गुरुवार, २६ जुलै, २०१२

काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...

  • Anna-Hazare
    (कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)
                       
    आता पुन्हा उपोषण होणार
    मग देश ढवळून निघणार
    मग बेदींना कंठ फुटणार
    मग मध्येच मोदी बोलणार
    मग जुनाच खेळ चालू होणार...
    काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
    
    मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
    मग सारीपाट मांडणार...
    मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...
    
    मग ते कुणीतरी ओरडणार
    मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
    रामदेव बाबा असतील तर चिडणार
    मग ‘नसतोच खेळलो तर बरं’ असं वाटणार
    
    आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
    काहीच घेण-देणं नसणार...
    
    काय रेऽऽ देऽऽवा
    
    मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
    मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
    मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार...
    
    मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार
    मग ते अण्णांनी अप्रूव केलेलं असणार
    मग रामदेवबाबांची मागणी नक्की काय
    असावी असा प्रश्न सार्‍यांना पडणार
    
    मग उगाच डोक्यात किडा वळवळणार
    मग ना घेणं ना देणं पण गांधी टोपी घालणार....
    काय रेऽऽ देऽऽवा
    
    मग च्यानेलवाले उत्साहात सगळीकडे धावणार
    मग केजरीवाल त्यांना स्पेशल बाईट देणार...
    मग बेदी त्याचे खंडन करणार...
    
    मग विरोधक अण्णांना पाठिंबा देणार
    पण विधेयकाला विरोध करणार
    मग सुंठेवाचून खोकला जाणार
    म्हणून काँग्रेस खूश होणार
    
    मग उगाच थोड्या वाटाघाटी होणार...
    मग विधेयक पुनर्विलोकनासाठी जाणार...
    काय रेऽऽ देऽऽवा
    
    मग फेसबुकी समाजसेवक उत्साहित होऊन जाणार...
    मग त्यांना नव्या क्रांतीची पुन्हा स्वप्न पडणार...
    मग झुकरबर्गने दिलेल्या फुकट्च्या भिंतीवर
    ते बरेच काही राष्ट्रप्रेमी वगैरे खरडणार...
    
    मग लिहिण्यासाठी आपली वॉलही अपुरी वाटणार...
    मग जाऊन ट्विटही करावंस वाटणार...
    एखाद्या मित्राचे अकाउंट हॅक करून
    त्याच्या नावेही आपणच लिहावंसं वाटणार...
    
    मग सारंच कसं इजिप्तसारखं
    पेटत पेटत जाणार
    
    पण तरीदेखील सत्ताधारी
    फक्त कूस बदलत राहणार...
    पण जागे नाही होणार!...
    काय रेऽऽ देऽऽवा
    
    आता उपोषण होणार
    मग देश जागृत होणार
    मग आयटीवालेही मागे नाही राहणार
    
    मग मागच्या वेळच्या गांधीटोप्या
    पुन्हा बाहेर काढणार
    मग फेज-१ पासून फेज-२ पर्यंत
    गांधीटोप्या नि तिरंग्यांचा मोर्चा काढणार
    मग चार फोटो फेसबुकासाठी काढणार
    
    मग एकदम लंच टाईम संपल्याचं समजणार
    मग लगेचच बॉसचा फोनही येणार...
    
    मग ते कंटाळणार....
    मग पुन्हा हापिसात येणार...
    
    घसा बसू नये म्हणून हापिसातल्या मशीनची कॉफी घेणार
    मोर्चात कोण आले नव्हते त्यांना फोटो दाखवून जळवणार
    
    लंच टाईम तोपर्यंत संपलेला असणार...
    फेसबुकच्या वॉलवर फोटो पडलेले असणार...
    माझ्या क्युबिकलमधे मी असणार...
    त्याच्या क्युबिकलमधे तो असणार...
    
    आमचा मोर्चा मात्र फेसबुकच्या साक्षीने आता
    गावभर फेमस झालेला असणार...
    
    उपोषण एप्रिल मध्ये झालं...
    उपोषण जुलैमधे होतंय...
    उपोषण डिसेंबरमधेही होणार...
    काय रेऽऽ देऽऽवा
    
    - बोलिन खरे
    
    - oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा