सोमवार, २१ मार्च, २०२२

अंडे आधी... पण ऑम्लेट की भुर्जी ?

’जगण्यातल्या कोणत्याही समस्येला एक योग्य बाजू नि एक किंवा अधिक अयोग्य बाजू असतात; आणि प्रश्न फक्त योग्य बाजू कुठली हे ओळखण्याचा उरतो’ असा बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे एखाद्या निर्णयाला ते सहजपणे योग्य वा अयोग्य ठरवू शकतात. एका निर्णयाने अपेक्षित परिणाम घडला नाही की तो निर्णय चुकला हे सिद्ध झाले, तरी त्याऐवजी दुसरा पर्याय निवडला असता तर अपेक्षित परिणाम घडलाच असता असे ठामपणे सांगता येत नसते याचे भान बहुतेकांना नसते. पण दोनही (किंवा त्याहून अधिक) पर्यायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन त्यातील अधिक कार्यक्षम कोणता ते ठरवणे व्यवहार्यही नसते.

ConfusedEgg
istockphoto.com येथून साभार

’अंडे आधी की कोंबडी?’ या प्रश्नाचे उत्क्रांती-अभ्यासकांनी उत्तर देऊन ठेवले आहे. पण जेव्हा मुद्दा खाण्याचा येतो, तेव्हा माणसासमोर हा प्रश्न येतो तो मुख्यत: आर्थिक पातळीवर. कुणाला कोंबडी परवडतच नाही म्हणून अंड्यावर भागवावे लागते. त्याहून खालावलेली आर्थिक स्थिती असेल तर अंडे ही देखील कधीतरीच उपलब्ध असणारी चैन असेल. आणि जेव्हा ते उपलब्ध असेल तेव्हाही जेमतेम एखादेच विकत घेणे परवडत असेल अशीही शक्यता आहे. अंडे आधी खावे की कोंबडी हा प्रश्न आता ज्याला खायचे त्याच्या आवडीचा न राहता निवडीचा होऊन जातो. एका प्रश्नाचे उत्तर हे नव्या प्रश्नाला जन्म देऊन जाते!

आणि उपलब्ध असलेल्या एकाच अंड्याच्या सहाय्याने ऑम्लेट बनवावे की भुर्जी याचा निर्णय अनुमानाने आणि निकषांच्या आधारेच घ्यावा लागतो. आधी ऑम्लेट बनवून खाऊन पाहा, मग त्याची भुर्जी बनवून पाहा. दोन्ही खाऊन पाहा नि दोन्हींमधील कोणते अधिक चविष्ट/पोटभर आहे (जो तुमचा निकष असेल तो) ते अनुभवा आणि त्याआधारे निवाडा करा’ असे म्हणता येत नसते. कारण पहिला पदार्थ बनवण्यासाठी अंडे फुटते तेव्हाच त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. दुसर्‍या पर्यायाच्या पडताळणीसाठी आता ते उपलब्धच नसते.

यासाठी शक्यताविज्ञान(Statistics) सांगते की ’एकसारखी’ पण एकाहुन अधिक अंडी वापरा, नि दोन्ही पदार्थ करुन अनुभव घ्या. पण एकाहुन अंडी उपलब्धच होऊ शकत नसली तर? यातून प्रयोगाचा वाढलेला खर्च परडणार नसेल तर? ज्याने ते आणले त्याची ऐपतच मुळी एक अंडे खरेदी करण्याची असेल तर? तसे असेल अंड्याचे काय करावे ऑम्लेट की भुर्जी हा प्रश्न त्याला काळजीपूर्वक सोडवायचा आहे. कारण ही संधी त्याला पुन्हा केव्हा येईल सांगता येत नाही. अशा वेळी दोनही पर्यायांच्या परिणामांचे ’अनुमान’ काढावे लागते नि त्यांच्या आधारे निर्णय करावा लागतो. आणि निवड कोणतीही केली तरी दोनपैकी एक पदार्थ खाण्यास मिळतच नसतो. आणि जो या निर्णयाचा भाग नाही, ज्याच्यावर ते अंडे विकत आणण्याची, त्यापासून तो एक पदार्थ बनवण्याची कोणतीही जबाबदारी नाही, तो न निवडलेल्या पदार्थाची जमेची बाजू दाखवून तुमचा निर्णय चुकला असे म्हणूच शकतो.

त्यात काय, आता भुर्जी बनवा नि पुढच्या वेळी ऑम्लेट असे बहुतेकांच्या डोक्यात येईल. पण ती वेळच आली नाही तर, आज अंड्यासाठी पाच रुपये वेगळे काढणे शक्य झाले. भविष्यात कायमच भाकरतुकड्यावर राहायची वेळ आली तर?’ किंवा ’आधी भुर्जीच का, ऑम्लेट आधी का नाही?’ हे प्रश्नही वाजवी आहेत. किंवा खाणारी ती एकच व्यक्ती आहे की एकाहुन अधिक जण तो पदार्थ वाटून घेणार आहेत? वाटून घेणार्‍यापैकी दुसर्‍या व्यक्तीची या दोनपैकी एका पर्यायाला आधीच पसंती असेल तर? त्याहून जास्तीची शक्यता म्हणजे पण त्यावेळेपर्यंत त्याची आर्थिक स्थिती आणखी सुधारून ’फ्रेंच(?) टोस्ट’ अशा नावाने भारतीय ओळखतात तो ब्रेड-अंड्यांचा पदार्थ करणे शक्य झाले तर? आता दोनाचे तीन पर्याय होतात. किंवा ’एवढी कटकट कशाला, सरळ उकडून खा’ असा आणखी सोपा पर्यात का वापरत नाही तुम्ही’ असा सल्ला मिळाला तर...?

शक्यता अशा वाढत जातात, त्यातील कोणतीही १००% बरोबर वा कार्यक्षम आणि इतर सर्व निर्विवादपणे चुकीच्या किंवा अकार्यक्षम, कमी फायदेशीर असे नसते. मुद्दा प्राधान्यक्रमाचा असतो. आणि त्या प्राधान्यक्रमाला वैय्यक्तिक आवड-निवड, निवडीची बाजारातील उपलब्धता, तिची किंमत/मूल्य, निवडणार्‍याची आर्थिक कुवत तसंच इतर स्टेकहोल्डर्सचा प्राधान्यक्रम, मर्यादा आणि कुवत अशा अनेक अनुषंगांचा विचार करावा लागतो.

हे सारे नीट समजून घेऊन केलेल्या मूल्यमापनालाच गांभीर्याने घ्यावे. एरवी दुसर्‍या कुणाचा एखादा निर्णय चुकला आहे किंवा मास्टरस्ट्रोक आहे हे दोनही निर्णय निवाडे नव्हे, शेरेबाजी या वर्गवारीत मोडत असतात. इथून पुढे कोणताही निवाडा करताना, मूल्यमापन करताना, किंवा हे बरोबर वा चूक हे जाहीर करण्यापूर्वी मेंदूला तरतरी यावी म्हणून एक अंडे खा... उकडून, तळून की नुसतेच दुधात घालून हा निर्णय तुमचा स्वत:चाच असू द्या.

- oOo -

१. Stakeholder याचा एकाच शब्दात मराठी अनुवाद कठीण आहे. यात निर्णयात आणि/किंवा अंमलबजावणीमध्ये सहभागी व्यक्ती, निर्णयाचा परिणाम ज्यांच्यावर होतो त्या व्यक्ती असे सर्वच एकत्रितरित्या समाविष्ट आहेत.


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: