सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी

फेसबुकवर मी काही दिवसांपूर्वी अरुणा ढेरे यांनी दिलेल्या लोककथेच्या आधारे एक पोस्ट लिहिली होती. त्या कथेमध्ये युद्धोत्तर अयोध्येमध्ये सीतेची नणंद तिला फसवून रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून घेते. मग त्याला जोडून पुरा रावण आरेखून त्याच्या आधारे रामाच्या मनात सीतेविषयी किल्मिष निर्माण करुन तिचा त्याग करण्यास उद्युक्त करते. या कथेच्या आधारे मी सर्वसामान्यांच्या ‘पराचा कावळा’ करण्याच्या वृत्तीबाबत नि एकुणात इतिहास हे स्वार्थ-साधक हत्यार म्हणून वापरण्याबाबत टिपण्णी करताना अखेरीस देवत्व संकल्पनेच्या उत्क्रांतीबाबत भाष्य केले होते.

आज कोकणातील एका स्नेह्यांकडून कौतुकाने माझा लेख वाचल्याचा मेसेज मिळाला. मी बुचकळ्यात पडलो. मी कुठलाच लेख कुणाला पाठवला नव्हता. मग त्यांनी दिलेल्या तपशीलावरून मी त्या वृत्तपत्राचा ई-अंक डाउनलोड केला नि अवाक्‌ झालो. त्यात चक्क माझा हा ‘लेख’ छापला होता. अरुणाताईंच्या फोटोखाली माझे नाव अशी करामतही करून दाखवली आहे. (ती लेखनाची इमोजी किती जणांना समजली असेल?)

KrushivalArticle

हे अर्थातच मला न विचारता, कल्पना न देता छापलेले आहे. वाईट म्हणजे सोबत जोडलेले पुस्तकाचे कव्हर चुकीच्या पुस्तकाचे आहे. मी उल्लेख केलेली लोककथा ही ‘लोक आणि अभिजात’ मधील आहे. शीर्षकही लेखनाच्या हेतूशी सर्वस्वी विसंगत दिले आहे. कहर म्हणजे सोबत अरुणाताईंचा फोटोही छापून दिला आहे. एकुणात आविर्भाव असा की यांनी हा लेख कमिशन केला असावा किंवा मी त्यांना पाठवला असावा. फक्त शेवटी हळूच ‘साभार’चे शेपूट जोडून आपले शेपूट सोडवून घेतले आहे.

काही वर्षांपूर्वी कोकणातीलच एका प्रथितयश दैनिकाच्या दिवाळी अंकात माझ्या ब्लॉगवरचा लेख असाच परस्पर छापलेला मला आढळला होता.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवरच मी राहुल गांधींच्या फोटोंवर भाष्य करणारी एक पोस्ट लिहिली होती. ती एका प्रसिद्ध नियतकालिकाने उचलून छापून टाकली, ‘व्हायरल’ या साळसूद स्तंभाखाली. एवढेच नव्हे तर त्याच्या संपादकांनी ते पान मला पाठवले. त्यांना बहुधा माझ्याकडून धन्यवाद मिळावेत अशी अपेक्षा असावी. चूक त्यांची नाही, कागदावर नाव दिसले की कृतकृत्य होणारे इतके लोक आसपास असताना तोच प्रघात पडला तर नवल नाही.

परंतु धन्यवाद देणे तर सोडाच, मी उलट नाराजी व्यक्त केल्यावर त्यांनी सारवासारव करत मानधन देण्याची तयारी दर्शवली. माझा मुद्दा त्यांच्या ध्यानातच येत नव्हता, बहुतेक लेखकांनाही येत नाही. मुद्दा मानधनाचा नाही (खरे तर तो ही आहे, पण माझ्यासारख्याच्या बाबत तो फार दुय्यम आहे.) तर लेखकाचे त्या लेखनाचे जनकत्व मानण्याचा आहे. स्वत: संपादक असूनही त्यांना लेखन-स्वामित्वाची जाण नसावी हे मला खटकले होते.

फेसबुक पोस्ट हे बहुतेक वेळा फारसे गंभीर लेखन नसते हे मला मान्य आहे. परंतु कसेही असले तरी एखाद्याने आपली थोडी बुद्धी, माहिती, दृष्टिकोन, विचार, अभ्यास, क्वचित व्यासंगही खर्ची घालून काहीतरी लिहिलेले असते. ते त्याचे अपत्य असते. ते परस्पर उचलून नेताना आपण त्याला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहोत हे यांच्या गावी नसते.

व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्ड्स म्हणून जाणारे लेखन मी समजू शकतो. तिथे फॉरवर्ड करणार्‍यांचा आर्थिक लाभ नसतो, क्वचित अजेंडा असतो. परंतु जी मंडळी वृत्तपत्र, नियतकालिक हे व्यावसायिक माध्यम चालवतात, त्यावर आर्थिक लाभ घेतात, त्यांनी लेखकांना असे गृहित धरणॆ अजिबात समर्थनीय नाही असे मी मानतो. दुर्दैवाने आपले लेखन कुणीतरी उचलले एवढ्यानेच धन्य होणारे लेखकु वारेमाप वाढल्याने, आपले काही चुकते असे या उचलेगिरी करणार्‍यांना जाणवतच नाही. त्यामुळे हल्ली मला या लेखक म्हणवणार्‍यांच्या लाचारीची चीड येते.

मी फेसबुकवर काही लिहिले तर ती माझी माध्यम-निवड आहे. अन्य माध्यमातून लिहिणे वा न लिहिणे हे ही माझ्याच निर्णयाने व्हायला हवे. तो माझा अधिकार आहे. सुचलेले मुद्दे ललित-निबंधाच्या माध्यमातून मांडावेत, लेखाच्या माध्यमांतून मांडावेत, कवितेच्या माध्यमांतून की कथेच्या हे लेखक ठरवतो तेव्हा त्यामागे काही एक आडाखा असतो. दुसरे माध्यम वा घाट निवडले नाहीत याचाच अर्थ त्यांच्यामार्फत आपले लेखन अपेक्षित ते पोहोचवू शकत नाहीत, किंवा त्याची परिणामकारकता पुरेशी असणार नाही असा त्याचा निर्णय असतो. चित्रकलेच्या क्षेत्रातही अभिव्यक्तीसाठी रंगाचे माध्यम कोणते निवडावे हे चित्रकार निवडत असतो. लहर लागली म्हणून जलरंग, लहर लागली म्हणून तैलरंग वा लहर लागली म्हणून पेस्टल्स असे नसते. त्या त्या माध्यमांतून आपण अधिक नेमके व्यक्त होऊ शकतो असा त्याचा आडाखा असतो.

हेच लेखनाबाबतही खरे आहे. माझ्या स्वत:च्या निर्णयाने मी बरेच लेखन मी फक्त ब्लॉगवर करतो, ते फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत नेत नाही, पोर्टलसारख्या डिजिटल माध्यमांत नेत नाही की छापायलाही पाठवत नाही. तो माझा निर्णय असतो. त्यात परस्पर बदल करण्याचा अधिकार इतर कुणाला नसतो. मग परस्पर असा माध्यम-बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? एखाद्या विशिष्ट माध्यमांत माझे लेखन नेण्यास माझा साफच विरोध असू शकतो ही शक्यताही आहे. अशा वेळी त्यांनी ते परस्पर छापणे हे सरळसरळ माझ्या नकाराधिकाराचे उल्लंघन आहे.

अनेकदा असे असते की फेसबुक-पोस्ट ही लेखकाच्या मनातील बीजच तेवढे असते. त्यावर आधारित विस्तृत लेखनाचा आराखडा त्याच्या मनात अथवा हातात असू शकतो. फेसबुक-पोस्ट ही मुद्द्याचा थोडक्यात वा मर्यादित विस्तार असलेली असते. मूळ मुद्द्याला अनुलक्षून काही नवा मुद्दा वा दृष्टिकोन कुणाला सापडतो का, किंवा त्या विषयाकडे पाहण्याचे वाचकाचे दृष्टिकोन आणि कोण-कोणते फाटे फोडणे शक्य आहे याचा अदमास घेण्याच्या दृष्टीने केलेली असते. त्यात लेखकाचा पुरा दृष्टिकोन आलेला नसतो. अशा वेळी ती प्रसिद्ध करून मोकळे होणे म्हणजे लेखकाच्या अर्धवट विचारांची जाहिरात करणे ठरू शकते. यातून लेखकाचा दृष्टिकोन उथळ वा अपुरा आहे असा आरोप त्याच्यावर होऊ शकतो.

याशिवाय विविध माध्यमांसाठी लिहिताना घाटाची, मांडणीची, भाषेची, संदर्भ देण्या/न देण्याची, सोबत डेटा/चित्रे/फोटो वगैरेची निवड वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला हा मजकूर हवा असेल तर तुमच्या माध्यमासाठी असे काही बदल त्यात आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ फेसबुकवर लिहिताना त्याच्या स्तंभस्वरूप मांडणीचा विचार करता लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे मी तीन ते चार वाक्यांचे परिच्छेद करतो. तेच ब्लॉगवर लिहिताना थोडे मोठे– पण तरीही पुस्तकाच्या तुलनेत लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे सहा ते आठ वाक्यांचे परिच्छेद करतो. फेसबुकवर लेखनाला अनुरूप इमेजेस जोडण्याचा पर्याय नसतो, कारण तिथे त्या मजकुराच्या खाली जातात आणि वाईट म्हणजे मजकुराहून कैकपट अधिक जागा व्यापतात. त्याने पोस्टचे केंद्रच (focus) बदलून जाते. याउलट ब्लॉगवर मजकूर, इमेज तसंच व्हिडिओ मांडणीचे अधिक स्वातंत्र्य घेता येते. (वेचित चाललो... वर याचा मी पुरेपूर वापर करून घेत असतो.)

याच धर्तीवर वृत्तपत्र, नियतकालिक आणि पुस्तक यांच्यासाठी मांडणीचा वेगवेगळा विचार करावा लागतो. उचलला मजकूर नि दिला पेस्ट करून असे नसते. तसे केल्याने नव्या माध्यमामध्ये ते लेखन अनुरुपता गमावून बसत असते. संपादक म्हणवणार्‍यांना ही समज नसावी हे अनाकलनीय आहे. त्यापेक्षा संपादकाने लेखकाशी संपर्क केला तर लेखक स्वत: या दृष्टीने विचार करून माध्यमानुरूप मजकूर देऊ शकतो. आज संगणकक्रांतीच्या कृपेने शून्य पैशांत फोन करणे शक्य झाले असतानाही मूळ लेखकाची अनुमती घेण्यास एक फोन करण्यास त्रास होतो? फुकटात मजकूर तर मिळतो आहे, निदान लेखकाचा पाच पैसे लायकीचा मान तरी त्याला द्यावा असे का वाटत नसावे?

एकुणातच छापण्याला अनावश्यक प्रतिष्ठा आहे असे माझे ठाम मत आहे. पण तो मुद्दा फार व्यापक आहे म्हणून सोडून देतो. पण त्याने होते काय की तेथे बसलेल्यांना अकारण एक श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण होतो. डिजिटल– त्यातही सोशल मीडियात लिहिणारे दुय्यम असतात नि त्यांचे लेखन उचलून आपण त्यांच्यावर उपकारच करत आहोत अशा आविर्भावात ते वागतात असा अनुभव आहे. एका प्रथितयश वृत्तपत्राच्या पुरवणी-संपादकाने ब्लॉग लेखनाची दखल घेण्याची बतावणी करत टोपणनावाने त्यांची टिंगलटवाळी करण्याचा उद्योग केला होता. माझ्यासह अनेक ब्लॉगलेखकांनी त्याला जशास तसे उत्तर दिल्यानंतर तो प्रकार लवकरच गुंडाळला गेला.

जोडीला दोन-चार लेख, एखादे पुस्तक छापून धन्य झालेली मंडळीही ‘ह्यॅ: ब्लॉग काही सीरियस लेखन नाही’ सारख्या पिंका टाकून या महाभागांना बळ पुरवत असतात.

व्हायरल झालेल्या वा सोशल मीडियातून मजकुराची उचल करणे हा म्हणूनच मला कोडगेपणा वाटतो. एकीकडे तुम्ही त्या माध्यमांना नाके मुरडता, ते गंभीर माध्यम नाही म्हणता आणि दुसरीकडे ‘व्हायरल’ या पळवाटेखाली तेथील मजकुराची उचलेगिरीही करता. हा दांभिकपणाही आहे.

या मंडळींना एक चांगली पळवाट कायम उपलब्ध असते. ते म्हणतात, ‘आम्हाला हे व्हॉट्स-अ‍ॅपवरून मिळाले’ किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेवर कुणीतरी शेअर केले होते तेथून मिळते. आम्ही मूळचा कर्ता कोण कसे शोधणार?’ हे व्हिडिओंबाबत काही प्रमाणात समर्थनीय आहे. परंतु लेखनाबाबत मला साफ अमान्य आहे. शब्दाधारितच नव्हे तर इमेज वापरून केलेला गुगल-शोधही अत्यंत कार्यक्षम आहे असा माझा अनुभव आहे. तो मूळ लेखका/कर्त्यापर्यंत सहज पोचवू शकतो. मिळालेले मीम, चित्र वा व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्डचा कर्ता मी अनेकदा शोधून काढला आहे. माझ्या दोनही ब्लॉगवर वापरलेल्या बहुतेक इमेजेसबाबत मी हे आवर्जून करत आलो आहे. हे अजिबात अवघड नाही.

इथे तर वर दिलेल्या दोन उदाहरणामधील एक संपादक हे मला व्यक्तिश: ओळखणारे आहेत, त्यांच्याकडे माझा फोन नं. आहे नि ते फेसबुक मित्रयादीतही आहेत. छापल्यानंतर कौतुकाने फोटो पाठवण्याऐवजी त्याच माध्यमातून आधी संपर्क करून अनुमती घेण्याची गरज त्यांना वाटली नाही.

‘मुद्रित नाम पाहता मम, तेणे धन्य जाहलो गे माये’ म्हणणार्‍या लेखकुंनी आपली पत इतकी खालावली आहे. लेखक हा नगण्य, क्षुद्र, ढेकूण आहे. त्याला आपण उपकृत करत आहोत अशा आविर्भावात वावरणार्‍या या प्रस्थापित माध्यम-ठेकेदारांसमोर घालीन लोटांगण केल्याचे हे परिणाम आहे.

छापण्यासाठी घायकुतीला आलेले लेखक(?) हे वाचूनही सुधारतील अशी सुतराम शक्यता नाही. तरीही...

- oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा