आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल.
या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. परंतु मला यात एका संक्रमणाची चाहूल दिसते आहे. यात बरे-वाईट परिणाम दिसतीलच, परंतु याचे संभाव्य दुष्परिणाम मला दिसतात जे अधोरेखित करावेत असे वाटते.
यांना शब्दांचे अर्थ समजावेत ही अपेक्षा बाजूला ठेवूनही मला असा प्रश्न पडतो, ‘ज्या मुलांना सज्ञान झाल्यावरही ही चिरपरिचित लिपी बिनचूक वाचता येत नसेल तर याचे कारण काय असावे?’ लहानपणापासून नागरी लिपीतील मजकूर वाचणे त्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. पहिल्या इयत्तेत मुळाक्षरे त्यांनी गिरवली आहेत, जाता-येता दुकानांचे बोर्ड वाचले आहेत, (निदान) क्रमिक पुस्तके वाचली आहेत. मग वय वाढू लागल्यावर हे ‘अनरिंगिंग ऑफ बेल’ किंवा हे ‘अनलर्निंग’ म्हणावे का? असेल तर हे का घडत असावे?
शाळेत असताना पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर मागील इयत्तांमध्ये आत्मसात केलेली माहिती (मी ‘ग्रहण केलेले ज्ञान’ म्हणण्याचे धाडस करत नाही) स्मरणातून सहज निसटून जाण्याला गंमतीने ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असे म्हटले जाई. ही पाठांतरप्रधान, संस्कारप्रधान समाजात असलेली जन्मव्याधी आहे. आकलनाऐवजी अनुकरणाला, ग्रहण करण्याऐवजी पाठांतराला महत्त्व देणार्या पंतोजी शिक्षणपद्धतीमध्ये याहून वेगळे अपेक्षित नाही.
मागच्या स्तरावर नवा स्तर चढला की आधीच्या स्तराकडे पोहोचण्यास नव्या स्तराचा अडथळा तयार होतो. आकलन म्हटले तर प्रत्येक स्तरातील ज्ञानाची एक अनुक्रमणिका, what and where किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचे तर मास्टर फाईल टेबल (MFT) तयार होऊन त्याआधारे हवे तेव्हा त्या स्तरातील माहिती उपसून काढण्याची सोय होत असते. पाठांतरप्रधान मंडळी कपड्यांच्या घड्यावर घड्या ठेवून नुसतेच ‘कोठावळे’ (hoarders) होऊन राहतात.
हे ‘अनलर्निंग’ त्याच्याही पुढचा टप्पा आहे का? जी वाक्ये त्यांनी शाळेत असताना सहज वाचली असती, ती आज त्यांना का वाचता येत नाहीत? त्यांनी स्वत:च्या बुद्धीने जे लिहिले असते त्याचेच आकलनही त्यांना का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, मला स्वत:चेच अनुभव जमेस घेऊन काही एक आकलन होऊ लागले. हे कितपत गंभीर आहे मला माहित नाही, परंतु ‘हे असे नाहीच’ वा ‘प्रमाण नगण्य आहे’ असे कुणी म्हणाले, ‘वडाची साल पिंपळाला लावतो आहेस’ (किंवा फेसबुक वा एकुण सोशल मीडिया नागरिकांच्या प्रवृत्तीला अनुसरून वैय्यक्तिक शेरेबाजी करत ‘तुझा छुपा अजेंडा आहे’) असे कुणी म्हणाले तर मी अजिबात मान्य करणार नाही हे नक्की.
माझ्या मते याला ‘दृश्यात्मकतेच्या आहारी जाणे’ हा मोठा दोष कारणीभूत आहे. ‘माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये मी अभिव्यक्तीच्या शब्द या माध्यमाची निवड मी का केली यावर थोडे भाष्य केले होते. त्याचबरोबर फेसबुकसह सर्वत्र फोटो/इमेज अथवा व्हिडिओ यांचे प्राबल्य असल्याने अभिव्यक्तीच्या काय समस्या निर्माण होतात याबाबतही थोडे लिहिले होते.
एक उदाहरण म्हणून माझी कालचीच फेसबुक-पोस्ट पाहता येईल. त्या पोस्टमध्ये मी सरमिसळ घटक अथवा confounding factors बाबत बोलत होतो. त्या मुद्द्याचे उदाहरण म्हणून एक भाष्यचित्र जोडले होते. सुरुवात जरी उपहासाने केली असली तरी माझ्या मते पोस्ट गांभीर्यपूर्वक मांडणी करणारी होती. (पोस्ट असल्याने मांडणी स्वैर होती हा दोष मान्य.) परंतु फेसबुक दृश्यात्मकतेला अवाजवी प्राधान्य देत असल्याने इमेजने व्यापलेली जागा मजकुराहून अधिक असते. यातून झाले असे की फेसबुकवर वा काही फेसबुककर नसलेल्या काहींना लिंक पाठवल्यावर हा: हा: अशी प्रतिक्रिया आली.
निव्वळ भाष्यचित्र पाहता ती वाजवी आहे... कदाचित. परंतु पोस्ट वाचल्यानंतर तशी येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे या प्रतिसादकांनी पुरी पोस्ट वाचली असण्याची शक्यता कमी आहे. चटकन इमेज पाहिली नि प्रतिसाद दिला असे झाले असण्याची शक्यता बरीच आहे. ‘लिहिले असेल नेहमीप्रमाणे लांबलचक, कशाला वाचा’ या विचारही एखाद्याने केला असेल (‘हा पाच मैल लिहितो, एवढे कोण वाचणार’ अशी एका मित्राची प्रतिक्रिया फार पूर्वी आलेली होती. तो दोष मान्य करून त्याच्या त्या प्रतिक्रियेमध्येच शब्दमाध्यमाबद्दलचा कंटाळा दिसतो हे नोंदवून ठेवतो.)
मी लिहितो म्हटल्यावर ‘समय के साथ चलो’ वाल्यांनी ‘लेखन अधिक पोहोचावे म्हणून संपूर्ण मजकूर फेसबुकवर टाकावा’ असा सल्ला दिला होता. त्याचा प्रतिवाद करताना मी फेसबुकच्या इमेज-मजकूर असमतोलाबद्दल आणि मांडणीच्या जाचक मर्यादेबद्दल नि त्याच्या परिणामांबद्दल लिहिले होते. ही मागची फेसबुक-पोस्ट याचे आणखी एक उदाहरण.
आज बहुसंख्येला मीम्स, रील्स, मायक्रो-व्हिडिओज वगैरे माध्यमांतूनच सारे काही हवे असते. त्यातून मग आकलनप्रधान, विश्लेषणप्रधान, मुख्य म्हणजे शब्दप्रधान मांडणी करणार्यालाही यू-ट्यूब चॅनेल चालू कर, छोटे व्हिडिओ बनव, पॉडकास्ट कर वगैरे सल्ले दिले जातात. शब्दाचे वाचन कमी कमी करत नेणार्या या पिढीमध्ये लिपीशी बांधिलकी विरत जाणार हे अपरिहार्य आहेच.
‘J1 झालं का?’ या सनातन प्रश्नापासून सुरु झालेली चॅट भरपूर प्रमाणात इमोजींचा वापर करते. टाईप कमी करावे लागावे हा उद्देश असतो. म्हणजे ‘मला हे आवडले नाही’ या वाक्याच्या जागी रागावलेली एक इमोजी टाकली की काम भागते. कदाचित लिपीप्रमाणेच पुढे या इमोजीचा अर्थ लावणेही मेंदू बंद करेल नि थेट त्यातील त्या-त्या भावनेचे निदर्शक असणारे केंद्र उद्दीपित करेल. हे कदाचित प्रासंगिक संवाद वा देवाणघेवाणीस पुरेसे असेलही, पण दस्तऐवजीकरणावर याचा काय परिणाम होईल याचा विचारही करायला हवा.
नफा हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन उभे राहिलेली भांडवलशाही व्यवस्था भरपूर पैसे निर्माण करत असली तरी गुणवत्ता, वैविध्य आणि मुख्य म्हणजे पर्यावरण याची ऐशीतैशी करते; तसेच प्रासंगिक संवाद महत्त्वाचा नि बाकी सारे दुय्यम समजू लागणे घातक आहे का याचा विचार आवश्यक आहे का या प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहायला हवा.
पोस्ट आधीच भरपूर लांबल्यामुळे फार उदाहरणे देत नाही. एकदोनच पाहू. समजा हे दृश्यप्रधान जगातील तरूण एखाद्या गुन्ह्याचे साक्षीदार असतील आणि पोलिसांच्या आरेखकाने यांना पाहिलेल्या गुन्हेगाराचे वर्णन विचारले अथवा घटनाक्रम नि गुन्ह्याच्या स्थानावरील जड वस्तूंच्या स्थितीबाबत विचारणा केली, तर वास्तवाच्या त्या अवकाशातील विविध घटकांसाठी नेमके शब्द यांना सापडतील, की मनात त्याला अनुरूप इमोजीच फक्त उमटतील? की वस्तुनिष्ठतेच्या नि दृश्यात्मतेच्या अवाजवी आहारी गेलेला माणूस संभाव्य मानवी वावराच्या परिसरातील प्रत्येक चौरस से. मी. वर विविध अँगलने पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल, जेणेकरुन माणसाच्या वर्णनक्षमतेवर अवलंबूनच राहायला नको?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकाच्या पडद्यापलिकडे माणसाचा परस्परसंवाद - आज झाला आहे त्याहून - कमी होत जाईल. समोरासमोर बसून एकमेकांना ‘आयएम’ करणे अधिक सुलभ होईल का? कारण अनेक वाक्यांची रचना ही शब्दांऐवजी इमोजींनी करणे अंगवळणी पडलेले असेल. आजही लांबलचक मजकूर कुणी वाचायचा म्हणून बहुतेक अॅप्स, उपकरणे (devices) यांची लायसन्स-अग्रीमेंट्स आपण न वाचता अॅक्सेप्ट करुन पुढे जातो. या अधीर वृत्तीला अज्ञानाची जोड मिळून हे भूत आणखी किती विक्राळ रूप धारण करेल?
आज हा अतिरंजित कल्पनाविस्तार वा प्रलयघंटानाद वाटू शकेल, परंतु माझ्या मते हे वास्तव दूर असले तरी आपल्या वाटेवर आहे हे नक्की
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा