(ज. के. उपाध्ये यांची क्षमा मागून...)
‘घसरतील पँट जरा, मम डाएट अनुसरता’।
वचने ही गोड-गोड देशि जरी आता ॥ध्रु.॥
सलाड समोरी आल्यावर भूक ही निमाली ।
चमचमीत खाद्य विविध, विविध पेयेही स्मरली ।
गुंतता तयांत, कुठे वचन आठविता ॥
स्वैर तू पतंग, जनि भाषण झोडणारा ।
‘सहजी होय वजन-घट’, नित ऐसे फेकणारा ।
दाविशी कुणी, ‘हा पाहा, कसा लठ्ठ होता’ ॥
जठरातील या भूक, तुज जाणवेल का रे ?
जिंव्हा नच, कृत्याच(१) कवण, उमगेल का रे ?
यापरता दृष्टिआड होऊनि जा आता ॥
- oOo -
(१). एक राक्षसी, विशिष्ट विध्वंसक हेतू मनात ठेवून तंत्रसाधनेच्या आधारे जिची निर्मिती वा आवाहन केले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा