(एखाद्या चित्रपटाने डोके भणाणून गेले किंवा व्यापून राहिले की काहीतरी खरडण्याची माझी जुनीच खोड आहे. पण एखाद्या चित्रपटाने झोप उडवल्याने गद्याऐवजी कवितेच्या माध्यमाची निवड केली अशी ही एकच घटना.
अनेक चित्रपट, चरित्रे असोत कि कथानके, त्यात एकच प्रसंग वा तुकडा असतो ज्याच्या भोवती सारा भवताल फिरतो. 'फँड्री'मधला शेवटाकडचा विहिरीचा प्रसंग असाच. त्या भोवतीच उगवून आलेली ही कविता. डोक्यातला सारा संताप, सारं वैफल्य तिने शोषून घेतलं न मला मोकळं केलं.)
काल संध्याकाळी फँड्री पाहिला त्यानंतर घरी आलो ते हे तुफान डोक्यात घेऊनच. शेवटच्या डुकराच्या पाठलागात त्या डुकराच्या जागी जब्या दिसू लागला नि डोकं सुन्न झालं. त्यातच चित्रपट पाहताना आणि पाहून बाहेर पडताना असंवेदनशील प्रेक्षकांनी केलेली शेरेबाजी नि मतप्रदर्शन ऐकून डोकं आणखीनच आउट झालेलं. घरी येऊन ते डोक्यातलं सारं तुफान कागदावर उतरवलं. सतत भानावर असणार्या, भावनेपेक्षा विचारांच्या आधारे वाटचाल करणार्या एखाद्यालाही कविता अचानक भेटते ती अशी.
मी मरुद्गणांनी दिलेल्या वेदनेतून वेदांतील ऋचा रचणारा श्यावाश्व नसेन किंवा रव्याधाच्या बाणाने विद्ध झालेल्या मैथुनरत क्रौंचाकडे पाहून घायाळ झालेला ामायणाकर्ता वाल्मिकीही. पण एखादी तात्कालिक प्रेरणा त्यांना अशी मुळापासून उखडून अन्यत्र रुजवते याचा अनुभव मात्र नक्कीच घेतला.
ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्यांची, आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची, विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही, तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही, खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती, सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी, दगड खडकांशी झुंजणारे ‘ते’ आकांताने वर येतात, काठावरचे ‘बघे’ त्यांना पुन्हा खाली लोटून देतात थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ पाणी नसल्या विहिरीच्या काठावर झुंबड हीऽ मोठी माणसांची, पोरांची, पोरींची आणि गावच्या पुंडांची ‘भाईयो और बहनो स्पेशल शो, विहिरीतला तमाशा, साथमें खाओ, या फिर पिओ मस्त थंडा पेप्सीकोला’ पेप्सीकोला घेई हाती नि चिमणी बघते दुरून, ‘काम’ सोडून पुंड बसला निवांत टमरेल झाकून थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ शाळेची घंटा झाली. आता ‘जन गण मन’ म्हणा सारे प्रार्थनेला उभे रहा, राष्ट्रगीताला मान द्या एऽ जब्या, हलू नकोस, हात हवेतला वळवू नकोस, रग लागल्या पायावरचा भार मुळी सोडू नकोस आपल्या महान देशाबद्दल थोडा आदर असू दे ‘भारतमाता की...’ लाही ‘जऽय’चा प्रतिसाद दे थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ अरे, बेहत्तर आहे दगडावरची पकड सुटली तरी, अरे, बेहत्तर आहे पुन्हा तळाशी कोसळलास तरी नेहेमीप्रमाणेच एक-दोन हाडेच काय ती पिचतील, कदाचित बापासारखे तुझे गुडघेसुद्धा फुटतील, सावळ्या देहावरती कुठे रक्ताचे ओघळ वाहतील पाहशील तू, काठावरचे त्यांना सुद्धा दाद देतील थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ हा तर पोचला काठापर्यंत, फारच आहे माजला हाणा सारे नेम धरून, होउ द्या वर्षाव दगडांचा साला इतक्या लवकर शो संपवतो म्हणजे काय, इथे आम्हाला तर अजून ‘प्रेशर’ पण आला नाय साल्या, इथून कटायचं. इथे काठावर नाही यायचं, ज्यानं त्यानं आपापल्या पायरीनंच असतं र्हायचं थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ काठावरची ती अबोल चिमणी काठावरच राहील, पेप्सीकोला संपला की आपल्या घरी निघून जाईल येड्या, विहिरीतल्या जीवांसाठी नसते कधी चिमणी, शिटणार्या पारव्यांशीच विहिरीची असावी सलगी तळाच्या पारव्याने नसते अशी झेप कधी घ्यायची उंच झाडावरच्या चिमणीची नसते आस घ्यायची थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ कडक कपड्यातले काही लोकही विहीरीवरती आले, पॉपकॉर्नच्या पुडीसोबत थोडे त्यांनीही येन्जॉय केले, थोड्या वेळात वैतागले, म्हणे– ‘वेळ साला फुकट गेला याच्या पेक्षा ढिशुम ढिशुम पिक्चर असता पायला शालू बी साली चिकणी नाय, एक लवसीन बी नाय चंक्याची असली खडकाळ विहीर पायची काय?’ थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ चंक्या लेका फुकट रे फुकट केलास सारा खटाटोप, विहीरीच्या तळातले विहिरीतच राहणार लोक दिगंताची सारी खडकाळ, वांझ जमीन पाहिलीस, काठावरच्या माणसांची पण नियत नाही जाणलीस या असल्या खडकात कुठे रुजते अबोलीचे बीज? साध्या हिरव्या अंकुराचीही इथे नसते कुठे वीण इथे हवा गुलाबांचा ताटवा, ‘वॅलंटाईन डे’चा फुलोरा, सलमानच्या फाईट्सवर ‘चिकनी चमेली’चा उतारा थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना ‘जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड. हाऽ हाऽ हाऽ’ - रमताराम - oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा