ब्रिगेडियर तुमचा रणगाडा, एक ताकदवान वाहन आहे. लाखोंचा जीवनस्रोत असणारे जंगल आणि सहस्र माणसांना तो सहज चिरडून टाकतो. पण त्यांत एक दोष राहून गेला आहे... तो चालवण्यासाठी एका माणसाची गरज असते ! कमांडर तुमचे विमान, आकाशातून आग ओकू शकणारे, एक शक्तिशाली साधन आहे. ते एखाद्या तुफानालाही सहज मागे टाकते, नि एखाद्या हत्तीहूनही अधिक वजन सहज वाहून नेऊ शकते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... त्याला जमिनीवरून भरारी घेण्यासाठी एका माणसाची गरज असते. अॅडमिरल तुमची युद्धनौका, पाण्यावरचे मूर्तिमंत सामर्थ्य आहे. कित्येक टन विध्वंसक शस्त्रांसहितही ती पाण्यावर सहज संचार करते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... तिचे सुकाणू हाती धरण्यासाठी एका माणसाची गरज असते. जनरल तुमचा माणूस, हे ही एक उपयुक्त हत्यार आहे तो विमान उडवू शकतो, नौका वल्हवू शकतो तसेच जंगल आणि माणसे चिरडूही शकतो. पण त्यातही एक दोष राहून गेला आहे... तो विचार करू शकतो! राष्ट्राध्यक्ष महोदय तुमची सत्ता, विचारांची नसबंदी करणारे एक बलशाली साधन आहे. सत्ता माणसांना बटीक बनवू शकते, माध्यमांच्या मदतीने भ्रमित करु शकते. पण त्यांतही एक दोष राहून गेला आहे... या दोहोंचे संचालन माणसाच्याच हाती असते... ... आणि हो, माणूस विचार करू शकतो ! -oOo- (पहिली दोन आणि चौथे कडवे ’Bertolt Brecht’च्या
’General, your tank ’ वर आधारित)
- oOo -
कवितेसोबत जोडलेले छायाचित्र १३ जून १९३६ मध्ये घेतले गेले. सैनिकांच्या जमावातील एक व्यक्ती नाझी सलाम करण्याचे नाकारून हाताची घडी घालून उभा आहे. या व्यक्तीचे नाव ऑग्युस्त लॅंडमेसर होते असे म्हटले जाते.
अहो पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाची गरज काढून टाकेल अशी चिन्हे दिसतायेत!😢
उत्तर द्याहटवात्याचे कोडिंग करण्यासाठीही माणसाची गरज असते. त्याने काय फरक पडेल असा प्रश्न पडला तर सुबोध जावडेकरांची ’सामना’ म्हणून एक कथा आहे ती वाच.
हटवा