’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

गण्या आणि मी

मी आणि गण्या एकाच हापिसात काम करतो. मी शाळेत गणितात हुशार नि गण्या त्या विषयात ढ. पण इतिहासाने आणि समाजशास्त्राने मला दगा दिला आणि त्याने नेमक्या त्या विषयात भरपूर मार्क्स काढले नि तो पुढे गेला आणि आता तो हेडक्लार्क आहे आणि मी त्याच ऑफिसला पिऊन आहे. तसं म्हटलं तर आमचं हे दोघांचंच ऑफिस. हे दहा बाय दहाचं ऑफिस आणि बाहेरच्या भिंतीवर पाच बाय पाच आमच्या ऑफिसच्या नावाची पाटी. आमचं हेडऑफिस अमेरिकेला आहे. आमचा बडा साहेबही तिकडेच बसतो. तो तिथून आमच्या दोघांवर नियंत्रण ठेवून आहे. मागच्या वर्षी गण्याला महिन्याला ८३ हजार रुपये होता आणि मला चौदा हजार. यावर्षी बड्या साहेबांनी मला तेहेतीसशे रुपयाची पगारवाढ दिली आणि गण्याला तेरा हजार रुपयांची. आता गण्याचा पगार शहाण्णव हजार झाला आहे तर माझा साडेसतरा हजार.

मला साधारण चोवीस टक्के पगारवाढ मिळाली आणि गण्याला सुमारे सोळा टक्के! दरवर्षी पगारवाढीमधे मला अधिक टक्केवारी मिळते म्हणून गण्या माझ्यावर खार खाऊन आहे. तो म्हणतो तुला जास्त पगारवाढ दिल्याने एक दिवस तू पिऊन असूनसुद्धा माझ्यापेक्षा जास्त पगार घेशील.

गण्याशी बोलण्यात अर्थ नसतो हे ठाऊक आहे, पण एकतर ऑफिसमधे दोघेच असल्याने कधीतरी तोंड उघडतो मी आणि दुसरे म्हणजे माझं गणिताचं ज्ञान पाजळून त्याला खिजवायची संधी मला सोडायची नसते. थोडे गणित करून मी त्याला सांगितले की आज तुमच्या माझ्या पगारात जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजाराचा फरक आहे. आजच्या टक्केवारीच्या (१६%) हिशोबाने पाहिले तर पाच वर्षांनी तुमचा पगार असेल एक लाख पंचाहत्तर हजार रुपये आणि माझा (२४% वाढीने) एक्केचाळीस हजार रुपये. म्हणजे तेव्हा आपल्या पगारात फरक असेल तो 'एक लाख चौतीस हजार रुपयांचा'! दहा वर्षांनी हा फरक असेल दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा! आजच्या पगारवाढीच्या हिशोबाने पुढची एकवीस वर्षे तुमचा पगार नि माझ्या पगारातला फरक वाढतच जाणार आहे. माझा पगार तुमच्यापेक्षा जास्त होण्यासाठी "सत्तावीस वर्षे" लागतील! आणि हे सुद्धा माझा पगार वाढत गेल्यावरही साहेब वाढीची टक्केवारी कमी करणार नाही हे गृहित धरून आणि माझ्यावरच्या असूयेपोटी तुम्ही काड्या करून नोकरीवरून काढून टाकले नाहीत तर. शिवाय आजच्या आपल्या वयाचा हिशोब ध्यानात घेतला तर तोवर आपण "निवृत्त" झालेले असू.

एका पिऊनने आपल्याला गणित शिकवावे हे गण्याला अजिबात आवडलेले नाही. 'तुझ्यासारखा भिकारडा पिऊन आता मला गणित शिकवणार?' असे म्हणून त्याने माझ्या एक कानाखाली वाजवली आणि म्हणाला "माझ्या नागपूरच्या सीएने मला सांगितले आहे की 'लवकरच तुझा पगार माझ्यापेक्षा जास्त होणार आहे.' त्या सीएपेक्षा तुझ्यासारख्या दहावी पासला जास्त अक्कल आहे, आं?'" दोन थपडा खाऊन मी निमूट आपल्या जागी जाऊन बसलो.

त्या नागपूरच्या सीएकडे माझ्यासारख्या दहावी पास माणसाला अप्रेंटिस म्हणून घेतात का हे विचारायला हवे.

#‎वाढ #‎वाढीचा_दर #‎गणितातले_ढ_लोक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा