‘लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा अधिक’ तर होताच, पण ‘एकुण कामगिरीही तोडीस तोड होती’. त्यामुळे ‘विधानसभेच्या जागा वाटपामध्ये शिंदे वरचढ असतील’... आहेत... ‘शहांचा सल्ला त्यांनी धुडकावला’... वगैरे आम्ही वाचत आहोत...
दरम्यान लोकसत्तामधील आजचा लेख असे सांगतो की, भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे, कमळ चिन्हावर लढणारे १५२, अधिक शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांत निर्यात करुन एकुण १७ असे एकुण १६९ उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकुण १६४ जागा लढवल्या होत्या असे स्मरते.
काँग्रेसच्या पीछेहाटीच्या अनेक कारणांमध्ये एक कारण इतर पक्षांसोबत केलेल्या आघाड्या नि घेतलेली दुय्यम भूमिका आहे हे माझे ठाम मत आहे. ते यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करतो. दारूण पराभव झाला तरी चालेल, पण पुर्या शक्तिनिशी लढावे हाच बहुधा पक्षाच्या हिताचा मार्ग असतो.
हे पुरेपूर ओळखून, भाजप (त्यांच्याबाबतीत तर दारूण पराभवाची शक्यता नगण्य आहे.) “लोकसभेचा पराभव ‘कालचा होता’, आजही आम्हीच शिरजोर आहोत” हे ठणकावून सांगते आहे. उलट मविआमध्ये मोठा भाऊ असून एक हरियानाचा पराभव पाहून काँग्रेसने शेपूट घातले नि दहा ते पंधरा आमदार असलेल्या पक्षांना बरोबरीचे स्थान दिले आहे.
मागील वेळच्या निकालानुसार जागावाटप झाले असल्याने, दोन सेना नि दोन राष्ट्रवादी बहुतेक ठिकाणी परस्परांविरोधात लढत आहेत. यातून दोघांचाही शक्तिपात (मागील एकत्रित पक्षांच्या कामगिरीच्या तुलनेत) नक्की आहे. या धोक्यापासून भाजपने स्वत:ला सुरक्षित करुन घेताना बहुसंख्य जागा स्वत:कडेच घेतल्या आहेत. उलट काँग्रेसने शेपूट घालून मविआच्या पराभवाची मुहूर्तमेढ रोवून ठेवली आहे.
आणखी काही उदाहरणे हवी असतील, तर आप, मनसे, वंचित यांचीच घेता येतील. आपने स्वबळावर लढलेले गोवा, गुजरात नि हरयानामध्ये अंगाशी आले असले, तरी तेथील भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसची आणखी पीछेहाट करुन ठेवली आहे. भविष्यात तिची जागा बळकावण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. दिल्ली नि पंजाबमध्ये त्यांची ही स्ट्रॅटेजी चांगलीच यशस्वी ठरली (अर्थात याला स्थानिक गणिते नि त्या त्या वेळची परिस्थिती धरून इतर कारणेही असतात. रिस्क तिथूनच येते.)
मनसेने पहिल्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारून १३ आमदार निवडून आणले. तेव्हा त्यांचा स्वत:चा असा प्लॅटफॉर्म ब्लू-प्रिंटच्या रूपात उभा केला होता, मराठी अस्मितेची नेमकी भूमिकाही होती. परंतु पुढे मोदी उदयानंतर मोदींसाठी निवडणुका न लढवण्याचा निर्णय आत्मघाती ठरला नि बाकी सारे गुंडाळून ‘उद्धवसेनाविरोध’ हा एक-कलमी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केल्याने (आणि तो फडणवीस नि नंतर एकनाथ शिंदे अधिक प्रभावीपणे राबवू शकत असल्याने) स्वत:चे असे स्थान शिल्लक ठेवले नाही.
उशीरा का होईना उपरती होऊन यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिल्याने बदल घडू शकेल का असा प्रश्न उभा राहतो. एक गोष्ट अनुकूल आहे आणि ती म्हणजे सहा पक्षांच्या काटाकाटीच्या खेळात काही ठिकाणी तिसर्याच कुणाला लॉटरी लागू शकते (आठवा– चार पक्षांच्या साठमारीत १२५ मतांनी निवडून आलेला अरुण गवळी), यात मनसे असू शकत होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच ‘मनसेच्या पाठिंब्याने भाजपचे सरकार’ अशी घोषणा करुन राज ठाकरेंनी तिसरा पर्याय ही भूमिका स्वत:च मोडीत काढली आहे...
...आणि त्याचवेळी शिंदेसेनेविरोधात मतदान करु इच्छिणार्या भाजपच्या मतदारांना डोळाही मारला आहे! याचा परिणाम म्हणून भाजपच्या मतदारांनी शिंदेसेनेऐवजी मनसेचा आमदार दिला तर भाजपची ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ अशी स्थिती होणार आहे.
किंबहुना शिंदेसेनेच खच्चीकरण होऊन काही आमदार मनसेकडून आले, तर त्यांना फायदेशीरच आहे. सत्ता न गमावता शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करता येईल. मनसेने भाजपकडे दहा जागांवर पाठिंब्याची मागणी केली आहे. माहीमसह या दहाही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. ही शक्यता ओळखूनच कदाचित, शिंदेसेनेने माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधातील आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिलेला आहे. थोडक्यात भाजप आपल्या सहकारी पक्षांतच कलागत लावून दोघांची शक्ती वाढणार नाही याची खातरजमा करुन घेत आहे.
वंचितची कथाही मनसेप्रमाणेच आहे. त्यांनी पहिली निवडणूक स्वबळावर लढवली तेव्हा भरपूर मते मिळवली. त्यातून त्यांची ताकद सिद्ध केली. परंतु तिची किंमत वसूल करताना अवाच्या सवा मागण्या करुन हातची संधी गमावली. आणि नंतर युती वा आघाडी यांच्याबाबत उलटसुलट भूमिका घेत विश्वासार्हता गमावली. आता नवजात अशा लहान-सहान पक्षांची गोधडी शिवून त्यात ताकद मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.
या खेरीज अनेक स्थानिक पक्षांबाबतही पाहिले तर स्वबळावर लढणे ही ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ स्ट्रॅटेजी आहे. तृणमूल, बीजेडी, टीआरएस, बसपा, वायएसआर काँग्रेस वगैरे पक्षांनी ही यशस्वीपणे राबवून दाखवलेली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेकांनी काँग्रेसचीच राजकीय भूमी ताब्यात घेतलेली आहे.
भाजपचे चाणक्य हे पुरेपूर जाणून आहेत. त्यामुळे एकवेळ पराभव स्वीकारतील (तो ही काही महिन्यात विजयात रूपांतरित करता येईलच) पण लवचिकपणा दाखवून आपली भूमी शिंदेसेनेच्या ओटीत घालण्याचा काँग्रेसी गाढवपणा ते कधीच करणार नाहीत.
-oOo-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा