’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

सोमवार, १४ मार्च, २०२२

आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती

चांगल्या/श्रेष्ठ कवितेचा एक गुण असा की निव्वळ शब्दांपलीकडे जाऊन न लिहिलेल्या, कदाचित अजून न घडलेल्या घटनेवरही ती समर्पक भाष्य करते. कालाच्या, भूगोलाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून ती व्यापक होते... त्याच वेळी विशिष्ट व्यक्ती, घटना, गट, स्थितीशी सुसंगतही होते तेव्हा ती श्रेष्ठ कविता ठरते.

कुसुमाग्रजांची अहि-नकुल या शीर्षकाची कविता आहे. अहि म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस या दोन हाडवैर्‍यांच्या संग्रामाचे चित्रमय शैलीत केलेले वर्णन आहे. शालेय अभ्यासक्रमातही ही कविता शिकविली जात असे, कदाचित अजूनही असेल. त्याच्या अखेरीस सर्पाचे निर्दालन करुन नकुल चालता होतो तेव्हा आम्हा शालेय विद्यार्थ्यांना आनंद होत असे. सर्प म्हणजे वाईट, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक. त्यातच ’शत्रू मानलेल्या देशातील, धर्मातील अर्भकालाही ठार मारावे, अन्यथा ते मोठे होऊन दहशतवादी होईल नि आपल्याला मारेल’ अशा ’उदात्त’ विचाराचे ’संस्कार’ करणारे आसपास अनेक. त्यामुळे त्या नकुलाच्या विजयामध्ये आम्ही आमचा विजय पाहात असू.

अर्थात माणूस कायम काही शालेय वयाचा वा समजुतीचा राहात नाही. वय वाढते तसे माणसाची क्षितिजे विस्तारतात. संस्काराबरोबरच तो विचारांनाही सामोरा जाऊ लागतो. ज्याप्रमाणे कॅमेर्‍याचा फोकस बदलला की त्याच फ्रेममध्ये यापूर्वी धूसर दिसणारी एखादी वस्तू ठळकपणे दिसू लागते नि ’अरेच्या, आधीच्या फोटोमध्ये ही दिसलीही नाही.’ असे चकित होण्याची पाळी येते; त्याचप्रमाणे नजरेचा नि विचाराचा पैस विस्तारला की जगण्यातील धारणांबाबतही होत असते. ’अहि-नकुल’बाबत असेच काहीसे झाले होते. या कवितेच्या अखेरच्या चार ओळी अशा आहेत.

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !

सर्प असो वा नकुल, त्यांचा दीर्घ संग्राम झाला. जीव पणाला लावून दोघे झुंजले. हार-जीत कुणाची झाली यापेक्षा संघर्ष किती घनघोर झाला याचे चित्र म्हणजे ही कविता. त्या दोघांखेरीज त्या संघर्षात इतर कुणीही सहभागी नव्हते. पण नकुलाचा विजय आणि सर्पाचा पराभव यातून स्वत:साठी काही आयते मिळवणारे कीटक जसे जमा होतात तसेच त्या संघर्षात काहीही न गमावता विजयाचा आनंद साजरा करत त्यात वाटेकरी होऊ पाहणारी तृणपातीही असतात. सर्पाचा विजय झाला की नकुलाचा याचे दोघांनाही सोयरसुतक नसते, त्यांचा संबंध असतो ते त्या संघर्षातून त्यांच्या पदरी काय पडते याच्याशी. संघर्षाच्या अखेरीस रुधिरस्नानाचा आनंद आणि मांसाची मेजवानी त्यांना मिळणारच असते.

तृण असोत वा कीटक, माणसाच्या मते दुय्यम जीव आहेत. कदाचित म्हणून ते अहि-नकुलांच्या संग्रामाची वाट पाहतात किंवा तो आपापत: घडून गेल्यावर त्यातून आपल्यासाठी काही वाढून घेतात. माणसे अधिक प्रगत असल्याने ते त्याची वाट पाहात नाहीत. तो संघर्ष ते घडवून आणतात. आणि त्यासाठी त्यांना परस्पर शत्रुत्व असलेल्यांचीही गरज नसते; नसेल तिथे ते निर्माण करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे असते.

CeaserSaysKillHim
www.shorthistory.org येथून साभार

रोमन साम्राज्यातून ’ग्लॅडिएटर्स’चा खेळ भरात होता. रिंगणातल्या एका माणसाने दुसर्‍याला भोसकल्यावर उडालेले रक्ताच्या कारंजे पाहून, एकाने दुसर्‍याचा उखडून काढलेला हात वा पाय पाहून, दुसर्‍याचा शिरच्छेद करून रक्त-गळते त्याचे शिर मिरवणार्‍याला पाहून प्रेक्षकांतून आनंदमिश्रित आश्चर्याचे चीत्कार उमटत असत. लढाऊंपैकी एखादा हतवीर्य होऊन जमिनीवर पडला नि प्रतिस्पर्धी त्याच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिला, आणि सम्राटाकडे ’जिवंत ठेवू की मारू?’ असा प्रश्न असलेल्या डोळ्यांनी पाहू लागला, की आपणच न्यायाधीश असल्याप्रमाणॆ हे प्रेक्षक ’किल हिम, किल हिम’ चा गजर सुरू करत असत. सम्राटाने अंगठा उचलून पराभूताला जिवंत सोडण्याची आज्ञा केली की या प्रेक्षकांतून नाराजीचे सूर उमटत.

