रविवार, ५ एप्रिल, २०२०

‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविड-१९’

PrincessDiamond
‘जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी’चा कोविड-१९ संबंधी माहिती देणारा डॅशबोर्ड पाहात होतो. कोणत्या देशांत किती रुग्ण आहेत हे पाहताना त्या यादीत अचानक ’डायमंड प्रिन्सेस’ हे नाव पाहिले की बुचकळ्यात पडलो. या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते. अधिक शोध घेता हा देश नव्हे तर खासगी क्रूझ आहे असे समजले. जेमतेम एक हजारच्या आसपास कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू असलेल्या या क्रूझवर तब्बल ७१२ लोकांना लागण झालेली होती. त्यातले ५१२ विषाणूमुक्त झाले तर १० जण दगावले असे हॉपकिन्सचा डॅशबोर्ड सांगतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यानेच त्या क्रूझचे नाव देशांच्या यादीत समाविष्ट करावे लागले. हा एक अनोखा अपवाद आहे.

पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागण हे एकच कारण आहे असे मात्र नाही. असा अपवाद समोर असलेल्या समस्येबद्दल काही इनसाईट देऊन जातो आहे. एखाद्या मोठ्या भूभागावर अशा विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करताना अनेकविध घटकांमुळे कार्यकारणभाव, निष्कर्ष यात अनेक अडचणी येतात. लोकसंख्येच्या विस्तारामुळे प्रत्येक व्यक्तीबाबत निरीक्षणे नोंदवत जाणे जिकीरीचे होते. याशिवाय अभ्यासक्षेत्र जरी आखून घेतले तरी त्या सीमेबाहेरील अनेक घटकांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम अनुभव आणि निरीक्षणांवर पडत असतात. अशावेळी मर्यादित क्षेत्रफळ, मर्यादित लोकसंख्या आणि बाह्य घटकांशी सहज तोडता येणारा संपर्क यामुळे या क्रूझवरील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास अधिक नेमकेपणे करणे शक्य झाले. यातून या विषाणूच्या प्रसाराचा वेग, त्याला अनुकूल घटक, त्याची मारकक्षमता यांचा वेध घेणे शक्य झाले. याच्या आधारे भविष्यातील प्रसाराचा अंदाज घेणे शक्य झाले.

हजारेक कर्मचारी आणि सुमारे २७०० उतारू घेऊन ही क्रूझ प्रवास करत होती. १ फेब्रुवारी रोजी या क्रूझवरील एक उतारु हाँगकाँग येथे उतरला. त्याला कोविद-१९ ची लागण झाल्याचे दिसून आल्यावर क्रूझला ताबडतोब संदेश पाठवून सावध करण्यात आले. ३ फेब्रुवारीला जपानमधील बंदरात ती पोचताच तिला ’क्वारंटाईन’ घोषित करून त्यातील व्यक्तींची तपासणी सुरू केली असतात तब्बल ७०० जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याक्षणी चीनपाठोपाठ सर्वाधिक लागण झालेली ती जागा होती. अन्य देशांतून आता कुठे या विषाणूच्या प्रसाराची सुरूवात होत होती. प्रिन्सेसच्या बाबतीत हे उघडकीस आल्यानंतर समुद्रात प्रवास करत असलेल्या अन्य क्रूझनाही संदेश देण्यात आले. पुढे सुमारे २५ क्रूझवर कोविड-१९ पोचला असल्याचे दिसून आले. या क्रूझमधून विविध बंदरांवर पोचलेल्या उतारुंनी तो आपल्यासोबत त्या त्या देशात नेला.

जपानी वैद्यकीय अधिकार्‍यांनी या क्रूझवरील उतारूंची कसून तपासणी केली. यात आधीच लागण झालेले ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली. काहींची एकाहून अधिक वेळा तपासणी करण्यात आली. संख्याशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर संपूर्ण लोकसंख्येची अशी तपासणी करण्याची, त्यांच्यावर निरीक्षणे नोंदवण्याची दुर्मिळ संधी या वैद्यकीय अभ्यासकांना मिळाली. यात त्या रुग्णांची केस-हिस्टरी, जीवनपद्धती वगैरे अधिकचे संभाव्य परिणामकारक घटकही नोंदवून ठेवता आले. यातून अभ्यासाची दिशा अधिकाधिक काटेकोर करणे शक्य झाले.

या अभ्यासाआधारे ’युरोसव्हिलन्स’ने तयार केलेल्या रिपोर्टनुसार लागण झालेल्यांपैकी तब्बल १८% लोकांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणे आढळून आली नव्हती. म्हणजे हे लोक जर एखाद्या देशात राहात असते, तर ते इतर लोकांत मिसळून त्यांना संसर्ग देणारे वाहक म्हणून काम करणारे ठरले असते. इतकेच नव्हे तर या क्रूझवर मुख्यत: सुटीचा आनंद लुटायला आलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्यामध्ये अशी लक्षणे दिसून येण्याची शक्यता अधिक होती. याचा अर्थ सर्वसामान्य समाजात, जिथे मध्यमवयीन, तरुण आणि मुले यांचे प्रमाण क्रूझहून अधिक असते, तिथे अशा वाहकांचे प्रमाण कितीतरी अधिक असणार याचा अंदाज अभ्यासकांना आला. यामुळे धोक्याचा इशारा देऊन सामाजिक विलगीकरण अपरिहार्य करण्यात आले. ५ फेब्रुवारीपासून सर्व उतारुंना दोन आठवड्यांसाठी आपापल्या केबिनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली. एरवी रोज सरासरी सात माणसांच्या संपर्कात येणारी व्यक्ती आता सरासरी एकाहून कमी व्यक्तीला भेटत असल्याने संसर्गाची शक्यता बरीच कमी झाली.

याच निरीक्षणांच्या आधारे पुढे केलेल्या अभ्यासातून या विषाणूबाधित लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ३.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. चीनमध्ये प्रत्यक्षात हा दर १.१% इतका नोंदवला गेला आहे. अंदाजाहून कमी दिसण्याची एकाहून अधिक कारणे असावीत. पहिले म्हणजे चीनसारख्या एकाधिकारशाही असलेल्या देशात कटू निर्णय घेणे आणि अंमलात आणणे तुलनेने सोपे असते. दुसरे चीनचा इतिहास पाहता हा मृत्युदर बराच अधिक असण्याची शक्यता आहे, परंतु अधिकृत पातळीवर तो कमी सांगितला गेला असेल. तिसरे म्हणजे प्रिन्सेसच्या उतारुंच्या तपासणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे रुग्णांचे आणि विलगीकरणाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे केले गेले असू शकेल.

पण यात एक मेख आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये तपासलेल्या रुग्णसंख्येच्या आधारे हे गुणोत्तर जाहीर केले आहे. यात तपासणी न होताच मृत्यू पावलेल्यांची संख्या जमेस धरलेली नाही. शिवाय प्रत्यक्षात लागण झालेले, पण तपासणी न झालेले आणि अजूनही वाहक असणार्‍यांच्या संख्येचा यात अंतर्भाव नाही. त्यामुळे त्या आधारे आजच्या मृत्यूंचे गुणोत्तर आणखी कमी दिसणार असले तरी भविष्यात या वाहकांमुळे हा विषाणू आपले हातपाय पुन्हा पसरु शकणार आहे.

जी गोष्ट चीनच्या आकडेवारीबाबत तीच प्रिन्सेसवरील अभ्यासांतून काढलेल्या निष्कर्षांबाबत. संख्याशास्त्रीय अभ्यास तुम्हाला निरीक्षणांतून निष्कर्ष काढण्यास मदत करतात. ते कितपत उपयुक्त असतील त्याचा अंदाजही देतात. त्यापुढे माणसाचे काम सुरू होते. तुम्ही आम्ही ते किती सुज्ञपणे आणि किती कार्यक्षमपणे हाताळतो त्यावर पुढचे यशापयश अवलंबून असते.

(स्मृती मल्लपती यांच्या ’नेचर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ’What the cruise-ship outbreaks reveal about COVID-19′ या लेखाच्या आधारे.)

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा