’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

गुरुवार, १४ जून, २०१२

शोध तुकारामाचा

तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत. पण या भक्तिभावाची परिणती ही की तुकोबाचे चार निवडक अभंग, त्याची 'कर्कशा' पत्नी आवली, त्याचा प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी झालेला संघर्ष, इंद्रायणीतून पुन्हा वर आलेली त्याची गाथा नि त्याच्या सदेह वैकुंठागमनाचे गूढ एवढ्यात तुकोबारायाबद्दलची आपली माहिती - नि रुचीही - संपते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्याची जडणघडण यावर प्रभाव पाडणारे अनेक घटक असतात. मानसशास्त्रात माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा बहुधा त्याच्या बालपणाच्या परिस्थितीपासून सुरू होतो. संस्कारक्षम वयात त्या व्यक्तीने जगलेले आयुष्य, त्याला मिळालेले कौटुंबिक संस्कार, सामाजिक वारसे, काळाच्या नि भूगोलाच्या जो तुकडा त्याच्या वाट्याला आला तो, इ. अनेक घटक त्याच्या व्यक्तिमत्त्वाला घडवत जातात. तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास या घटकांच्या अनुषंगाने समजावून घ्यायला हवा.

वेगवेगळ्या चित्रपटांकडे पाहण्याचा/लिहिण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला हवा असे मी मानतो. रावडी राठोडबद्दल लिहिणे/तो पाहणे नि बालगंधर्व किंवा नव्या ’तुकाराम’ बद्दल लिहिणे यात मूलभूत दृष्टिकोनाचाच फरक असायला हवा. तसा तो नसेल तर अपेक्षाभंग नक्की. हिंदी चित्रपट किंवा समकालीन चित्रपट बहुधा एकसारख्या कथांच्या आधारे मांडणी करतात. तिथे कथा, पटकथा याबाबत फारसे डावे-उजवे करता येत नाहीच. मग तिथे बहुधा अभिनय, तांत्रिक बाजू, चित्रीकरण द. आफ्रिकेत केलं आहे की मॉरिशसमधे, आयटेम साँग कुठले आहे नि कोण डान्सर आहे, फाईट्स थरारक वगैरे आहेत की नाहीत अशा असाहित्यिक, मुद्द्यांवर मूल्यमापन सुरू होते. बालगंधर्व किंवा तुकाराम (अगदी 'काकस्पर्श' देखील) मुळात स्वत:ची अशी कथा घेऊन येतात, त्यामागे लेखक-दिग्दर्शकाला काही सांगण्याचा हेतू असतो. या दोन चित्रपटांच्या बाबत त्या त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलचे संशोधन असते, एक निश्चित दृष्टिकोन असावा लागतो. उचलले चार प्रसंग नि बांधली जुडी चरित्राची हे चित्रपट धंद्याच्या उगवतीच्या, नावीन्याच्या काळी ठीक होते, आज तेवढ्याने भागत नाही. इंटरनेटच्या क्रांतीनंतर आज गल्लीतल्या गणा-गणपालाही चित्रपटाबद्दल बरेचसे माहित होऊ लागले आहे, तो ही चित्रपटाची चिकित्सा करू लागला आहे. ती चिकित्सा शवविच्छेदकाच्या भूमिकेतून करायची की शिल्पकाराच्या याचे भान मात्र ज्याचे त्याने ठेवायला हवे. अशा चित्रपटांना संशोधनाचा, काही तुलनेने अधिक गंभीर दृष्टिकोनाचा पाया असतो. तो ध्यानात न घेता केवळ याने काम कसे केले, त्याने काम कसे केले 'बालगंधर्वांच्या काळात बोगनवेल होती का?' हे प्रश्न विचारत राहिले तर 'यू विल मिस द ब्रॉडर पिक्चर'. अशा पार्श्वभूमीचा चित्रपट हा मुळात एका सशक्त कथेचे सादरीकरण करू पाहत असतो, ते पुरे चित्र न पाहता एक एक धाग वेगळा करून हा कच्चा आहे, त्याचा रंग फिका आहे, इथे काटकोनाऐवजी ८९ अंशात छेद गेला आहे या बाबी नोंदवत बसण्यात हशील नाही. (पुरे चित्र पाहून झाल्यावर हे ही मुद्देही जरूर अभ्यासावेत) मुळात लेखक-दिग्दर्शकाला जे सांगायचे आहे तेच कमकुवत असेल तर या तपशीलाची तशी गरजही नाही. थोडक्यात समकालीन हिंदी चित्रपट नि असे चित्रपट यांचे हेतू भिन्न, दृष्टिकोन भिन्न आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा प्रेक्षकाचा, समीक्षकाचा दृष्टिकोनही भिन्नच असायला हवा.

चित्रपट पाहिलेल्यांकडून काही गंमतीशीर - खरं तर अपेक्षित - प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. पहिली म्हणजे 'जितेंद्र जोशी तुकाराम वाटंत नाही'. या प्रश्नाचे मूळ पुन्हा आमच्या मनात ठसलेल्या विष्णुपंत पागनीसांच्या (आणि कदाचित स्वतंत्रपणे जितेंद्र जोशींच्याही) इमेज मधे आहे. खरे तुकाराम कसे दिसत होते, कसे बोलत होते हे आजच्या पिढीतील कुणी पाहिलंय? मग 'वाटणं' जे आहे त्याला प्रभातने दाखवलेल्या तुकारामशिवाय आधार काय? तुकाराम 'वाटावा' यासाठी काय जितेंद्र जोशीने पागनीसांसारखे मऊ मुलायम पातळ स्वरात बोलायला हवे होते? तरीही नक्कल करतोय हा आक्षेपही आलाच असता ना? मुळात तुकोबाच्या आयुष्यातील जो कालखंड प्रभातच्या ’तुकाराम' ने प्रामुख्याने मांडला तो नि नव्या ’तुकाराम'ने मांडलेला कालखंड वेगळा नाही का? तिथे मध्यमवयातील तुकाराम चित्रपटाचा मोठा भाग व्यापतो तर इथे बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा. या वेगवेगळ्या कालखंडात दिसणारी व्यक्ती, तिचे व्यक्तिमत्त्व वेगळे असणार नाही का? तरुण वयातील तुकारामानेही वयस्कर तुकारामासारखे वागावे/दिसावे ही अपेक्षा अस्थानी नव्हे काय? तरुणपणचा संसारी तुकोबा हा विरक्तीच्या वाटे चालणार्या मध्यमवयीन तुकोबापेक्षा वृत्तीने नि प्रवृत्तीनेही वेगळाच असणार ना. किंबहुना तुकारामाचा शोध घेताना, त्याच्या मध्यमवयीन आयुष्याची रेघ मागे ओढून त्याचे तारुण्यातील आयुष्याबाबत तर्क करायचा तर लेखक-दिग्दर्शकाला कोणत्याही संशोधनाची गरज नाही की चित्रपट निर्माण करण्याचीही. हा पागनीसांचा तुकाराम नाही किंवा प्रभातचाही(!) हे ध्यानात ठेवूनच चित्रपट पहायला हवा.

दुसरा आक्षेप हा की हा पीरियड मूवी वाटंत नाही. पुन्हा 'वाटंत नाही' म्हणजे काय हे असे म्हणणार्‍याला नीटसे सांगता येत नाही. पीरियड मूवी वाटत नाही याचे बहुधा कारण रंगीत चित्रपट असणे हे असावे. ते रंग आपल्याला जुन्या काळाची नाळ जोडत नाहीत. त्याऐवजी काळा-पांढरा चित्रपट असता तर बहुतेकांच्या दृष्टिने तो पीरियड मूवी म्हणून चालवून घेता आला असता असता बहुधा. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर या गुगलच्या जमान्यात पीरियड मूवी वगैरे भाषा गल्लीतला गणा-गणपाही बोलत असला तरी त्याचा अर्थ नक्की काय हे बहुतेकांना ठाऊक नसावेसे दिसते. उगाच ’काकस्पर्श’  मधे उमा नंतरच्या काळातील बहिणाबाईचे गाणे कसे गुणगुणते (अरेच्या, प्रभातचे तुकाराम तर विसाव्या शतकात शांताराम आठवल्यांनी लिहिलेले ’आधी बीज एकले’ गातात की, या तुकाराम’मधे तुकोबा एकविसाव्या शतकातील दासू वैद्यांची गाणी गातो. कवि समकालीन नसला तरी गाणे चित्रपटाच्या काळाशी सुसंगत असले तर कुठे बिघडले?), बालगंधर्वांच्या काळात अमूक प्रकारचे लुगडे अस्तित्त्वात होते का असले प्रश्न विचारणे म्हणजे पीरियड मूवीचे मूल्यमापन असा काहीसा ट्रेंड दिसतो. हे पाहून हसावे की रडावे तेच कळंत नाही.

चित्रपटाबद्दल लिहिणे म्हणजे त्याची शिफारस करणे किंवा सालं काढणे असा काळा-पांढरा व्यवसाय करीत नाही मी. एखाद्या स्त्रीने सुरेख साडी आणली ती आवडली म्हणून नि नवरोबाच्या प्रशस्तीने ती चांगली दिसते आहे हे ही पटले तर त्याच्या हजारभर आडव्या धाग्यांचे विणकाम किती बरोबर आहे, नेमका काटकोन साधला आहे की नाही याचा विचार करूनच चांगल्या वाईटाचा निवाडा करते का? बरेचदा बाह्य रूपच इतके आवडते की फार खोलात जातही नाही आपण. मग सूक्ष्म रूप चांगले असेल वा वाईट. ते न पाहता 'स्पेक्युलेट' कशाला करायचे. 'पाहिले नाही' म्हणायचे नि जेवढे पदरी पडले ते साजरे करायचे हा माझा दृष्टिकोन. त्यामुळे बालगंधर्व असो वा तुकाराम, सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पीरियड मूवीतल्या चुका काढत मी बसलो नाही. 'बालगंधर्व'बाबत काही समीक्षकांनी हिरिरीने मांडल्याही होत्या, ’तुकाराम'बाबतही हे त्यांचे काम त्यांच्यावरच सोपवू आपण नि आपल्यापुरते प्रेक्षकाची भूमिका स्वीकारून चित्रपटाचा आनंद घेता आला तर पाहू.

चित्रपटाबद्दल बोलायचे तर चित्रपटाच्या पटकथेबद्दल आधी बोलायला हवे. मी जेव्हा चित्रपटाविषयी लिहितो तेव्हा सातत्याने आवर्जून मांडलेला मुद्दा असतो तो हा की पटकथालेखक-दिग्दर्शक तुम्हाला काय सांगू पहात आहे, दाखवू पहात आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे. आपला 'तुकाराम' आपण चित्रपटात शोधता कामा नये. तसे असेल तर हा तुकाराम पाहण्यापूर्वीच त्याच्याव 'नापास' चा शिक्का पडेल. कारण तुकोबारायाचे आयुष्य विविध माध्यमातून आपण पाहिले, आपल्या मनात ठसले ते त्याच्या आयुष्यातील संतपदी पोहोचल्यानंतरचे, त्याचा गावच्या तुक्यापासून तुकोबाराय होण्यापर्यंतचा प्रवास बहुधा माहितीचा नसतो, असलाच तर फारसा महत्त्वाचा नसतो.

चित्रपटातून, कथा-कादंबर्‍यातून आपण तुकोबा पाहिला तो बव्हंशी तुक्याचा तुकोबाराय झाल्यानंतरचा. तुकोबाचे चरित्र म्हणजे बहुधा चार चमत्कारांचे गाठोडे, सोबतीला त्यांचे चार अभंग, तोंडी लावण्यास अद्भुताची जोडी, विनोद अथवा कारुण्य निर्मितीसाठी त्याच्या कर्कशा पत्नीचे आवलीचे पात्र नि अखेर स्वर्गारोहणाची हक्काची कथा. मुळात तुक्याचा तुकोबा कसा झाला याचा प्रवास बहुधा आपल्या माहितीच्या, अनुभवाच्या कक्षेच्या बाहेरचा. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक स्वभावपैलूंचा मागोवा त्याच्या बालपणातून घेता येतो असे आधुनिक मानसशास्त्र मानते. त्यामुळे प्रशांत दळवी-अजित दळवी लिखित नि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ’तुकाराम’ची सुरवात होते ती तुकोबाच्या बालपणाचा वेध घेत. या चित्रपटात रंजनमूल्य अथवा स्मरणरंजनात्मक मूल्य शोधायला गेल्यास फसगत होणार आहे. किंबहुन तशी अपेक्षा असलेल्यांनी हा चित्रपट न पाहिलेला बरा. चित्रपटाचा उद्देश आहे तो तुकारामाचा, त्याच्या जडणघडणीचा शोध घेण्याचा, त्याच्या प्रेरणा उलगडून पाहण्याचा, तुका असतानाच्या त्याच्या पाउलखुणांचा वेध घेण्याचा.

गावच्या मित्रमंडळींबरोबर, लगोर्‍याचा, आबाधुबीचा खेळ खेळणारा तुकोबा; कसल्याशा अनामिक प्रेरणेने विठ्ठलाच्या मूर्तीलाच कवटाळून ब्रह्मानंदी टाळी लागलेला विठोबा,'आपल्या गावच्या विठोबात नि पंढरपूरच्या विठोबात काय फरक आहे' असा प्रश्न अगदी लहानपणीच पडलेला तुकोबा, केवळ मडके घडवून पाहण्याचे कुतूहल शमवण्यासाठी हातीच्या दोन सलकड्यांपैकी एक सहजपणे हातावेगळे करणारा तुकोबा, आपल्या ऋणकोंबाबत बोलताना सावजीदादाच्या 'त्यांचे घर-दागिने आपल्याकडे गहाण पडलेले नाहीत, आपले पोट त्यांच्याकडे गहाण पडले आहे' या स्पष्टोक्तीने अंतर्मुख झालेला तुकोबा, आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल बाळगणारा नि ते शमवण्यासाठी असंख्य प्रश्न विचारून आई-वडिलांना भंडावून सोडणारा तुकोबा. तुकोबाचे हे असे बालपण आपण कधीच अनुभवलेले नसते, चिंतिलेले नसते.

तुक्याची घरची पार्श्वभूमीच मुळी विसंगतीचा वारसा घेऊन आलेली. वडील नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे नि त्याचवेळी सावकारी करणारे. व्यवहाराच्या वेळी भक्तिमार्गाचा कळवळा अजिबात आड न येऊ देणारे, केवळ नजरेने धान्य तोलणारे नि दुष्काळाची चाहूल घेऊन ऋणवसुली आधीच करून घ्यायला पाहिजे हा भावनाशून्य चाणाक्षपणा असलेले. या सार्‍या व्यवहाराकडे पाठ फिरवून बसलेला सावजीदादा हा थोरला बंधू. अशा व्यवहारशून्य ज्येष्ठ पुत्रा मुळे व्यवहाराची जबाबदारी अगदी लहानपणीच तुकोबाच्या अंगावर आलेली आहे. हे व्यवहारी आयुष्य तुकोबाने लीलया अंगीकृत केलेले. आयुष्याची व्यावहारिक, कौटुंबिक बाजू सांभाळत असतानाही मूळचा चिकित्सक नि सारासारविवेकाला प्राधान्य देणारा स्वभाव मात्र सोडून गेलेला नाही. गावच्या वेशीतून प्रवेश करताना द्यायच्या करात जातीच्या, व्यवसायाच्या आधारे डावेउजवे होण्याची शक्यता दिसताच, कराचे नियम सार्‍यांना समान असावेत असा आग्रह धरणारा त्यासाठी कर देण्याचे ठामपणे नाकारणारा तुकोबा ’कठीण वज्रास भेदू ऐसे’ चा पहिला प्रत्यय देतो. कौटुंबिक पातळीवर मधला असून थोरल्याची जबाबदारी स्वीकारून सार्‍या कुटुंबाचा जणू पोशिंदाच होतो. पाठच्या भावाला मदतीला घेऊन वडिलांचा व्यापार नि संसार दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा. यात तुकोबा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हे दुहेरी आयुष्य जगतो आहे.

माणसाची जडणघडण जशी अंगभूत गुणांमधून कौटुंबिक संस्कारांतून होते तशीच लाभलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थिती नि काळाच्या तुकड्यावर ती अवलंबून असते. तुकारामाच्या आयुष्यात निर्णायक भूमिका बजावली ती पडलेल्या दुष्काळाने. ऐन दुष्काळाच्या तोंडावर वार्धक्याने वडिलांचे नि त्यांच्या पाठोपाठ मातेचे निधन झालेले, थोरला भाऊ तर आधीच नि:स्संग. यातून पोशिंद्याच्या भूमिकेबरोबरच तुकोबाच्या खांद्यावर आलेले कर्तेपणाचे ओझे. यातच ज्याची चाहूल होती तो दुष्काळ आलाच. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत कुणी वृद्ध दामाजीपंतांची गोष्ट सांगतो. त्यावर ’आपल्या इथे असा सरकारी अधिकारी वा महाजन, कोणी नाही जो आपले कोठार गरीब गुरिबांसाठी खुले करेल’ असे कुणीसे म्हणतानाच तुकोबा अस्वस्थ होतो. कदाचित त्याला जाणवले असेल की इथे ज्याच्या कडे कणग्या भरून धान्य आहे असा आपल्याखेरिज दुसरा आहेच कोण? यात आपणच पुढाकार घ्यायला हवा. ज्यांच्याकडे जे धान्य शिल्लक आहे ते सगळे खुले करावे नि सर्वांनी ते वाटून घ्यावे असा प्रस्ताव तो मांडतो. सूचना आपली त्यामुळे तिचा श्रीगणेशा आपणच करायला हवा या भावनेतून आपले कोठार खुले करतो. पण धान्यवाटणीच्या वेळी पायली पायलीने वाटून न घेता हपापलेपणे हुल्लडबाजी करून स्वार्थीपणे आपली तुंबडी भरून घेणारे किडके म्हणा अगतिक म्हणा असे लोक पाहून तो व्यथित होतो. कदाचित यातून त्याला जाणवले असेल की देणार्‍याची दानत पुरेशी नसतेच, घेणार्‍याचे शहाणपणही तेवढेच आवश्यक असते. हे शहाणपण नसले तर इथे रुजवले पाहिजे अशी खूणगाठ त्याने आपल्या मनाशी बांधली असावी. दुष्काळासारख्या तुटवड्याच्या वेळी माणसातलं जनावर जागं झालेलं पाहून, त्यांच्या उत्थानाची सुरुवात त्यांच्या मनातूनच व्हायला हवी हे त्याने मनी जाणले. इथूनच तुक्याचा तुकोबाराय होण्याचा प्रवास सुरू होतो.

याचवेळी कौटुंबिक पातळीवर पडलेली मृत्यूची कृष्णछाया त्याला अधिकच अंतर्मुख बनवते. पहिली पत्नी रखमा, भावजय यांच्या मृत्यूनंतर नि सावजीदादाच्या परागंदा होण्याचे घरात आलेले रितेपण त्याला वेढून राहते. सावजीदादाच्या मनात सारे आयुष्य घर करून राहिलेली विरक्तीची, भक्तिमार्गाची भावना (तुकोबाच्या दुसर्‍या पत्नीच्या भाषेत ’त्या काळ्याचा शाप’) प्रबळ होऊ लागते. आता तुकोबा त्याच्या समोरच्या मालावर डल्ला मारून पळणार्‍या चोराकडे दुर्लक्ष करून पोथी वाचण्यात गर्क झालेला दिसतो. इथे तो तो दहा-बारा वर्षांचा असताना सावजीदादाच्या आत्ममग्नतेने गमावलेले सामान नि ते वाहून नेणारी गाढवे आठवत राहतात. थोडक्यात आवलीच्या भाषेत त्या घराण्यात असलेल्या ’काळ्याची शापाची’ छाया आता तुकोबाला वेढून घेते. तुकोबा आता सावकारी सोडून देतो, गहाण ठेवलेली शेते, दागिने मूळ मालकाला परत करतो. ज्यांचा यावरही विश्वास बसत नाही त्यांना ’आपले काही देणे लागत नाही’ असे लिहूनही देतो. आता तुक्याचे रुपांतर आपल्याला परिचित असलेल्या तुकोबामधे झालेले असते.

इथून पुढचा भाग बहुतेकांना माहित असलेलाच आहे. परंतु माहिती आणि सादरीकरण, माहिती आणि तपशील यातही काही बाबी, काही फरक नोंदवून ठेवाव्या लागतात. शिवछत्रपतींची नि तुकोबांची भेट नि राजांनी राज्याच्या सनदा त्यांच्या झोळीत टाकणे वगैरे नाट्यमय भाग इथे येत नाही. राजे हे द्रष्टे नेते होते हे गृहित धरले तर अशा नि:संग संताच्या हाती ते राज्य सोपवतात हे तसे पटणारे नाहीच. भावनिकतेचा अतिरेक म्हणून ही प्रतीकात्मता येते, पण ते वास्तव नव्हे याचे भान लेखकांनी ठेवले आहे. इथे शिवछत्रपतींच्या नि तुकोबांच्या तोंडी जे संवाद आहे ते दोन्ही ऐतिहासिक व्यक्तींच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असणे ठसवणारे. राजे म्हणतात ’आमच्या थोरल्या महाराजांनीही स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर तुम्हा संतांनी आमच्या प्रजेला जे आत्मभान दिले त्यातून आम्हाला लक्ष्मणासारखे स्वराज्याचे पाईक मिळाले. त्यामुळे हे श्रेय जितके आमचे तितकेच तुमचेही.’ यावर तुकोबा म्हणतात ’तुमच्या आईसाहेबांची इच्छा आमचा सन्मान करण्याची आहे. पण तुमच्या सारख्या राजाने अशा फकीराचे श्रेय मानणे हाच मोठा सन्मान आहे. तुम्ही तुमचे काम करत रहा आम्ही आमचे करत राहू.’ इथे ’सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ हे ध्वन्यर्थाने, लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते, शब्दश: नव्हे. हे भान लेखकद्वयाने राखले आहे.

शेवटचा गाथा बुडवण्याचा प्रसंग चित्रपटाचा कळस मानावा. गाथा बुडली खरी पण ती तरली ती साध्याभोळ्या कष्टकरी विष्णुदासांच्या मनात. तुकोबा नदीकिनारी अन्नत्याग करून बसला ते  - कदाचित - गाथा गमावल्याने आयुष्याचे सारे संचित गमावल्याच्या वैफल्याने. त्याचे प्रायोपवेशन हे नदीला घातलेले साकडे नव्हे तर विफलतेतून अंताकडे जाणार्‍या प्रवासाची वाटचाल होती. पण तुकोबांनी शहाणे करून सोडलेले ’सकळ जन’ तुकोबाला असे कसे जाऊ देतील? हां हां म्हणता तुकोबाचे सहप्रवासी जमा होतात, त्याला सोबत करू लागतात. अचानक एका भक्ताच्या तोंडून एक अभंग प्रकट्तो. त्यावरून दुसर्‍याला दुसरा आठवतो. पाहता पाहता ’अवघा रंग एकचि' होऊन सारे विष्णुदास अभंगगायनात तल्लीन होऊन जातात. वैफल्यग्रस्त होऊन बसलेल्या तुकोबाला जाणवते ’अरे आपण ज्याला आयुष्यभराचे संचित समजत होते ते होते चार कागद. अखेर ज्यांच्यासाठी ती गाथा अवतरली त्यांच्या मनात ती तरली आहेच की. आयुष्याचे खरे संचित म्हणायचे ते हे.’ सार्‍या आप्तगणांच्या सहाय्याने तुकोबा पुन्हा माणसात येतो. इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा वैष्णवांचा मेळा अवतरतो. तुकोबा आपल्या वीणेला नि चिपळ्यांना साथीला घेऊन विठ्ठलनामात दंग होऊन जातो, अवघा भावस्वरूप होतो. इथून पुढे त्याच्या जडदेहाचे पतन नक्की कसे झाले हा केवळ तपशीलाचा भाग उरतो.

२ टिप्पण्या: