प्रथम दाढी वाढवावी. (दाढीऐवजी शेंडी चालेल का असा जातीयवादी प्रश्न विचारु नये.)
आकाशात शून्यात बघून किंवा थेट जमिनीकडे पाहात तिरपे चालत जाण्याचा सराव करावा.
फाटकी, विटकी जीन्स (किंवा अनेक खिशांची बर्म्युडा चालेल) वर चे गवेरा/ग्वेवेरा/ग्वेव्हाराचा अनेक वेळा धुवून विटका झालेला टी-शर्ट वापरायला सुरुवात करावी. ( त्याऐवजी वेडेवाकडे, अगम्य असे रंगांचे फटकारे असलेले चित्र ’गोंदवून’ घेतलेलाही चालेल.)
कोणतेही एखादे स्वस्त अथवा फुकट असे पेंटिंगचे कंप्युटर अॅप्लिकेशन घेऊन त्यात रोज वाट्टॆल तसे फराटे मारुन बरबटलेले चित्र बनवून फेसबुकादि समाजमाध्यमांवर ’रोज एक तरी चित्र पोस्टावे’ या न्यायाने टाकून द्यावे.
सोबत एक अगम्य क्याप्शन द्यावा. एक फासा टाकून रॅंड्मली एक माध्यम निवडून हे त्या माध्यमातले आहे असे ठोकून द्यावे. एखादा खरा - किंवा बरा - चित्रकार हे चूक आहे म्हणू लागला तर त्याची कमेंट डिलीट करुन त्या पोस्टपुरते त्याला कमेंट करण्यास बंदी करावी. (कस्टम पर्याय वापरा.)
त्या सोबत एखाद्या कवीच्या ओळी लिहिण्याचा गाढवपणा अजिबात करु नये! तुम्ही नव नव्हे तर जून-चित्रकार किंवा हौशी-फोटोग्राफर असल्याचा शिक्का बसेल नि तुम्ही नवचित्रकारांच्या टोळीतून कायमचे बाद व्हाल. (देहांत प्रायश्चित्ताइतका भयानक गुन्हा आहे असे समजून चाला.)
असे काही महिने गेले की आपल्या चित्रांचे प्रदर्शन असल्याची जाहिरात सुरु करावी.
एक गल्लीबोळातली १० बाय १० ची ’आर्ट गॅलरी’ म्हणवणारी खोली चार दिवस भाड्याने घ्यावी.
त्यात भिंतींवर, जमिनीवर तसंच छतावर विविध आकाराचे स्वच्छ धुतलेले कॅन्व्हास टांगून ठेवावेत. (त्याऐवजी घरच्या बाद कपड्यांना फ्रेमवर ताणून बसवले तरी चालेल.) शक्यतो त्रिकोणी, गोल, चौरस, आयत असे भौमितिक आकार टाळावेत. ’असे का?’ असा प्रश्न विचारलाच तर ’आमची कला वास्तवातील सार्या मिती भेदून जाते’ असा दावा करावा.
प्रत्येक कॅनवासवर वेगवेगळ्या तीव्रतेचा प्रकाश टाकणारे दिवे बसवून द्यावेत (अर्थातच ते चालू करावेत) रंगीबेरंगी दिवे वापरुन आपली अब्रू आपणच चवाठ्यावर मांडू नये. फक्त मंद पिवळ्या रंगाचे दिवेच वापरावेत. त्यांच्या प्रखरतेची रेंज शक्य तितकी कमी ठेवावी, कॅनव्हास जेमतेम दिसतील इतकी.
उद्घाटनाला कोणत्याही प्रसिद्ध कलाकाराला बोलावू नये. आपण किती ’डाउन टु अर्थ’ आहोत हे दाखवण्याची मखलाशी करत एखाद्या लहान मुलाच्या हस्ते उद्घाटन करावे. फोटो छापून आणण्याच्या बोलीवर त्या पोराच्या आईबापाकडून किमान गॅलरीचा भाडेखर्च पदरात पाडून घ्यावा.
समाजमाध्यमावरील मित्रांनाच आमंत्रित करावे. आपण कित्ती कलेचे प्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी लाजेकाजेस्तव प्रत्येक कॅनवासवर त्याला/तिला काहीतरी ’सापडेल’. त्यावर त्याची/तिची 'प्रतिक्रिया आवर्जून कळव’ अशी विनंती करावी. यातले एक दोघे हौसेने समाजमाध्यवर काहीतरी खरडतील.
एकाच वेळी उपस्थित असलेले दोन जीव परस्परांशी बोलत असतील आणि आपण दोघे वेगळेच काही समजतो आहोत असे त्यांना समजून येऊ लागले की त्यात हस्तक्षेप करुन ’प्रत्येकाला ज्यातून स्वत:चे असे काहीतरी सापडते ती खरी श्रेष्ठ कला’ अशा मखलाशी कम बढाई मारत, त्याकरवी आपणच आपल्या कलेला श्रेष्ठतेचे सर्टिफिकेट देऊन टाकावे.
विशेष सूचना: प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त चहा नि बिस्किटांची व्यवस्था करावी. उगा शिनेमात दाखवतात तशी वाईन वगैरे ठेवू नये. एकतर खर्चिक होते आणि दुसरे म्हणजे मद्याने चित्तवृत्ती सैलावलेला एखादा आपल्या कलेचा प्रामाणिक पंचनामा जाहीरपणे करु लागला, तर इतर दबलेल्या प्रेक्षकांनाही बळ मिळून रसिकोत्सुक समाजाचा जमाव होऊन अनावस्था प्रसंग उद्भवू शकतो.
हजेरी लावलेल्या प्रत्येकासोबत आपला फोटो काढण्यास विसरु नये. यातून तो/ती अंमळ खूश झाली की एखाद्या कॅनव्हासशेजारी त्याला/तिला उभे करुन फोटो काढून घ्यावा. हे दोन्ही फोटो - स्वतंत्र पोस्टमध्ये - समाजमाध्यमांवर टाकून त्याला/तिला टॅग करावे.(आवश्यकता वाटल्यास फोटॉशॉपने रिकाम्या कॅनव्हासवर एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराचे अप्रसिद्ध चित्र चिकटवून द्यावे.)
फ्रेंडलिस्टात आधीच जोडून घेतलेल्या वृत्तपत्र-प्रतिनिधीला ट्यागून ’तुझ्या काही सूचना यात अंतर्भूत केल्या आहेत.’ अशी कमेंट टाकावी. एखादा मूर्ख प्रामाणिकपणे 'मी कुठे काय सूचना केल्या?’ असे विचारेल. पण तो प्रश्न विचारणारी कमेंट डिलिट करुन वरच्याप्रमाणेच त्याला त्या पोस्टपुरता ’निलंबित करावा’.
हळूहळू आपण नवचित्रकार म्हणून प्रसिद्ध होऊ लागतो.
- oOo -
हा फक्त पहिला टप्पा. अॅड्वान्स्ड कोर्ससाठी आमच्याशी संपर्क साधा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा