इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी त्या दिवशी भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो हा संदेश भारताला बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा.
त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच 'छद्म' किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली.
’गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतून लोक अहमहमिकेने ही अफवा पुढे पसरवू लागले. चॅनेलच्या मंडळींनी आपले बोंडुक घेऊन आमंत्रण दिलेल्या सेलेब्रिटी आणि राजकारणी मंडळींच्या घरी धाव घेतली. तिथून बाप्पांना दूध पाजण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम लाईव्ह सुरू झाला.
या सार्या अहमहमिकेमध्ये केवळ केशाकर्षणाने खेचले गेलेल्या आणि मूर्तीला स्पर्श करताच खाली ओघळून तिच्या पायाशी साठलेल्या दुधाच्या थारोळ्याकडे सर्वांनी दुर्लक्षच केले. पण काही सुज्ञांनी केवळ दूधच नव्हे तर पाण्यासह इतरही काही द्रव हाच गुणधर्म दाखवतात हे सप्रमाण सिद्ध केले. इतकेच काय, तर इतर देवांच्या मूर्तीच नव्हे तर माणसांचे पुतळेही ’दूध पितात’ हे सिद्ध केले.
पण बुद्धिहीन झुंडीपुढे सुज्ञांचा आवाज हतबल ठरतो तसेच इथेही झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही 'आमच्या घरचा गणपती दूध प्याला.' म्हणून सांगू लागले. या निमित्ताने राजकारणी, चंदेरी दुनियेतील सेलेब्रिटी, गल्लीबोळातले ’कार्यकर्ते’ यांनी टीव्हीवर चमकून घेतले.
गंमत म्हणजे, 'पटेल आमचेच' म्हणणार्यांप्रमाणेच शैव मंडळींनी 'गणपती आमचाच नव्हे का?' अशी बतावणी करत 'शिव-शक्ती डॅझल्स इन इंडिया' अशा हेडलाईन्स छापून मुलाचे थोडे श्रेय वडिलांकडे वळते करण्याचा प्रयत्नही केला.
उपमुख्यमंत्री मा. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मोजके अपवाद वगळता सारा समाज या चाचणीचा सहज बळी ठरला.
ही चाचणी कमालीची यशस्वी झाली आणि यापूर्वी केवळ सांगोवांगी अफवा पसरवणार्या तिच्या कर्त्यांना कमालीचे बळ देऊन गेली. त्या अस्त्राचा वापर करणारे आयटी सेल आज काय काय करामती करतात, त्याचे परिणाम काय काय घडतात हे आपण अलीकडची काही वर्षे पाहातच आलो आहोत.
ही छद्मप्रसाराची चाचणी बुद्धिदात्या गणपतीच्या नावेच व्हावी ही चलाखी अलौकिक आहे, पोखरणच्या विध्वंसक हत्याराच्या निर्मितीलाही 'बुद्ध हसला' चे कवच दिले होते, तसेच* बाबरीच्या विध्वंसाला नेमका ६ डिसेंबर निवडून एका दगडात दोन पक्षी मारण्याइतकेच धूर्तपणाचे.
राजवाडेंनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' यावर बावीस खंड लिहिले आहेत. इथे 'अफवेच्या प्रसाराची साधने' यावर ५६ खंड लिहिले गेले आहेत असे ऐकतो. पण ते खासगी वितरणासाठीच आहेत असे समजते.
-oOo-
* हे 'त्यांना सांगा की' किंवा 'तेव्हा काही नाही बोललात'वाल्यांसाठी.
गणपतींस दूध पिऊ द्या: https://www.loksatta.com/agralekh-news/rumors-on-social-media-1709343/
https://www.jagranjosh.com/general-knowledge/september-21-ganesha-drinking-milk-miracle-1995-science-behind-the-phenomenon-that-shook-the-world-1632131295-1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा