रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

'ऑल दॅट आय वॉन्ना डू' : आभासी स्वातंत्र्याचा प्रवास

'Mother died today, or may be yesterday; I can't be sure' कामूच्या 'द स्ट्रेंजर'च्या सुरुवातीचे हे मर्सोऽचे हे वाक्य म्हणजे साहित्यातील एका नव्या प्रवाहाची नांदी मानलं जातं. अस्तित्ववादी विचारधारेचा प्रभाव असलेल्या साहित्याचा प्रवाह तिथून बळकट होत गेला. वरवर पाहत अब्सर्ड, अर्थहीन जगातील माणसाच्या जगण्यातील तुटलेपणाचा, दिशाहीनतेचा मर्सोऽ प्रतिनिधी दिसतो. जगण्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा आधार गमावतानाही त्याबाबत बेफिकीर, खरंतर संवेदनाशून्य कंटाळा असलेल्या, कोणत्याही बंधनातून दूर राहू पाहणार्‍या, गुंतण्याचे टाळणार्‍या व्यक्तींचा प्रतिनिधी बनून राहिला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर कामूच्या या नायकाची प्रतीरूपे प्रत्यक्ष जगण्यात दिसू लागली आणि साहित्यिकांनीही त्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली.

AllIWannaDo

'माझा बाप मेला, आणि मी गावात हत्तीवरून साखर वाटून आलो.' असे म्हणत आपल्या गोष्टीची सुरुवात करणारा संजीव खांडेकर यांच्या 'ऑल दॅट आय वॉन्ना डू' या कवितेमधील कुबडा या मर्सोऽची आठवण करून देतो. मातेचा मृत्यू असो, मरीबरोबर केलेला सेक्स असो की रेमंडच्या गर्लफ्रेंडला त्याच्यासाठी लिहिलेले पत्र असो, मर्सोऽ हा एकतर साक्षीदार आहे किंवा अंमलबजावणी करणारा; निर्णय घेणारे वेगळेच आहेत. त्या निर्णयांच्या योग्यायोग्यतेबद्दलही त्याने फारसा विचार केलेला नाही की घडल्या घटनेबद्दल. एक प्रकारची निरिच्छ तटस्थता त्याला व्यापून राहिली आहे. याउलट खांडेकरांचा कुबडा हा स्वतःला काय मिळवायचे आहे याचा निश्चित निर्णय घेतलेला, त्या साध्याला आवश्यक साधने काय याचा वेध घेणारा आणि त्याच्या आड येणार्‍या कुटुंबासह सार्‍या तथाकथित जवळच्या गोष्टी निर्ममपणे नाकारणारा, निष्ठुरपणे स्वतःच त्यांचा ध्वंस करणारा.

या कुबड्याला मि. इंडिया व्हायचे आहे! आणि हे साध्य करण्यासाठी त्याला बुद्धाच्या मार्गावर जायचे आहे. हे साध्य नि साधन परस्परविसंगत नसले तरी त्यांत कोणती संगतीही नाही. पण आजचे जगच असे की अशा परस्पर विसंगत भासणार्‍या आकांक्षा ठेवणे हे तितकेसे हास्यास्पद राहिलेले नाही. इतकेच नव्हे तर कदाचित नव्या संदर्भात त्यांत काही संगती उगवूनही येते आहे. या कुबड्याच्या पाठीवरचे कुबड आहे ते परंपरांचे, पूर्वग्रहांचे, कर्मकांडाचे जोखड. ते कुबड हा त्याचा नकोसा झालेला वारसा आहे. कारण त्याला नाहीसे होत जाणार्‍या जगाचे संदर्भ आहेत. कुबड्याला हे जोखड उतरवून फेकायचे आहे, नव्या जगाच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचे आहे. त्यासाठी त्याला बुद्धाचा मार्ग मदत करणार आहे. बुद्धमार्गाच्या आधारे एकदा का हे विरूप कुबड नाहीसे झाले की मग शारीर सौंदर्याच्या आधारे मिळवले जाणारे ते बिरुद मिळवणे त्याला शक्य होणार आहे.

जागतिकीकरण, वेगाने वाढलेली उत्पादकता, मिळवण्याजोगे बरेच काही समोर ठेवणार्‍या जगाला सामोरे जाणारा कुबडा भूतकाळ, परंपरांचे कुबड उतरवून टाकून पुढे पुढे धावत जाण्याची अगदी लालसेच्या, हव्यासाच्या पातळीवरची उमेद बाळगणारा. नवी परिस्थिती अशी की 'पङ्गु लङ्घयते गिरीम्' ही उक्ती केवळ ध्वन्यर्थाच्या पातळीवर न राहता एखाद्या कुबड्यालाही मिस्टर इंडिया होण्यास उद्युक्त करणारी. त्यातच त्याचे हित आहे असे पटवत वास्तवात आपलेच हित साधून घेणारी जमात आज अप्रत्यक्ष सत्ताधारी होऊन बसली आहे. बुद्धापर्यंत पोचायचे तर सीमेपार जायला हवे इतके कुबड्याला ठाऊक आहे. पण तिकडे जाण्याचा मार्ग त्याला ठाऊक नाही. पण वर्षानुवर्षे उपस्थित असलेले बडवे, पंडे आता 'बडी' म्हणून जवळीक साधत हा मार्ग दाखवण्याचे आश्वासन देत आहेत आणि तुझा मार्ग कोणता हे तुझ्या खिशात किती पैसे आहेत यावर ठरेल असे बिनदिक्कतपणे सांगत आहेत. पण धार्मिक क्षेत्रात ईश्वराचे ठेकेदार म्हणून उभे राहिलेल्या पंड्या-बडव्यांविरोधात झालेली जागृती अजून या नव्या वारसदारांबाबत झालेली दिसून येत नाही.

जुन्या जगातील लोकांच्या मानसिकतेवर गारुड करणार्‍या धर्मसंस्थांचा इतिहास पाहिला तर प्रेषितांशी द्रोह करणारेच नंतर पश्चात्तापाचा दावा करत त्यांच्या नावे दुकाने उघडून बसले होते. प्रेषिताचा अनुग्रह झाल्याचा दावा करत त्याचा वारस म्हणून मिरवत होते. आपल्या अलौकिक अशा 'मार्केटिंग' तंत्राच्या आधारे प्रेषिताचे शब्द जगाच्या कानाकोपर्‍यात पसरवत होते. त्यातून पदरी पडणारे लाभ उठवत होते. या कुबड्याच्या बुद्धमार्गावरही कधीकाळी थेट लोकांची हत्या करुन त्यांची बोटे माळ करून गळ्यात मिरवणारे 'अंगुलीमाल' बुद्धाचा अनुग्रह झाल्याचा दावा करत बस्तान बसवून आहेत. एकवेळची भूक भागवत मरत्या माणसाला जेमतेम जिवंत ठेवणार्‍या वडापाव पासून सेलेब्रिटी अंत्यसंस्कारांपर्यंत सर्व काही आता 'अंगुलीमाल' ब्रँड आहे. सार्‍या जगण्याचेच आता ब्रँडिंग झाले आहे.

केवळ मार्ग दाखवूनच ते थांबत नाहीत, त्या मार्गावरचा प्रत्येक थांबा हा त्यांनी आपल्या मालकीचा करून घेतला आहे. जगातील शासनांच्या ध्येयधोरणांवर, हाडामासांच्या माणसांच्या जगण्यातील निर्णयांवर ही नवी सत्ताधारी जमात अधिराज्य गाजवते आहे. त्यांनी काय खावे, काय परिधान करावे हे तीच ठरवून लागली आहेत, इतकेच नव्हे तर त्यांनी कोणती स्वप्ने पहावीत, त्यांची पूर्तता कोणत्या मार्गाने करावी यावरही तिचे संपूर्ण नियंत्रण आहे. एक प्रकारे हा एक विशाल असा खेळ ती खेळते आहे नि यातील माणसे जणू यातील केवळ अँड्रॉईड्स किंवा रोबॉट्स बनून राहिली आहेत. आणि असे असूनही त्यांना निर्णयस्वातंत्र्य असल्याचा आभास निर्माण करण्यात सत्ताधारी जमात यशस्वी होते आहे.

सारे जग जणू धावते ट्रेडमिल झाले आहे. या ट्रेडमिलवरच हे अंगुलीमाल धावण्याच्या शर्यती आयोजित करताहेत. केवळ एकालाच अंडे फलित करण्याची संधी मिळेल हे ठाऊक असूनही आकांताने धावणार्‍या शुक्रजंतूंप्रमाणे सारे ऊर फुटेपर्यंत धावत आहेत, पण अंडे फलित करण्याचा हक्क पुन्हा अंगुलीमालच मिळवत आहेत. अंगुलीमालांच्या कृपेने कुबड्याचे कुबड तर गळते, परंतु त्या यशाचे नवे कुबड उलट दिशेने पोटावर उगवून येते आहे. थोडक्यात एका समस्येचे निराकरण करणारे अंगुलीमाल तुमच्यावरच्या ओझ्यांची जागा फक्त बदलत आहेत. आणि पुन्हा त्या नव्या ओझ्यावरचे उपायही तेच तुम्हाला देत आहेत. जुन्या विरूपतेला मागे सारून नवी विरूपता तिची जागा घेते आहे.

'ऑल दॅट आय वॉन्ना डू' चा पुण्याच्या एका तरुण मुलांच्या ग्रुपने त्याचा रंगमंचीय आविष्कार सादर केला. 'हल्लीचे तरूण साहित्यादी कलांपासून दूर जाताहेत, त्याची त्यांना कदर नाही' हा जुन्या जाणीवा घेऊन जगणार्‍या समीक्षकांचा तक्रारीचा सूर मोडून काढत तरुण मंडळींनी या प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कदाचित हे म्हणत असतील की आमच्या जगण्याशी रिलेट होणारे, आम्हाला सामावून घेणारे काही समोर येते तेव्हा तिथे आमची दाद असतेच. पण आमच्या जगण्याचा भाग नसलेल्या इतिहासातील काही घटना वा जाणीवांच्या आवृत्त्या आम्हाला रुचत नाहीत, त्यात आम्हाला रस नाही. कदाचित समीक्षकांनाच आता नव्या चौकटी मांडण्याची गरज निर्माण झाली असेल.

भावकवितांचे नृत्याविष्कार अनेकदा पाहिले पण अशा वैचारिक बैठक असलेल्या एखाद्या कवितेचे असे माध्यमांतर हा दुर्मिळ प्रयोग असावा. कवितेतील मिथक नेमके पकडून त्याचा सादरीकरणाशी मेळ घालण्याचे कौशल्य अविनाश सपकाळ या तरुणाने उत्तम पेललेले दिसले. मूळ कवितेमधे दिसणारा कुबड्याचा 'प्रवास', त्यातले टप्पे हे संहितेमधे आणताना त्याला एखाद्या कम्प्यूटर गेमच्या 'स्टेजेस'मधे रूपांतर करून त्याचे प्रवाहीपण राखण्यात त्यांची टीम बव्हंशी यशस्वी झाली. संहिता आणि सादरीकरणाचा नवा बाजही कवितेच्या मूळ विषयाला पूरक ठरणारा. कवितेच्या पहिल्याच वाक्यात असलेला 'मी साखर वाटून आलो' या उद्घोषणेतला निष्ठुर नि ठाम निश्चय मात्र त्यांच्या हातून निसटलेला दिसतो. कुबड्याचे कुबड नेमक्या कोणत्या टप्प्यावर गळून पडले हे ही ठसठशीतपणे समोर आणण्यात दिग्दर्शक फारसा यशस्वी झालेला दिसला नाही. परंतु या प्रयोगात सर्वात उल्लेखनीय गोष्ट होती ती मूळ कवितेच्या कथनाला जोडलेला उपसंहार. कवितेचे सारे मर्म एकाहुन अधिक पात्रांच्या तोंडून उलगडत त्यातून एका गोंधळाचा, संभ्रमाचा आभास निर्माण करण्यात प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असे म्हणावे लागेल.

- oOo -

(पूर्वप्रसिद्धी: हा लेख दैनिक ’दिव्य मराठी’च्या ’रसिक पुरवणी’मध्ये ’आभासी स्वातंत्र्याचा आवेगी प्रवास (आभासाचा प्रयोग)’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला.)


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. पाठीवरचे कुबड पोटावर आले... ही महत्त्वाची नोंद या लेखात वाचायला मिळाली. कवितासंग्रह वाचला नाही पण, अभिजित रणदिवे यांनी केलेला लॅत्रोजे, काम्यूच्या कादंबरीचा अनुवाद वाचला. लेख आवडला.

    उत्तर द्याहटवा