आमचा सातवी पास असलेला गण्या हुशार आहे. माझ्या तर्कातल्या चुका तो अचूक काढतो आणि मला जमिनीवर आणत असतो. आता हेच पहा ना, परवा कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात म्हणे 'सनातन'च्या कुण्या कार्यकर्त्याला अटक झाली. आपला होरा बरोबर ठरला म्हणून पुरोगामी म्हणवणारे माझ्यासारखे खुश झाले. "बघ आम्ही म्हणालो तेच बरोबर ठरले की नाही." गण्याकडून आमची नेहेमीची, बदनामीपुरती खाण्याची पानपट्टी घेता घेता मी त्याला ऐकवले. फडक्याला हात पुसता पुसता गण्या क्षणभर थबकला, मग माझ्याकडे ढुंकूनही न पाहता समोर ठेवलेले पान उचलून त्याला चुना फासू लागला.
चुना, कात वगैरे लावून झाल्यावर आवश्यक ती पंचद्रव्ये त्यात टाकून त्याने ते पान 'शीलबंद' केले आणि आधीच लावून ठेवलेल्या सुमारे तीसेक पानांच्या ओळीत जोडून दिले. पुन्हा एकदा फडक्याला हात पुसता पुसता तो म्हणाला, "तुम्ही पुरोगामी लोक बावळट आहात असं मी म्हणतो ते अजिबात चूक नाही."
गण्या जेमतेम सातवी पास असला आणि माझ्याहून दहा वर्षांनी लहान असला तरी तो मला... मलाच का त्याच्या दुप्पट वयाच्या अनेकांनाही बावळट म्हणण्याचा हक्क राखून आहे.
"म्हणून म्हणत असतो, साल्याहो आधी राजकारण शिका."
मी राजकारणात नसल्याने हा टोला मला नसल्याने मी सुटल्याचा निश्वास टाकला.
"हे राजकारणी तुम्हाला बोल बोल म्हणता घुमवतात. अरे तो समीर गायकवाड हा रेड हेरिंग आहे."
गण्या हा आमच्यासारखाच जन्मजात पुणेकर असल्याने 'हे तुला कसे ठाऊक?' हे विचारण्याचा गाढवपणा मी मुळीच करणार नव्हतो. आणि हे 'रेड हेरिंग' वगैरे तुला काय ठाऊक विचारणे म्हणजे पुढच्या माहितीपूर्ण संवादाला मुकणे नक्की असल्याने मी मुकाट त्याचे पुढचे प्रवचन ऐकू लागलो.
"अरे हे राजकारणी बेटे बेरकी..." गण्या हाती सापडलेल्या बकर्याला आता एकदम ठार न करता हलाल करण्याच्या उत्साहाने माहिती सांगू लागला. "तुम्ही लेको बोंबलत होतात ना सनातनच्या नावे, आणि 'वर्ष झाले, दोन वर्षे झाली, अजून कसे खुनी सापडत नाहीत?' म्हणून, मग घ्या तुम्ही म्हणत होतात तस्सा सनातन वाला पकडला पहा. आता गप पडा. तपास होईल, खटला उभा राहिल, यथावकाश पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल. दरम्यान 'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' म्हणत सरकार हात झटकून टाकेल. तो निर्दोष सुटेल तेव्हा सनातनवाले आणि तुम्ही ज्यांना 'भक्त' म्हणता ते कासोटा सुटेपर्यंत नाचतील, तुम्ही कसे हिंदूद्वेष्टे आहात हा त्या घटनेशी संबंध नसलेला आपला निष्कर्ष पुन्हा एकवार बोंबलून सांगतील..." बोलता-बोलताच त्याने लावलेली सारी पानांची चळत करुन एका कागदात बांधली.
ती पुडी रॅकवर ठेवून फडक्याने हात पुसता-पुसता तो पुढे बोलत होता, "...आणि तुम्ही? त्या दरम्यानच्या काळात घडलेल्या अशाच एखाद्या घटनांचा निषेध करण्यात आपली आधीच क्षीण झालेली शक्ती खर्चण्यात व्यग्र असाल. प्रत्येक पुरोगामी पार्टीचा, विद्यार्थी संघटनेचा तेव्हाही आपापला वेगळा मोर्चा असेल. कदाचित तोवर आणखी चार दोन नवे पक्ष वा संघटना उभ्या राहिलेल्या असतील. प्रत्येक मोर्चात दहा ते पंधरा माणसे असतील, प्रत्येक मोर्चा कुठूनतरी सुरू होऊन एस. एम. जोशी फाउंडेशनपाशी किंवा साने गुरुजी स्मारकापाशी विसर्जित होईल."
एक छोटी गोल्डफ्लेक घेण्यासाठी आलेल्या गिर्हाईकाला सिगरेट आणि सुटे पैसे देऊन तो पुन्हा माझ्याकडे वळला.
"मग एखाद्या पत्रकाराच्या हातापाया पडून त्याची बातमी कुठल्याशा पेपरमधे छापून आणून तुमचे नेते कृतकृत्य होत 'त्या पार्टी'च्या मोर्चात पंधराच लोक होते, आमच्याकडे दोन जास्त आले याबद्दल आपली पाठ थोपटून घेतील. आणि गल्लीबोळातले, तुमच्या त्या फेसबुकवरचे तुझ्यासारखे तज्ज्ञ कधीकाळी कुठल्याशा पुरोगामी वर्तुळात उठबस होती एवढ्या बळावर सगळ्या जगाला अक्कल शिकवणार्या नोट्स लिहीत बसतील. "
"साल्याहो, जोवर तुमची संघटना भक्कम नाही, फॉलोअप घेण्याइतकी चिकाटी आणि नेटवर्क उत्तम नाही तोवर तुम्ही प्रत्येक घटनेनंतर टेंबलायचे कर्मकांड पार पाडण्यापलिकडे काही दिवे लावू शकत नाही. आम्ही पानपट्ट्या विकतो पण आमचीही शहरात एकच संघटना आहे. आम्ही सुमारे पंचवीस ते तीस हजार लोक आहोत, मराठी माणसांपासून यूपीच्या भैयापर्यंत सगळीकडून लोक आले आहेत आमच्याकडे. आमच्यांत मतभेद नसतील का? पण अजूनही आमची एकच संघटना आहे. तुम्ही लेको श्राद्धाच्या पिंडासारखे पक्ष नि संघटना काढून आपापल्या विझत्या चुली फुंकत बसलेले आहात..."
गण्या पोटतिडकीने बोलत होता, म्हणूनच मला त्यांला थांबवावेसे वाटले नाही. आणि तो बोलत होत्या त्या तसंही आक्षेप घ्यावा असं काही नव्हतंच. आश्चर्य हे की पानाच्या ठेल्यावर बसून गण्या हे जे सहज पाहू शकतो हे अनेक वर्षे पुरोगामित्वाची दुकानं चालवणार्यांना कसं ध्यानात येत नाही? की येतं पण शहाणपणापेक्षा अहंकार अधिक मोठा वाटतो? आपल्या विहित कार्याची सीमा ओलांडून जाऊन भलत्या ठिकाणी तोंड उघडण्याचा किंवा न झेपणारी लढाई लढण्याचा अगोचरपणा ते का करतात?
जोवर या प्रश्नांची उत्तरे ते शोधून काढत नाहीत तोवर एखादा समीर गायकवाड समोर करून त्यांचे तोंड गप्प करण्याचा सोपा उपाय सत्ताधारी वापरत राहतीलच; आणि 'संघटनेवर बंदी घाला' हा जुनाट, कालबाह्य आणि सर्वस्वी अपरिणामकारक उपाय करावा अशी जुनाट मागणी, जुनाट नेत्यांनी करण्यापलिकडे काही घडेल असे वाटत नाही.
"अशा संघटनांच्या चिकाटीने होणार्या प्रसाराला जशास तसे उत्तर देण्याची कुवत तुम्ही विकसित करत नाही तोवर तुमच्या चार शिव्यांनी किंवा हातभर लेखांनी त्यांना काही फरक पडणार नाही. अर्थात 'आपण काहीतरी करतो' इतके समाधान स्वतःला देण्यापुरते नि तो 'स्टँप' आपल्या चिकटवहीत लावण्याइतकेच श्रेय तुम्हाला पुरेसे आहे असे असेल तर जे चालू आहे ते उत्तमच आहे. पण मग लेको 'बदल घडत नाही, हे सारे तुमच्यासारख्यांनी चुकीचे नेते निवडल्यामुळे म्हणून.' असे त्याचे खापर फोडायला माझ्याकडे येऊ नकोस."
एक पानपट्टी खाताखाता इतके शहाणपण आले हा बोनसच म्हणायचा. त्या तंद्रीत सुटे पैसे परत घ्यायचे विसरून मी घरी परतलो. माझी खात्री आहे, माझ्या पाठीमागे गण्या गालातल्या गालात हसत असणार.
-oOo-
संबंधित लेखन : गण्या आणि मी - १ : गण्याचे गणित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा