सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

अखंड-हिंदुस्तानचे स्वप्न आणि वास्तवातील प्रश्न

’अखंड-हिंदुस्तान’ नावाचा घोष हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ’देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळे झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातील माणसे, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय. ’पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्‍या, आपल्याला नकोशा वाटणार्‍या माणसांचे काय करायचे? असा प्रश्न ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचे येणार नाही, हे निदान त्यांतील विचारशील व्यक्तींना पक्के ठाऊक असते.

AkhandBharat

कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसते. जमिनीवरची परिस्थिती, सामाजिक बदलांतून ती घडत असते. देश एकसंघ असेल, तर नकाशावर कृत्रिमरित्या अशी रेघ ओढल्याने दोनही तुकड्यांवरच्या लोकांची बांधिलकी फारशी बदलत नसते. फाळणीमुळे दुभंगलेल्या कुटुंबांच्या दुराव्यातील वेदनेच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण त्या दुर्दैवी असल्या, तरी प्रातिनिधिक नसतात हे आपण विसरत असतो. आज बहुसंख्य भारतीय नि पाकिस्तान वा बांगलादेशात असलेल्या बहुसंख्येची परस्परांप्रती बांधिलकी असती, तर जनमताच्या रेट्यापुढे ती फाळणी टिकली नसती हे जर्मनीच्या उदाहरणावरुन म्हणता येईल.

याउलट या दोन देशांतील एखाद्या खेळाच्या सामन्याप्रसंगी* दोनही बाजूंच्या खेळप्रेमी नागरिकांतही उसळणारा जो द्वेष दिसतो, त्यातून हे देश एका छत्राखाली आले तरी त्यांतील समाज मनाने वेगळेच राहणार हे उघड आहे. कारण भारत व पाकिस्तान या दोन देशांतील समाजामध्ये धर्माधारित असलेली दरी, त्या त्या देशातील राजकारण्यांनी ’बाहेरील बागुलबुवा’ दाखवून घर सांधावे या हेतूने अधिकाधिक रुंद करत नेलेली आहे. परस्परांविषयीच्या द्वेषाने संपृक्त असे हे दोन समाज एका छत्राखाली राहूच शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

’अखंड-हिंदुस्तान’वाल्यांच्या राजकारणाचा आधार द्वेष हाच असल्याने, या दोन समाजांत मनोमीलन घडवण्याचे, बांधिलकी निर्माण करण्याचे कौशल्य तर त्यांच्याकडे नाही. त्यांचे सत्ताकारण हिंदू-मुस्लिम परस्परद्वेषाची पेरणी करण्यावर आधारलेले असल्याने, या एका देशात हिंदू नि मुस्लिम ही दोन राष्ट्रे सतत युद्धसंमुख स्थितीतच असणार आहेत हे उघड आहे. त्यामुळे ’अखंड-हिंदुस्तान’ वगैरे बाता कुण्या संघटनेच्या वा राजकीय पक्षाच्या राजकारणातील एक पत्ता म्हणून वापरला जात असला, तरी ते वास्तवात येण्याची सुतराम शक्यता नाही.

उलट अशा अखंड भारतात या ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या पोपटवीरांसमोरचे प्रश्न अधिक जटिल होतील, हे त्यांच्याच ध्यानात येत नाही. किंवा येत असले तरी अखंड-भारतच्या केवळ बाताच मारायच्या आहेत हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे. त्यांच्या बातांची पोपटपंची करणार्‍या त्यांच्या समाजमाध्यमी अनुचरांसाठी थोडे विस्ताराने आकडेवारीनिशी मांडू या.

आज भारताची लोकसंख्या आहे अंदाजे १३८ कोटी पैकी सुमारे ऐंशी टक्के, म्हणजे ११० कोटी हिंदू आणि १४ टक्के, म्हणजे अंदाजे १९ कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. त्याच वेळी पाकिस्तानची लोकसंख्या आहे सुमारे २२ कोटी. यात सुमारे ९७ टक्के, म्हणजे २१ कोटी मुस्लिम आहेत. हिंदू नगण्य म्हणजे २ टक्के किंवा सुमारे ४४ लाख. पाकिस्तान भारतात विलीन करुन घेतला गेला तर भारताची एकुण लोकसंख्या होईल अंदाजे १६० कोटी आणि त्यात मुस्लिम लोकसंख्या असेल ४१ कोटी... म्हणजे सुमारे २५%!

बरं त्या ’आसिंधुसिंधु हिंदुस्तान’मध्ये पूर्व-पाकिस्तानपण आहे म्हणे. तर तो बांग्लादेशही यात घेऊ. तिथे १६.५ कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ १५ कोटी मुस्लिम आहेत आणि अंदाजे दीड कोटी हिंदू आहेत. आता हे जमेस धरले, तर भारताची लोकसंख्या होईल सुमारे १७६ कोटी, मुस्लिम लोकसंख्या सुमारे ५५ कोटी म्हणजे सुमारे ३१ टक्के !

यांच्या अखंड-हिंदुस्तानच्या व्याख्येत अफ़गाणिस्तानपासून थेट इंडोनेशियापर्यंत सारी राष्ट्रे येतात. त्यातील मुस्लिम लोकसंख्या ध्यानात घेतली तर या ’हिंदूराष्ट्रा’त सुमारे पन्नास टक्के मुस्लिम लोकसंख्या असेल. आजच्या भारतातही अमुक सालानंतर मुस्लिम बहुसंख्य होतील नि हिंदू अल्पसंख्य होतील अशी ओरड हेच ’अखंड-हिंदुस्तान’वाले करत असतात. पाकिस्तान, बांग्लादेश पोटात घेतल्याने हे आणखी वेगाने घडून येणार आहे हे अखंड-हिंदुस्तानवाल्यांना ध्यानात येते आहे का? येत असणारच.

एका बाजूने हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत असा दावा करत दुसरीकडे अखंड-हिंदुस्तानचा पुरस्कार करणार्‍या नेत्याचा वारसा आपण चालवत असल्याचा दावा - निदान महाराष्ट्रातील - ’अखंड-हिंदुस्तान’वाली मंडळी करत असतात. यातील अंतर्विरोध त्यांच्या लक्षात येत नसतो असे नाही. पण राजकारणाच्या सोयीसाठी हा दांभिकपणा ते हेतुत: स्वीकारत असतात. सद्य भारतात ८०% हिंदू लोकसंख्येच्या उबेत राहून ’अखंड-हिंदुस्तान’च्या बाता या फक्त राजकारणाच्या सोयीसाठीच मारायच्या आहेत हे त्यांनाही समजत असतेच.

आता निवडणुकांच्या राजकारणाकडे वळू. वर म्हटल्याप्रमाणे अखंड-हिंदुस्तानात आता ११२ कोटी हिंदू विरुद्ध ५५ कोटी मुस्लिम अशी स्थिती निर्माण होणार आहे. (मुळात सुमारे पस्तीस टक्के अन्य-धर्मीय असलेला देश हिंदुस्तान म्हणावा का? पण ते असो.) ’अखंड-हिंदुस्तान’वाल्यांच्या दाव्यानुसार मुस्लिम हे एकगठ्ठा मतदान तर करतातच, आणि ते मतदान यांच्या पक्षाला अजिबात होत नाही. म्हणजे अखंड-हिंदुस्तानात जवळजवळ तेहतीस टक्के मतदान यांना होणारच नाही हे यांचेच गृहितक असेल.

आजच्या भारतात २०१९च्या लोकसभा निवडणुकांत हिंदुत्ववादी भाजपला सुमारे ३८ मते मिळाली आहेत. अखंड-हिंदुस्तानचा विचार केला तर हे प्रमाण २९ टक्के इतके खाली येते. यात प्रतिनिधित्वाच्या दृष्टिने पाहिले तर, संपूर्ण मध्यभारत आजच ’शत-प्रतिशत भाजप’ आहे. हे ध्यानात घेतले, तर तिथे केवळ उतरणच शक्य आहे. वाढीची शक्यता फक्त बंगाल नि उडिशा या दोन पूर्वेकडील राज्यातच उरते आहे. याचा अर्थ आजची ताकद राखली तरी भाजप/हिंदुत्ववादी राजकारण हे जेमतेम निम्म्या जागांवर प्रभाव राखून असेल. उलट ५५ कोटी मुस्लिम लोकसंख्येतील मतदार, म्हणजे अंदाजे तेहतीस टक्क्यांच्या आसपास मतदार हे विरोधी मतांमध्ये समाविष्ट होतील.

पण तरीही क्षणभर मान्य करु की, असा अखंड-हिंदुस्तान तरीही यांना खरोखरच हवा आहे. केवळ अनुयायांसमोर, कार्यकर्त्यांसमोर मारलेली ती बढाई नाही आणि देशासाठी सत्तेचा त्याग वगैरे करण्याची यांची तयारी आहे. पण जेव्हा फाळणी झाली त्या काळात हिंसाचार झाला, अत्याचार झाले. दोन्ही बाजूंच्या अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले, लोक देशोधडीला लागले, जगभरातील संघर्षात होते तसे स्त्रियाच अधिक बळी पडल्या. तर मग प्रश्न असा आहे, की जिथे हे अखंड-हिंदुस्तानवाले आता रशियाने युक्रेनवर केला तसा पाकिस्तानवर हल्ला करुन तो जिंकून घ्यावा असे म्हणत आहेत, त्या युद्धकाळात हेच पुन्हा होणार नाही का? त्यातून नव्याने निर्माण झालेली, जुनी धूसर होत चाललेली पण नव्याने उगाळलेली कटुता घेऊन जगणारा हिंदुस्तान किती काळ अखंड राहू शकेल?

शस्त्राने जिंकलेले भूभाग जर चिरकाल ताब्यात ठेवता आले असते, तर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला आपल्या सीमेपासून कैक मैल दूर असणार्‍या, जे देश त्यांच्या मुख्य भूमीला, नागरिकांना कोणतेही नुकसान पोहोचवू न शकत नव्हते अशा व्हिएतनामपासून अफ़गाणिस्तानपर्यंत सार्‍या देशांतून माघार का घ्यावी लागली असती? सोव्हिएत युनियनची शकले का झाली असती? एका युगोस्लावियातून आठ राष्ट्रे वेगळी का झाली असती? आणि ज्या देशातील लोकसंख्येचे भारतातील लोकसंख्येशी मनोमीलन आता जवळजवळ अशक्य आहे, त्या देशांचे असे सामीलीकरण तात्कालिकच राहणार वा दीर्घकालीन यादवीचे बीज रोवणारेच असणार हे समजून घ्यायला हवे आहे. आणि असे असेल तर हे (समजा) शत-प्रतिशत देशभक्त असणारे हे अखंड-हिंदुस्तानवादी उलट देशाचे अहितच घडवून आणणार आहे असा याचा अर्थ आहे.

याचा अर्थ असा की मला हिंदू बहुसंख्य असलेल्या, वरचढ असलेल्या समाजात राहायचे असेल तर मला अखंड हिंदुस्तानचा आग्रह सोडावा लागतो. त्यामुळे असा व्याघात (contradiction) निर्माण होतो आहे, की मी हिंदुत्ववादी असेन तर मला अखंड हिंदुस्तान’ला विरोध करावा लागेल, आणि अखंड-हिंदुस्तान व्हावा अशी माझी इच्छा असेल तर मला माझ्या हिंदुत्ववादाला तिलांजली द्यावी लागेल.

पण ही ’अखंड हिंदुस्तान’वाली मंडळी अडचणीचे प्रश्न टोलवण्यासाठी कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय ’तुम्ही म्हणता तसे घडणारच नाही, अशी समस्या येणारच नाही.’ असे ठाम विधान करुन ते शेपूट सोडवून घेऊ पाहतील. पण आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारु. ’अशी समस्या उद्भवणारच नाही असे का म्हणता? म्हणजे ’अखंड-हिंदुस्तानात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतील’ असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असा बदल घडवून आणणारी जादूची छडी जर तुमच्याकडे असेल, तर ती फिरवून निदान आजच्या हिंदुस्तानात राबवून या १३८ कोटींचे भले करण्यापासून तुम्ही सुरुवात का करीत नाही?

थोडक्यात हे दोन मुस्लिम देश भारतात विलीन केल्यानंतर त्यातल्या ’त्यांच्या’ लोकसंख्येचे काय करायचे? त्यांचे प्रबोधन करुन गुण्यागोविंदाने सहजीवन जगायचे, की त्यांना हिंदू धर्मात सामील करुन घ्यायचे? त्यासाठी त्यांचे मन वळवायचे की जबरदस्तीने हे घडवून आणायचे? या दोन्ही उपायांमध्ये लागणारे मनुष्यबळ नि आर्थिक बळ कसे उभारायचे? आपण तब्बल एकतीस टक्के लोकसंख्येमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत याचे भान ठेवून याचे उत्तर द्यावे.

पुढचा प्रश्न असा की यांना जात कोणती द्यावी? कारण जातीविहीन हिंदू ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. जात त्यागून, ’अजात’ अशी नोंद केलेल्या अनेकांना पुढे आलेल्या अडचणींमुळे- नाईलाजाने, पुन्हा आपली मूळ जात लावावी लागण्याचे उदाहरण महाराष्ट्रातच आहे. जातिविहीन माणसाला हिंदू समाज मुस्लिमांपेक्षा अधिक वाळीत टाकत असतो. मग आता यांचे काय करायचे? मुस्लिमांना त्यांची अशी वेगळी जात द्यायची? आणि शिया, सुनी, अहमदिया, सूफी हे ढोबळ अधिक त्यांचे उपपंथ असलेले मुस्लिम सरसकट एका जातीचा स्वीकार करतील? की त्यांच्या उपजाती वा पोटजाती तयार होतील? पुढे या जाती व पोटजातींकडून गरीबीच्या आधारावर आरक्षणाची मागण्या पुढे येऊ लागल्या तर हे अखंड-हिंदुस्तानवाले तिला पाठिंबा देतील? की आरक्षणाच्या बाबत सध्या घेतात तशी ’गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ अशी दुटप्पी भूमिका घेत पळवाट काढतील?

पुढचा प्रश्न हा की जे तरीही हिंदू होण्यास नकार देतील त्यांचे काय करायचे? त्यांचे शिरकाण करुन ही समस्या सोडवायची, की त्यांचे नागरिकत्वाचे हक्क काढून घेऊन त्यांना जेमतेम जनावराचे आयुष्य जगण्यास भाग पाडायचे? आणि याचा अर्थ त्यांना स्वत:चे प्रतिनिधी निवडण्याचा, मतदानाचा हक्क न देणे असेल, तर पूर्वाश्रमीच्या पाकिस्तान व बांग्लादेशातील भूभागावरील मतदारसंघात अक्षरश: मूठभर असणारे हिंदू वा अन्यधर्मीय त्या संपूर्ण समाजाचा प्रतिनिधी निवडणार का? उरलेल्या ऐंशी-नव्वद टक्क्यांचा तो प्रतिनिधी कसा समजायचा? आणि तो तरी या ’मतदार नसलेल्यां’च्या भल्याचा का विचार करेल? की हे टाळण्यासाठी ते प्रदेश सरळ केंद्रशासित करून टाकायचे? म्हणजे देशाचा सुमारे तेहतीस टक्के भूभाग हा केंद्रशासित करायचा?

तसेही अखंड-हिंदुस्तानवाल्यांना सर्व हिंदुस्तानच केंद्रशासित हवा आहे, आणि केंद्रातील नेतृत्वाला उद्धारक मानून लोकांनी त्यासमोर नतमस्तक व्हावे** असे वाटत असल्याने त्यांना हा पर्याय अधिक स्वीकारार्ह वाटेल. पण त्यातून जे देशांतर्गत संघर्ष उभे राहतील, त्यातून मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान किती होईल याचा काही अंदाज बांधता येईल का? की ’कुठल्यातरी तथाकथित भविष्यवेत्त्याने, कुठल्याशा अगम्य भाषेत केलेली, आमच्याच देशाला लागू पडते, अशी बतावणी केली गेलेली, तथाकथित भविष्यवाणी सत्य होईल, नि कुणीतरी देदिप्यमान कामगिरी करणारा, बलवान असा नेता ह्या असल्या समस्या चुटकीसरशी सोडवील’ या गृहितकावर भक्तिभावाने रोज दोन फुले वाहणारे हे भाबडे जीव त्या भरवशावर जगत आहेत?

सीमेवरील चकमकी आणि दहशतवादी हल्ले वगळता १९७१ नंतर भारताला सर्वंकष असे युद्ध लढावे लागलेले नाही. कारगिल भागात झालेले युद्ध न म्हणता लढाई म्हणावी लागेल. दोनही देशांच्या राजकीय नेतृत्वाने तिला व्यापक युद्धात रूपांतरित होऊ न देण्याचे शहाणपण दाखवले. त्यामुळे युद्धाची झळ बसणे म्हणजे काय याचा अनुभव आज बहुसंख्येकडे नाही.

त्या युद्धानंतर जन्मलेलेही आज पन्नाशीला पोहोचले आहेत, हे ध्यानात घेतले तर तरुण पिढी ही त्याबाबत सर्वस्वी अनभिज्ञच आहे असे म्हणता येईल. त्यांच्या युद्धाबद्दलच्या कल्पना या घरबसल्या आवेशाने युद्धकथा लिहिणार्‍या लेखकांची पुस्तके वाचूनच तयार झालेल्या आहेत. बहुधा त्यामुळेच स्वातंत्र्यलढाही न लढलेल्यांच्या पुढच्या पिढ्या युद्धाच्या कथांनी आणि बातम्यांनी घरबसल्या (किंवा ट्विटबुक-बसल्या म्हणू) रोमांचित होत असतात. म्हणून रशियाच्या साम्राज्यवादाला ध्यानात न घेता, त्यांच्याप्रमाणेच आपणही पाकिस्तानवर हल्ला करून अखंड-हिंदुस्तान वगैरे निर्माण करावा असे शाळकरी वयातले स्वप्न नव्याने व्यक्त करुन आपली बौद्धिक वाढ त्याच वयात थांबली असल्याचे दाखवून देत असतात.

- oOo-

* खेळांतून बांधिलकी निर्माण होणे अपेक्षित असते. त्यातूनच ’खिलाडू वृत्ती’ अशी संज्ञा निर्माण झाली आहे.
** म्हणून तर इतिहासातून हिटलर आणि वर्तमानातील पुतीन हे यांचे आदर्श आहेत.


संबंधित लेखन

४ टिप्पण्या:

  1. अवघड अवघड बऱ्याच प्रमाणात सुटं करून सांगितलंय! अजून एक दोनदा वाचायला हवं. एकूणच संख्याशास्त्रीय शिस्त म्हणजे!!

    उत्तर द्याहटवा
  2. प. पु. आदिनाथ (अॅडाॅल्फ) हिडींबासुत(हिटलर) यांस आम्ही गुरुस्थानी मानितो कारणे अखंड हिंदोस्थानांत म्लेंच्छांसी गर्दनमुक्त करुन (शीरकाण करुन) आर्यावर्त सजविणार आहोत. सबब या लेखाचे लेखकांस ॐ फट्ट स्वाहा करोनी सोडत आहोत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अरे बापरे, आता मला कुणीतरी पावरबाज मांत्रिक गाठून उतारा केला पाहिजे. :)

      हटवा