वास्तविक पाहता रिंगणात लढणार्‍या त्या दोघांशीही या प्रेक्षकांपैकी बहुतेकांचे काही देणे-घेणे, सोयर-सुतक नसे. पण प्रत्येकाच्या मनात आदिम हिंसा असते. सर्वसामान्यांच्या, दुबळ्यांच्या मनातील हिंसेचे विरेचन व्हायला वाव नसतो. मग ते अशा परोक्ष भावे किंवा साक्षीभावाने तिचा निचरा करीत असत. जो मारला गेला, पराभूत झाला, ज्याच्या रक्ताची कारंजी अथवा पाट वाहिले त्याच्याशी यांचे काही वैर नसेच. पण तरीही त्याच्या त्या वेदनेत त्यांना आपला आसुरी आनंद गवसत असे. बहुतेकांची त्याच्याशी पुसटशी ओळखदेखील नसे मग वैर तर सोडूनच द्या. तरीही त्यांच्या मनातील हिंसा, कल्पित भावनेने त्याच्यावरचा आपला विजय नेणिवेतून साजरा करत असे.

त्या झुंजीचा निकाल नेमका उलट लागला असता, पराभूत हा विजयी खेळाडूला भारी पडला असता तरी ही झुंड त्याच त्वेषाने ’किल हिम, किल हिम’ ओरडली असती, सम्राटाने पराभूताला जीवदान दिल्यावर तितकीच नाराज झाली असती ही शक्यताच जास्त असे. कारण मृत्युची झुंज खेळणार्‍या दोघांसाठी तो अस्तित्वाचा प्रश्न असला तरी प्रेक्षकांच्या दृष्टीने तो केवळ एक खेळ होता. त्या खेळासाठी आज आपण जशी कोंबड्यांची, बोकडांची, बैलांची झुंज लावतो तशी माणसांच्या झुंजी लावून आपल्या करमणुकीसाठी त्यांच्यातील काहींचा जीव गेला तरी त्यांची हरकत नसे.

CeaserSaysKillHim
www.ancienthistorylists.com येथून साभार

'महासत्ता', 'साम्राज्य' वगैरे भाकड कल्पनांसाठी देशाचे नेते जेव्हा युद्धे लादतात तेव्हा त्या युद्धात लढणार्‍या जवानांनाही ग्लॅडिएटर्सपेक्षा, झुंजीच्या बोकड वा बैलाहून काही वेगळे वागवत नसतात. आपल्या जवानांनी त्यांची जास्त माणसे मारली, बॉम्ब टाकून माणसांनी उभारलेली घरे, निर्माण केलेली कला,रुजवलेली संस्कृती उध्वस्त केली म्हणून युद्धभूमीपासून दूर, सुरक्षित अंतरावर असलेली जनता आनंद व्यक्त करीत असते. कुसुमाग्रजांच्या कवितेत त्यांना तृणपात्याची भूमिका दिली ती समर्पक आहे. ही माणसे कणाहीन असतात. एखाद्या अर्भकाच्या पायतळी सहज तुडवल्या जाणार्‍या तृणपात्यांसारखी. केवळ जिंकणार्‍याच्या बाजूला राहणे, ते जमले नाही तर आपलीच बाजू जिंकली याची मखलाशी करणे इतपतच ते साध्य करीत असतात. आजही आपला ज्याचा कधीही संबंध आलेला नाही, येण्याचा संभव नाही आणि म्हणून त्याच्या आपल्या वैराचे कोणतेही प्रत्यक्ष कारण उपस्थित नाही, अशा हजारो मैल दूर असणार्‍या कुणाला तरी कुणीतरी तरी संपवले याचा आनंद घरबसल्या यांच्या मनात उमटत असतो. या अस्थानी वैरासाठी ते काही काल्पनिक, उसनी कारणे शोधत असतात. मुळात कुणाच्या तरी वेदनेने, मृत्यूने आपण आनंदित होतो ही आपल्या मनातील विकृती आहे हे यांना मान्य नसते. त्यांच्या लेखी ते रक्तातील शौर्याचे प्रतीक असते. एरवी प्रत्यक्ष संघर्षात सहभागी होण्याइतकी धमक त्यांच्यात नसते. त्या अर्थी अस्तित्व-आहार-पुनरुत्पादन या तीनही बाबींसाठी जिवावरचा संघर्ष करणार्‍या जनावराहून ते खालच्या पातळीवर असतात...

राजकारणाच्या झुंजीतही ’किल हिम किल हिम’ ओरडणार्‍या झुंजीचेही असेच असते. आज एक ग्लॅडिएटर यशस्वी होतो म्हणून त्याला प्रोत्साहन देणारे करणारे बाजू पलटली, प्रतिस्पर्ध्याने त्याचे रक्त काढायला सुरुवात केली, त्याचे बळ घटते आहे असे दिसले की बाजू बदलून ’किल हिम, किल हिम म्हणताना दिसतील यात शंका नाही. कारण मुळात भित्र्यांचा हा जमाव कायम विजेत्याच्या बाजूला, त्याच्या मर्जीत राहून त्याच्या गैरमर्जीपासून बचाव करत असतो. आणि यातून येणार्‍या अपराधगंडाला गाडून टाकण्यासाठी त्या पराभूताच्या पराभवात आपलाही विजय शोधून, जणू आपणच त्याचा पराभव केला असे स्वत:ला बजावून आपला नसलेला विजय आपला म्हणून साजरा करत असते. त्यायोगे आपण भित्रे नव्हे तर शूर आहोत, विजयी आहोत हे सिद्ध करण्याची धडपड करत असते. अशा जमावाचा आवाज नेहमी कर्णकटू मोठा असतो. ऐकणार्‍याला त्या कोलाहलात स्पष्ट विचार करता येऊ नये, या विजयाचा आपला संबंध नाही याची त्याला उकल करता येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.

'खिलाडूवृत्ती’ हा शब्दच ज्या खेळांमधून निपजला त्या खेळांतील जय-पराजयावरही ग्लॅडिएटर्सच्या झुंजीच्या प्रेक्षकांप्रमाणेच द्वेषाची कारंजी उडताता गेल्या काही दशकांत दिसू लागली आहेत. फुटबॉलच्या सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघांच्या पाठिराख्यांत होणारी हाणामारी हा नित्याचा भाग झाला आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला निदान दोन देशांतील संघर्षाचे आयाम आहेत. पण एकाच देशातील बॉस्टन आणि न्यूयॉर्क या दोन शेजारी शहरांच्या अमेरिकन फुटबॉलच्या संघांतील स्पर्धा बाहेर पाठीराख्यांमध्ये किती भयानक वळण घेते हे पाहून मला धक्का बसला होता. 

काही वर्षांपूर्वी काही कामाच्या निमित्त बॉस्टनला गेलो असताना तिथे प्रसिद्ध ’सुपर बोल’ या त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेचा अंतिम सामना नेमका त्याच शहरात होता. त्यांचा संघ त्यात खेळणार होता. ’त्या सामन्याच्या दिवशी मी शक्यतो घराबाहेर पडू नये’ अशी तेथील मंडळींनी मला ताकीद दिली होती. सामना जिंकला तर त्या उन्मादात आणि पराभव झाला त्या दु:खात वा संतापात, चाहत्यांकडून होणार्‍या संभाव्य उतमात आणि उत्पातापासून दूर राहावे म्हणून हा सल्ला देण्यात आला होता. त्यापूर्वी एकदा न्यूयॉर्कला फिरायला गेलेला आमचा मित्र तिकडून विकत घेतलेली यांकीज (न्यूयॉर्कचा संघ) टोपी घालून बॉस्टनमध्ये फिरला तेव्हा त्याला अनेक संतापलेल्या नजरांचा सामना करावा लागला होता. ऑफ़िसमध्ये पोहोचल्यावर तेथील सहकार्‍यांकडूनच त्याला त्याचे कारण समजले.

असा माथेफिरु समाज, जीव गमावणारे वा पंगु होणारे ग्लॅडिएटर्स यांच्या जिवावर उच्चासनावर बसलेले सीझर्स निश्चिंतपणे राज्य करत असतात. पण बाजू पलटली की ’किल हिम, किल हिम’ म्हणणार्‍या बोटांची टोके आपल्याकडेही वळू शकतात, हे त्या जीवघेण्या खेळात उतरलेल्या ग्लॅडिएटरने जसे विसरायचे नसते, तसेच सीझरनेही! म्हणून विजय साजरा करू पाहणार्‍या झुंडीला ’आपली’ मानण्याची चूक करू नये. त्याचा विजय हा झुंडीला आपला विजय वाटत असला, तरी त्याचा पराजय आणि/किंवा त्यानंतरचा मृत्युही पोरकाच असतो. तृणांना कोणाच्या रुधिराचे स्नान घडते आणि कीटकांना कोणाचे मांस मिळते याचा विधिनिषेध नसतो. मांसाने पोट भरते आणि इतरांच्या रक्ताचे झेंडे मिरवता येतात हे दोघांच्या दृष्टिने सुखाचे आयुष्यच असते.

- oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा