मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

’कोर्ट’ आणि एका ’असंवेदनशील’ प्रेक्षकाच्या नजरेतून चित्रपट

१७ तारखेला (२०१५) 'कोर्ट' रिलीज झाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवला गेला तेव्हा प्रचंड गर्दीने प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याबद्दल अधिकाधिक चर्चा होऊ लागली. लोक उत्सुकतेने तो रिलीज होण्याची वाट पाहू लागले होते. चित्रपट मराठी असल्याने किती काळ टिकेल हे ठाऊक नसल्याने रिलीज झाल्या-झाल्या बघून टाकण्याचे बहुतेकांनी ठरवले होते. चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी फर्स्ट-डे-फर्स्ट शो पाहून घेतला. वृत्तपत्रांतून आलेल्या समीक्षेतून बहुतेकांनी त्याला उत्तम रेटिंग दिले गेले. पहिल्या एक-दोन शोमधेच असा अनुभव येऊ लागला, की सर्वसामान्य प्रेक्षकाची प्रतिक्रिया निराशेची होती.

स्वयंघोषित चित्रपट रसिक/समीक्षकहा धक्का होता. त्यातून काही जणांनी प्रेक्षक 'असे कसे दगड हो?' अशी प्रतिक्रिया देऊ केली. थोडे सभ्य होते त्यांनी 'काही संवेदनशीलता वगैरे आहे की नाही' असा थोडा सुसंस्कृत सूर लावला. एकामागून एक लेख नि फेसबुक पोस्ट्समधून अशा 'दगड' वा 'असंवेदनशील' प्रेक्षकांवर लेखकुंनी कोरडे ओढायला सुरुवात केली. माझा बुवा, माझा नेता, माझी जीवनपद्धती, माझी आवडनिवड्च काय ती 'बरोबर' नि त्याच्याशी न जुळणारे ते सारे 'चूक', नव्हे त्याज्य अशी भारतीय मानसिकता पुन्हा एकदा दिसून येऊ लागली.

Court

अशा गदारोळात मी ही कोर्ट पाहिला. स्पष्ट सांगायचं, तर सामान्य प्रेक्षकाला तो न आवडणे अगदी साहजिक आहे असेच माझे मत झाले. तसे मी माझ्या एकदोन मित्रांशी बोललोही. पण असा एखादा नवा प्रयोग लोकांना निदान पाहू दे, आताच नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नको असा एकुण सूर दिसला नि तो मला मान्य झाला. परंतु ज्या वेगाने चित्रपट न आवडणार्‍यांबद्दल विविध माध्यमांतून गरळ ओकले जात आहे, ते पाहता मी माझा नियम बदलून यावर बोलावे असे ठरवले आहे. मी स्वतः मराठी चित्रपटाचा प्रवाह भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सशक्त प्रवाह आहे असे मानणारा आहे. (हसू नका! बरं 'बर्‍यापैकी प्रयोगशील प्रवाह' म्हणतो, ठीक आहे?) किंबहुना समीक्षकांचे पूर्वग्रह मराठी चित्रपटाला मारक ठरताहेत असेच माझे मत झाले आहे. एका बाजूने मराठी चित्रपटाची टर उडवणारेही केवळ आता तो पाश्चात्त्य चित्रपटाच्या मापदंडानुसार बनवला गेल्याने त्याचा उदोउदो करत आहेत. दुसरीकडे केवळ सामाजिक हिताचा विषय (?) असल्याने चित्रपट आवडायलाच हवा असा आग्रह असणारे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक आहेत.

खरंतर चित्रपटाची गोष्ट वेगळी नि चित्रपट वेगळा असे अनेक तज्ज्ञ सांगत आले आहेतच. मी तर म्हणतो विषय, कथा, पटकथा नि शेवटी चित्रपट असे चार टप्पे पाहू शकतो.

विषय संवेदनशील आहे म्हणजे चित्रपट संवेदनशील आहे हे गणित अनाकलनीय आहे. अनेक उत्तम विषयांची चित्रपटातूनच काय, कथांमधून, कादंबरींतून वाट लावलेली आपण पाहिली आहे. तेव्हा केवळ विषयनिवडीवरूनच चित्रपटाला संवेदनशील असल्याचे सर्टिफिकेट देणे बरोबर नाही असे मला वाटते. तेव्हा चित्रपट आवडला नाही म्हणजे तुम्ही असंवेदनशील, दगड, उथळ वगैरे शेरेबाजी करणे हेच मुळी उथळपणाचे लक्षण आहे असे मी मानतो. तिसरा गट आहे तो मुख्यतः बोटचेप्या माणसांचा. चित्रपट न आवडला तर आपल्याला प्रतिगामी, असंवेदनशील, बामणी व्यवस्थेचा समर्थक वगैरे शिव्या खाव्या लागतील या भीतीने आवडल्याचे जाहीर करणारा. अलिकडच्या काही प्रतिक्रिया पाहता ही भीती साधार असल्याचे मला दिसून येते आहे.

या सार्‍या पलिकडे, चित्रपट न आवडणारे किंवा माझ्यासारखे 'ठीक ठाक आहे' असे मत झालेले काही लोक आहेत. माध्यमांतून चित्रपटाचा उदोउदो करण्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही, पण ते करत असताना तो न आवडलेल्यांच्या पेकाटात लाथा घालणे अगोचरपणाचे आहे हे माझे मत. म्हणूनच मी इथे डेविल्स अडवोकेट म्हणून लिहितो आहे. 'कोर्ट'बाबत मी कोणतेही नकारात्मक वा सकारात्मक मत इथे देत नाही याची कृपया नोंद घ्यावी! तेव्हा ज्यांच्यामुळे मी ही नोट लिहायला प्रवृत्त झालो त्या एकांगी प्रवृत्तींनी इथे येऊन माझी सालं काढण्यापूर्वी कणभर विचार करून हे वाचावे ही (फलद्रूप होईल याची शक्यता कमी असूनही) विनंती.

एखादा चित्रपट कुणाला आवडावा वा आवडू नये हे चित्रपटाची नि त्या व्यक्तीची तार जुळण्यावरसुद्धा अवलंबून असते, ते बहुधा वस्तुनिष्ठ निकषांवर ठरतच नाही. तसं असेल, तर मग आपल्या विरुद्ध मत झालेल्याच्या कुवतीवर शेरेबाजी करणे हे कितपत योग्य आहे? 'कोर्ट'बाबत गेले दोन वा तीन दिवस शेरेबाजी चालू आहे नि 'एखाद्या भव्योदात्त(?) चित्रपटाबद्दल क्षुद्र लोक नापसंती व्यक्त करताहेत' असे निवाडे देण्याची अहमहमिका चालू आहे. ती भलतीच एलिटिस्ट वगैरे आहे असे आमचे स्पष्ट मत झाले आहे. एखाद्या प्रेक्षकाला चांगला चित्रपट आवडला नाही असे तुम्हाला दिसले तर त्याचे दुर्दैव म्हणावे नि चूप बसावे, फार जवळचा मित्र असेल, तर आपल्याला त्यात काय चांगले दिसले ते सांगून कदाचित त्याला दिसले नसेल तर दाखवण्याचा, अधोरेखित करण्याचा प्रयत्न करावा हे ही ठीक. पण त्याची कुवतच काढायचे काय कारण? (अर्थात हे राजकारणापासून समाजकारणापर्यंत सार्‍यालाच लागू पडते म्हणा.)

'फँड्री' हा चित्रपट मला अतिशय आवडला होता नि त्यावेळी 'टाईमपास'च्या अपेक्षेने आलेल्या लोकांचा मलाही राग आलेला होता नि तो मी व्यक्तही केला. पण राग आला तो माझ्या चित्रपट पाहण्यात अडथळा निर्माण केला म्हणून! ('कोर्ट' पाहताना ज्यांना असा 'शेजार' भेटला त्यांचा वैताग नि त्रागा न्याय्यच आहे.) एरवी त्यांनी 'फँड्री'मधे 'शोले' पाहण्याचा प्रयत्न केला नि सापडला नाही म्हणून फँड्री फालतू आहे असे जाहीर केले असते तर मी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याच्या कदाचित फंदातही पडलो नसतो. पण म्हणून 'ज्यांना कळत नाही त्यांची मरायला इथे यावेच कशाला.', 'आता कुठे मराठी सिनेमा जरा चांगले काही देतोय तर आले हे पाणी ओतायला' वगैरे 'होलिअर दॅन दाऊ' गमजा कशाला? मला वाटतं ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही, त्यांतही अनेकांना हा विषय नक्कीच भावणारा असणार आहे. किंबहुना न आवडण्याचे एक कारण 'अपेक्षाभंग' हे असणार आहे. चित्रपटाला कथेव्यतिरिक्त अनेक अनुषंगे असतात, त्यातली काही पटतात नि काही पटत नाहीत हे सयुक्तिक आहेच. एकत्रितरित्या 'चांगले' किंवा 'वाईट' या दोनच प्रतिसादात सारे काही आले पाहिजे असे नाही.

तज्ज्ञांनी कितीही कोर्‍या मनाने पहा वगैरे म्हटले, तरी प्रेक्षक काही अपेक्षा घेऊनच चित्रपटगृहात जातो हे उघड आहे. खुद्द ते तज्ज्ञदेखील पूर्वग्रहांशिवाय, गृहित चौकटींशिवाय चित्रपटाकडे बघतात याची खात्री ते स्वतः देऊ शकतील का असा प्रश्नही या निमित्ताने विचारू शकतो. ’बालगंधर्व’ चित्रपटात त्यांच्या काळी अस्तित्वातच नसलेली अमुक प्रकारची साडी चित्रपटात कशी असा आक्षेप घेणारा समीक्षक, ’हायवे’ सारख्या काळाच्या तुकड्यावर चाललेल्या कथानकातील वेळेच्या गणिताची ऐशीतैशी मात्र ’असं फुटकळ मुद्द्यांवर चित्रपटाचे मूल्यमापन करायचे नसते' म्हणून झटकून टाकतो. यात पूर्वग्रह वा हितसंबंधांचे गणित सांभाळण्याची शक्यताच मला अधिक दिसते.

एका जमिनीच्या तुकड्यावर वसलेला, एका भाषेत संवाद करणारा, नि एकच सांस्कृतिक वारसा बर्‍याच अंशी पाळणारा समाज, त्यांना अनुसरुन अपेक्षांचे चित्र घेऊन येतो हे अपरिहार्य आहे. एखादा चित्रपट माझ्या अपेक्षेहून सर्वस्वी वेगळे काही घेऊन येत असेल, तर ते ग्रहण करण्यास आवश्यक मानसिक जडणघडण माझी नसेल, तर एका चित्रपटासाठी ती अचानक उगवून यावी ही अपेक्षा कितपत योग्य आहे? 'कोर्ट'मधील बहुसंख्य पात्रे जसे कोर्टाबाहेर सामान्य चाकोरीबद्ध जीवन जगतात तसेच प्रेक्षकही जगतो ना, तो ही त्याच समाजाचा भाग आहे ना? मग त्याने चित्रपटांकडे दिग्दर्शकाला वा तज्ज्ञांना अपेक्षित दृष्टिकोनातून पाहिले नाही, त्यामुळे त्याला तो आवडला नाही तर त्याला असंवेदनशील, दगड म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे म्हणणार्‍यांची संवेदनशीलता कलेच्या बाहेर, प्रत्यक्ष आयुष्यात कशी उमटते हे ऐकायला मला आवडेल.

आता अपेक्षा म्हटलं तर कोणत्या असा प्रश्न येईलच. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोमोज वा प्रसारणपूर्व जाहिरातींचे तंत्र आपण स्वीकारले हे खरे, पण ते कितपत परिणामकारक होते आहे याचा अभ्यास कधी केला गेला आहे का? मीडिया मॅनेजमेंटचे पुस्तकी शिक्षण घेऊन प्रोमोज बनवणारे चित्रपटाबद्दल दिशाभूल करणारे प्रोमोज बनवत नाहीत ना असा प्रश्न निर्माता/ दिग्दर्शकाला पडत नाही का? (की हे हेतुतः केले जाते?) तो चित्रपटाच्या कथानकाची सुरुवातच, अथवा उपोद्घातच तेवढा समोर ठेवतो. उदा. ’गण्या सरकारी कचेरीत कारकून आहे. एकदा त्याची आयुष्यात एक घटना घडते नि त्याचं आयुष्य बदलून जाते.’ आता ही शिंची घटना कुठली, त्याने बदल होतात ते कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक (अपघात?), रोजगार... नक्की कुठले. या सिनॉप्सिस मधून काय डोंबल समजतं, की ज्यावरुन मला चित्रपटाचा अंदाज बांधून तो पाहावा की नाही हे ठरवता येईल? आणि ते अपेक्षित नसेल तर त्या सिनॉप्सिसचा नक्की उपयोग काय? (आमचे एक -एकाच नाटकाचे - लेखक स्वत:च्याच नाटकाची जाहिरात ’हे नाटक छान आहे’ असे फेसबुकवर करत. असल्या सिनॉप्सिसपेक्षा ते बरे म्हणायचे मग. :) )

'टाईमपास'शी नातं सांगणारा फँड्रीचा प्रोमो पाहून आलेल्यांना त्या प्रोमोतले गाणेच नसलेला आणि पौगंडावस्थेतील प्रेमकथा नसलेला चित्रपट पहावा लागतो, तेव्हा प्रोमो पाहून तशी अपेक्षा ठेवून आलेल्यांची नाराजी न्याय्य नाही का? किंबहुना यामुळे फँड्रीचा अपेक्षित सुरुवातीचे दिवस चित्रपटगृहाबाहेर राहिला का? असाच प्रश्न 'कोर्ट'बद्दल विचारायला हवा.

प्रोमोमधे असलेला पोवाडा, त्यानंतर कोर्टातला सीन पाहून हा चित्रपट वीरश्रीपूर्ण, संघर्ष चित्रित करणारा असेल अशी अपेक्षा काही प्रेक्षकांची झाली असेल तर ती अस्थानी म्हणता येईल का? त्या ऐवजी एक संथ लयीतला, कोणतीही घटना, कथा नसलेला केवळ स्थिर असा चित्रपट पहायला मिळाल्यावर त्याची निराशा होणे स्वाभाविक नाही का? चित्रपटाच्या प्रोमोमधे एक जोरकस पोवाडा पाहून नारायण कांबळेच्या संघर्षाची गोष्ट असलेला चित्रपट पहायला मिळणार असा समज करून घेऊन बरेचसे प्रेक्षक आले असणार हे उघड आहे. इथे पाहतो तो पहिला पोवाडा वगळता आम्हाला दिसतो तो निव्वळ परिस्थितीशरण असा नारायण कांबळे. त्याचा संघर्ष कुठेच नाही. प्रेक्षकांनी अमुक एक अपेक्षा ठेवून येऊ नये हा माझेही मत आहेच. परंतु तसे असतानाही त्या असतात हे ही खरेच. (कदाचित अति गवगवा झाल्याने माझ्याही अपेक्षा नको इतक्या वाढल्या नि त्या पुर्‍या झाल्या नाहीत असेही असेल.)

बरं तो प्रोमोमधे असलेला पोवाडा देखील चित्रपटात आम्हाला पुरा पाहू दिला नाही. दोन कडव्यांचा पोवाडा कधी ऐकलाय का हो तुम्ही? अगदी भजनातही दोन चार कडवी असतात हो. दुसर्‍या प्रसंगात पोवाडा नि 'वाट बघतोय रिक्शावाला' या दोन सादरीकरणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद दाखवत असतानाही तो पोवाडा (की गाणेच?) एकाच कडव्यात आटपले आहे. तसे असेल तर पोवाडा हे चित्रपटाचे केवळ निमित्तकारण किंवा बीजकारण असेल तर प्रोमोमधे त्याला एवढे महत्त्व का बरं? किंबहुना या निमित्ताने प्रोमो तयार करणार्‍या पुस्तकी इवेंट मॅनेजर्सना किमान एका फिल्म अप्रिसिएशन कोर्सची सक्ती करावी का असा एक विचार मनाला चाटून गेला. चित्रपटांचा सिनॉप्सिसदेखील असाच चित्रपटाशी अनेकदा केवळ एखाद्या प्रसंगापुरता संबंध राखून असतो असे दिसते. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल चुकीच्या अपेक्षा रुजवल्याबद्दल असे दिशाभूल करणारे प्रोमो किंवा सिनॉप्सिस देणार्‍यांना जबाबदार का धरले जाऊ नये?

मराठी प्रेक्षकाला नुकतेच कुठे मराठी चित्रपटातून तांत्रिक बाजू कुठे कुठे दिसू लागल्या होत्या, समजू लागल्या होत्या. 'कोर्ट'मधे स्थिर राहिलेला नि वट्ट तीन वेळा हललेला कॅमेरा अशा नवसाक्षर प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडून गेला. आम्हाला सांगण्यात आले की 'अहो तो कॅमेरा तुमच्या आमच्या वृत्तीचे प्रतीक आहे'. तो एकाच दिशेने नि कोणतीही हालचाल प्रतिक्रिया न दाखवता समोर चाललेले पाहतो आहे. आम्ही म्हणालो, 'वा:, हे समजले आम्हाला'. पण मग त्या वकीलीणबाई कोर्टाच्या दारातून बाहेर पडतात, नि बारा तेरा पावले फुटपाथवरून चालत जातात' त्या प्रसंगात स्थिर कॅमेर्‍याचा नियम मोडून त्यांचा पाठ्लाग करण्याजोगे काय महत्त्वाचे होते? याउलट जोरकस असा पोवाडा चालू असताना कॅमेरा ट्रॉलीशूट तर सोडाच झूमही वापरताना दिसत नाही. जर चित्रपटाचे बीजकारण असलेला पोवाडा इतका महत्त्वाचा की थेट तो प्रोमोमधे आला आहे तर त्याच्या सादरीकरणात ठळकपणा का नसावा ? त्याचा 'वेध' कॅमेर्‍याने अधिक कल्पकतेने घ्यावा ही अपेक्षा चूक आहे का. आता सुरु झाला म्हणे तो आता संपलाही असा चटावरचे श्राद्ध घातल्यासारखा का उरकला आहे तो? आता म्हणतील की अहो ते महत्त्वाचे नाहीच, महत्त्वाचे आहे तो त्याने घडवलेला परिणाम. हे ही मान्य. पण तो पोवाडा कथेत नक्की किती महत्त्वाचा याचा गोंधळ यातून निस्तरला जात नाहीच.

बरं तो मख्ख कॅमेरा हे 'नियमानुसार काम' तंत्र आहे हे जर खरे असेल तर त्याचा परिणामही अपेक्षित होतो की नाही हे पहायला नको का? ते तपासताना आपला संभाव्य प्रेक्षक त्याकडे कोणत्या नजरेने पाहू शकेल याचा विचार करावा लागतो हे पटते का? निव्वळ नि-सा-ग-म-ध-नि-सा*' म्हणजे मालकंस होतो का? गाणार्‍याने त्यात गाळलेल्या जागा भरून - इंग्रजीत म्हणतात तसे फ्लेश अँड बोन्स भरुन - त्याला आकार द्यावा लागतो ना? आम्हा मराठी माणसांच्या चित्रपटीय जाणीवा आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार नाहीत, त्या तशा असाव्यात असा आग्रहदेखील आम्ही फेटाळून लावणार आहोत. त्याबद्दल आम्हाला असंवेदनशील वगैरे म्हणणे हे जजमेंटल होणे आहे. संवेदनशीलता हा मानवी गुण आहे, दोन वस्तूंमधले अंतर नव्हे की ते एक आणि एकच एककाच्या सहाय्याने चोख मोजता यावे. स्थिर कॅमेरा हा नियम आहे म्हणून प्रेक्षकाच्या प्रतिक्रियेची पर्वा न करता आम्ही तो तसा वापरणार असू तर प्रेक्षकाची प्रतिक्रिया अनुकूल न येण्याची शक्यता गृहित धरावीच लागते. ती तशी देणारा मूर्ख नसतो, जसे त्या नियमानुसार शूट करणाराही मूर्ख नसतो. दोघांचे प्राधान्य वेगवेगळ्या गोष्टींना असते इतकेच. तेव्हा कुणी कुणाला मठ्ठ वा दगड म्हणण्याची गरज नाही हे ध्यानात घेतले तरी पुरे.

त्यातच चित्रपटाचा संथ वेग हा ही कंटाळवाणा होत जाणारा. मला वाटते ज्यांना हा चित्रपट आवडला नाही त्याचे हे मुख्य कारण आहे. मूळ पटकथेचा विचार करता तो अपरिहार्य परिणाम आहे असे तंत्राचे अभ्यासक सांगतात. ठीक आहे. पण मुद्दा आता असा की मुळात आमचा प्रेक्षक मेलोड्रामाच्या अपेक्षा कमी करून थोड्या सटल्टीज समजून घेऊ पाहतो आहे. अशा वेळी मेलोड्रामाच काय ड्रामाही नसलेला विषय घेऊन उभा असलेला चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गळी उतरवणे अवघड असणार हे दिग्दर्शकाला ठाऊक असायला हवे, नव्हे असणार आहे याची मला खात्री आहे. मग अशा वेळी प्रेक्षकाला चित्रपटाशी गुंतवून घेण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार दिग्दर्शकाने करायला हवा, तो मात्र केलेला आहे असे दिसत नाही.

आपण आपला चित्रपट ज्या बाजारात विक्रीला ठेवत आहोत तिथला ग्राहक समजूनच तो तयार करायला हवा. इंग्लंडच्या ग्राहकांसाठी बनवलेला केक ढेबेवाडी बु. मध्ये विकला गेला नाही तर गळा काढण्यात अर्थ नसतो. बाजार निश्चित करुनच उत्पादन बनवायचे असते. पाश्चात्त्य चित्रपटाचे मापदंड वापरून तंत्राचा हुबेहूब पुस्तकी वापर करून चित्रपट बनवला तर तो पाश्चात्य अभिरुचीला पटेल कदाचित, पण वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या, चित्रपटाबाबत वेगळ्या (तज्ज्ञांनी खालच्या पायरीवर असे समजायला हरकत नाही.) पातळीवर असलेल्या प्रेक्षकांची निराशा होत असेल, तर ते त्यांच्या कमअस्सल अभिरुचीचे प्रतीक आहे असा आरोप करायचे कारण नाही. एक प्रयोग म्हणून पहा हे म्हणणे ठीक आहे, पण आवडूनही घेतलाच पाहिजे अन्यथा चित्रपटाची नावड म्हणजे विषयाची नावड, नि विषयाची नावड म्हणजे तुम्ही असंवेदनशील असल्याचे मान्य करा, असले भलते त्रैराशिक मांडायची काय गरज आहे?

अनेकांशी झालेल्या चर्चेत मी पुन्हा पुन्हा हे स्पष्ट करत आलो आहे की मी चित्रपटाबद्दल बोलतो आहे, विषय वा कथेबद्दल नाही! तरीही 'मला आवडलेल्या चित्रपटाबद्दल कुणी वाईट बोलूच कसं शकतं' या आवेशात त्यांच्या ते लक्षात येतच नाही. पुन्हा पुन्हा मला त्या विषयाबद्दलच तर्क दिले जात आहेत. चित्रपटाची गोष्ट मला आवडली आहे, पटली आहे नि माझ्या विचाराशी सुसंगत आहेच. तसे मी पुन्हा पुन्हा सांगितले आहेच. थोडक्यात सांगायचे तर रागसंगीतात कुण्या वाग्गेयकाराने बांधलेली एखादी बंदिश असते ती अनेकांनी सुरेख गायलेली असल्याने प्रसिद्ध झालेली असते. पण एखादा गायक किंवा पूर्वी ती उत्तम गायलेलाच गायक एखाद्या कार्यक्रमात ती सुमार गातो. तेव्हा त्या कार्यक्रमाला वाईट म्हणणे म्हणजे बंदिशीला नावे ठेवणे नसते एवढी समज आपल्याला असायला हवी. तेव्हा माझे सारे मुद्दे सादरीकरणाबद्दल आहेत, कथा, पटकथा, विषय किंवा आशय याबद्दल नाहीत हे पुन्हा एकदा, पुन्हा पुन्हा एकदा, पुन्हा पुन्हा पुन्हा एकदा ठसवतो आहे.

जाता जाता: 'कोर्ट'ने एक मात्र साध्य केले हे मान्य करावयास प्रत्यवाय नसावा. प्रथम संगीत नाटक, मग शास्त्रीय संगीत, मग ग़ज़ल आणि शेवटी जागतिक सिनेमा हे समाजातील एलिटिस्ट लोकांनी प्रथम आक्रमक विरोध करत, मग नाके मुरडत नि शेवटी अंगीकारत, गौरवत जोपासलेले छंद आहेत. दुसरीकडे यांना नाके मुरडणारे, सामाजिक विषयांबाबत अगदी फॅनटिक असणारे, पण स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे असे लोक आहेत. भिन्न कारणांसाठी हे दोनही गट 'कोर्ट'ची स्तुती करताना आणि तो न आवडणार्‍यांवर शरसंधान करणार्‍यांना लाखोली वाहताना एकाच बाजूला आलेले दिसताहेत. सामाजिक अभिसरणाचे हे अंग 'कोर्ट'ने दाखवले याचे श्रेय मात्र कोर्टला नि:संशय दिले पाहिजे. 😊

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा