(हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही.)
सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात 'पुरोगामी दहशतवाद' असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि 'स्वतःला पुरोगामी म्हणवणारी' मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे.
परंतु असे असले तरी मोरेंबद्दल माझा आक्षेप आहे, तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्या विधानाबद्दल आहे आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे. एरवी यांच्या विद्वत्तेबद्दल मला आदर आहेच. आजच्या काळात इतक्या साक्षेपी नि काटेकोरपणे अभ्यास करणारे फारच थोडे लोक उरलेले दिसतात. तेव्हा त्यांच्या विधानाबद्दल गल्लीबोळात आवाज उठवताना याचे भान राखायला हवे (अर्थात केंद्रात बसलेल्यांच्या भक्तांप्रमाणे 'त्यांना सांगा की' म्हणायचे असेल तर सोडून देऊ.)
मी ९१-९२च्या आसपास प्रथम सावरकरांवरची त्यांची दोन पुस्तके वाचली होती. त्यातील चिकाटी, तर्काचा काटेकोरपणा, विस्तृत विवेचन यामुळे मी प्रभावित झालो होतो. याच पुस्तकांमुळे तथाकथित पुरोगामी मंडळींनी त्यांना सावरकरवादी ठरवून टाकले होते. सावरकर हे हिंदुत्ववादी आणि म्हणून सावरकरवादीही हिंदुत्ववादी या न्यायाने त्यांना अडगळीत टाकले होते.
त्यानंतर त्यांनी आंबेडकरांवर लिहिलेल्या पुस्तकावरून तर यावर शिक्कामोर्तबच झाले. यावरून तर शाहू-फुले-आंबेडकर यांना 'प्रातःस्मरणीय' करून ठेवलेल्या पुरोगाम्यांनी मोरेंचे नावच टाकले. नंतर त्यांनी 'शासनपुरस्कृत मनुवादी: पांडुरंगशास्त्री आठवले' हे आठवलेंचे मूर्तीभंजन करणारे पहिले पुस्तक लिहिल्यानंतरही त्यांना माफ करण्यात आले नाही, 'चार आदर्श खलिफा' (याचे उपशीर्षक बहुधा 'इस्लामचा सुवर्णकाळ' असे होते) हे एका अर्थी हिंदुत्ववाद्यांना डिवचणारे पुस्तक लिहिले तरीही पुरोगामी त्यांच्यावर रुसलेलेच राहिले.
'अखंड भारत का नाकारला' मधील त्यांची मांडणीही हिंदुत्ववादी गटांना अडचणीची वाटावी अशीच आहे. १८५७च्या उठाव हा 'जिहाद' होता अशी मांडणी केली, तेव्हा कदाचित ती हिंदुत्ववाद्यांच्या थोडी सोयीची झाली असावी. (बहुधा रावसाहेब कसबेंनी किंवा सदानंद मोरेंनी याचा प्रतिवाद करणारा लेख लिहिला होता, सध्या मला याचा संदर्भ आठवत नाही.) त्यांचे विचारकलह, अप्रिय पण (हे अगदीच स्तंभलेखनाच्या पातळीवरचे होते, बहुधा 'सामना'मधे लिहिलेले लेख) हे दोन वाचलेले नाहीत.
जितके आकलन मला झाले त्यानुसार हा लेखक उजव्या मंडळींत मुळीच न शोभणारा आहे. एकदा त्यांची सुरुवात सावरकरांपासून झाली आणि आंबेडकरांवरील तशाच स्वरूपाच्या लेखनात त्यांनी बहुधा आंबेडकरांच्या काही मर्यादांचा उल्लेख केल्यामुळे पुरोगाम्यांनी त्यांना पलिकडे ढकलून दिले.
मुळात सावरकर असोत,मोरे यांच्यासारखे लेखक असोत की तुमच्या आमच्यासारखे सध्याचे नागरिक पुरोगाम्यांची पंचाईत ही आहे की त्यांना एखादा माणूस 'आपला' तेव्हाच वाटतो तेव्हा तो १००% आपला असतो. हिंदुत्ववादी असून 'काही' पुरोगामी विचार मांडणारे सावरकर किंवा सावरकरवादी असूनही मुस्लिमांच्या खलिफांवर लिहिणार्या मोरेंची आपल्या सोयीची बाजू तेवढी घेऊन न पटणारी सोडून देण्याचा नीरक्षीरविवेक पुरोगामी 'म्हणवणार्यांत' उरलेला नाही. हे काहीसे हिंदूंच्या समुद्रपर्यटनबंदीसारखे किंवा ब्रेड खाल्याने किरिस्तांव झालास म्हणून आपणच आपल्या माणसाला दूर लोटण्यासारखे आहे.
वास्तविक सावरकरांची 'हिंदुपतपातशाही', 'सहा सोनेरी पाने' ही पुस्तके मला मुळीच न पटणारी आहेत पण 'गाय माता असेल तर बैलाची' म्हणणारी त्यांची विज्ञाननिष्ठता, त्यांचे जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, भाषाशास्त्रीय निबंध इ. गोष्टी पुरोगामी लेखकालाही अवाक् करणार्या आहेत. पण एका हिंदुत्ववादाने सारं नाकारलं गेलं.
इथे सावरकरांवरचा हिंदुत्ववादी असल्याचा आरोप मी मुळीच नाकारत नाही, त्यांनी माफीनामा देऊन सुटका करून घेतली किंवा गांधीहत्येत त्यांचा सहभाग होता हा दावाही मी क्षणभर खरा मानायला तयार आहे (एरवी तो खरा की खोटा हे मला ठाऊक नाही.) त्यांनी मुस्लिम विरोधासाठी कोणत्याही हत्याराचे केलेले समर्थन घृणास्पद म्हणावे असेच आहे. पण त्या कारणासाठी सावरकरांमधला विज्ञानवादी, साहित्यिक, अभ्यासक नाकारायची माझी तयारी नाही. एखादा खुनीदेखील उत्तम गात असेल तर त्याचा तो गुण नाकारायचे कारण नाही, त्यामुळे तो त्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केला जातो आहे असा कांगावा करायची गरज नाही.
याच चालीवर मोरेंकडेही पुरोगामी वस्तुनिष्ठपणे पाहत नाही हा माझा आक्षेप आहे. तुमच्या मते त्यांचे जे दोष आहेत ते आहेतच, पण पुरोगामी पोरासोरांनी त्यांची लायकी काढत गांधीची लायकी काढणार्या अर्ध्या चड्डीवाल्यांच्या रांगेत येऊन बसावे हे चूक आहे. हा सूड आहे किंवा आपणही आपल्या विरोधकांचेच उलटे प्रतिबिंब आहोत याची जाणीव नसणे आहे. हे संघासारख्या मिलिटरी ऑर्गनायजेशनच्या नावे शपथा खाणार्यांकडून अपेक्षितच आहे. त्यांच्याकडून वस्तुनिष्ठतेची अपेक्षाच नाही, पुरोगामी म्हणवणार्यांकडून ती आहे!
मागे एका पुरोगामी म्हणवणार्या तरुण मित्राशी बोलताना कुरुंदकरांच्या विचारव्यूहाचा उल्लेख केला होता. 'हॅ: त्यांनी हिंदुत्ववांद्यांना सोयीची इस्लामविरोधी मांडणी केली होती. पळशीकरांनी कसला धुतला होता त्यांना.' असे तटकन उत्तर आले. त्यावेळी आमच्या बोलण्याचा मुद्दा इस्लामशी मुळीच संबंधित नव्हता. तरीही कुरुंदकरांचे मत लक्षात घेण्याची त्याची तयारी नव्हती.
ही जी 'संपूर्ण नकारा'ची पद्धत पुरोगामी म्हणवणार्यांनी स्वीकारली आहे ती सर्वस्वी अ-पुरोगामी आहे आहे माझे मत आहे. एखाद्याने एखादे गैरसोयीचे, न पटणारे मत मांडले की त्याला मुळापासून छाटून टाकण्याची ही अघोरी पद्धतच पुरोगाम्यांचा प्रभाव कमी करत नेण्यास कारणीभूत ठरली आहे. जसजसे एखादे विसंवादी मत येते, तसतसे पुरोगाम्यांची 'श्रद्धास्थाने' कमी कमी होत जातात. अखेर विचारांचे अधिष्ठान असलेले पुरोगामित्व संपून जाते नि जातीय, धार्मिक अस्मितांचे झेंडे घेऊन उभे असलेल्यांप्रमाणेच पुरोगामी म्हणवणारे देखील केवळ झेलकरी होऊन राहतात.
पुरोगामी मंडळींनी उलट सावरकर, मोरे यांचे हिंदुत्ववाद्यांना गैरसोयीचे ठरणारे लेखन वारंवार उद्धृत करत त्यांना खिंडीत गाठायला हवे, तिथे हे त्या लेखनाकडे पाठ फिरवून बसले आहेत. इतके रामबाण हत्यार आपण स्वतःहून हिंदुत्ववाद्यांच्या भात्यात टाकून निष्प्रभ केले आहे याची समज आपल्याला यायला हवी. एक रावसाहेब कसबे वगळले तर अभ्यासपूर्ण प्रतिवादही आज फारसे कुणी करताना दिसत नाही. त्या कसबेंनाही एकाच गैरसोयीच्या मुद्द्यावर आम्ही शिव्यांची लाखोली वाहिली आहे.
याउलट अशा लोकांना पुरोगाम्यांनी दूर ढकलणे संघाच्या पथ्यावरच पडते आहे, ते आनंदाने अशा लोकांना मांडीवर घेऊन साखर भरवत आहेत. आजच्या काळात आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे फारच अवघड झाले आहे. 'ते सगळं सोडा, आधी तुम्ही कुठल्या बाजूचे ते सांगा.' असा दम दिला जातो. थोडक्यात सावरकरप्रेम आणि आंबेडकरांवरील तथाकथित टीका या कारणासाठी पुरोगाम्यांनी दूर ढकललेले मोरे हिंदुत्ववाद्यांच्या बाजूला झुकणे ही पुरोगाम्यांनीच निर्माण केलेली अपरिहार्यता आहे. आणि मोरे हे पहिले नाहीत की शेवटचे, नाकारण्याची प्रक्रिया अखंड चालू असते आणि पुरोगाम्यांचा प्रभाव कमी होण्याचीही.
याच्या नेमके उलट मी संघावर टीका करतो हे ठाऊक असूनही अनेक जाहीर नि छुपे संघवादी माझ्याशी वरचेवर चर्चा करू बघतात. पडते घेऊन बोलत माझा ईगो कुरवाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधीतरी मला 'उपरती' होईल नि मी त्या बाजूला येईन असा त्यांना दृढविश्वास असतो. उलट पाहिले तर पुरोगाम्यांचे आणि पुरोगामी म्हणवणार्यांचे गट 'माझे पुरोगामित्व तुझ्यापेक्षा अधिक अस्सल आहे.' या मुद्द्यांवर भांडणे करताना दिसतात, तुकडे पाडून परस्परांचा द्वेष करतात.
फेसबुकसारख्या समाज(?)-माध्यमातून माझ्याशी मैत्री झालेल्या एका गटाचे किमान चार तुकडे मला आज दिसताहेत. हा तर केवळ छोटा आठ दहा माणसांचा गट आहे, पुरोगाम्यांचा राजकीय चेहरा असलेले समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आज कुठल्या परिस्थितीत आहेत हे जगजाहीर आहे.
टीका सहन करतही वैयक्तिक मानापमानापेक्षा 'संघटन' महत्त्वाचे मानणारा संघ आणि 'मीच मोठा पुरोगामी' म्हणत माझे महत्त्व राहील इतका आपला गट लहान करत नेणारे पुरोगामी या दोन दृष्टीकोनातला फरक पाहिला तर संघाचा प्रभाव का वाढता राहतो नि पुरोगामी कायम निर्बळ का राहतात हे लक्षात येईल. आणि याचमुळे आज दोन्ही बाजूंकडे पाहणारे सर्वसामान्य लोक संघाचा प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाकडे नाईलाजाने का झुकले हे ही समजून येईल.
इतकं होऊनही आक्रमकतेने शिवीगाळ वा टिंगलटवाळी करण्यापुरते आपले पुरोगामित्व टिकून राहणार असेल तर राहो बापडे. पण विचारहीनता वाढली की हुकूमशहांना सोयीची भूमी तयार होते, माद्यांसाठी लढताना 'बाहेरील' धोक्यांकडे दुर्लक्ष झालेल्या काळवीटांच्या नरांची शिकार अधिक सोपी होत असते, हे ध्यानात ठेवायला हवे.
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा