रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी

  • भाग - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता << मागील भाग
    ---

    तुरुंगवारी अथवा मृत्युदर्शन हे टोकाचे नि वेदनादायक वळण आहे. आयुष्यात अपरिहार्यपणे अथवा अनाहुतपणे येणार्‍या इतर काही प्रमाथी नि आवेगी वळणांनाही, माणसे आपल्या इच्छाशक्ती, कुवत, कौशल्य नि चिकाटीने वळशामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतात. जगण्याची गाडी पुन्हा मूळ स्थानी नेऊन प्रवास सुरू करण्याचा अट्टाहास, आटापिटा करताना दिसतात. त्यांचा तो आटापिटा अनेकदा 'You can never go back home' या उक्तीचा अनुभव देऊन जात असतो.


    कांदिद:

    प्रसिद्ध विचारवंत वोल्तेअरच्याकांदिद’ची कथा काहीशी मागील भागात सांगितलेल्या ऑर्फियस-युरिडिसीच्या वळणाची. पण त्याचे संघर्ष कैकपट व्यापक. त्याचे त्याच्या देखण्या आतेबहिणीवर– Cunégonde– प्रेम आहे. परंतु तिचे वडील बॅरन(१) म्हणजे उमराव घराण्यातील आहेत. आपल्या सामाजिक स्थानाचा विचार करता, बहिणीच्या या ‘अनौरस पुत्रा’शी आपल्या मुलीचे लग्न करण्यास तिच्या वडिलांचा ठाम विरोध आहे.

    CandideByBrunelleschi
    Candide by Voltaire
    Artist: Umberto Brunelleschi (1879 - 1949).

    इथून पुढे दोघांचे आयुष्य अतिशय वादळी ठरते. कांदिदची हद्दपारी, नैसर्गिक नि राजकीय आपत्ती, ‘जमिनीवरील स्वर्गा’त (El Dorado) पोहोचून त्यातून प्रचंड संपत्ती जमा करणे, परंतु तितक्याच सहजपणे तिचे विरून जाणे, कुनिगोंदेच्या स्त्रीत्वाचे निघालेले धिंडवडे, तिच्या संरक्षणासाठी तिच्या दोन मालकांची हत्या करून पुन्हा परागंदा झालेला कांदिद, एका उमरावाची मुलगी असलेल्या कुनिगोंदेवर य:कश्चित नोकर म्हणून आयुष्य कंठण्याची आलेली वेळ ... या सार्‍या फरफटीच्या अखेर काही वर्षांनी ते एकत्र येतात.

    इतकी वर्षे जिची आस धरून जगण्याला वादळवाटेवर भिरकावून दिले, तिच्याबद्दल कांदिदला आता तेवढी असोशी राहिलेली नसते. तरीही पूर्वी केलेल्या वाङनिश्चयाखातर तो तिच्याशी लग्न करतो. पण प्रेयसीची आता पत्नी झालेली ती, आयुष्याच्या वाटेवर इतकी वादळे नि वर्षे पचवून आलेली असते. शारीर सौंदर्य तर वयोमानापरत्वे उतरणीला लागलेले असतेच, पण जगण्यातील – युरिडिसीप्रमाणेच– भोगांनी आयुष्याबाबत तेवढी सकारात्मकही राहिलेली नसते. त्याने प्रेम केलेल्या उत्फुल्ल, सुंदर कुनिगोंदेऐवजी एका सुमार देहसौंदर्याची, किरकिरी, निराशावादी स्त्रीशी उरलेले आयुष्य काढावे लागणार आहे, याची जाणीव त्याला होते.

    जीएंच्या कथेतील ऑर्फियस आणि कांदिद यांच्यात हा एक महत्त्वाचा फरक राहतो. जे साध्य म्हणून हाती आले नाही, ते जबाबदारी म्हणून, भागधेय म्हणून कांदिदने स्वीकारले आहे. या उलट ऑर्फियसने मात्र मळभ आलेल्या मानसिकतेच्या युरिडिसीला– तात्पुरते का होईना– नाकारले आहे.

    कांदिदच्या आयुष्याकडे पाहिले तर, पुराच्या पाण्यात अडकलेल्या, जिवाच्या आकांताने किनार्‍याकडे पोहोचू पाहणार्‍या, पण प्रवाहाच्या रेट्याने पुन्हा-पुन्हा दूर फेकल्या जात असलेल्या असाहाय्य होडक्याची उपमा देता येईल. त्याच्या साध्यापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास प्रामुख्याने भवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीने नियंत्रित केला आहे. परिस्थिती बदलली, की बदललेल्या आव्हानाशी नव्याने संघर्षाची सुरुवात करण्यापलिकडे त्याच्या हातात फारसे काही नाही. त्याचे संघर्ष त्याने निवडलेले नाहीत, परिस्थितीच ते त्याच्यासमोर आणून उभे करते आहे. त्याच्या प्रिय कुनिगोंदेकडे परतण्यास प्रतिबंध करत आहेत.


    कालिदास:

    मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’(२) मधील कालिदासही त्याच्या प्रियेकडे– मल्लिकेकडे परतून येऊ इच्छितो. पण त्याची परिस्थिती कांदिदहून सर्वस्वी वेगळी आहे. कांदिदच्या आयुष्यातील विरह परिस्थितीजन्य, तर कालिदासाच्या आयुष्यातील विरह(?) सर्वस्वी त्याच्या निर्णयाने आलेला. प्रियेकडे परतण्यासाठी कांदिदने उभ्या आयुष्याचा संघर्ष मांडलेला, तर कालिदासाने या तथाकथित विरहकालात कीर्ती, धनसंपत्ती, राजकीय सत्ता आणि सुंदरीचे बाहुपाश या सर्व प्रकारच्या सुखांनी परिपूर्ण असे आयुष्य भोगले आहे.

    राजकृपा, राजकवीपदाचा मान, त्याआधारे मिळालेले सुखवस्तू आयुष्य, राजकन्येशी झालेला विवाह, राजाच्या जावयाला साजेसे म्हणून दिले गेलेले काश्मीरचे राजेपद... या सार्‍या स्वार्थासाठी बालपणापासून त्याच्यावर जीव जडवून बसलेल्या मल्लिकेला कालिदास सोडून जातो. त्या आयुष्यातून तिचे अस्तित्व वजा करून टाकतो. इतके की, जी त्याच्या काव्याची मुख्य प्रेरणा, तिच्याकडे त्याच्या प्रसिद्ध ग्रंथांच्या प्रती पाठवण्याचे भानही त्याला राहात नाही. या सुखासीन आयुष्याच्या काळात कालिदासाला मल्लिकेचा संपूर्ण विसर पडलेला आहे.

    याउलट कांदिद त्याच्या प्रेयसीशी एकनिष्ठ आहे, तिच्या प्राप्तीसाठी त्याने आयुष्याचे वाळवंट केले आहे. अनेकवार दूर फेकले जाऊनही, आपली दिशा बदलून आकांताने तो पुन्हा तिच्याकडे येतो आहे, कारण तेच त्याचे साध्य आहे. कालिदासाचे असे नाही. प्रेरणास्वरूप असलेल्या मल्लिकेकडून, गावच्या निसर्गाकडून जमा केलेले सारे संचित ओतून घडवलेली त्याची साहित्यशिल्पे मनोहारी ठरली, त्यांनी त्याला हरप्रकारे सुखासीन आयुष्य दिले. कदाचित तेच त्याचे साध्य होते.

    परंतु आता ते संचित संपले आहे, राजकीय उलथापालथीचा परिणाम म्हणून, सारे ऐश्वर्यही हरवून गेले आहे. असा कालिदास, आता जुन्या आधारासाठी परतून आला आहे. तो ‘मल्लिकेवरील प्रेमाखातर’ असे म्हणणे सयुक्तिक ठरेल असे वाटत नाही. (म्हणूनच वर मी विरह या शब्दापुढे एक प्रश्नचिन्ह ठेवून दिले आहे.) तो परत आला आहे तो, त्याची ती रिती ओंजळ पुन्हा भरण्याच्या हेतूने. ‘ज्या मल्लिकेने आणि निसर्गाने ती पूर्वी भरली होती, ते दोघे ती पुन्हा भरतील’ या आशेने तो परतून आला आहे. त्याचे परतणे विरह-व्याकुल प्रियकराचे नव्हे, तर रिक्तहस्त सुखवस्तूचे स्वार्थी परतणे आहे.

    आयुष्यातील एक नवा डाव पुरेपूर भोगून झाल्यावर, त्याला पुन्हा एकवार ते जुने उबदार, संघर्षहीन आयुष्य खुणावते आहे. त्याला ते परत हवे आहे. त्यासाठी तो मल्लिकेकडे नि आपल्या गावी परतून आला आहे. आपल्या सार्‍या प्रमादांबद्दल– कदाचित अप्रामाणिकपणे– तो तिची क्षमायाचना करतो (स्वार्थ साधणे हा हेतू योजून). पण त्याचे ते जग आता पूर्वीसारखे राहिलेले नसते. आपल्या माघारी त्या जगाला, मल्लिकेच्या आयुष्याला – आपल्याइतकी नसली तरी– गती होती. ते ही एका वेगळ्या वाटेवर पुढे निघून गेले आहे, याचे भान त्याला येते.


    आयुष्यात अशी ‘स्ट्रॅटेजिक रिट्रीट’ घेण्याची इच्छा अनेकांना होत असते. सार्वजनिक, व्यावसायिक अथवा व्यक्तिगत आयुष्यात प्रगतीच्या हेतूने, आसक्तीने पुढे टाकलेली काही पावले मागे घेण्याची इच्छा अनेकदा होते. याची एकाहुन अधिक कारणे असू शकतात. कदाचित त्या पावलांनी, उपायांनी अपेक्षित परिणाम वा साध्य जवळ आलेले दिसत नसते. आणि त्यासाठी मागच्या टप्प्यावर जे सोडले, ते ही दूर जाताना दिसू लागलेले असते. अशा वेळी ‘सोवळे सुटले नि ओवळे सापडले नाही’ अशी त्रिशंकू अवस्था होते.

    याशिवाय वर्तमानातील जगण्यातील अडचणी, अडथळे नि संघर्ष हे समोरच ठाकलेले असल्याने अधिक ठळकपणे दिसतात. त्यांनी दिलेले दु:ख, वेदना अधिक अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्या तुलनेत दूर गेलेल्या भूतकालातील दु:खाची, वेदनांची जाणीव आता बोथट झालेली असते. अशा वेळी भूतकाळातील ते सोवळे, होते त्याहून अधिक आकर्षक भासू लागले. त्यामुळे वर्तमानापेक्षा भूतकाळ हा अधिक सुखद वा हवाहवासा वाटू लागतो. मग वर्तमानाला पाठ दाखवून त्या भूतकाळातील देदिप्यमान, सुखद, उबदार, हवेसे जगणे, ती दुलई पांघरून सुरक्षित, सुखी होण्याची आस वाढू लागते. त्यातून ‘परतुनि जा घरा’ ही ओळ कानात कुणी गुणगुणत असल्याचा भास तीव्र होतो. मग ते जुने सोनेरी दिवस ओढून आणण्याची, किंवा तेव्हाच्या काही सोनेरी स्वप्नांचा पुन्हा एकवार पाठलाग करता यावा, म्हणून, पुन्हा त्या आरंभबिंदूपाशी जाण्याची असोशी घेऊन ते जगतात.

    खरे तर तेव्हाचे जगही आजच्याहून अधिक सुखी, आनंदी, वैभवशाली वगैरे असत नाही. त्या काळाच्या म्हणून काही समस्या असतातच. त्यावर मात करून, वा त्यांना वळसा घालूनच वाटचाल करावी लागलेली असते. पण काळात इतके पुढे आल्यावर त्या संघर्षाची, त्याने दिलेल्या वेदनांची जाणीव बोथट झालेली असते. त्यातील यशाची, सुखांची, वैभवाची स्मृती मात्र तुलनेने ठळक शिल्लक राहते. याचे कारण, पुस्ती गिरवावी तशी पुन्हा पुन्हा कुरवाळून माणसांनी, इतिहासाने ती ठळक केलेली असते, त्यावर स्मरणरंजनाची, अस्मितेची प्रावरणे पांघरून त्यांना अधिक भरजरी केलेले असते.

    एखाद्या व्यक्तिलाच कशाला, आपला भूतकाळ देदिप्यमान, सोनेरी, वैभवशाली होता, असे जगभरातील सर्वच राष्ट्रातील नागरिकांना वाटत असते. आफ्रिकेपासून आशियापर्यंत सर्वच मागास देशांतील नागरिकांमध्ये हा समज दृढ झालेला असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना- निदान आजच्या युरपिय वंशाचे प्राबल्य असलेल्या- फारसा दीर्घ इतिहासच नाही. मग तो वैभवशाली, सोनेरी वगैरे आहे का याबाबत बोलणे सयुक्तिकही नाही. पण गंमत म्हणजे तिथेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा कुणी अमेरिकेला ‘पुन्हा एकदा’ ग्रेट करु या म्हणून साद घालतो, नि अमेरिकन्स त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. मग भारतासारख्या भूतकालभोगी देशात तर संघ-भाजपचा हा प्रचार परिणामकारक ठरतो यात नवल नाही.

    या गमावलेपणाच्या, अपुरेपणाच्या अतृप्तीप्रमाणेच परतुनि जाण्याची इच्छा व्हावी याचे कारण ‘परिपूर्ती’ची भावनाही असू शकते. जे साध्य करण्यासाठी आपला स्थायी थांबा (base camp) सोडून पुढे झेप घेतली, ते आता साध्य झाले आहे. त्यामुळे आता हा प्रवास पुढे चालू ठेवण्यात अर्थ नाही. जे साध्य झाले त्याचे संचित सोबत घेऊन मूळ स्थानी परतावे अशी साफल्यजनक भूमिका घेतली जात असते. पण अतृप्तीच्या तुलनेत याचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके कमी आहे.

    बहुतेक माणसे साध्याच्या दिशेने वाटचाल सुरु करताना, आपल्या आकलनाच्या कलाने प्रवासाची दिशा नि मार्ग निश्चित करतात, त्यावर चालू लागतात. त्या मार्गावर त्यांना अपेक्षित थांब्यावर ते पोहोचतातही. पण आता त्या प्रवासाचा कैफ त्यांना थांबू देत नाही. मग मार्ग न बदलता, त्याच मार्गावरचा पुढचा एखादा थांबा ते नवे साध्य म्हणून स्वीकारतात नि मार्गक्रमणा चालू ठेवतात. हे करत असताना ‘आपल्या आरंभबिंदूपासून अधिक दूर चाललो आहोत’ याची रुखरुख सोबत घेऊन ते वाटचाल करत असतात.

    यावर उपाय म्हणून मग ते स्वत:ला– त्यापेक्षाही इतरांना ‘आपण लवकरच परतुनि येणार’ असल्याचे सातत्याने ठसवत राहतात. आर्थिक संपन्नतेच्या ‘अमेरिकन स्वप्ना’कडे उडत उडत गेलेले भारतीय ‘मी काही वर्षांनी परत येणार आहे.’ असे स्वत:ला नि आसपासच्या मंडळींना ठसवत असतात, त्याला अधिक ठळक करण्यासाठी इकडे घर अथवा जमीन विकत घेऊन ठेवतात. ज्यातून आपली मुळे आपण विसरलो नाही हे स्वत:ला पटवत इतरांसमोर मिरवत राहतात. तेवढे पुरेसे वाटले नाही तर, स्वदेशातील काही कर्मकांडे तिकडेही साजरी करत त्या समजाला अधिक ठळक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांची - माझ्या मते अकारण असलेली - ती रुखरुख मवाळ करण्यास एवढे पुरेसे ठरुन पुढचा प्रवास अधिक निर्धास्तपणे करणे शक्य होते.


    आरती देवी:

    कालिदासाप्रमाणेच ‘आँधी’ या चित्रपटातील ‘आरती देवी’ तिला हवे तिथे पोहोचली आहे. कीर्ती, संपत्ती नि सत्ता या तीनही क्षेत्रात तिने भरपूर कमावले आहे. त्या बाबतीत साफल्याची भावना तिच्या मनात रेंगाळते आहे. पण एका टप्प्यावर कालिदासाप्रमाणेच तिलाही परतून यावेसे प्रकर्षाने वाटते. फरक इतकाच की कालिदासाप्रमाणे ते संचित गमावल्यामुळे तिच्या मनात ती भावना उमटलेली नाही.

    कालिदास जसे त्याचे पूर्वीचे जग मागे सोडून आला होता, तसेच ती ही आपले एक जग मागे सोडून आलेली आहे. एका धनाढ्य उद्योगपती नि राजकारण्याची ही तरुण मुलगी, अपघातानेच जे.के.च्या प्रेमात पडते. प्रेम होते, लग्न होते, मूल होते, तारुण्याचे देणे पुरे होते. आता तिला वडिलांचा वारसा खुणावतो आहे. तो सोडून एका य:कश्चित सामान्य माणसासोबत तिने आयुष्य काढणे त्यांनाही मान्य नाहीच. आपल्या परीने ते ही तिला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर आपल्या प्रेरणेला होकार देऊन ती वडिलांकडे परतते, राजकारणात प्रस्थापित होते.

    पुढे कधीतरी योगायोगाने एकदा जे.के.शी झालेल्या भेटीमधून तिला जाणवते की, ती जे मागे सोडून आली त्यापासून पूर्ण मुक्त होऊ शकलेली नाही. त्यातील बंधांचे काही अवशेष अजून शिल्लक आहेत. भौतिक यशाचा कोणताही टप्पा साध्य करण्यास शिल्लक नसल्याने असेल कदाचित– पण आता तिला त्या जगातील काही खुणावते आहे. शक्य असल्यास त्या दोन्ही जगांतले साध्य तिला साधायचे आहे. इंग्रजीत म्हणतात तसे ‘She wants the best of both worlds.’(३) आता कुटुंब-संस्थेकडून मिळणारा भावनिक आधार, तसंच त्याचे प्रतिबिंब म्हणून राजकारणात सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणारी आपुलकी हे दोन्ही एकाच वेळी हवे आहे.

    निवडणुकीच्या धामधुमीत आरती देवींच्या या भूतकाळाला राजकारणाच्या उकिरड्यावर खेचून आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो. हा डाव उलटवण्यासाठी आरती देवी वेगाने हालचाली करुन स्वत:च तो उघड करते, ‘पत्नी म्हणून, आई म्हणून आपली जबाबदारी टाळल्याची’ खंत व्यक्त करते. तसेच ‘आपण आपल्या कुटुंबाकडे परतून जाणार असल्याचे’ही जाहीर करते.

    या जाहीर वचनामध्ये भावनेचा तात्कालिक उठाव किती नि राजकारणी डावपेचाचा भाग किती हे सांगता येत नाही. यात पुन्हा कालिदासाप्रमाणेच नात्याची प्रामाणिक बूज किती, नि त्याच्या आधाराने आपल्या मतदात्यांसमोर ‘एक कुटुंबवत्सल होऊ पाहणारी, कौटुंबिक पातळीवर केलेल्या चुका(?) प्रामाणिकपणे मान्य करणारी एक नेता असे रूप उभे करण्याचा प्रयत्न किती?’ असा प्रश्न विचारण्यास वाव आहे. या भाषणा-दरम्यान ती “मी ‘तुमच्या सेवेस इथे होते म्हणून’ मी माझ्या कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडू शकले नाही”, हा त्याग आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे, असेही ठसवताना दिसते.

    परंतु निवडणुकीची धामधूम शांत झाल्यावर, कदाचित मागे जाण्याची इच्छा व्यक्त करणारी ती भावनिक लाट ओसरून गेल्यावर, ‘You cannot go back home'ची जाणीव तिला होते. सामान्य महत्त्वाकांक्षा असलेला तिचा पतीही, समजूतदारपणे तिला हवा होता तोच– राजकारण प्रधान मानणारे वर्तमान आयुष्य पुढे चालू ठेवण्याचा– सल्ला देतो. त्याद्वारे त्या निर्णयाचा दोष अप्रत्यक्षपणे स्वत:कडे घेतो, नि तिला वचनभंगाच्या अपराधगंडातून मुक्त करतो... कालिदासाला मल्लिकेने केले होते तसेच!

    - (क्रमश:) -

        पुढील भाग >> भाग - ३ : ययाती, बुधा आणि... माणूस

    टीपा:
    (१). युरोपिय उमरावांचे पाच वर्ग आहेत– ड्यूक, मार्क्विस, अर्ल किंवा काऊंट, वाय-काऊंट आणि बॅरन. त्यातील बॅरन ही सर्वात खालची श्रेणी. कांदिदचा मामा हा जर्मनीतील Westphalia या (वास्तविक) प्रांतातील Thunder-ten-Tronckh नामे काल्पनिक राज्याचा बॅरन आहे.

    जाताजाता:
    जर्मनी हा ‘प्रशिया’ या नावाने राजसत्ताक असताना, तिथे ‘Prussian House of Lords’ नावाचे ‘वरिष्ठ’ सभागृह अस्तित्वात होते. जे केवळ उमराव घराण्यातील सदस्यांचे प्रतिनिधीगृह असे. यातील सदस्यत्व जन्मसिद्ध, कुलसिद्ध असे. महायुद्धोत्तर जर्मनीमध्ये मात्र हे समागृह बरखास्त करुन, नव्या संघराज्य व्यवस्थेला अनुसरून ‘राज्यांच्या प्रतिनिधींचे सभागृह’ अशी नवी रचना असलेले 'German Bundesrat' प्रस्थापित करण्यात आले.

    ब्रिटनमधील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ची संकल्पना त्याच धर्तीवर आहे. तिथे हे पाच उमराव-वर्ग १९९९ सालापर्यंत या हाऊसचे पदसिद्ध सदस्य असत.

    थोडक्यात संभावितांना, प्रतिष्ठितांना ब्रिटिश, जर्मन राज्यव्यवस्थेने स्वतंत्र स्थान, विशेष अधिकार दिले आहेत वा होते. ‘राज्यसभा’ या भारतातील वरिष्ठ सभागृहाची जडणघडण मात्र लोकशाहीच्या पायावर झालेली आहे, हा महत्त्वाचा फरक इथे नोंदवून ठेवायला हवा.

    (२). पुस्तक: आषाढातील एक दिवस - ले. मोहन राकेश (अनुवाद: विश्वनाथ राजपाठक). प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन.

    (३). आरती देवींप्रमाणेच गिरीश कार्नाडांच्या ‘हयवदन’ नाटकामधील मधील पद्मिनी आणि प्रशांत दळवींच्या ‘चारचौघी’ मधील विनी दोन भिन्न पुरुषांमध्ये असलेले गुणसमुच्चय एकाच वेळी आयुष्यात राखू इच्छितात. फँटसीच्या वळणाने जाणार्‍या हयवदनमध्ये पद्मिनी देवदत्ताचे शिर (पक्षी: बुद्धिमत्ता) आणि कपिलचे शरीर (पक्षी: बाहुबळ) अशा संकरित शरीराला पती म्हणून स्वीकारू इच्छिते, तर विनीला वीरेन आणि प्रकाश दोघांसोबत सहजीवन सुरू करण्याची इच्छा आहे.

    ---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा