रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

प्रस्थान ऊर्फ Exit : दोन भाषणांचे नाटक

मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये उजव्या विचारांचे बोल्सेनारो यांचा पराभव होऊन डाव्या विचारांचे नेते लुला डि’सिल्वा यांची भावी अध्यक्ष म्हणून निवड झाली. याउलट गेली दोन दशके अस्थिर राजकीय परिस्थिती अनुभवणार्‍या इस्रायलमध्ये पाच वर्षांत चौथ्यांदा निवडणूक होऊन उजव्या विचारांचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू निसटत्या बहुमताने निवडून येत पुन्हा एकवार पंतप्रधान होऊ घातले आहेत.

लोकशाही राष्ट्रांमध्ये सत्तेचा लंबक असा इकडून तिकडे फिरणे ही नित्याची बाब आहे. समाजातील मूठभर व्यक्ती विशिष्ट वैचारिक भूमिकेशी बांधील असतात. अमका नेता वा पक्ष हा अमुक विचारसरणीचा आहे म्हणून त्याला निवडून देणारे बहुसंख्य लोक त्या वैचारिक भूमिकेबद्दल अज्ञानीच असताना दिसतात. याशिवाय मोठ्या संख्येने नागरिक अथवा मतदार हे प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करत असतात. त्यांनी केलेल्या निवडीमागे वैचारिक भूमिकेपेक्षा ’सद्यस्थितीत राजकीय सत्ता राबवण्यास सक्षम कोण?’ याचे त्यांनी शोधलेले उत्तरच तेवढे असते. राजकीय चित्र बदलण्यास प्रामुख्याने ही मंडळी कारणीभूत असतात.

परंतु राजकीय सत्तेचा विचार बाजूला ठेवून केवळ वैचारिक भूमिकेशी बांधील असणार्‍यांकडे पाहिले, तर बदलत्या राजकीय परिस्थितीतही आपली वैचारिक बांधिलकी टिकवून धरण्यामागे त्या-त्या वैचारिक भूमिकेचा अथवा विचारप्रवाहाचा अभ्यास कारणीभूत असतो, की एक चूष म्हणून त्यांनी तो झेंडा खांद्यावर घेतलेला असतो?

समाजातील असंख्य समस्यांना भांडवलदार वा भांडवलशाही जबाबदार आहे म्हणणार कम्युनिस्ट चोख सुखवस्तू आयुष्य जगतो, तेव्हा तो इतरांना केलेला वर्गविहीन (de-class) होण्याचा उपदेश सोयीस्कररित्या विसरून जात असतो. मार्क्सने एका संदर्भात दोषी ठरवलेल्या मध्यमवर्गीयांवर सर्व सामाजिक समस्यांचे खापर फोडणारा स्वयंघोषित पुरोगामी स्वत: चोख मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतो. आणि हे करत असताना ’त्याची व्याख्या आर्थिक नव्हे तर प्रवृत्तीप्रधान आहे’ अशी - धार्मिकाची ’खरा धार्मिक नि खोटा धार्मिक” वर्गवारी असते तशी - पळवाट काढून ठेवतो.

अखंड हिंदुस्तानचे बिल्ले मिरवणार्‍या हिंदुत्ववाद्याची त्याच्या व्याख्येतील सारा भूभाग भारतात सामील केला, तर ते हिंदूराष्ट्र तर सोडाच हिंदूबहुलही राहात नाही, हे समजून घेण्याची तयारी नसते. किंवा देवबाप्पाच्या कृपेने काहीतरी होऊन मुस्लिम आपोआप नाहीसे होतील, असा भाबडा समज त्याच्या नेणिवेत असतो. निश्चित वैचारिक भूमिका स्वीकारल्याचे जाहीर करणारे बहुतेक वेळा केवळ उक्ती-कृतीच नव्हे तर वैचारिक पातळीवरच्याही अंतर्विरोधाचा सामना करतात. स्वत:च्या आयुष्यातील अंतर्विरोधाकडे न पाहता दांभिकपणे डोळे मिटून घेतात आणि विरोधकाच्या कुसळाचे मुसळ करुन त्याचा गवगवा करत बसतात.

हे वैचारिक मतभेद एका हाताच्या अंतरावरुन बघताना सुखवस्तूपणे पाहता येतात. एकमेकांना दांभिक म्हणून उडवून टाकता येते. परंतु एकाच घरात जेव्हा दोन परस्परविरोधी भूमिकांचा वावर असतो, तेव्हा संघर्ष अपरिहार्य असतो. विशेषत: हे दोन विचार पती-पत्नींनी स्वीकारले असतील तर समस्या अधिकच जटील व्हायला हवी.

परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजात असं म्हटलं जातं की ’आस्तिकाच्या पत्नीला श्रद्धेची सक्ती असते तर नास्तिकाच्या पत्नीला अश्रद्धतेची’. तिचे वेगळे मत असूच शकत नाही असा पुरुषांचा समज असतो. आंतरजातीय विवाहांनंतरही जातिव्यवस्था कणभरही दुबळी होत नाही याचेही हेच कारण आहे. कुटुंबाच्या आपल्या व्याख्येत अजूनही नवर्‍याचे कुटुंब समाविष्ट असल्याने ती नवर्‍याच्या घरच्या चालीरीती नि परंपरांचा स्वीकार करते नि माहेरच्या परंपरांचा अनायासे त्याग करते. अप्रत्यक्षत्यरित्या पत्नीची जात बदलण्यापलिकडे त्यातून काहीच बदल घडत नसतो.

परंतु नागरी आयुष्यामध्ये विकेंद्री कुटुंबात जिथे पती-पत्नी नि त्यांची मुले एवढेच घर प्रामुख्याने असते तिथे मात्र पती नि पत्नी परस्परविरोधी वैचारिक भूमिका स्वीकारल्याचा दावा करत असतील तर मात्र संघर्ष अटळ असतो. त्याची तीव्रता किती नि व्याप्ती किती हे त्यांच्या परस्पर नात्याची वीण किती घट्ट आहे त्यावर तर अवलंबून असतेच पण त्याचबरोबर त्यांची वैचारिक निष्ठा कितपत भरीव आहे, कितपत पोकळ आहे यावरही अवलंबून असते.

Prasthaan

अशाच एका पती-पत्नींच्या आयुष्यावर आधारित ’प्रस्थान ऊर्फ Exit' हे मकरंद साठे लिखित नाटक नुकतेच पाहण्यात आले. साठेंसारखा नाटककार म्हटल्यावर बर्‍याच अपेक्षा होत्या. परंतु नाटक पाहिल्यावर पुरा भ्रमनिरास झाला असे म्हटले तर फार अतिशयोक्ती होणार नाही.

अगदी स्पष्ट सांगायचं तर हे नाटकच नव्हे असे माझे मत आहे. पण आशयाशी विसंगत अशा नवनवीन घाटांशी (forms) खेळणे हे अर्वाचीन नाटकाचे - आणि कथा, कादंबरीसारख्या कथनात्म साहित्याचे सुद्धा- वैशिष्ट्य होत चालल्यामुळे साठे नि त्यांच्यासारखे लोक मला ’मग काय तुम्हाला सारखा ड्रामाच हवा असतो.’ म्हणून जुनाट ठरवून झाडून टाकतील हे मला ठाऊक आहे. पण माझे - निदान माझ्या मते- नेमके आक्षेप आहेत.

विचारांचे, जगण्याचे दोन प्रवाह स्वीकारलेले, दीर्घकाळ सोबत असणार्‍या दोघांचे एकमेकांच्या दृष्टिकोनाबाबत, दांभिकतेबाबतचे मतप्रदर्शन हे मी समजू शकतो. पण त्या दोघांचा छेद जाऊन नाट्य उभेच राहिले नाही. ("ह्यॅ: काळे, तुम्ही जुनाट मानसिकतेचे. याला नरेटिव ड्रामा म्हणतात..” बरं.) इथे सरळ दोन दीर्घ monologs होते. दोघांना दमसास टिकवण्यास सोय म्हणून ते प्रत्येकी दोन भागात विभागले होते. आणि एकसुरीपणा टाळण्यासाठी मृत्युदूत हा तिसरा गडी अधेमध्ये आणला होता इतकेच. हे दोघे एक प्रकारे त्याच्यासमोर आपल्या जोडीदाराची कैफियत मांडत आहेत अशा तर्‍हेने दोघे बोलत असल्याने त्यांच्या भाषणाला स्वगत म्हणता येत नाही इतकेच. पण या पलीकडे या तिसर्‍याला भूमिकाच नाही.

बरे monologs ही एकसुरी होते. समजा आपण म्हणू की आमच्यासारख्या जुनाट ड्रामा वा मेलोड्रामावाल्यांना अपेक्षित नाट्य नाही त्यात. तो उद्देशच नाही त्यांचा. चला हरकत नाही. पण ते monologsही केवळ एकाने दुसर्‍याचे केलेले वरवरचे मूल्यमापन इतकेच राहिले. विशिष्ट घटना, प्रसंग यांच्या साहाय्याने - भले narrative मध्ये का असेना- दोघांच्या भूमिकेतील विरोधाभास, वैय्यक्तिक पातळीवरील उक्ती-कृतीमधील अंतर्विरोध हे ठळक करता आले असते, तेही केलेले नाही. एकाच्या दृष्टिकोनातून दुसरा इतकेच त्याचे स्वरूप राहिले.

त्यात पुन्हा मूल्यमापन करणार्‍याच्या पूर्वग्रहांची छाया कुठे दिसली नाही. म्हणजे असं पाहा, की एखाद्याची अंतर्विरोध नसलेली, वस्तुनिष्ठ भूमिका दुसर्‍याच्या विचारांशी सुसंगत नसल्याने त्याला आवडत नाही. त्यातून त्याच्या/तिच्या दृष्टीने मूल्यमापनातही निर्दोष ठरूनही तो त्याचे उघड मूल्यमापन वा मतप्रदर्शन अट्टाहासाने नकारात्मक ठेवतो, असेही बरेचदा घडत असते. नवरा-बायको असोत की मित्र असोत, परस्परांच्या काही भूमिकांबद्दल मतभेद असून आदर - किंवा दुर्लक्ष करणे- असते, तसेच काही बाबतीत असा दुराग्रहाचा नकारही त्यात असतो. तो इथे दिसला नाही, निदान मला आठवत नाही.

डावा विचार नि उजवा विचार याबाबत साठेंनी समोरून केलेले काहीसे तटस्थ मूल्यमापन दोन पात्रांच्या तोंडी घालून त्यांना रंगमंचावर उभे करण्यापलीकडे यात काही नव्हते असे मला प्रामाणिकपणे वाटते. केवळ ते पती-पत्नी आहेत म्हणून सेक्सचा उल्लेख तर हास्यास्पदरित्या वरवरचा होता. डाव्या विचारात विवाह-संस्था ही देखील एक व्यवस्थाच असल्याने शोषक मानली आहे. तर उजव्या विचारात तिला पावित्र्याची (sacrosanct) झूल चढवलेली आहे. पन्नास वर्षे संसार झाल्यावरी त्यासंदर्भात त्या दोघांचा निदान शाब्दिक संघर्ष होऊ नये हे पटण्याजोगे नाही. त्यासंदर्भात सेक्सचा विचार मांडला असता तर त्याला काही पाया मिळाला असता.

पती-पत्नी हे दोघेही परस्परविरोधी (?) विचारांचे झेंडे घेऊन उभे असले तरी ते केवळ झेंडेच आहेत. त्यांत विचारांची फार खोल रुजवणूक नाही. शाब्दिक भपका किंवा भाषणबाजी यातून ते चटकन प्रभावित होतात इतके ते उथळ दिसतात. दोघांनी एकमेकांच्या संदर्भात केलेल्या मूल्यमापनात हे सरधोपट दृष्टिकोन बर्‍यापैकी उतरले आहेत. एकुणात चूष म्हणून एक विचार स्वीकारल्याची द्वाही फिरवायची इतकेच बहुसंख्य मंडळी करत असतात. साठेंना हाच दृष्टिकोन मांडायचा होता असा माझा समज झाला आणि तो चांगला जमला आहे असे मत झाले.

नाटकात उल्लेख आल्याप्रमाणॆ साठच्या दशकात कम्युनिझम वा डावा विचार ही बुद्धिमंतांची चूष होती. सध्या राष्ट्रवाद (म्हणजे रे काय भाऊ?) आणि/किंवा हिंदुत्ववाद ही चूष आहे. एकुणात माणसांच्या मनातील न्यूनगंड त्याला कुठल्या ना कुठल्या कळपाशी बांधून घेण्यास भाग पाडतात. बहुतेक वेळा त्या त्या काळात चलनी नाणे असलेल्या विचाराच्या गटाशी संलग्न होणे अधिक सुरक्षित असते असा त्यांचा होरा असतो. म्हणून समाजात विचारांचे संक्रमण होत नाही, वारे एकदम फिरतात नि झेंड्यांचे रंग वेगाने बदलतात. बंगालमध्ये पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या कम्युनिस्टांची दोनच निवडणुकांत पुरी धूळदाण होते ती त्यामुळे. वारे बदलते आहे म्हणून माणसे गट बदलू लागतात आणि माणसे गट बदलू लागतात म्हणून वार्‍यांचा वेग वाढतो असे चक्र आहे ते.

पती हा पुरुष असल्याने बाहुबलाच्या बाता मारणारे त्याला अधिक भावतात हे समजण्याजोगे आहे. त्यामुळे त्याला हिटलरच्या तथाकथित राष्ट्रवाद त्याला पसंत आहे. खरे तर तो केवळ विस्तारवादच होता. आजही मोदींचा राष्ट्रवाद हा महासत्तेची पिपाणी वाजवतो. कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांच्याकडे वा त्यांच्या मातृसंस्थेकडे नाही. त्यांचा मुद्दा ’विकासा’चा आहे. तो सर्वसमावेशक असेल का याची फिकीर ते करत नाहीत. तिथे सरळ समाजवादी दृष्टिकोन स्वीकारुन शेतकर्‍याला २००० रू. दान करतात. दुसरीकडे उद्योगपतींना मोकाट सोडतात. यातून राष्ट्राचं ’आपोआप’ भलं होईल असा त्यांचा होरा असतो. मातृसंस्थेने तर हिंदूराष्ट्र झाले की सगळे आलबेल होईल हा हास्यास्पद दृष्टिकोन स्वीकारला आहे. राष्ट्रवादाच्या आपल्या ठेकेदारांची ही स्थिती आहे. या वरवरच्या उथळ राष्ट्रवादाचे प्रतिबिंब नवर्‍याच्या विचारात उतरले आहे हे वास्तवदर्शी आहे.

पुरोगामी वर्तुळात जो अंतर्विरोध आहे तोही साठेंनी अचूक नोंदला आहे. माणूस एकाच वेळी गांधी, नेहरु, आंबेडकर यांना पूज्य मानू शकतो हे खरे. पण तो एकाच वेळी गांधीवादी नि आंबेडकरवादी असू शकतो हे पटण्याजोगे नाही. गांधींच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतील अनेक त्रुटी आंबेडकरवादामध्ये अधोरेखित केल्या जातात. दुसरीकडे आंबेडकरवादी - स्वत: आंबेडकर नव्हेत- विद्रोहाच्या अति-प्रेमात आहेत. ते व्यवस्थेचा विचार करत नाही, निर्मितीविचार त्यात अनुपस्थित आहे. त्यांचे सारे बळ, सार्‍या समस्यांचे मूळ ब्राह्मणी व्यवस्थेत शोधण्यात खर्च होते. ’मग तुम्हाला अभिप्रेत व्यवस्था कुठली?’ या प्रश्नाला ’संविधानावर आधारित’ असे गुळमुळीत उत्तर येते. कम्युनिस्टांना अभिप्रेत व्यवस्थेचा आदर्शवादच तिला अस्थिर करणारा आहे, हा आक्षेप ते झाडून टाकतात तसेच हे ही.

वास्तविक संविधान हे व्यवस्था म्हणून विचार करते, समाज म्हणून नाही. ते शेजार्‍याशी तुम्ही कसे वागावे हे सांगत नाही. तुम्ही अस्पृश्यता पाळलीत तर त्या गुन्ह्याला काय शिक्षा आहे हे ते सांगेल. पण अस्पृश्यता का वाईट, त्यातून सामाजिक एकसंघतेला कसे नुकसान पोहोचते वगैरे प्रबोधनात्मक प्रवचन ते देत नसते. हा जनजागृतीचा भाग असतो आणि तो अलिखित सामाजिक प्रवृत्तींबाबत असतो. संविधान नियमांपलिकडच्या सामाजिक व्यवस्थेबद्दल सांगणारच नसते. असो. हा मुद्दा फारच मोठा आहे. पण गोळाबेरीज ही की माणूस एकाच वेळी इतक्या इझमचा अनुयायी असू शकत नाही. नीरक्षीरविवेकाने यातील काही, त्यातील काही तो स्वीकारू शकतो.

’मी अमुकवादी आहे’ म्हणणार्‍यांपासून मी स्वत: कायम चार हात दूर राहणे पसंत करतो. कारण अशा व्यक्ती बुद्धिबंद (मंद नव्हे!) असतात असा माझा अनुभव आहे. त्यांच्याशी संवाद होऊ शकत नाही.

दुसरीकडे तथाकथित राष्ट्रवाद्यांमध्ये बाहुबलाचे असणारे निर्बुद्ध आकर्षण आणि डाव्यांचे क्रियाशून्य शब्दसुखी असणे हे परस्परविरोधी दृष्टिकोन मला नेहमीच अस्वस्थ करतात. पण नाटकाची प्रकृती पाहता त्यांचे अधांतरी असणे आणि तरीही ठोस विधानांमधून व्यक्त होणे या पलीकडे काहीच दिसत नाही. त्यांच्या परिणामांची कारणमीमांसा तर दिसत नाहीतच, पण परिणामांचे उल्लेखसुद्धा नाहीत.

म्हणून मी वर म्हटले तसे हे केवळ साठेंनी दोन बाजूंचे - खरेतर त्या बाजू स्वीकारल्याचा दावा करणार्‍यांचे - केलेले मूल्यमापन आहे इतकेच. सुरुवातीपासून त्यांनी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी निवडलेले माध्यम नाटक हे आहे, म्हणून त्यांनी त्याचे नाटक केले इतकेच. पण मुळात त्या विषयामध्ये, दृष्टिकोनामध्ये नाटकाची प्रकृतीच नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

विचारांनी कदाचित दुसर्‍या बाजूला असलेल्या अभिराम भडकमकर या नाटककाराचे ’ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक मला इथे आठवते. नास्तिकता-आस्तिकतेचा उहापोह करत असतात त्यांनी वास्तविक प्रसंगांशी, कथनाशी त्या मुद्द्याची सांगड घातली होती. त्यामुळे त्यात नाटक होते. अर्थात दुसरी बाजू म्हणजे ते साठेंच्या डाव्या-उजव्या विचारांच्या मूल्यमापनाइतके खोल उतरू शकले नव्हते. मुळात नाटकासारख्या सादरीकरण माध्यमात एखाद्या विश्लेषणात्मक अथवा भाष्य करणार्‍या लेखामध्ये असते तेवढी खोली अपेक्षित ठेवता येत नाही हे ही तितकेच खरे.

तंत्राच्या बाजूमध्ये स्क्रीन प्रोजेक्शन ही सध्याची चूष नाटककारांमध्ये दिसते. ती पुन्हा तंत्राशी खेळणे या उद्दिष्टापलीकडे तसे अस्थानीच असते असे माझे मत आहे. बहुतेक वेळा त्यावर अगम्य अशा काही विचित्र-चित्रांची मालिका दाखवली जात असते. ज़ौकचे शिष्य ग़ालिबच्या शायरीबाबत ’या तो ये जाने या ख़ुदा जाने’ म्हणत तसे हे प्रोजेक्शनही अनेकदा ’या तो बनानेवाला जाने या ख़ुदा जाने’ टाईपचेच असते. गेल्या दशकात पोस्ट-मॉडर्निझम ही एक चूष उफाळून आली होती त्या काळात बस्तान बसवलेला हा प्रकार आहे.

त्याचा सुसंगत उपयोग मी आळेकरांच्या ’एक दिवस मठाकडे’मध्ये पाहिला होता. (त्याचे दिग्दर्शन बहुधा निपुण धर्माधिकारीने केले होते.) त्यात स्क्रीन प्रोजेक्शमधून त्या मठाचे वास्तव-कल्पिताच्या सीमारेषेवर असणे, त्याकडे जाणार्‍या वाटेची चढण. आदी बाबींमधून एक आभास निर्माण केला होता. जो संवादातून उभ्या राहणार्‍या शब्दचित्राला एक दृश्य रूप देत होता. त्यानंतर ओम भूतकरच्या ’मी ग़ालिब’मध्ये शेर आणि त्यांचे अर्थ दाखवण्यासाठी वापरले गेले. भाषिक फरकामुळे ते उपयुक्त ठरले. पण असे अपवाद. त्यानंतर ही चूष बरीच पसरली. (याचे मूळ बहुधा क्युब्रिकच्या ’२००१ ओडिसी’ या गाजलेल्या चित्रपटात असावे.)

मृत्युदूताचे प्रयोजनच मुळी वर म्हटले तसे एकसुरीपणा कमी करण्यासाठी, ज्याला तात्पुरते वळण (detour) म्हणतात तसे असल्याने त्याचे स्क्रीन-प्रोजेक्शन नि पुढचे अ‍ॅप वगैरे उल्लेख फारसे कामाचे नाहीतच. तसेही शेवटच्या काही सेकंदाच्या एका प्रसंगासाठी त्या अभिनेत्याला रंगमंचावर आणलेच होते. म्हणजे प्रत्येक प्रयोगाला तो हजर असणारच आहे. मग इतर संवादही त्याला प्रत्यक्ष रंगमंचावर आणून घेता आले असते. तो प्राणहरण करण्यास येतो नि त्याला मोबाईलवर फोन येऊन काहीतरी चूक झाल्याचा संदेश मिळतो तो ऐकून परत जातो किंवा तो फोन घेण्यास बाहेर जातो असेही दाखवता आले असते. स्क्रीन प्रोजेक्शनचे खूळ विनाकारण घातले आहे. संगणकावरील प्रोग्रामच्या चार ओळी सरकताना दाखवता आल्या इतका त्याचा माफक उपयोग झाला आहे.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा. शेवटी उजव्या विचारांचा पाईक असल्याचा दावा करणार्‍या पतीला मृत्युदूत घेऊन जातो. (यात अप्रत्यक्षपणे मोदीराज्याचा अंत सूचित करण्याचा प्रयत्न आहे असा माझा समज झाला. पण तो सोडून देऊ.). दोघांच्याही भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या कोणत्याही त्रयस्थ मूल्यमापनाखेरीज केलेला निवाडा म्हणून तो पक्षपाती तर वाटलाच, पण केवळ निरास हवा या अट्टाहासातून आणल्यासारखा वाटला.

विशेष म्हणजे नाटकाच्या शीर्षकाशी या उपर्‍या प्रसंगाचाच संबंध जुळतो. एरवी ते शीर्षकही तसे अधांतरीच म्हणावे लागेल. दोघांना भूमिका मांडण्यासाठी प्रासंगिक कारण म्हणून ’नक्की कुणाची वेळ भरली आहे?’ हा प्रश्न उपस्थित करुन दोघांनी एकमेकांविरोधात साक्ष दिल्यासारखी केलेली भाषणे एवढेच नाटकाचे स्वरूप राहिले आहे. एखाद्या कोर्टरूम ड्रामाचा हा घाट दिसतो. परंतु वास्तव घटनांशी त्याची फारशी सांगड बसत नसल्याने त्याचे स्वरूप परस्पर-मूल्यमापनाच्या स्वरूपाचे चार दीर्घ monologs एवढेच शिल्लक राहते.

- oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. खूप विस्तृत, विश्लेषण. या प्रकारचे आणि इतके सखोल विश्लेषक लेखन, एका नाटकाचे झालेले आठवत नाही. अलीकडे तर नाहीच. त्यात प्रायोगिक (असे म्हणायचे) नाट्यविश्लेषणाची इथे वानवा आहे. कोडकौतुकाची प्रथा आहे. त्यामुळे असे लिखाण व्हायला हवे, वाचले जावे. रुजायला हवे, यातच प्रायोगिकतेचे भले आहे, असे वाटते.

    उत्तर द्याहटवा
  2. नावावरुन काही बोध होईना‌ मग म्हटलं लेखात होईल, तो पण दोनवेळा लेख सावकाशीने वाचला तेव्हा लेखातील लंबक‌ कुठे कुठे सरकला ते समजले. साठेंनीही सरसकट डावे-उजवे केलेले दिसते पण नाटक पाहिल्याशिवाय आपले स्वतःचे मत मांडणे चुकीचे आहे. साठेंनी स्वतः एवढा विचार केला असेल का तेही जाणवत रहाते. पण तुमचे कौतुक तुम्ही असे विश्लेषण समोर आणल्याबद्दल. भले ते तुमचे विचार असोत, विचार करायला लावतात हेच महत्त्वाचे...

    उत्तर द्याहटवा