गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ

आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... !

दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात.

मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात.

दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात.

प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा!

प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते.

खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते.

पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्साहन देणारे, विरोधी टीमच्या समर्थकांवर शाब्दिक वार करणारे, एकमेकांना भिडणारे प्रेक्षकच असतात.

‘ड्रिंक्स’ ब्रेकमध्ये परस्परविरोधी टीमचे खेळाडू एकाच आईस-बॉक्समधून पाणी नि कोल्ड्रिंक पितात. तसंच सामना संपल्यावर परस्परांसोबत डिनर पार्ट्या करतात.

प्रेक्षकांनी खर्चलेल्या पैशांतून खेळणार्‍या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना, डग-आउटमध्ये नुसतेच बसलेल्या टीम सपोर्ट स्टाफला, त्यांच्या मालकांनाच काय पण टीव्हीवरील निवेदकांनाही(!) मानधन मिळून त्यांची चांदी होते.

सामना संपला, गुलाल उधळून झाला की प्रेक्षक आपला खिसा किती हलका झाला याचा अंदाज घेत-घेत पुढच्या काटकसरीची चिंता करत घरी जातात (किंवा टीव्ही बंद करतात.)

दोन्हींमध्ये मोजके स्थानिक/मूलनिवासी खेळाडू आणि बाकीचे थोडे देशातले, थोडे परदेशातले असे पैसे देऊन खरेदी करून एक टीम तयार केली जाते. पण ‘नालायक असले तरी स्पर्धेच्या/संघर्षाच्या प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, गावच्या माणसाची बाजू घ्यायला हवी’ या निष्ठेतून अशा ‘आपल्या नसलेल्या’ आपल्या टीमची बाजू सर्वसामान्य चाहते प्रसंगी आपल्याच माणसांशी वैर पत्करुनही लढवत असतात.

एक लहानसा फरक असा आहे की आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव होतो, तर निवडणुकीत ‘होस्टाईल टेक-ओव्हर’देखील (Hostile Take-over) होते.

प्रत्यक्ष निवडणुकीआधी बाहेरुन नेते आयात करतात, निवडणुकीदरम्यान बाहेरुन नेते आयात करतात आणि निवडणूक झाल्यावरही बाहेरुन नेते आयात करतात. (अदानी जसे कंपनी शून्यापासून सुरु करण्याचे नि वाढवण्याचे कष्ट न घेता सरळ इतरांची बळकावतो तसेच.) थोडक्यात पळवापळवी हा राजकारणाच्या अनेक उपखेळांपैकी एक खेळ आहे.

... कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!

GameOrSport
https://www.sportsbusinessjournal.com/ येथून साभार.

प्रत्येकाचा एक संघ असतो नि एक लाडका खेळाडू असतो. हे दोन्ही जग्गात भारी आहेत असा त्याचा समज असतो. यांची कामगिरी खालावली तर ती ‘सदोष पंचगिरी’मुळेच असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ‘पंच बदला निकाल बदलेल’ या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास असतो. कारण...

आपलं पोरगं कोणत्या शाळेत नि कितव्या इयत्तेत शिकते याचा पत्ता नसलेल्यालाही फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती नि त्यांनी कुठल्या पक्षातून किती नेते आयात केले याचे स्टॅटिस्टिक्स बिनचूक मुखोद्गत असते. आणि असे असून बीसीसीआय आपल्याला ईशान किशनप्रमाणेच करारापासून वंचित ठेवते याची त्याला खंत नसते. कारण...

उपकर्णधार म्हणून साधी स्वतंत्र रूम मागितली म्हणून सुरेश रैनाला स्पर्धेच्या मध्येच परदेशातून हाकलून लावले जाते. दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून जडेजासारख्या दिग्गज खेळाडूला एका आयपीएलचे तिकीट नाकारले जाते. पण ‘निवडून येण्याची क्षमता’ आणि ‘श्रेष्ठींशी नाते’ या गुणांच्या बळावर हार्दिक पांड्याला मात्र भाजपमधून शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यावरही निलंबित केले जात नाही. तरीही...

दुसर्‍या पक्षातून येऊन थेट तिकीट मिळवलेला हार्दिक ‘कसा निवडून येतो बघतोच.’ असे म्हणत कुणी रामदास बुमराह बंड करतो. पण वरिष्ठांनी ‘समजावल्या’वर (समजूत घातल्यावर नव्हे, प्लीज नोट!) ‘संघ नि देशासाठी’ म्हणून निमूटपणे तिसरा गोलंदाज म्हणून चेंडू हाती घेतो. कारण...

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही ‘लोकसभेसाठी थेट उमेदवारी मिळणार नाही’ असे हायकमांड जाहीर करते. एवढेच नव्हे तर किमान एका ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनेल निवडून आणल्याखेरीज पक्षप्रवेशही होणार नाही असे बजावते. पण हार्दिक पांड्याचा थेट पक्षप्रवेश होऊन त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदही बहाल केले जाते. तरीही...

‘आयुष्यातील इतकी वर्षे संघाला दिली. आता अशा बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी आम्ही काय सीमारेषेवर पाण्याच्या बाटल्या घेऊन बसायचेच का?’ असा प्रश्न यापूर्वी अवघड मतदारसंघही जिंकून दिलेल्या रोहित शर्माला पडत असतो. तरीही...

ड्रीम-११ किंवा फँटसी-लीग सारख्या कंपन्या केवळ क्रिकेटसदृश मैदानी खेळांसाठी आभासी खेळ देऊ करतात. पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या– आणि चॅनेल माध्यमे ‘सिंहासन का क्वार्टर-फायनल’, ‘सिंहासन का सेमी-फायनल’ किंवा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वगैरे नावांनी डायरेक्ट टेलेकास्ट करत असलेल्या निवडणुकांसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळासाठी मात्र असा आभासी खेळ देत नाहीत. याचा निषेध केला जातो आहे. कारण...

‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेमध्ये केवळ दर पाच वर्षांनीच या खेळाची मजा लुटता येणार असल्याने अभिजित बिचुकले ‘जंतर मंतर’वर उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आरसीबी संघ त्याच्या व्यवस्थापनासह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. कारण...

उलट ‘आयपीएलच्या धर्तीवर वार्षिक निवडणूक असायला हवी आणि ती ही पळण्याच्या शर्यतीप्रमाणे ‘सारे एकदम’ न लढवता आयपीएलच्या धर्तीवर ‘एकास एक’ पद्धतीने लढवावी– म्हणजे मनसेसारख्या पक्षांनाही एखाद-दुसर्‍या विजयाची संधी मिळू शकेल’ अशी मागणी मूळसेना-नेते भंजक खाऊच आणि गतस्वाभिमान-नेते हरिहर नानू खाणे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे केली आहे. कारण...

‘लोकांना सतत निवडणुकांच्या धामधुमीत नि उत्तेजित अवस्थेत ठेवण्याने आपल्या लाथाळीला मिळणारा वाव नाहीसा होईल’ या भीतीने बायचुंग भुतिया या फुटबॉल महाशक्तीने आपल्याला छुपा पाठिंबा दिल्याचा दावा या दोघांनी केला आहे. कारण...

आयपीएलच्या ’फॅन पार्क’ संकल्पनेमध्ये ज्याप्रमाणे सामने नसलेल्या शहरांत चाहत्यांना स्टेडियममध्ये एकत्र सामना पाहण्याचा आनंद दिला जातो, त्याच धर्तीवर आपापल्या नेत्याच्या अन्य शहरांतील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळावी यासाठीही असे फॅन पार्क निर्माण करून तिथे मोठ्या स्क्रीनवर आपल्या लाडक्या नेत्याचे संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवावे अशी मागणी सर्वपक्षीय फॅन्सतर्फे करण्यात आली आहे. कारण...

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांचे स्वत:चे चॅनेल्स व वेबसाईट्स असतात नि त्यावरून आपल्या लाडक्या संघ व खेळाडूंच्या जुन्या खेळी पुन्हा पुन्हा पाहून आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे आप-आपल्या लाडक्या नेत्यांची भाषणे, विरोधी नेत्यांच्या भाषणातील चुका अधोरेखित/निर्माण करणारे मीम्स आणि रील्स, चॅनेल-चर्चेमध्ये आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याला वा चॅनेल-प्रतिनिधीला कस्सला धुत्तला हे दाखवणारे असे सारे व्हिडिओज, माहिती, लेख वगैरे एकाच ठिकाणी देणारे चॅनेल्स आणि वेबसाईट्स असायला हव्यात अशी आग्रहाची मागणीही करण्यात आली आहे. कारण...

आयपीएलमध्ये प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात दाखवतात त्याच धर्तीवर निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांदरम्यान जाहिराती दाखवण्यात याव्यात अशी मागणी थडानी ग्रुप्स या मॉरिशसस्थित आफ्रिकन-अमेरिकन कंपनीने केली आहे. ‘म्हणजे अजून पैसा’ हे ध्यानात आल्यावर डोळे लकाकलेल्या बीसीसीआय प्रमुखांनी ‘एक देश एक निवडणूक’ अध्यादेशामध्ये या पुरवणी मागणीचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. कारण...

एका भाषणात दोनच बाउन्सर(!) अलौड असावेत, ‘रिव्हर्स’ स्वीप या फटक्यावर प्रचारामध्ये बंदी घालण्यात यावी. निवडणुकांचा प्रचार चालू असताना ऐनवेळी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून हार्दिक पांड्याप्रमाणे विरोधी उमेदवारच आपला उमेदवार म्हणून जाहीर करण्याची सोय असायला हवी... इत्यादि मागण्या ‘गुजरात जायन्ट्स’(!) संघाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. कारण...

निवडणुका अधिक रोमांचकारी होण्यासाठी मागे फन्ना पाडारे(!) यांनी मागणी केल्याप्रमाणे, युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यानंतर खेळणार्‍या रशियन खेळाडूंप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्यात नि नंतर आयपीएलच्या धर्तीवर विजेत्यांचा लिलाव करून विविध संघांनी त्यांना विकत घ्यावे. जे सर्वाधिक खासदार विकत घेऊ शकतील त्यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे. कारण...

...कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!!

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा