेजार्‍यापाजार्‍यांना सांगत असत.) ऑफिसमधून घरी परतणार्‍या बंडोपंतांना अडवून सांगत होते.

"आमच्या शकूच्या लग्नाच्या वेळी सहा हजार रुपयाने सोनं घेतलं, आता जेमतेम सहा महिने झालेत, तर भाव नऊ हजारापर्यंत गेलाय." "मग विकून टाका नि करा मोकळे पैसे." बंडोपंत काहीतरी बोलायलाच हवे म्हणून बोलले. "वेडे आहात का तुम्ही बंडोपंत. अजून दोन महिन्यात बारा हजारावर जाईल भाव. आहात कुठं."

सावंतांना कसंतरी वाटेला लावून बंडोपंत घरात पाऊल टाकतात तर, "बघा मी म्हणत नव्हते..." बायकोने सावंतांची ष्टोरी परत ऐकवली. मेजर सावंताचं त्याच्या दुप्पट आकाराचं अर्धांग बायकोच्या कानी लागलं असावं हे समजायला तर्काची गरज नव्हती. "तेव्हाच घेऊन ठेवले असले सोने तर आज दीडपट झाले असे पैसे. ('आणि मला सावंतीणीसारखा हारही मिळाला असता' हे वाक्य मनातल्या मनात) कसलं बोडख्याचे विकृत आकर्षण म्हणे. चार चव्वल हातात आणून देते ते खरं. आता तरी ऐका माझं. सोनं बारा हजार होण्याच्या आत हार विकत घेऊन टाकू." बंडोपंतांनी निमूटपणे नव्या हाराची नोंदणी सराफाकडे केली नि आपले व्यवहारज्ञान पराभूत झाल्याचे दु:ख त्यांनी नवीन इम्पोर्टेड विस्कीच्या बाटलीतील दोन पेगांबरोबर गिळून टाकलं.

अखेर व्हायचे तेच झाले. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने मागणी घटल्याची ओरड सराफ बाजाराने सुरू केली. त्यातच कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने आणि आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात वाढू लागल्याने डॉलरची मागणी चढीच राहिली आणि रुपया घसरायचा काही थांबला नाहीच. अर्थमंत्र्यांवर चहूकडून टीका सुरू झाली.

अखेर निरुपाय होऊन त्यांनी सोन्यावरील आयात-बंदी उठवल्याची घोषणा केली. सराफ बाजाराने ताबडतोब समाधान व्यक्त केले. विरोधकांनी 'अर्थमंत्र्यांनी एक प्रकारे आपली चूक कबूल केल्याने' त्या दरम्यान झालेल्या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. 'नैतिकता म्हणजे काय हे विरोधकांना कसे काय ठाऊक?" असा खोचक उलट-प्रश्न विचारून अर्थमंत्र्यांनी ती फेटाळून लावली.

"ऐकलं का, मी काय म्हणते..." ऑफिसातून परतलेल्या बंडोपंतांना चहा देतादेता बायकोने प्रस्तावना केली. "सावंत वहिनी सांगत होत्या, सोनं स्वस्तं झालंय म्हणून. नऊ हजारावरून आठ-साडेआठ हजारावर उतरलंय. किंमती पुन्हा वाढण्याच्या आत रांकाकडून दोन नवीन बांगड्या करून घेऊ या, पुन्हा बारा हजाराकडे जाण्याच्या आत." नवी ऑर्डर नोंदवणे नि इम्पोर्टेड विस्कीच्या नव्या बाटलीचे उद्घाटन पुन्हा एकदा जोडीनेच झाले.

उत्तर-आधुनिक:

"सालं हे काँग्रेसचं राज्य म्हणजे गरीबांची परवड नुसती. एखादा हुकूमशहाच यायला हवा आता." बंडोपंतांचे नुक्तेच पदवीधर झालेले चिरंजीव समीर मूठ आपटून ओरडले. अर्थात मूठ आपटताना ती समोरच्या लॅपटॉपच्या की-बोर्डवर न आपटता बाजूच्या टेबलवर आपटण्याची खबरदारी त्याने घेतली होती. त्याने त्वेषाने समोरच्या कागदाचा चोळामोळा करून संतापाने फेकून दिला. पंतप्रधान किंवा अर्थमंत्रीच जणू त्याच्या ताब्यात सापडले आहेत नि त्यांना तो किडामुंगीसारखा चिरडतो आहे असा त्याचा आविर्भाव होता.

Sameer1
छायाचित्र: https://www.dreamstime.com/ येथून साभार.

प्रत्यक्षात त्याला ती संधी मिळाली नसली तरी फेसबुकवर त्याने त्या दोघांचा शब्दांनी, इतरांनी काढलेल्या आणि आणखी कुणी कुणी शेअर केलेल्या कार्टून्सच्या सहाय्याने कोथळा काढलेला होताच.

फेसबुकवर मित्रांनी शेअर केलेल्या लिंकवरची चित्रे आणि चरित्रे चवीचवीने पहात असता अचानक त्याला एका मित्राने शेअर केलेली लिंक दिसली. 'देवभूमीत झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीचे वेळी 'विकासप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा राबवून फक्त आपल्या प्रदेशातून देवभूमीत गेलेल्यांना चुटकीसरशी बाहेर काढले. केंद्राची प्रशासन-यंत्रणा, लष्कराचे जवान नि हेलिकॉप्टर्सना जे जमलं नाही ते विकासपुरुषाने काही चारचाकी गाड्यांच्या सहाय्याने करून दाखवलं...' 'पत्र नव्हे विकासमित्र' असे बिरुद मिरवणार्‍या वृत्तपत्राने लिहिले होते. खुशीत येऊन समीरने ताबडतोब ती लिंक शेअर केली आणि झाडून सार्‍यांना टॅग करून टाकले.

'पप्पा, तुम्ही नेहमी बोंब मारता ना विकासपुरुषाच्या नावे. एक लिंक शेअर केलीय बघा फेसबुकवर, ती बघा.' बाहेर हॉलमधे टीवीवर इंग्लिश चित्रपटांच्या च्यानेलवर जेम्स बाँडचा नवा चित्रपट पहात आपले इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करत बसलेल्या बंडोपंतांना त्याने ओरडून सांगितले. 'षोडशे वर्षे प्राप्ते...' वगैरे वर विश्वास असलेले बंडोपंत मुलाशी फेसबुक-मैत्रीपूर्ण संबंध राखून होते.

चार दिवस त्या लिंकने फेसबुकवर धुमाकूळ घातला. विकासपुरुषाच्या पीआर फर्मने आणि एरवी ट्विटर टिवटिव करून आपल्या विकासकामांना जनतेसमोर आवर्जून मांडणार्‍या विकासपुरुषाने त्यावर सोयीस्कर मौन बाळगले होते. अचानक एक दिवस एका दुष्ट काँग्रेसधार्जिण्या पत्रकाराने विकासपुरुषाचा दावा अव्यवहार्य असल्याने सप्रमाण दाखवून दिले. झालं.

विकासपुरुषाच्या विरोधकांना आयतं कोलितंच मिळालं. सर्वत्र विकासपुरुषाच्या विकासाच्या दाव्यांबाबत शंका घेणारे लेख येऊ लागले. आता या गदारोळाला उत्तर द्यायला हवे या हेतूने विकासपुरुषाला जणू सार्‍यांना भाकरी देण्यासाठी अवतार घेतलेला गोदोच समजणार्‍या त्याच्या पक्ष-प्रवक्तीने तो रॅम्बोगिरीचा दावा शक्यतेच्या पातळीवर कसा आहे हे सांगण्याचा दुबळा प्रयत्न करणारा लेख लिहिला. "घ्या लेको. साले काँग्रेसी, स्वतःला काही जमत नाही म्हणून इतरांनाही जमत नाही असा दावा करत होते नाही का. हा घ्या पुरावा." म्हणत समीर नि समीरच्या मित्रांनी तोही ताबडतोब शेअर करून टाकला.

पण दुर्दैवाने आकडेवारीची करामत अंगाशी येऊन त्या लेखातील दावेही खोडून काढण्यात आले. विकासपुरुष गप्पच होता. इतक्यात सदर लेख हा काँग्रेसी हस्तकांनीच छापून आणून आमच्या नेत्याची बदनामी केल्याचा कट केल्याचा दावा विकासपुरुषाच्या पक्ष-प्रवक्त्याने केला. "बघा मी आधीच म्हटलं होतं, हा सगळा काँग्रेसी कावा आहे." समीर विजयी मुद्रेने आपल्या बापाचे सामान्यज्ञान वाढवित म्हणाला. ताबडतोब ही माहिती देखील सर्वसामान्य अज्ञ जनांपर्यंत पोचावी म्हणून त्याने ती बातमीही शेअर करून टाकली. (आणि हे करत असताना हळूच पहिली लिंक शेअर करताना लिहिलेली पोस्ट डिलिट करून टाकली.) अजूनही विकासपुरुष गप्पच होता.

पण तरीही विकासपुरुषाबाबत उठलेला गदारोळ शमण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी मूळ लेख लिहिलेल्या पत्रकाराला 'उपरती झाली'(?) आणि हा आपण विकासपुरुषाने दिलेल्या माहितीवर आधारित नसून त्याच्या पक्षातील कुण्या कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिला असल्याचे त्याने स्पष्ट केले. पत्राने पत्रकाराला नि पक्षाने कार्यकर्त्याला हाकलले नि सगळं शांत झालं.

तसा काही प्रगतीविरोधी पत्रकारांनी त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याची ओरड केली. पण समीरसकट सार्‍या प्रगतीच्या वारकर्‍यांनी हा त्यांचा दावा 'मूर्खपणाचा' म्हणून निकालात काढला. पुन्हा एकदा "आपण हे आधीच बोललो होतो" असा दावा करत समीरने हे ही शेअर करून टाकलं. विकासपुरुष अजूनही गप्पच होता.

सारं धुमशान विरलं तरी विकासपुरुष अजूनही गप्पच होता. "त्याला बोलायची काय गरज, त्याची पीआर फर्म सगळं त्याला हवं ते छापून आणते नि तुझ्यासारखे लोक त्याचा आयता प्रसार करतातच की. रुजली बातमी तर ठीकच; नाहीतर परत मी असा दावा केलाच नाही म्हणायला मोकळा. त्याचं म्हणजे ’चित भी मेरी, पट भी मेरी और अंटा मेरे बाप का' तसं आहे." हा बंडोपंतांच्या टोमणा 'म्हातारा चळलाय. चार दिवस राहिलेत त्याचे, उगाच कशाला वाद घाला.' अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत समीरने कानाआड केला.

आधुनिकोत्तर:

"डोन्ट बी अ फूऽल डॅऽड." टेबलावरचा ग्लास उचलता उचलताच दुसर्‍या हाताने समोरच्या बशीतला भाजलेला बदाम उचलून तोंडात टाकत समीर बंडोपंतांना म्हणाला. बंडोपंत आणि समीर त्यांची नवी कोरी शेवर्ले गाडी सिंगल माल्टच्या साथीने सेलेब्रेट करत होते.

"तू सावंताशी स्वतःला कम्पेऽर का करतोस." 'षोडशे वर्षे प्राप्ते...' स्थिती पार होऊन बरीच वर्षे झाली नि पोरगं 'हाताशी आल्यावर' बंडोपंतांनी त्याला '...मित्रवदाचरेत्' च्या ष्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्या आज्ञाधारक पणे पाळत एव्हाना तो 'तुम्ही' वरून 'तू' वर पोचला होता. सावंतांनी चार-पाच लाखात सर्व सुखसोयीनी युक्त अशी चारचाकी घेतलेली त्यांनी पाहिली होती. त्या तुलनेत दीडपट पैसे खर्चून समीरने गाडी आणल्यामुळे बंडोपंत थोडे नाराज होते.

Sameer2
छायाचित्र: https://www.alamy.com/ येथून साभार.

"लुक अ‍ॅट धिस डार्लिंग आय बॉट यू. साला व्हॉट अ क्यूट बेऽबी. ड्राईव करून बघ तू, मख्खन रे मख्खन. अँड इट कम्स विद ऑल द लेटेस्ट टेक्नॉलजी. स्साला त्या सावंताच्या गाडी जीपीएस नाही साधा. यू कॉल दॅट ए काऽर?" जेनेरेशन गॅप नावाचं कायससं प्रकरण असल्यामुळे आपण आपले मत समीर ऊर्फ सॅमला पटवून देऊ शकत नाही अशी आपली समजूत करून घेत बंडोपंतांनी तिसरा पेग भरला.

जरी खर्चाच्या बाबत जरी त्यांना सॅमशी 'डिफरन्स ऑफ ओपिनियन' असले तरी सावंतापेक्षा भरी कार आपल्याकडे आल्याने ते आणि खास करून त्यांच्या सौ. अत्यंत खुशीत होते. त्या आनंदात सौ. सावंतांना पेढे देण्याच्या मिषाने त्यांचा पडलेला चेहरा पोटभर पाहून घेण्याच्या नादात सौं. नी चक्क रोजची 'मैं तुम्हारी नहीं तो किसी और की कैसे बन सकती हूँ? और तुम मेरे नहीं तो करीनाके कैसे बन सकते हो?' असा -डब्बल - खडा सवाल टाकणारं शीर्षक असलेली मालिका चुकवली होती.

एक महिन्यानंतरची संध्याकाळ. नेहमीप्रमाणे संध्याकाळची फेरी आटपून आलेल्या बंडोपंतांनी नोकरीच्या दिवसांपासून असलेला घरात येताच कोचावर घरंगळून प्रथम टीवी लावण्याचा आपला शिरस्ता प्रथमच मोडला. आले तेच मुळी काही तरी प्रचंड धक्कादायक पाहिल्याचे भाव चेहर्‍यावर घेऊन. बंडोपंत आत आल्याआल्या त्यांच्यासाठी चहा आणण्याचा आपला नेम सौंनी मात्र बिनचूक पाळला. चहा घेऊन बाहेर येतात तो टीवी अजून बंदच पाहून त्यांना काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. लगबगीने येत त्यांनी चहा समोर ठेवला, फुल्ल स्पीड मधे फॅन चालू केला नि सार्‍या खिडक्या उघडून टाकल्या.

नवर्‍याजवळ बसून कातर स्वरात विचारत्या झाला 'काय झालं हो? बरं नाही का वाटंत?" "मला काय धाड भरलीये?" बंडोपंत त्यांच्यावर एकदम खेकसले. पूर्वी ऑफिसच्या दगदगीनंतरही हसतमुख असणारे बंडोपंत चक्क खेकसतायत हे पाहून सौ. चिंताक्रांत झाल्या. "वय झालं आता. लहान सहान त्रास व्हायचेच." हे वाक्य चुकून त्यांच्या तोंडून निसटलं नि बंडोपंत त्यांच्यावर दुप्पट उखडले.

दहा मिनिटांच्या भडिमारानंतर चौथ्या मजल्यावरच्या गुप्तांनी नवी कोरी एसयूवी गाडी घेतली नि त्यात ऑटोपायलट, ऑटोगिअर, ऑटो स्विच नि बरंच काय काय ऑटो आहे नि लेटेस्ट i20 मायक्रोप्रोसेसर का काय तो आहे असा सौ बंडोपंतांना साक्षात्कार झाला.

"हूं त्यात काय एवढं. शिंचं या पुण्यातल्या खड्यात कसला डोंबलाचा ऑटोपायलट काम करणारे? आणि ऑटोगिअर म्हणजे अगदीच डाउन-मार्केट की नाही. त्यापेक्षा आपल्या गाडीचे मॅन्युअल गिअर म्हणजे असे एकदम रॉयल, तुम्ही ते गिअर टाकताना म्हणजे कसे ऐटबाज दिसता. आता गिअर नाहीतर म्हटल्यावर कसं होणार."

"तेच तर म्हणतो मी. उगाच सालं नव्या गाडीत यंव आहे नि त्यंव आहे. हवंय कशा कौतुक. शेवटी ओल्ड इज गोल्ड. आमची गाडी अजून १२ चं अ‍ॅवरेज देते. आणि ही नवीकोरी गाडी म्हणे ९चे अ‍ॅवरेज देणार." कधी नव्हे ते पती-पत्नींचं पाच मिनिटात एकमत झालं होतं.

- oOo -

ता.क.: कथा महत्त्वाच्या नाहीत तर कथा'सूत्र' महत्त्वाचे असे आमच्या साहित्यातील गुरू आणि ज्येष्ठ...(अर्रर्र चुकलो.) ... श्रेष्ठ समीक्षक डॉ. सौ. समीक्षा नेटके यांचे मत होते. (त्यांचे आजचे मत काय हे ठाऊक नसल्याने रिस्क न घेता 'होते' असा भूतकालवाचक शब्दप्रयोग केला आहे.) ते ही शिंचे वादग्रस्तच. पण दोन समीक्षक, दोन डॉक्टर किंवा दोन मेकॅनिक यांचं एकमत कधी झालंय का. ते असो. मुद्दा काय, तपशीलाची चटणी वाटण्यापेक्षा मूळ पदार्थाशी सलगी केल्यास रसपरिपोष अधिक चांगला व्हावा ही अपेक्षा.

ता.क. २: यांना नि:शब्दकथा का म्हटले असा प्रश्न येईल. याला बरीच उत्तरे आहेत. उत्तर देण्याच्या फंदात न पडता गप्प बसणे हे एक. बाकीची -आवश्यक वाटल्यास -वाचकांनी शोधावीत.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा