काही वर्षांपूर्वी एका महान नेत्याच्या सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये गुपचूप जीपीएस चिप बसवल्याची कुजबूज ऐकायला मिळाली होती. या चिपवरून ती नोट कुठे आहे हे बिनचूकपणे सांगता येते असे एका चॅनेलकाकूंनी आम्हाला डेमोसह समजावून सांगितले होते.
बहुतेक काळा पैसा साठवणारे नेहमी मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये तो साठवत असल्याचे एका चाणाक्ष (हा शब्द `चाणक्य'वरुन आला असावा का?) नि धूर्त नेत्याने ओळखले होते. म्हणून या सर्वात मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटेची लालूच दाखवण्यात आली होती नि त्यात जीपीएस चिप दडवली होती
एक दोन मूर्ख चॅनेल पत्रकारांनी हे गुपित फोडल्याने पंचाईत झाली होती. परंतु नंतर शासनाने सफाईने (हिंदीमध्ये ‘आनन फाननमें’ किंवा इंग्रजीत swiftly) सक्रीय होत त्याबद्दल अधिक माहिती जाहीर होऊ नये याची काळजी घेतली.
त्यामुळे त्या चिपसोबतच `चिप-पोर्टेशन'चे तंत्र काम करत असल्याची माहिती कुणाला समजली नाही. आज दहा वर्षांनंतर ते तंत्र कार्यरत झाले असल्याची बातमी आतल्या गोटातून मिळाली आहे.
या तंत्राच्या साहाय्याने ती नोट जिथे आहे तिथून पोर्ट करुन (तुम्ही ‘स्टार ट्रेक’ नामक मालिका पाहिली असेल. त्यात ‘व्हूउउउउउश:.... इथून गायब, तिकडे हजर’ प्रकाराने माणूस यानातून ग्रहावर किंवा ग्रहावरून यानामध्ये जात असे. त्यातील माणसांच्या जागी नोट कल्पून पाहा.) थेट रिजर्व्ह बँकेच्या सिक्रेट लॉकरमध्ये पाठवली जाते आहे. (काही दुष्ट लोक कुण्या अदानीच्या तिजोरीत जाते असे म्हणतात, पण तो अपप्रचार आहे.) सार्या काळ्या पैशाला असे गुप्तपणे थेट सरकारजमा केले जात आहे. त्यामुळे व्यवहारातून या नोटा गायब झाल्या आहेत.
आपल्या तिजोरीतून वा तांदुळाच्या डब्यातून या नोटा गायब होत असल्याने काळा-पैसा धारकांमध्ये घबराट पसरली आहे. काहींना हा भानामतीचा प्रकार वाटला. पण मग एका गुजराती वृत्तपत्राने खुलासा प्रसिद्ध केल्यावर काय घडते आहे ते सार्यांना समजले.
पण त्यांना बदलून घेण्यास फार उशीर झाला आहे. आता मोबाईल-पेमेंट क्रांतीनंतर (हा आणखी एक मास्टरस्ट्रोक) बाजारातही मोठी नोट कुणी हाती घेत नसल्याने खपवणेही मुश्किल झाले आहे. आणि आपसांत रोखीची देवाणघेवाण करणारे काळा पैसावाले आपल्या या– म्हणजे काळापैसाधारक – जातभाईकडूनही स्वीकारेनासे झाले आहेत. बरं हा सारा पैसा काळा असल्याने त्याबद्दल जाहीर बोलणे शक्य नसल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे.
देशातील सारा काळा पैसा अशा रीतीने बिनबोभाट देशाच्या (किंवा कुण्या अदानीच्या) तिजोरीत आणण्याचा हा मास्टरस्ट्रोक कमालीचा यशस्वी झाला आहे. आपल्या देशातील अनेकांना नेहमीप्रमाणे पोटदुखी झाल्याने याचे म्हणावे तेवढे श्रेय सरकारला दिले जात नाही. परंतु परदेशांत मात्र या भारतीय तंत्राबाबत भरपूर कुतूहल निर्माण झाले आहे. काही देशांत याचा उपयोग इतर गोष्टींसाठी केला जाऊ लागला आहे.
आता हेच पाहा ना. नासाने आता याच चिपचा वापर करुन टायर्स बनवायला सुरुवात केली आहे. सर्व टायर्स आता या चिप्ससह उत्पादित होतात. याचा फायदा असा की गाडी नो-पार्किंगमध्ये लावली तर तिला उचलून न्यायला Tow-truck पाठवायची गरज पडत नाही. फक्त एक बटन दाबून व्हूउउउश: करुन ‘इम्पाउंड लॉट’मध्ये आणून टाकता येते.
यातून तिथले पार्किंगचे नियम मोडणार्यांनी यावर तोडगा शोधला आहे, तो सोबतच्या चित्रात दाखवला आहे.
भारतीय काळा पैसावाले असाच काहीसा उपाय शोधून आपला पैसा वाचवतील का? असा प्रश्न ‘बोल मर्दा’ या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टलचे बातमीदार कम टाईपसेटर चिंटू चोरडिया यांनी विचारला आहे
- oOo -
छानच.....
उत्तर द्याहटवा