मध्यंतरी सकाळी दूध घेऊन येत असताना एका मित्राची गाठ पडली. तो गणपतीबाप्पाच्या उत्सवासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडला होता. सोबत त्याची पत्नी गौरी आगमनाची तयारीही करताना दिसत होती. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले, तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला.
मी स्वत: कोणतीही पूजा-अर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे.
ती स्त्री आपले घर सोडून नव्या घरी येणार. नव्या घरच्या सार्या तथाकथित परंपरांचे जोखड तिच्याच शिरावर. तिच्याच बळावर इष्टुर-फाकड्यांचे हे तथाकथित 'घराणे' आपली कर्मकांडे चालवणार. कितीही नालायक, बेअक्कल, छळवादी असले तरी त्या घरच्या ज्येष्ठांना बाय डिफॉल्ट आदराने वागवायला हवे म्हणे. त्यांचा अनमान करता कामा नये. वर सार्या खस्ता काढत या नव्या घराची अवलाद तिने जन्माला घालायची, पोसायची. पण ती कार्टी नाव लावणार बापाचे. एवढे करुन बाई निजधामाला गेल्यावर एकच विशेष विधी, तो ही सधवेसाठी; म्हणजे पुन्हा नवरा नामक बैलाचाच मान करणारा. तो आधी खपला तर तो ही वगळला.
असल्या भिकारड्या परंपरा स्त्रियाच अधिक सांभाळून ठेवतात. स्वत:च्या शोषणाची ही रेघ स्वत:च कुरवाळत वाढवत नेतात. म्हणून मला संस्कृतीने त्यांना दिलेल्या दुय्यम भूमिकेपेक्षाही त्यांनी ती सहज स्वीकारली याचाच संताप अधिक येतो. वर बेशरम लाचारपणे ’आपली परंपरा’ पाळल्याचा निर्बुद्ध अभिमानही बाळगायचा.
बरं परंपरा काही असेल ती असू दे. आपण आपल्यापुरते सक्तीचे नसलेल्या गोष्टी टाळू शकत नाही? आजींच्या सुनेला हे का खटकले नसावे? ’दोन वर्षांपूर्वी सासरे गेले तेव्हा वर्षभराचे सुतक पाळले, मग एक स्त्री म्हणून सासूचेही पाळू’ असे का म्हटली नाही ती? 'सख्ख्या मुलालाही आईबाबत हा भेदभाव का खटकला नाही?' हा प्रश्न तर - तो पुरुष असल्याने - विचारतच नाही. शेवटी परंपरा नि संस्कृती मानवनिर्मितच असतात. जेमतेम शंभर वर्षांपूर्वीच्या चालीरिती पाहिल्या तर त्यातील अनेक आज अस्तंगत झालेल्या आहेत. तेव्हा नोकरदार स्त्रिया जसे श्रावणी शुक्रवारची सवाष्ण सोय म्हणून रविवारी जेवायला घालतात, त्या जेवणातला स्वयंपाक अनेकदा तयार आणतात. (एकदा तर थेट होटेलमध्येच सवाष्णभोजन, ते ही वर्तुळाच्या न्यायाने एकमेकींना दिलेले मी स्वत: पाहिले आहे.). इतपत मुरड घालतात, तर एक वर्ष गणेशोत्सव वा गौरी आवाहन केले नाही तर बाभळ बुडेल असे तिला का वाटते?
यांचा जास्तीतजास्त विद्रोह म्हणजे घराबाहेरच्या पुरुषांना ’तुम्ही पुरुष मेले असलेच’ म्हणून आगपाखड करायची. अग बाई तुझ्या घरातल्या त्या सांडाला सांग, मी हे पाळणार नाही म्हणून. उगा फेसबुकावर ’स्त्रिया कित्ती कित्ती सहन करतात’चे रडगाणे गाऊन काय बदल होणार आहे. तुझ्या भल्यासाठी तुझ्या घरातले बैल सुधारायला हवेत. शेजार्याच्या गोठ्यातला बैलांना प्रवचन देऊन काय उपयोग? बरे शेजारचे बैल तुमच्या मदतीसाठी आले, की तेव्हा घरच्या बैलाची बाजू घेऊन ’इतक्या वर्षांची परंपरा का सोडायची’, ’त्यांना सांगा की’ ’आमच्या घरच्या भानगडीत तुम्ही नाक खुपसू नका’ म्हणून शेपूट घालायची. मग या वांझोट्या फेसबुकी फुसकुल्या कशाला बायांनो? अंधारातली अधेली उजेडात शोधून उपयोग होत नाही. त्यासाठी जिथे ती हरवली तिथेच दिवा लावावा लागतो. आणि त्यासाठी सुरुवात आपणच करावी लागते. बाहेरचे माझ्या घरात दिवे लावत नाहीत म्हणून त्यांच्या नावे बोटे मोडून उपयोग नसतो.
हॅरिएट टबमन म्हणाली होती, ’मी कित्येक गुलामांना गुलामीतून मुक्त केले. त्याहून कित्येक पट गुलामांना मुक्त करु शकले असते. पण आपण गुलाम आहोत याची त्यांना जाणीवच नव्हती.’ माझ्या नवर्याने मला हिरे जडवलेल्या सोन्याच्या बेड्या आणल्या हे फुशारकीने शेजारणीला सांगणार्यांनी टबमनचे ऐकायला हवे.
मुळात देवळातच जाऊ नये, कर्मकांड हीच गुलामी, परंपरा पाळूच नयेत वगैरे टाईपच्या सनातनी-पुरोगाम्यांसाठी हे विचार नाहीत. माझे अश्रद्ध असणे,कर्मकांडविरहित जगणे ही जशी माझी, निवड, माझे स्वातंत्र्य, तसेच सश्रद्ध असणार्याचेही. त्याच्या परिघात त्याने दोषरहित असण्याचा प्रयत्न करावा. माझ्या परिघात मी करेन. स्त्रियांना कर्मकांड, परंपरा पाळण्याची सक्ती जितकी शोषक तितकी नास्तिकाने आपल्या पत्नीला ती न पाळण्याची केलेली सक्तीही. पुरोगामित्व हे कोणतेही मत लादण्यावर अवलंबून नसावे. एखाद्या स्त्रीने 'मी माझे शोषण करणारे, मला दुय्यम राखणारे संस्कृतीचे जोखड स्वत:हून स्वीकारले' असे म्हटले तर तिच्या निर्णयाचाही मी आदरच करेन. फक्त मग तिला ’स्त्री कित्ती शोषित, तुम्ही पुरुष मेले...’ या तर्काचा हक्क देणार नाही. ’मी तिसर्या मजल्यावरुन उडी मारली स्वत:च्या निर्णयाने. माझी हाडे मोडली याला तूच जबाबदार. तू मला रोखले नाहीस हा तुझा गुन्हा’ असला उफराटा तर्क अजिबात ऐकून घेणार नाही इतकेच.
आणि हो ’आपल्या संस्कृतीत स्त्रीला आदराने वागवले जाते’ हा मूर्ख तर्क देणार्याच्या तर कानफटातच वाजवेन. ’निदान आम्ही बुरखे तरी घालायला लावत नाही’ म्हणणार्याच्या दोन कानफटात लावेन. जगातील समस्त संघटित-धर्म-प्रधान संस्कृती या स्त्री-शोषकच आहेत. नागर संस्कृती माणसाने स्वीकारली तेव्हा संघटित, काल्पनिक आणि पारलौकिकावर आधारित छद्म-धर्म उदयाला आले आणि सर्वांनी एकमुखाने स्त्रीला दास्यात ढकलले. याला कोणताही, अगदी कोणताही धर्म अपवाद नाही. तेव्हा गाढवाने डुकराकडे बोट दाखवून आपल्या गाढवपणाचे समर्थन करु नये. तुम्ही दोघेही मनुष्य नाही हे ध्यानात घ्या. तरच काही अक्कल सुधारली तर सुधारेल इतकेच.
- oOo -
लेखासोबत जोडलेले छायाचित्र indiatoday.in येथून साभार (त्यांनी त्याचे श्रेय Getty Imagesला दिले आहे.)
ताजा कलम :
शीर्षकातच मी ’आपली’ असे एकवचन वापरले आहेत. त्यामुळे सर्व परंपरा, संपूर्ण संस्कृतीबद्दलचे ते भाष्य नाही. सरसकटीकरण करणे. त्याच्या आजाने माझे पाणी उष्टावले ’असेल’ म्हणत नवजात कोकराला ठार मारणे ही धर्म०संस्कृती-जात-परंपरा यांच्या अस्मितेची मुळव्याध झालेल्यांची ’परंपरा’ आहे, माझी नाही.
सुरवातीला शोषण न वाटणारी गोष्ट कालांतराने शोषण वाटू लागते. लैंगिक शोषणाच्या बाबत या घटना घडतात.
उत्तर द्याहटवाश्रद्धेच्या परिघात असणारे अन्याय या तुझ्या शब्दयोजनेतून पीडा पोहोचते... भारी सणकून लिहिले आहेस. ते योग्यच. अशा शोषित व स्वयंघोषित शोषितांना आपण रोज बघतोय नि काही करू शकत नाही याने हताश वाटते. हा आवाज केल्याबद्दल आभार!
उत्तर द्याहटवा