गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

अन्योक्ती २: खड्डे खणणारे हात

एक आटपाट मैदान होतं...

त्या मैदानावर सकाळी म्हातारे कोतारे फिरायला येत असत. मैदान असलेलं ते गाव हे खरंतर लहानसं शहरच होतं. महानगरी 'ज्येष्ठ नागरिकां'प्रमाणे ओघळणारे पोट घट्ट दाबून बसवणारे टी शर्ट नि ट्रॅक पँट किंवा बर्मुडा ऊर्फ पाऊण चड्डी घातलेले पुरुष इथे नसले तरी इथले पुरुषही त्यांच्या प्रमाणेच मैदानाला एखादी फेरी मारून घाम पुसत पुसत राजकारणाच्या खेळाच्या आणि खेळातल्या राजकारणाच्या गप्पा मारत असत.

हल्ली एकत्र कुटुंब पद्धती मागे पडू लागली असल्याने सुनेच्या कागाळ्या हा म्हातार्‍या स्त्रियांचा हक्काचा विषय जवळ जवळ बाद झालेला असल्याने त्या थोड्या मॉडर्न होऊन हिंदी चित्रपटातल्या हिरो हिरोईनच्या न जुळलेल्या वा मोडू घातलेल्या लग्नाची चिंता करत असत. किंवा एखाद्या मालिकेतल्या त्या कुण्या सासुरवाशिणीला त्रास देणार्‍या तिच्या सासूच्या नावे बोटे मोडत आपण तसे नाही हे स्वतःला नि इतरांना पटवून देत. तर कुणी एखाद्या पदार्थाला तिरफळ लावावे की नाही यावर साधकबाधक चर्चा करताना दिसत.

सकाळी अकराच्या सुमारास मुलींच्या शाळा सुटल्या की त्या दप्तरासकट मैदानावर हजर होत. त्यांचे खेळ रंगत ते थेट दुपारी एक वाजेपर्यंत. त्या सुमारास मैदानालगतच दहा बाय दहाच्या खोलीत सात-आठ जणांच्या कुटुंबासह राहणारा म्हातारा दगडू जेवण करून मैदानाच्या कडेने उभ्या असलेल्या एखाद्या झाडाखाली डुलकी काढण्यास येई. तो येताना दिसला की त्या पोरींना वेळेचे भान येई आणि उशीर केल्याबद्दल आपापल्या आयांची बोलणी खाण्याच्या तयारीने लगबगीने घरी पसार होत.

मग सकाळच्या सत्रात काम करून थकलेले कुणी मजूर, रिक्षावाले, फळविक्रेते, फिरते विक्रेते वगैरे मंडळी हळूहळू दगडूच्या जोडीला जमा होत. दुपारी दोन ते चारच्या दरम्यान दगडूबरोबरच ते मैदानही शांत लवंडलेले दिसे. चारच्या सुमारास झाडांच्या सावल्या मैदानावर हातभर पसरू लागल्या की घटका दीड घटका आराम करून ताजेतवाने झालेले जीव आळस झाडून आपापल्या कामाला चालते होत. दगडू मैदानाच्या दारात असलेल्या राम्याच्या टपरीवर एक कटिंग चा मारून पुन्हा झाडाच्या सावलीत विसावे.

पाच वाजण्याच्या सुमारास मुलांच्या शाळा सुटल्या की मैदानाला भरते येई आणि तिथे वेगवेगळे खेळ रंगत. कुठल्याशा झाडाच्या तोडून आणलेल्या फांद्यांपासून बनवलेले स्टंप्स, एखाद्या सुताराकडून दादापुता करून अखंड लाकडातून कापून आणलेली बॅट आणि सायकलच्या दुकानातून टाकून दिलेल्या ट्यूब्जमधून बनवलेला चेंडू घेऊन भावी गावसकर, तेंडुलकर, कपिलदेव आवेशाने, भान हरपून परस्परांशी झुंज घेताना दिसत.

खेळता खेळात कुण्या टोळक्याच्या चेंडूच्या चिंध्या होऊन जात. विकत आणणे ही संकल्पनाच माहित नसलेली ती पोरे पटापट बुचाच्या झाडावर चढून त्याच्या शेंगा गोळा करून आणत नि त्या कुटून त्यांचा चेंडू बनविण्याचा कामाला लागत. कुणी शूर पोरटी गुलमोहराच्या झाडाच्या शेंगा काढून तलवारीसारख्या वापरत बाजीप्रभू किंवा मुरारबाजी होण्याचे स्वप्न वास्तवात उतरवून बघत. कुणी बाप आपल्या पोराला एका कोपर्‍यात सायकल शिकवताना दिसे.

उन्हे कलू लागली की पोरट्यांना परतायचे वेध लागत. पण रिकाम्या हाती घरी जाणे त्यांना ठाऊकच नसे. सीजननुसार आंबा, चिंचा, पेरू, बोरे, आवळे वगैरे फळे उतरवून ती खाताखाता एखाद्या झाडाच्या पायथ्याशी लंब्याचवड्या गप्पांचे फड जमत. आसपास त्यांनी काही महिन्यांपूर्वी फळे खाऊन फेकलेल्या बियांतून चार कोवळे अंकुर डोकावताना दिसत. त्यातलाच एखादा शेजारच्या वठलेल्या झाडाची जागा भरून काढण्यासाठी वेगाने वाढताना दिसे. अंधार पडू लागला की हळू हळू सर्वजण काढता पाय घेत आणि मैदानालाही त्या शांत वातावरणात आजचा आपला दिवस कसा गेला याच्या आठवणी काढण्यास उसंत मिळे.

हे मैदान कुण्या जहागीरदाराच्या वंशजाच्या मालकीचे होते. गाव तसं शांत नि बर्‍यापैकी वस्तीचं असलं तरी मोठ्या शहरातील प्रगतीची पावले अजून त्याच्यापर्यंत पोचलेली नव्हती. माणसांना अंग टाकायला चार हात जागा आणि ताटात कोरभर भाकरी यापलिकडे काही अधिक मिळवायचे असते याची जाण नव्हती. आडनावापुढे न चुकता 'जहागीरदार' लावणारा मालक कुळांकडून येणार्‍या धान्यावर निवांत जगत होता. आणि खणा दोन खणांच्या जागेत राहणार्‍यांवर रुबाब गाजवायला त्याला त्याचे आठ खणांचे घर पुरेसे होते.

'आयुष्यात सतत पुढे जात रहायला हवे' असे घोकत जगणारा एक दाढीवाला माणूस एका संध्याकाळी मैदानापाशी आला. मैदानाचा विस्तीर्ण आकार, जवळच असलेले मार्केट, शाळा, गावापासून सात-आठ किलोमीटर पुढे असलेले अशा दहा गावांची पाण्याची गरज सहज भागवू शकेल इतके विस्तीर्ण तळे, जेमतेम चार किलोमीटर अंतरावरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगैरे गोष्टींची नोंद त्याच्या प्रगतीशील मनाने पटापट घेतली. त्या मैदानावर किती बिल्डिंग उभारता येतील नि किती पैसा निर्माण करता येईल या विचाराने त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

दाढीवाल्याने ताबडतोब शहरातील आपल्या बिल्डर मित्राकडे धाव घेतली. आणि त्या मैदानावर शहरातील लोकांसाठी हॉलिडे होम्स, रेस्ट हाऊसेस, फार्म हाऊसेस बांधून प्रचंड पैसा मिळवता कसा मिळवता येईल याची एक योजनाच त्याच्या कानावर घातली. बिल्डरला ती योजना पसंत पडली. पण शहरात अडकून पडलेल्या त्याने ही जमीन ताब्यात आणण्याची जबाबदारी दाढीवाल्यावरच सोपवली. त्याबद्दल भरपूर पैसे देण्याची तयारी दाखवली. दाढीवाल्याला नेमके हेच हवे होते. पण त्यातही त्या ठिकाणी बांधल्या जाणार्‍या रस्त्यांना आपल्या वाडवडिलांची नावे देण्याची अट त्याने बिल्डरकडून मान्य करवून घेतली.

आता आपले स्वप्न साकार होणार या आनंदात दाढीवाल्याने ताबडतोब गावांत येऊन मैदानाच्या मालकाची गाठ घेतली. आणि अतिशय उत्साहाने त्याने आपली योजना त्याच्या समोर मांडली. नुकतेच जेवण करून आचवत असलेल्या मालकाने फार रस दाखवला नाही. तो आपला दोन घास अन्न खाऊन सुस्तपणे पहुडला. दाढीवाल्याने आणखी एक दोन वेळा त्याची भेट घेऊन त्याला आपल्या योजनेतील फायदे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण मालक निवांत होता. दाराशी चालत येणारे धान्य आणि 'जहागीरदारसाहेब' म्हणून मान देणारे गांवकरी या पलिकडे त्याला आणखी काही मिळवण्याची इच्छा नव्हती. 'मग पोट्टे लोक खेळतील कुठे?' असा मोजका प्रश्न विचारून तो दाढीवाल्याला वाटेला लावत असे.

DumpingGround

पण दाढीवाल्याने ती जमीन मिळवण्याचा चंग बांधला. तिथे खेळायला येणार्‍या पोरासोरांनाच हाताशी धरून त्याने त्या जमिनीवर खड्डे खणायला सुरुवात केली. हळू हळू सारी जमीन खड्ड्यांनी भरून गेली. त्याच बरोबर दुसरीकडे आसपासचा सारा कचरा तिथे पडू लागला, शेजार्‍यापाजार्‍यांनी तसे करावे म्हणून दाढीवाला त्यांना पैशाची लालूच दाखवू लागला. जहागीरदार साहेबांवर आधीच खार खाऊन असलेल्या शेजार्‍यापाजार्‍यांनी अहमहमिकेने त्या मैदानाचे रूपांतर डंपिंग ग्राउंड मधे केले. आता मुलांना खेळायला तिथे जागा उरली नाही.

एकदा जहागीरदारसाहेब सकाळचे फिरायला गेले असताना एका खड्ड्यात पडून त्यांचा पाय मोडला. अखेर कंटाळून त्यांनी जमीन विकायची तयारी दाखवली. दाढीवाला हुरळून गेला, तो धावत आपल्या बिल्डर मित्राकडे गेला आणि त्याने ती जमीन विक्रीला उपलब्ध असल्याचे शुभवर्तमान त्याच्या कानावर घातले. बिल्डरने तिथल्या तिथे त्याला कमिशन देऊन ही बातमी अन्य बिल्डर्सच्या कानावर न घालण्याची ताकीद दिली. पैसे घेऊन बाहेर पडलेल्या दाढीवाल्याने ताबडतोब जंगी पार्टी केली आणि आपल्या या 'मिशन'मधे सहभागी झालेल्यांना सार्‍यांना खुश करून टाकले.

उरलेले पैसे देऊन व्यवहार पुरा करण्यापूर्वी जमीन पाहून घ्यावी घ्यावी म्हणून बिल्डरने त्या मैदानाकडे फेरी मारली. मैदानावर जागोजागी पडलेले भलेमोठे खड्डे, गांवभरच्या कचर्‍याचे ढीग, त्यावर घोंगावणार्‍या माशा, खचलेला रस्ता हे पाहून तो संतापला. त्याने दाढीवाल्याला जोरदार फैलावर घेतले. जमीन मूळ स्थितीत आणून देण्याचे अन्यथा त्याला कबूल केलेले उरलेले पैसे न देता ते जमिनीच्या सफाईसाठी म्हणून जप्त करण्याची धमकी त्याने दाढीवाल्याला दिली.

मालकांना खड्ड्यात घालावे म्हणून खणलेले खड्डे भरण्याची जबाबदारी आता दाढीवाल्यावर येऊन पडली आहे. बिल्डरकडून मिळालेले पैसे तर संपून गेले आहेत, कचरा टाकणारे उलट दिशेने उचलायला मदत करतील याची शक्यताच नाही. अपरिहार्यपणे ते खड्डे भरण्याचे काम आता दाढीवाला स्वतःच करू लागला आहे. पण आता कचरा टाकण्यास सरावलेले शेजारी तिथे कचरा टाकणे थांबवत नाहीत.

कचरा फेकणारे शेकडो हात आणि तो उपसणारे दाढीवाल्याचे दोन असा विषम सामना सुरु झाला आहे. अतिश्रमाने थकलेला दाढीवाला कधीमधी चक्कर येऊन त्याच खड्ड्यात पडतो आहे. ते खड्डे खोदणारी मुले कधीतरी परततील, ते भरण्याला आपल्याला मदत करतील म्हणून आशाळभूतपणे त्या मैदानाच्या गेटसमोर वाट बघत बसलेला तो दिसतो.

पण मुलांनी दुसरे मैदान शोधून काढले आहे. ते आता इकडे फिरकत नाहीत. मैदान हरवल्यामुळे घरी लवकर परतणार्‍या पोरींना आयांनी घरकामाला जुंपले आहे. मैदानावरच्या झाडांवर पूर्वी फुकट मिळणारी फळे आता बाजारातून पैसे मोजून विकत घ्यावी लागत असल्याने मुलांच्या आहारातून फळे हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी पाच दहा रुपयांच्या पाकीटातून मिळणारे वेफर्स किंवा चिप्स यावर ते आपली चैन भागवू लागले आहेत, इतकेच नव्हे तर फळांऐवजी चिप्स खाणे हे पुढारलेपणाचे, प्रगतीचे लक्षण ती मानू लागली आहेत.

पूर्वी मैदानावर फिरायला जाणारे म्हातारे घरात बसून त्यांचे सांधे आखडू लागले आहेत. त्या वेदनेमुळे वा 'अतिपरिचयात अवज्ञा' या न्यायाने घरच्या पोराबाळांशी छोट्या छोट्या मुद्द्यांवरून त्यांचे खटके उडू लागले आहेत. घरात बसून सतत किरकिर करणार्‍या म्हातार्‍यांवर सुना, लेकी करवादू लागल्या आहेत.

सद्यस्थितीत बिल्डरकडून येणार्‍या उरलेल्या पैशांवर पाणी सोडून चालते होणे हा पर्याय दाढीवाल्यासमोर आहेच. पण इतक्या नेटाने प्रयत्न करून हातातोंडाशी आलेले पैसे असे सोडून देण्याचा त्याचा धीर होत नाही. आज ना उद्या आपण हे मैदान जसे आहे तसे करू आणि आपले पैसे मिळवू या वेड्या आशेवर तो कचरा साफ करतो आहे, खड्डे भरतो आहे. मैदान आपल्याला हवे असेल तर खड्डे खोदणार्‍यांबरोबरच खड्डे भरणारे हातही बरोबर घ्यायला हवे होते हे मात्र दाढीवाल्याला अजूनही उमगलेले नाही.

'आयुष्यात सतत पुढे जात रहायला हवे' म्हणणारा दाढीवाला प्रगतीच्या वाटेवरचा सफाई कामगार होऊन तिची सोनेरी स्वप्ने पहात एका जागी खिळून राहिला आहे.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः 'प्रभात' दिवाळी २०१५)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा