शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

नासा म्हणे आता

NasaSayNotUs
  • या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं 'नासा'च्या सूत्रांनी जाहीर केले आहे.
  • त्यातून जे वाचतील त्यांना नोव्हेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे!
  • नासाने मर्मेड्स अथवा मत्स्यस्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून नासाच्या आण्विक संशोधकांनी गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते.
  • नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे.
  • नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
  • संगणक आणि भाषा याबाबत संशोधन करणार्‍या नासा'च्या शास्त्रज्ञांना संस्कृत ही संगणकासाठी आदर्श भाषा आहे असे वाटते...

संस्कृत ही संगणकाला योग्य भाषा आहे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी विचारत आलो आहे की नक्की कशी ती सांग बाबा मला. बहुतेकांकडे यावर उत्तर नसते. मग सोपा उपाय म्हणून कुठल्या तरी देशी लेखकाचा दाखला दिला जातो ज्याने नासाचा दाखला दिलेला असतो. म्हणजे 'मी त्याच्याकडून ऐकले, पुरावे काय ते त्याच्याकडून घ्या' म्हणून झटकून टाकले जाते.

असले अठ्ठावीस इंची छाती फुगून छप्पन इंची झाल्याचा आभास निर्माण करणारे, सनसनाटी दावे व्हॉट्सअ‍ॅप, ईमेल किंवा सोशल मीडियावर शेअर करणारा त्याच मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून त्याची सत्यासत्यता तपासून बघण्याच्या फंदात पडत नाही. कारण हा दावा 'खरा असावा' अशी त्याची इच्छा असते. भाषा, व्याकरण, अंतर्गत वाहतूक, आहारशास्त्र, अंतराळविज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इ. पासून थेट जीवनशैली पर्यंत वाटेल त्या क्षेत्रातील दावे 'नासा'च्या हवाल्याने केला जातात. हे 'नासा' नावाचं प्रकरण नक्की कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करतं असा प्रश्न त्या दाव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांना कधी पडत नाही.

अशा दाव्यांना ताबडतोब आणि वेगाने प्रसिद्धी मिळण्याची बरीच कारणे असतात. एक म्हणजे असे दावे सुप्त स्वार्थी हेतूने, प्रॉपगंडा म्हणून हेतुत: प्रसारित केले जातात. त्यामुळे त्याच्या मागे एक मशीनरी काम करत असते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अशा सोयीच्या बातम्या वारंवार नि विविध प्रकारे प्रसारित करून गोबेल्सने हिटलरच्या नृशंस नि पाशवी महत्त्वाकांक्षांना राष्ट्रप्रेमाची देखणी आणि अभिमानास्पद भासावी अशी झालर प्रदान केली होती. त्याच्या आत्मघाती आणि जनताद्रोही पावलांना नव्या क्षितिजाकडे नेणारी द्रष्टी पावले समजली जावीत इतका बुद्धिभेद सहजपणे साध्य केला होता.

अनेकदा अशा दाव्यांमधे अर्धा भाग खरा असतो आणि अजेंड्याचा भाग हळूच चिकटवून खर्‍याबरोबर खोटे खपवण्याची चलाखी असते. भारत नि श्रीलंका यांना जोडणार्‍या खडकाच्या रांगा समुद्रातळी दिसतात हे उपग्रह छायाचित्रांच्या सहाय्याने नासाने शोधून काढले हे खरे. पण तो रामसेतू आहे हे नासाने सांगण्याचे कारणच नाही. पण सांगताना या दोन गोष्टी जोडून रामसेतूचा शोध नासाने लावल्याचा ग्रह करून दिला जातो, ज्यातून त्या निराधार दाव्याला उगाचच एक शास्त्रीय आधार असल्याचा आभास निर्माण करता येतो.

आणखी एक कारण म्हणजे माणसाला उपजत असलेली सनसनाटीपणाची चूष, जिभेवर सर्पदंश करून घेण्याचे व्यसन असावे तसे सतत हवाहवासा वाटणारा प्रलयघंटानाद किंवा विनाशाची हूल. असा प्रलयघंटानाद रुढीप्रधान देशात अधिक फायदेशीर ठरतो कारण कोणत्याही भीतीच्या आधारे प्रतिगामी लोक आपला निसटू पाहणारा आधार बळकट करत नेत असतात.

तिसरे कारण नव्या जगाचा सतत प्रवाही राहण्याचा अट्टाहास आणि धंदेवाईक गणिते! संगणकावरील व्हायरस नष्ट करण्यासाठी अँटि-व्हायरस प्रणाली विकसित करण्यात आल्या आणि मग त्यांनी जिवंत रहावे म्हणून अशा व्हायरसेसचा पुरवठा चालू ठेवणे अनिवार्य होऊन बसले.

तसेच संगणक माध्यमांना ईमेल, सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना रहदारीचा वेग राखावा लागतो, तरच त्यातून जाहिरातींचे भरपूर पीक काढता येते. अशी रहदारी राखण्यासाठी चटपटीत, चटकन देवाणघेवाण कराव्याशा वाटाव्यात अशा बातम्या सतत प्रसारित केल्या जात असतात. व्यवसाय नि फायदा म्हटले तर खर्‍याखोट्याची, नीतीकल्पनांची चाड बाळगायची नसते हे तर आता सर्वमान्यच झाले आहे.

भूतकाळाबाबत करण्याचे सोयीचे, चलाखीचे दावे करण्यासाठी जुन्या ग्रंथांचा, तथाकथित अभ्यासकांचा आधार घेणे हे नियमित वापरले जाणारे हत्यार आहे. 'अमुक ग्रंथात' सांगितले आहे असे म्हटले की ऐकणारा निश्चिंत होतो नि आणखी शंभर जणांपर्यंत हे पोचवून देतो. ही साखळी दूरवर पसरते नि पाहता पाहता खोट्याला खरे मानले जाऊ लागते. गंमत म्हणजे या सार्‍या साखळीतली एकही व्यक्ती तो अमुक ग्रंथ उघडून पाहण्याची, त्या दाव्याची खातरजमा करून पाहण्याची तसदी घेत नसतो. त्या ग्रंथाचे नावच लोकांना आश्वस्त करण्यास पुरेसे असते. ग्रंथ उघडून पाहण्याचे सोडा मुळात त्या नावाचा ग्रंथ अस्तित्वात आहे की नाही इतकी खातरजमा करण्याची तसदीदेखील घेतली जात नाही.

ग्रीसच्या आर्थिक संकटाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या एका मित्राने कुठल्याशा 'प्रक्षिप्तपुराणा'ने आपल्याकडे या संकटाचे भाकित केल्याचा दावा केला. अतिशय आक्रमक भाषेत आपल्याकडचे इतके ज्ञान तुम्ही नाकारूच कसे शकता असे प्रतिपादन करणारी पोस्ट लिहिली. त्यासाठी त्याने एका संस्कृत पंडित मित्राकडून संस्कृत श्लोक लिहून घेतला, ज्यातून जर्मनीची राणी मेर्केल ही ऐतिहासिक देशाला संकटात लोटील असा अर्थ ध्वनित होत होता.

कायम राष्ट्रप्रेमाच्या ज्वरात जगत असलेल्या अनेकांनी तो दावा सोशल मीडियांतून, व्हॉट्सअ‍ॅपवरून दणादण शेअर केला होता. 'प्रक्षिप्त' नावाचे पुराण अस्तित्वात आहे का याची खात्री करून घेण्याची तसदीही त्यांनी घेतली नव्हती. किंबहुना त्या नावावरूनच हा दावा खोटा असल्याशी शंका खरंतर संस्कृतच्या नावे भंडारा उधळणार्‍यांना यायला हवी होती. यांचे राष्ट्रप्रेम वगैरे किती अडाणीपणाचे असते हे सहज उघड झाले.

नव्या पिढीला अधिक विश्वासार्ह वाटावे म्हणून आता 'नासा'ला वेठीला धरण्यात आले आहे. जसे पुराणग्रंथांची, धार्मिक वा राजकीय नेत्याची साक्ष काढावी तसे 'नासा'ची साक्ष काढली जाते. उद्देश हा की याला तुम्ही आव्हान देऊ नये, ते प्रमाण मानावे. माणसे अधिक खोटारडी झाली आहेत की केवळ माध्यमविस्फोटांमुळे त्यांचे ते खोटारडेपण आपल्यापर्यंत पोचू लागले आहे कोण जाणे. किंवा मुळातच अशा अस्मितेच्या आणि गूढ धोक्यांच्या कथांची, रूढ जगाच्या नियमाबाहेरच्या घटनांची चूष एखाद्या व्यसनाची चटक लागावी आणि त्याची वारंवारता वाढत जावी तसे होते आहे.

ऑस्कर वाईल्ड म्हणाला होता 'एखादा दावा विश्वासार्ह आहे की नाही हे ठरवताना ब्रिटिश माणूस तो दावा करणारा कितपत विश्वासार्ह आहे हे पाहतो.' सांगणार्‍यावर आपला विश्वास असेल तर तो सांगेल तर सत्य मानून चालतो. मग तो सांगणारा आपण स्वीकारलेल्या वा अनायासे मिळालेल्या जात, धर्म, वंश वा देश यांचा स्वयंघोषित ठेकेदार असो, आपल्या राजकीय पक्षाचा अथवा सांस्कृतिक, सामाजिक संघटनेचा नेता असो. त्याने सांगितले की ते खरे आहे असे समजून माणसे मरण्या-मारण्यास सिद्ध होतात. 'आपण कमअस्सल आहोत, योग्य काय अयोग्य काय हे आपले आपण जाणून घेण्याची कुवत आपल्यात नाही हे त्यांच्या मनात पुरेसे ठसवले गेलेले असते.' म्हणूनच एखादे पुस्तक उघडून पाहणे, इंटरनेटसारख्या माध्यमातून शोध घेणे अगदी सहज शक्य असूनही ते करण्याची तसदी माणसे घेत नाहीत.

काही काळापूर्वी एक बोलके छायाचित्र पाहिले होते. एका मोकळ्या जागेत घोडा उभा आहे आणि त्याची साखळी एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधलेली आहे. वास्तविक तो घोडा त्याच्याहून कैकपट हलक्या असलेल्या त्या खुर्चीसकट तिथून निघून जाऊ शकतो, पण जात नाही. कारण गुलामी ही साखळीत नसते तर ती मनात असते. गुलामगिरीविरोधी कार्यकर्ती हॅरिएट टबमन म्हणाली होती 'मी हजारो लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले आहे... आणखी हजारोंना करू शकले असते, पण ते गुलाम आहेत हे त्यांना ठाऊकच नव्हते.'

-oOo-


संबंधित लेखन

३ टिप्पण्या: