’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

बापाचे नाव लावायला लाज वाटते का?... एक बिनडोक प्रश्न

हा प्रश्न मला काही दिवट्यांनी पूर्वी विचारला आहे. मला थेट नसला तरी एका फेसबुक-पोस्टवर पुन्हा एकवार विचारला गेला नि त्या अनुषंगाने हे जुने सगळे मुद्दे पुन्हा वर आले.

'तुम्ही ईश्वर कल्पना मानत नसाल तर बापालाही बाप म्हणत नसाल' असला सुपीक तर्क लढवणाऱ्यांच्या डोक्यात असले आग्रह असतात. नेमका हाच तर्क आमचा बापूस देत असे. मग हट्टाने वगळलेच त्याचे नाव. म्हटले माझे मानणे न मानणे, आदर असणे न असणे हा माझ्या वर्तनाचा भाग आहे. त्यात तुला तो दिसत नसेल, तर मधले नाव लावण्याने काही उपयोग होत नाही. आणि तिथे दिसत असेल, तर नाव न लावण्याने काही फरक पडत नाही. म्हातारा-म्हातारीला म्हातारपणी लांब ठेवून फक्त वाढदिवसाला विश करण्याचे, एखादे गिफ्ट देण्याचे कर्मकांड तुला अधिक पटेल, की प्रत्यक्ष तुला सोबत ठेवून काळजी घेणे हे तूच ठरव, म्हणून ठणकावले होते.

मधले नाव लिहिणे हे कर्मकांड आहे, राणा प्रतापाच्या वंशजांनी त्याची प्रतिज्ञा पाळतो असे स्वत:ला पटवून देण्यासाठी मऊ पिसांच्या गादीखाली चार गवताच्या काड्या ठेवण्यासारखे. सार्‍या कर्मकांडांचा मला मनापासून तिटकारा आहे.

आणि समजा ’हो, मला बापाचे नाव लावायची लाज वाटते.’ तर? माझे नि माझ्या बापाचे संबंध कसे असावेत, ते घट्ट प्रेमाचे आहेत की तीव्र द्वेषाचे, याची उठाठेव इतरांनी का करावी? मी माझे नाव कसे लिहावे, माझी ओळख कशी असावी याचा निर्णय या बेंबट्यांनी का घ्यावा? उद्या मोदी-भाजपच्या राज्यात कुलदैवताचे नाव लिहा म्हणाल... नावापुढे श्री. लिहितात तसे धर्म लिहा म्हणाल... उत्तर भारतात जातीचा उल्लेख केला जातोच अनेक ठिकाणी. तिथेही पुन्हा हाच तर्क द्याल! का द्यावे मी? बापाचे नाव लिहायची लाज वाटते का हा सर्वस्वी बिनडोक प्रश्न आहे. बापाचे नाव लावत नाही या कारणासाठी इतरांप्रमाणेच मलाही असलेला हक्क तुम्ही डावलणार? हा मूर्खपणा बहुसंख्येच्या आधारे उन्मादात, अहंकारात परावर्तित होतो.

मी कळत्या वयापासून वडिलांचे नाव लावत नाही. अमुक कुळाचा किंवा अमुक व्यक्तीचा मुलगा/मुलगी हे काही खासकरुन सांगण्याची गोष्ट आहे असे मला वाटत नाही. खरंतर आडनावाचीही गरज नाही. पण आमचे नाव तीन अक्षरीच असल्याने लिहिले आहे की नाही इतपत शंका येईल म्हणून दोन अक्षरी आडनावही जोडून दिले. कुळ, वंश सांगून, 'आमच्या खापरपणज्याच्या खापरपणज्याने म्हाराजांच्या टायंबाला मोरेसरकारांच्या घोड्याला खरारा केलावता किंवा चिटणीस होते’ असल्या फुशारक्या, वर्तमानात फारसे दिवे लावता येत नाहीत, म्हणून उसन्या आणलेल्या अस्मितेच्या कुबड्या असतात, असे आमचे प्रामाणिक मत आहे. मी जसा आहे तसा माणूस आहे. अमक्याचा मुलगा, तमक्या कुळातला ही माझी ओळख मला मान्य नाही. घराण्याच्या, जातीच्या नायकांच्या बाता मारणे हा खुज्या लोकांचा उद्योग आहे. मला त्याची गरज नाही.

हा दळभद्री प्रकार माणसे सोडतील तेव्हा ते आत्मसंतुष्टता सोडून स्वत:ची उंची वाढवण्याचा विचार करतील. त्याचा पहिला टप्पा म्हणजे मधले नाव, आडनाव काढून टाकणॆ*.

आणखी एक मूर्खपणा इथल्या नगरवाचन मंदिरात पाहिला. पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डच हवे म्हणे. आधार कार्ड, लायसन्स तर सोडाच म्हटलं वीजेचे बिल माझ्यानावे आहे, पासपोर्ट आहे. कुछ नही, रेशन कार्डच! आता मला गरज नाही रेशन कार्डची. कुठेच लागत नाही ते. केवळ यांच्या मेंबरशिपसाठी काढू की काय. काय कारण तर म्हणे पुस्तक आणले नाही तर इतर कुटुंबियांची नावे असतात त्यावर. अरे बाबा म्हटलं पण पत्ता एकच असणार ना. मग मी असो की कुटुंबिय, फरक काय पडतो. पण तिथला प्राचीन म्हातारा ऐकेना. नाद सोडला मग. म्हातार्‍यांची सद्दी संपवायला हवी लवकर.

मधल्या नावाचा आग्रह धरणारा नियम मूर्खपणाचा आहे. एस. अरविंद असे नाव असलेल्या तमिळ माणसाने मधले नाव काय लिहावे? त्यातले एस. हे त्याच्या वडिलांच्या नावाचे आद्याक्षर असते. आडनाव नावाचा प्रकार नसल्याने ’मधले’ नाव नावाचा प्रकार नाही. आणि त्यांच्याकडे वडिलांच्या नावाचे आद्याक्षर आधी लिहायची पद्धत आहे. त्यांची तीच ओळख असते. उत्तरेत तर सरळ चरणसिंग, दिग्विजयसिंग असे लिहितात, ना आडनाव ना बापाचे नाव. (काही ठिकाणी अलिकडे जातीचा उल्लेख करुन ’मधले नाव’ वाल्यांपेक्षाही प्रतिगामित्व दाखवतात.) कर्नाटकात काही ठिकाणी वडिलांचे नाव, आडनाव न लावता केवळ गावाचे नाव लावतात. त्यांनी तुमच्या पद्धतीने नावे का लिहावीत म्हणे?

मधले नाव लिहिण्याची पद्धत जास्त करुन महाराष्ट्रातच आहे. एकुणात मराठी माणसांना नि त्यातल्या स्वयंघोषित वरच्या वर्गाला आपली पद्धत ही जागतिक वगैरे असल्याचा मूर्ख समज असतो. मग ते गुढी पाडव्याला हिंदू नववर्षदिन वगैरे म्हणतात. इतरांची बाजू समजून घ्यायची पद्धत नसते आपल्याकडे.

मध्यंतरी एका फेसबुक-मैत्रिणीने पासपोर्ट ऑफिसमध्ये आलेला अनुभव लिहिला होता. तिथेही काऊंटरवरच्या दिवट्या संस्कृतीरक्षक बाईने तिला मधले नाव लिही, डिवोर्स झालाय तर वडिलांचे लिही म्हणून आग्रह धरला होता. असले इतरांचे आयुष्य नि ओळखी कंट्रोल करणारे बेअक्कल लोक आपल्या समाजात महामूर आहेत. तुम्ही काय खावे, काय प्यावे, कपडे कोणते घालावे याचे नियम स्वत: आयुष्यात कणभर दिवे लावता न आल्याने धर्म,जाती,संस्कृतीच्या खुंट्यांना वटवाघळासारखे उलटे लटकून जगणारे सांगत असतात.

आमची एक छोटी मैत्रीण आहे. सध्या महाविद्यालयात शिकते. तिने सरळ अफेडेविट करुन आपले नाव श्रुती मधुदीप असे करुन घेतले आहे. म्हटले तर यात वडिलांचे नि आईचे नाव सूचक आहे, म्हटले तर ते नाव स्वतंत्र आहे. हा सुज्ञपणा व्यापक व्हायला हवा.

जाताजाता: माझे वृद्ध आईवडील माझ्याकडेच असतात. संस्कृतीच्या बाता मारणारे, बापाचे नाव लावायला लाज वाटते का विचारणारे दिवटे ’आम्हाला प्रायवसी नको का?’ म्हणत म्हातार्‍यांना दूर करुन फक्त वाढदिवसादी मोजक्या दिवशी तोंड दाखवतात. एरवी त्यांच्याकडे ढुंकून पाहात नाहीत. हेत्वारोपप्रधान किंवा ad-hominemप्रधान फेसबुकी मराठी समाजासाठी हे सांगावे लागते.

#भारतहाकर्मकांडप्रधानदेशआहे
#प्रशासकीयकर्मकांडे

-oOo-

*(हे ही कर्मकांडच हे सांगायला धावत येणार्‍या छिद्वान्वेषींसाठी... होय हे ही कर्मकांडच, पण इतरांनी न लादलेले. त्या मागची भूमिका निश्चित माहित असलेले. त्यामुळॆ खरंतर कर्मकांड या शब्दाला पात्र नाही. पण तुमच्या चूक काढल्याच्या आनंदासाठी मान्य करुन टाकू.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा