'उठी उठी गोऽपाऽलाऽऽऽ आ... आ... अ...' कोणीतरी केकाटू लागला. 'तिच्यायला सकाळी सकाळी हे कोण केकाटून कुमारांच्या सुंदर गाण्याची वाट लावतंय' असं पुटपुटत रामू अंथरुणातून धडपडत उठला नि सवयीने रिमोटकडे हात गेला. रिमोटचे बटण दाबूनही आवाज बंद होईना हे बघून वैतागला. इतक्यात त्याला आठवले की टीवी नव्हे तर मुख्य प्रधानाच्या आदेशाने आपल्या घरात प्रविष्ट झालेला रेडिओ कोकलतो आहे.
मध्ययुगातील रेडिओ आता डिजिटल झालेला असल्याने त्याचे बटन पिळून बंद करताना त्याचा कान पिळल्याचे दुष्ट समाधानही मिळत नाही हे ध्यानात येऊन तो अधिकच वैतागला. धडपडत कसातरी टचस्क्रीन रेडिओ अनलॉक करून त्याने आवाज बंद केला. 'च्यामारी या मुख्य प्रधानाच्या, गोबेल्सने रेडिओ वापरला त्याला शंभर वर्षे झाली. तंत्रज्ञान बदलले तरी या बाबालाही रेडिओच हवा म्हणे. आणि हे कसले खूळ तर म्हणे रोज नवा गो-सेवक उठी उठी गोपाला गाणारा.' झोप पुरी न झाल्याने रामू चिडचिडत राहिला.
सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर दररोज सकाळी सहा वाजता 'उठी उठी गोपाला' हे नाट्यगीत गायले जाई. (हे खरे तर प्राचीन ग्रंथात आधीपासून होते, नाटककाराने ते चोरून आपल्या नाटकात वापरले असा खरा इतिहास नुकताच उघडकीस आला होता.) रोज एका नव्या गोसेवकाला ते गाण्याचा बहुमान मिळे. गाणार्याची निवड करण्यासाठी महा-गुरु नेमले होतेच. (प्राचीन भाषेमधे 'गो' शब्दाचा एक अर्थ गुरु असाही असल्याने यांचा उल्लेख हल्ली 'महा-गो' असाही केला जाऊ लागला होता.). यांना गोरसाची लाच दिल्यास आपला नंबर आधी लागतो, अशी कुजबूज अधूनमधून ऐकू येई. 'काय एकेक महाभाग रोज उगवतात राव. काल तो सर्दी झालेल्या बेडकाच्या आवाजात गात होता. साला सारा दिवस खराब जातो असा कुणी असला की.' टूथब्रशवर पेस्ट घेता घेता रामू स्वतःशीच पुटपुटला.
प्रातर्विधी उरकून आत येत त्याने स्वयंपाकघरातील कलत्राला चहाची ऑर्डर सोडली. बाहेरच्या खोलीत येऊन शिरस्त्याप्रमाणे १२८ श्री श्री वामदेव बाबांचे चॅनेल लावण्यासाठी टीवी चालू केला. रोज सकाळी प्रथम वामदेव बाबांचे प्रवचन, मग महंत गोविंदराम यांच्यासोबत योग (आता याला योगा म्हणण्यावर बंदी आली होती, इंग्रजीतही Yog असेच स्पेलिंग करण्याचा वटहुकून निघालेला होता) असा रामूचा सकाळचा क्रम ठरलेला होता. प्रवचन चालू होते इतक्यात शेजारच्या नाडगौडा काकू डोकावल्या. त्यांचे मालक आज लवकर बाहेर पडणार होते पण त्यांच्याकडील दूध संपलेले नि दूधवाला उशीरा येत असल्याने त्यांना थोडे दूध हवे होते. काकूंची चाळ सुटली पण शेजारीपाजारी सतत उसनवारी करण्याची सवय सुटली नव्हती.
दूध घेऊन बाहेर पडत असताना रामूने त्यांची, त्यांच्या मुलाबाळांची जुजबी चौकशी केली. 'गोपाल-१ चे पत्र आले होते काल. आता त्याला ईशान्येत पोस्टिंग मिळाले आहे.' 'असे का. आणि गोपाल-२ कुठे असतो सध्या?' त्याने चौकशी केली. 'त्याला सध्या दिल्लीत रेसिडेंट पोस्टिंग आहे. छानच जागा मिळाली आहे हो. या दोन पोरांची काळजी तर मिटली. आता गोपाल-३ नि गोपाल-४ मार्गाला लागले की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी झाले.' असे म्हणत काकू अंतर्धान पावल्या.
काकू अतिशय श्रद्धाळू होत्या. गो-काक बाबांवर त्यांची अतीव श्रद्धा होती. त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी आपल्या शासनपुरस्कृत साध्वींच्या नि साधूंच्या हुकूमावरून जन्माला घातलेल्या चारही पोरांची नावे त्यांनी 'गोपाल' अशीच ठेवली होती. 'चारही वेळा 'ग' हेच अक्षर आलं बघा, किती भाग्यवान की नै?' असं त्या अतीव कौतुकाने सार्यांना सांगत असत. मग त्यांना गोपाल-१ ते गोपाल-४ अशाच नावाने हाक मारली जाई. पण खुद्द काकू वगळता अन्य कुणी - खुद्द काकादेखील - पूर्ण नाव न उच्चारता फक्त एक-नंबर, दोन-नंबर अशीच हाक मारत. (यावर 'एक नंबर' अतिशय खूष होता तर 'दोन नंबर' सार्या जगावर खार खाऊन होता.)
आंघोळ उरकून प्रवचन नि योग संपवून तो आंघोळीच्या तयारीला लागला. सरकारी अनुदानाच्या सहाय्याने नगण्य किंमतीत घेतलेल्या गो-इंधनाच्या सहाय्याने पाणी गरम करणार्या बंबातून येणार्या पाण्याच्या धारेस बोट लावून ते पुरेसे गरम झाले आहे ना याची त्याने खात्री करून घेतली. पत्नीने त्याचा पंचा, गो-उत्सर्जितांपासून बनवलेला साबण नि उटणे, गोरस नि गोमूत्रापासून बनवलेला शांपू आधीच न्हाणीघरात आणून ठेवलेला होता. आंघोळ करत असताना तो मनातल्या मनात आज करावयाच्या कामाची उजळणी करू लागला.
'बायकोच्या सततच्या डोकेदुखीसाठी लागणारे गोमयापासून बनवलेले 'सर्वपीडाहारी' मलम आणि छोटीच्या खोकल्यासाठी गोमूत्रापासून बनवलेले 'सर्वव्याधीनिवारक' सिरप ऑफिसमधे जातानाच घेऊन जाऊ. गोमूत्रापासून बनवलेले फिनाईल संपले आहे ते ऑफिसमधून येता येता घेऊन या असे पत्नी म्हणत होती. पण येताना सुरेंद्राच्या 'पंचगव्य कोल्ड्रिंक हाऊस'च्या नव्या आउटलेटच्या उद्घाटनाला जायचे आहे, तेव्हा ते तिलाच आणायला सांगू. '
'हा सुरेंद्र लेकाचा एकदम डोकेबाज. रुग्णालयात कॅन्सरसह सार्या आधिव्याधी गोमय नि गोमूत्राच्या चाटणांच्या आधारे बर्या होऊ लागल्याने याचा सर्जिकल इन्स्ट्रूमेंट्सचा धंदा बुडित निघाला. पण औषधे बनवण्याच्या पर्यायाऐवजी चक्क पंचगव्य वापरून शीतपेय बनवण्याचा उद्योग सुरू केलाय. गोरस, गोमूत्र नि गोमय यांच्यापासून बनवलेले त्याचे 'त्रिवेणी' शीतपेय वर्ष दोन वर्षातच राज्यभर पसरले. आपल्या गावातलेच हे त्याचे चौथे आउटलेट. त्याची ही कल्पना देशी शीतपेयांचे मार्केट वाढवून परदेशी कंपन्यांकडे जाणारा पैसा रोखणारी असल्याने शासन दरबारीही चांगले वजन आहे पठ्ठ्याचे.' "आवरा आता. पावणेआठ झाले. ब्रेकफास्ट तयार आहे." या सौं.च्या घोषणेने त्याच्या विचारात खंड पडला. आंघो़ळ उरकून तो बाहेर आला.
हे असं सगळं गो-गो काय चाललंय असा तुम्हा वाचकांना प्रश्न पडला असेल ना? झालं काय की काही काळापूर्वी राज्यात निवडणुका झाल्या. त्यातून सत्तारूढ झालेल्या पक्षाने हजारो वर्षे गोमातेने त्यांच्या केलेल्या पालनपोषणाबद्दल 'गो-रक्षण' हे सरकारचे... चुकलो शासनाचे आधुनिक धोरण ठरवून टाकले होते. 'आधी रक्षण गोमातेचे, मग पाहू शेतकर्याचे' असा मूलमंत्रच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता.
त्याला अनुसरून प्रथम 'गोवंश हत्या बंदी' वटहुकूम जारी करण्यात आला. त्या पाठोपाठ सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी गोपालन केंद्रांची स्थापना केली. आपल्या कमाईतली पै न पै खर्च गोपालनावर खर्च करत ते त्या पवित्र कार्यात मग्न होऊन गेले. मातेच्या अलौकिक अशा मल मूत्राचे विविध गुणधर्म तपासणारे, तसे सिद्ध करणारे संशोधक हिरिरीने पुढे आले. ते ही शासकीय अनुदान न घेता पदरमोड करून नव नवे शोध लावू लागले. वर उल्लेख आलेले बहुतेक शोध हे या अथक परिश्रमाचे फलित होते.
ब्रेकफास्ट आणि सकाळचा दुसरा चहा घेता घेता रामूने वृत्तपत्र चाळायला सुरुवात केली. 'प्रगतीशील भारत'च्या पहिल्या पानावर पूर्ण पान व्यापेल असे डोक्यावर कुठल्याशा राज्यातील पगडी घातलेले मुख्य प्रधानाचे चित्र होते. हे रोजचेच असल्याने आता त्याखाली काय लिहिले आहे ते न वाचताच रामूने ते पान उलटले. राज्यात वेगाने होणार्या प्रगतीचे प्रतिबिंबच त्या वृत्तपत्रांतून उमटलेले दिसत होते. पान-अर्धा पान व्यापणार्या गृहप्रकल्पाच्या जाहिराती, अतिशय स्वस्त नि सर्व सोयींनी युक्त अशा मोटारी ऊर्फ कार्सच्या जाहिरातींची वृत्तपत्रात नेहेमीप्रमाणे रेलचेल होती.
गेल्या काही वर्षांत गोमूत्र नि गोमयाच्या विशिष्ट मिश्रणावर चालणार्या गाड्या बाजारात आल्या होत्या. पुढील पाच वर्षांत खनिज उत्पादनांवर चालणार्या गाड्या टप्प्याटप्प्याने वापरातून काढून टाकण्याच्या स्पष्ट सूचना गाडीमालकांना देण्यात आल्या होत्या. अर्थात गोउत्सर्जनावर आधारित इंधन स्वस्त असल्याने ते ही त्यासाठी एका पायावर तयार होतेच. जागोजागी पेट्रोल-पंपाच्या जागी 'गो-इंधन उत्पादन केंद्रे' उभी रहात होती. आपापल्या गाड्या तिथे उभ्या करून कारपासून ट्रकपर्यंत सारे चालक/मालक अस्वस्थपणे 'इंधन' मिळण्याची वाट पहात उभे असत. इंधन उत्पादनासाठी तिथे अनेक गोमातांना अत्यंत आदराने उभे केले गेले होते. त्यांची इच्छा असल्यास स्वस्थ पडून राहण्यासाठी गवताची, क्वचित फोमची गादीही देण्यात येई. त्यांच्या आहारासाठी पाचक नि रुचकार अशा गवताची नि अस्सल देशी बनावटीच्या पशुखाद्याची सोय करण्यात आली होती. सारा देशच गो-मय झाल्यामुळे अशा पशुखाद्यांच्या खरेदीत कोणतेही घोटाळे होत नव्हते.
देशातील बॅंका अशा गो-उत्सर्जनांवर आधारित मोटारींसाठी शून्य व्याजदराने कर्ज देऊ लागल्या होत्या. केवळ मोटारीच नव्हे तर ऊर्जेची अन्य बाबतीत असलेली गरजही गोबर-गॅसच्या माध्यमातून भागवली जात होती. प्रत्येक रुग्णालय नि पंचतारांकित होटेल्स यांनी स्वतःचे असे गोबर गॅस प्लँट्स उभारले होते. त्यातून ते स्वतःची गरज तर भागवतच पण वर उरलेली ऊर्जा ते देशहितासाठी आसपासच्या नागरिकांना फुकट वाटत असत. एवढेच नव्हे तर गोमय हे किरणोत्सारापासून संपूर्ण बचाव करत असल्याने सीमेवर आणि देशातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणांभोवती गोमयाच्या भिंती उभारण्याचे काम गो-विंद इंटरनॅशनल मार्फत वेगाने चालू होते.
तिसर्या पानावर माजी न्यायमूर्ती गोमतेय बज्जू यांच्या अध्यक्षतेखाली एक नवी सत्यशोधन समिती नेमल्याची बातमी रामूला दिसली. हे न्यायमूर्ती अत्यंत विद्वान, प्रकांड पंडित, राजकारणाची सूक्ष्म जाण असलेले आणि स्पष्टवक्ते असे होते. जगातील जवळजवळ सर्वच न उकललेल्या समस्यांची वा गूढांची उत्तरे यांच्याकडे आहेत असे मानले जाई. सरकार दरबारीच नव्हे तर सोशल मीडियावरही हे चांगलाच दबदबा राखून होते. तेव्हा त्यांचे नाव पाहून रामूने कुतूहलाने ती बातमी वाचून काढली.
काही महिन्यांपूर्वी 'जन-धन योजने'च्या धर्तीवर शासनाने 'गो-धन' योजना जाहीर केली होती. या अंतर्गत देशातील नागरिकांना ते सांभाळ करत असलेल्या प्रत्येक गोमातेमागे पंधरा लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर सदर परिपत्रकात मुद्रणदोष असल्याचे नि ही रक्कम पंधरा रुपये इतकी असल्याचा खुलासा कृषी मंत्रालयाने केला, परंतु सदर खुलासा करणे हे कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही असा दावा करत अर्थ मंत्रालयाने त्याला स्थगिती दिली. यानंतर ही स्थगिती मूळ आदेशालाही लागू होते का याबाबतची संदिग्धता दूर करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तिचा अहवाल सहा महिन्यात सादर केला जावा असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
अशा तर्हेने गोसर्गापासून (म्हणजे प्रातःकालापासून) ते गोरजकालापर्यंत सदैव गो-सेवेत व्यतीत करणार्या नागरिकांचे अवघे आयुष्यच 'गो-मय' (प्रेममय, रसमय या चालीवर) होऊन गेलेले दिसे. लग्नाचे वेळी लग्नाळू युगुलाकडून 'आपण गो-डीगुलाबीने संसार करू' असे अभिवचन गोमातेला स्पर्श करून घेण्यात येत असे. (पूर्वी हीच पद्धत होती. याचाच भ्रष्ट अवतार म्हणजे किरिस्तांवांचे 'आय डू' असे अभिवचन घेणे किंवा मुस्लिमांचे 'कुबूल है' म्हणणे होय हे काही काळापूर्वी ज्येष्ठ नि श्रेष्ठ इतिहाससंशोधक गोपद्मविभूषण पन्नालाल कालरा यांनी साधार दाखवून दिले होते.) मुलाच्या बारशाचे वेळी 'पंचगव्य चाटण' समारंभ केला जाई. 'सुवर्ण चाटण' समारंभ हा म्लेन्छांकडून आला असल्याचा शोध लागल्याने त्याची जागा आता पंचगव्याने घेतली होती. मातेच्या दुधानंतर गोमातेचे दूध नि त्यानंतर गोमूत्र नि गोमय या क्रमाने आहारात बदल करत गेल्याने मूल सुदृढ नि सशक्त होते असे आरोग्यमंत्री वैद्यवाचस्पती विस्मृतीभूषण छंदोपाध्याय यांच्या गोसंशोधन केंद्रात संशोधन करणार्या टीमने पुन्हा एकवार सिद्ध केले होते.
सर्व घरांच्या बाहेरील भिंतींवर" तुका म्हणे इष्ट, गोमयाचे जिणे | जळो परपुष्ट, कलंक अवघे|" रंगवलेला दिसे. गोप्रतिपालक, गोभूषण, गोभक्तिपरायण (गो.गो.गो.) सत्यगोपालजी महाराज यांनी सदर श्लोक हा तुकोबाच्या अभंगगाथेच्या अप्रकाशित पोथीचा भाग असल्याचे शोधून काढले होते. हाच श्लोक रामूच्या दारावरही कोरलेला होता. साडेआठच्या सुमारास सारे आवरून रामू बाहेर पडला तेव्हा दारासमोरील गोपद्मांना हात लावून त्याने नमस्कार केलात्याचवेळी या श्लोकावरील प्रत्येक अक्षराला स्पर्श करून त्याने त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण केले.
फाटक उघडून रामू बाहेर पडला तर समोरच टपाल नेणारी गोमाता दिसली. गो-वंश हत्याबंदीमुळे आणि गो-सेवेच्या प्रवृत्तीचा बहुसंख्यांच्या मनात प्रादुर्भाव* (*हा एका मुख्यमंत्र्यांनी बहाल केलेला शब्द) झाल्याने प्रचंड संख्येने गोधन उपलब्ध होते. अशा गोधनाचा वापर करून घेणे तर आवश्यक होतेच परंतु जिला माता म्हटले तिला आदरपूर्वक वागवावे लागे. टपाल पोचवण्यासाठी वा निरोप पोचवण्यासाठी गोमातांची नेमणूक करण्यात आली होती. गर्भरेशमी झूल पांघरलेल्या या माता गल्लीतल्या एकेका घरासमोर, सोसायटीसमोर जाऊन उभ्या राहात नि विशिष्ट आवाजात हंबरत. त्या हंबरण्याच्या कंपन वारंवारते मुळे (मराठीत ज्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात) ज्याच्या नावचे टपाल आहे त्याला ते अचूक समजत असे. तत्परतेने तो गोमातेजवळ येऊन आपले टपाल घेत असे. त्यानंतर तो मातेला स्पर्श करून आशीर्वाद घेई.
छोट्या निरोपांसाठी (एसएमएस सदृश) ताज्या दमाचे खोंड मदत करत असत. पूर्वी काही देशांत निरोप पाठवण्यासाठी कावळ्याचा ऊर्फ 'कागा'चा वापर करून घेतला जाई तर काही लोक कबूतराला यासाठी ट्रेनिंग देत. याच धर्तीवर चालणारी ही "गो-बाईल" सर्विस उपलब्ध झाल्यापासून मोबाईल कंपन्याही तोट्यात जाऊ लागल्या होत्या. ते असो. पण या गोमातेची ड्यूटी सुरु व्हायची असल्याने तशी निवांत होती. तिला स्पर्श करून दिवस चांगला जावा म्हणून आशीर्वाद मागितला. तिनेही शेपूट वर करून त्याला आशीर्वाद दिला.
रामू खुश झाला. वाटेत दिसणार्या सर्व मातांना नमस्कार करत तो बसस्टॉपवर पोचला. बसस्टॉपच्या मागच्याच बाजूला स्थानिक बस-सेवेतर्फे बांधलेल्या 'इंधनपुरवठा केंद्रा'त उभ्या असलेल्या गोमातांनाही स्पर्श करून तो बसस्टॉपपाशी आला. गोमयापासून बनवलेल्या कृत्रिम धातूपासून बनवलेल्या भक्कम अशा बसस्टॉपमधे रांगेत उभा राहून तो बसची वाट पाहू लागला. गो-इंधन स्वस्त असल्याने आणि मायलेजही भरपूर देत असल्याने त्यावर चालणार्या आता बसकंपन्यांची प्रति-फेरी ऑपरेटिंग कॉस्ट नगण्य झाल्याने गाड्यांच्या फेर्यांची संख्या भरपूर वाढली होती. तेव्हा पाचच मिनिटात मिळालेली बस पकडून रामू ऑफिसला पोहोचला.
ऑफिसमधे पोहोचताच प्रथम त्याने आपल्या टेबलवर ठेवलेल्या गोमातेच्या फोटोला हात लावून नमस्कार केला. मग टेबलवरचे फडके घेऊन तो स्वच्छ पुसून काढला. रोजच्याप्रमाणे त्याने दोन उदबत्त्या लावून ठेवल्या नि एक मिनिटभर मातेचे स्मरण केले. हे होईतो ऑफिसच्या शिपायाने गोमूत्रयुक्त गवती चहाचा कप आणून देता देताच त्याचा मदतनीस गोरक्षकर आज येणार नसल्यावी बातमी त्याच्या कानावर घातली. गोरक्षकरच्या मुलाला गो-वर आला असल्याने आज त्याच्या घरी मोठा उत्सव होणार होता, त्यामुळे आज त्याला ऑफिसला येणे शक्यच नव्हते.
गो-वर हा आजार नसून तो गोमातेचा अनुग्रह आहे असे आता सर्वमान्य झाले होते. तेव्हा त्या रोगासाठी होणारे लसीकरण थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. उलट गो-वर आलेल्या व्यक्तीच्या पायावर आपल्या मुलांना घालण्यासाठी बायाबापड्यांची रीघ लागत असे. यातून गोमातेच्या आपल्या मुलांवरही अनुग्रह होईल अशी त्यांची श्रद्धा होती.
इतकेच नव्हे तर या अवस्थेला इंग्रजीत chicken-pox असे संबोधून गोमातेऐवजी कोंबड्यांशी याचा संबंध जोडण्याचा मेकाल्यन कावा हाणून पाडण्यासाठी याचे नाव बदलून go-pox करावे आणि तसा आग्रह शासनाने ऑक्सफर्ड प्रेससह सर्व इंग्रजी शब्दकोशनिर्मात्यांकडे धरावा असा प्रस्ताव नुकताच संसदेसमोर मांडण्यात आला होता. परंतु इंग्रजी go च्या अर्थाने पाहिले तर याला अपेक्षित अर्थ मिळणार नाही असा दावा करत हे cow-pox करावे अशी उपसूचना विरोधकांकडून मांडण्यात आली. सदर उपसूचनेवर प्रचंड गदारोळ होऊन अखेर हा प्रस्ताव पुनर्मांडणीसाठी संसदेच्या गोभक्तिप्रोत्साहन समितीकडे पाठवण्यात आला होता.
गोमातेच्या कृपेने त्याने सकाळचे आपले काम संपवले आणि जेवणाच्या सुटीच्या वेळी इतर सहकार्यांबरोबर ऑफिसच्या कँटिनमधे गेला. गोरसयुक्त पौष्टिक भोजनाचे सेवन करत असतानाच सर्वसामान्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे त्यांच्या राजकारण, शासन आणि क्रिकेट या विषयावर गप्पा सुरू होत्या. गोष्टीवेल्हाळ नरेश बेलतंगडी नेहेमीप्रमाणे आपली मौलिक मते इतर सर्वांना पटवून देत होता. त्यात नुकतेच त्याला दहा गोपद्मे मिळाली असल्याने सध्या तो अधिक जोशात होता.
विशेष कामगिरी बजावणार्यांना हे गोपद्म पुरस्कार दिले जात. जसजशी अधिक गोपद्मे मिळतील तसतशी त्याआधारे त्याला कामाच्या ठिकाणी बढती मिळे. पंचवीस गोपद्मे मिळवणारा गोसेवक हा ग्रामसेवक पदाला पात्र समजला जाई, पन्नास गोपद्मे मिळवली की तो तहसीलदार होई आणि शंभर मिळवली की कलेक्टर. राजकारणात मात्र गोपद्मांची अट नव्हती. देशसेवेत असलेल्यांना गोसेवेसाठी वेळ मिळत नसल्याने त्यांच्यापुरता अपवाद केला होता. देशपातळीवर गोपद्मश्री, गोपद्मभूषण आणि गोपद्मविभूषण असे नवे पुरस्कार चालू करण्यात आले होते. ("जुन्या पद्मश्री वगैरेंची नावे बदललीत फक्त”, असा आरोप विरोधकांनी केला होता पण मुख्य प्रधानाने इतर कुणाचेच म्हणणे मनावर घ्यायचे नसते या आपल्या 'नीती'नुसार त्याच्याकडे दुर्लक्ष केले.)
अशा तर्हेने उत्तम कामगिरी करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गो-पुरस्कार देत असतानाच दुसरीकडे आता गुन्हेगारांना गो-सेवेची शिक्षा देण्यात येऊ लागली. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार कालावधी कमी जास्त होई इतकेच. तसा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा 'पवित्र माते'च्या सेवेला तुम्ही शिक्षा कसे काय म्हणू शकता, असे म्हणणारे देशद्रोही आहेत असा दावा करत विरोधकांनी गोंधळ घातला नि संसद तहकूब करावी लागली होती. परंतु नंतर सत्ताधारी नि विरोधकांच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात याला शीख धर्मीयांच्या (यातही धर्मीयांच्या की पंथीयांच्या यावर गदारोळ झाला पण तो दोन्हीचा उल्लेख टाळून केवळ 'शिखांच्या' असा करून मिटवण्यात आला) 'कारसेवे'च्या धर्तीवर 'गो-सेवा' असाच शब्द वापरावा असे उभयपक्षी मान्य करण्यात आले.
एकदा अशी सेवा-शिक्षा भोगलेला गुन्हेगार पुन्हा गुन्हा करताना आढळत नाही असे दिसून येई. यावरून अशा गो-सेवेने तो सुधारतो असा दावा सरकारने केला होता. काही देशद्रोही मात्र शेणाच्या संगतीत राहण्याचा वीट आल्यामुळे हे घडल्याचे कुजबुजत. पण अशी टीका करणार्या लोकांना परदेशांतून पैसा मिळतो हे वारंवार सिद्ध झाले होते. त्यामु़ळे बहुसंख्य लोक अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करायला शिकले होते.
जेवण आटपून नि बेलतंगडीचे भाषण ऐकून रामू परत आपल्या जागेवर परतला तेव्हा बरोब्बर दोन वाजले होते. जेवणाची सुटी एक मिनिटसुद्धा अधिक न घेण्याचा रामूचा शिरस्ता होता. वेळ पाळण्याबाबत बहुसंख्य गो-सेवकांप्रमाणेच तो अतिशय काटेकोर होता.
जसे रामूसारखे निष्ठावान गो-सेवक आपले तन मन धन अर्पून गो-सेवा करत होते तसेच शासनही आपल्या परीने गोरक्षणाचे आपले व्रत निष्ठेने पार पाडत होते. गोवंशावरील अत्याचारविरोधी मोहिमेचा पुढचा भाग म्हणून शेतीसाठी गोवंशाच्या खांद्यावर जू ठेवण्यास बंदी करणारा वटहुकूम नुकताच शासनाने काढला होता. त्यावर मग शेती करायची कशी असा प्रश्न करत शेतकरी कपाळाला हात लावून बसले होते.
पण 'हा वटहुकूम तुमच्या हिताचाच आहे. मला तुमच्या हिताची काळजी आहे' असे सांगणारी मुख्य प्रधानाची भाषणे सर्व चॅनेल्सवरून दाखवली जात होती. शेतकर्यांना आणखी दिलासा देण्यासाठी वृत्तपत्रातून मुख्य प्रधानांच्या पान पान भर जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यात काय लिहिले आहे ते वाचू न शकणार्या अडाणी शेतकर्यांना ते रोजच्या रोज वाचून दाखवण्याचे फर्मान अंगणवाडी शिक्षकांना सोडण्यात आले होते. शेतीमंत्री 'विरोधकांची हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर चर्चा करावी' असे आव्हान देत होते' ते आव्हान स्वीकारलेल्या विरोधकांना 'गोपद्मभूषण' संपादकाच्या च्यानेलवर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी असे पुढचे आव्हान देत होते.
'अ-गोचर' सारखे शब्द व्यवहारात वापरण्यास बंदी करणारा वटहुकूम सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी जारी केला होता. असे शब्द भाषेतूनच हद्दपार करावेत म्हणून असे शब्द असलेली सारी पुस्तके ते शब्द वगळून सरकारी खर्चाने पुनर्मुद्रित करण्यासाठी आणि जुनी नष्ट करण्यासाठी सरकार निधी उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
'पो-गो' या लहान मुलांसाठी कार्टून प्रसारित करणार्या चॅनेलचे नाव आक्षेपार्ह असल्याने त्यावर प्रथम बंदी घालण्यात आली. परंतु गो.गो.गो. सत्यगोपालजी महाराज यांच्या सूचनेवरून त्यांनी ते 'गो-पो' असे बदलून घेतल्यानंतर त्यांना कार्यक्रमप्रक्षेपणाची परवानगी देण्यात आली. ते बंदी घालणारे पत्र आणि त्यानंतर प्रसारणास परवानगी देणारे दुसरे पत्र अशी दोन्ही पत्रे परवानगी देणारे पत्र रामूनेच टाईप करून तो ज्यांच्या ऑफिसमधे काम करत होता त्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे सहीसाठी पाठवली होती.
संध्याकाळी काम संपवून सहाच्या ठोक्याला रामू बाहेर पडला. सकाळी योजून ठेवलेली सारी खरेदी त्याने पूर्ण केली. आज दिवसभर झालेल्या कामाने बराच शीण आला होता. गेले काही महिने सांस्कृतिक कार्य मंत्रायलाकडे सतत कुठल्या ना कुठल्या पुस्तकावर, कार्यक्रमावर, सोशल माध्यमातील काही चर्चा वा फोटोंवर कारवाई करण्याची वा आधी केलेली कारवाई मागे घेण्याची धांदल खूपच वाढल्याने कामाचा ताण खूपच वाढलेला होता.
त्यामुळे रामू शीण घालवण्यासाठी कधी कधी संध्याकाळी घराशेजारच्या बिल्डिंगमधे राहणार्या गोंद्या पाटलाला घेऊन थोडा 'घसा ओला करण्यासाठी' घराजवळच असलेल्या 'आशीर्वाद बार'ला भेट देत असे. अलिकडे त्यांच्या भेटी नियमित झाल्यामुळे गल्ल्यावरचा मॅनेजर रघ्याशी त्यांची चांगली दोस्ती झालेली होती. त्यांच्यासाठी खास ठेवणीतला माल देणे किंवा कुठला ब्रँड इथे डुप्लिकेट आहे, घेऊ नका अशी वॉर्निंग तो मित्रत्वाच्या नात्याने देत असे. सुरेंद्रच्या 'कोल्ड्रिंक हाऊसच्या उद्घाटनाला जाण्याऐवजी नुसत्याच ड्रिंक्स हाऊस ला भेट देणे अधिक चांगले' असला पीजे स्वत:शीच मारून तो आशीर्वादच्या दिशेने वळला.
चालताचालताच त्याने गोंद्याला तो येणार का हे विचारण्यासाठी फोन लावला. रिंग अजून वाजतच होती तोवर तो आशीर्वादच्या दाराशी पोचलाही. गोंद्या येतोय तोवर नेहेमीची ऑर्डर देऊ अशा विचाराने तो आत शिरला. गल्ल्यावर आज रघ्या नव्हता. नव्या मॅनेजरने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. अखेर नेहेमीचे टेबल पकडून तो बसला.
वेटरने पाणी आणि मेन्यू कार्ड समोर आणून ठेवले. हसून रामूने कार्ड बाजूला सरकवले आणि 'नेहेमीचे' अशी ऑर्डर दिली. त्यावर त्याच्याकडे तुच्छतेने पहात वेटरने ते मेन्यूकार्ड त्याच्यासमोर आपटले नि तो चालता झाला. बुचकळ्यात पडलेल्या रामूने ते कार्ड उघडले आणि त्यावरील नावे वाचून स्वतःच्याही नकळत त्याने जोरदार किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध पडला.
- oOo -
उपोद्घातः
कुठलीशी किंकाळी ऐकून रामू दचकून जागा झाला. आपण उशीरापर्यंत झोपलो होतो हे त्याच्या ध्यानात आले. म्हणजे आता पाहिले ते सारे स्वप्नच होते असे ध्यानात येऊन त्याला हायसे वाटले. सकाळचे नऊ वाजले होते. आज रविवार असल्याने ऑफिसची कटकट नव्हती. हे सारे स्वप्न सांगायला राजाकडे जाऊ म्हणून तो उठला नि हाती येईल तो शर्ट अंगात चढवून घाईघाईने घराबाहेर पडला.
सोसायटीच्या दारातून बाहेर पडला नाही तोच त्याचे पाय जमिनीवर खिळले. हतबुद्ध होऊन तो समोर पहात राहिला. 'आशीर्वाद बार'च्या जागी 'सत्यवान गोमूत्र-गोरस सेवन केंद्र' ही पाटी त्याला वाकुल्या दाखवत दिमाखाने चकाकत होती. गल्ल्यावर कपाळाला उभे गंध लावलेला आणि 'तुळशीमाळ गळा' असलेला रघ्या... नव्हे रघुनंदन बसला होता. बाजूच्या गोठ्यात चार गोमाता विलक्षण तन्मयतेने रवंथ करताना दिसत होत्या.
त्यापैकी रस्त्याच्या बाजूच्या गोमातेने रामूकडे थंड डोळ्यांनी एकदा पाहिले नि ती खच्चून हंबरली. शेपूट उंचावून गोमयाचा नवा गोळा तिने उत्सर्जित केला. जमिनीवर पडलेल्या त्या गोळ्याखाली रामूची रविवार सकाळ दबून केविलवाणी दिसू लागली.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा