(‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)
—काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती...
(पान ७).
... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते, तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता, नि आपली सेवा लाल बावट्यालाही रुजू केली असती."
(पान १४)
---
अनिल बर्वे यांच्या अतिशय गाजलेल्या ‘थँक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील हे दोन परिच्छेद! निष्ठेचे सातत्य, निष्ठाविषय मात्र बदलता हे वरवर पाहता परस्परविसंगत वाटते. पण थोडा विचार करुन जाऊन पाहिले, तर असे दिसते की हे शक्य आहे– नव्हे हे फारच सार्वत्रिक आहे. सद्य राजकारणातील एखाद्या एखाद्या नेत्याने पक्ष बदलला, की त्याच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठाही त्याला अनुसरून बदलतात. नव्या पक्षाशी त्यांच्या निष्ठा जुन्या पक्षावर होत्या तितक्याच तीव्र असतात. सध्याचे राजकारण पाहिले तर राजकारणातली गणितं बदलली की सर्वसामान्यांच्या निष्ठाही त्यानुसार हेलकावे खाताना दिसतात. काल ज्याचे गुणगान गाताना थकत नव्हती; परिस्थिती बदलताच, आज त्याच्या नावे शंख करणारी माणसे दिसतात. त्यामुळे ग्लाडच्या प्रवृत्तीचे हे वर्णन वाचल्यावर हा मि. ग्लाड मला सर्वसामान्यांच्या प्रवृत्तीचे एक रूपच वाटू लागला.
एकीकडे ‘आपला महान देश...’ वगैरे जपमाळ ओढणारी जमात दुसरीकडे ब्रिटिशांनी आणलेल्या नोकरशाहीची कास धरुन आपले पोट भरत होती. त्यावेळी तिला ब्रिटिश सत्ता ही उत्थानकारी वाटत होती. देश बिटिश सत्तेच्या अंमलाखालून मुक्त झाल्यावर, निर्माण झालेल्या संधींचा सर्वाधिक लाभही याच जमातीने घेतला. एका बाजूने हा फायदा घेत असतानाच, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढ्याच्या धुरिणांना बदनाम करुन ते ही श्रेय आपल्या खाती ओढून आणण्याचा त्यांचा आटापिटा सुरु झाला. आता ते स्वत:ला ब्रिटिशविरोधी लढ्याचे वारसदार म्हणून सिद्ध करण्याची खटपट करु लागले.
वर ग्लाडबाबत म्हटल्याप्रमाणे उद्या जर खरोखरच कम्युनिस्ट क्रांती झाली, नि देश लोकशाहीकडून तथाकथित श्रमिकांच्या एकाधिकारशाहीकडे सरकला, तर आज विरोधी मताच्या व्यक्तीला तुच्छतेने ‘अर्बन नक्षलवादी’ संबोधणारी ही जमात एकमेकाला ‘कॉम्रेड’ म्हणून संबोधू लागेल यात शंका नाही.
‘जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच– श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. ‘आपण नेमके श्रेष्ठ जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये, सत्तेच्या मॉडेलमध्ये कसे काय जन्माला आलो बुवा?’ असा प्रश्न तिला पडत नसतो. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.
या जमातीमधील प्रत्येक जण एका बाजूने शोषित असतो, तर दुसर्या बाजूने शोषकाच्या भूमिकेत जाऊन आपल्या शोषकांचा सूड आपल्याहून दुबळ्या, आपल्या अधीन व्यक्तींवर उगवत असतो. काही वर्षांपूर्वी एक सुरेख लघुकथा वाचली होती. अडचणीत आलेल्या, वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सुरु झालेली साखळी— मंत्री, त्यांचा सचिव, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याच्या हाताखाली काम करणारा तात्यापर्यंत पोचते. घरी पोहोचलेला तात्या तिथला राग/वैताग बायकोवर काढतो, मग ती त्यांच्या मुलावर आणि तो एका भटक्या कुत्र्यावर... त्याने पेकाटात हाणल्याने केकाटलेले कुत्रे, ते धडकल्यामुळे पडलेला भय्या, त्याच्या धक्क्याने हेलपाटलेली बुरख्यातली बाई आणि त्यातून निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम तणाव पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर नवी समस्या उभी करतो. प्रत्येक टप्प्यावरचा शोषित हा शोषक बनून शोषणाला खालच्या टप्प्याकडे टोलवत जातो आणि मागच्या समस्येच्या निराकरणाऐवजी नव्या समस्येला जन्म देत जातो.
‘थँक यू, मि. ग्लाड’ मधील जेलर ग्लाड हा असाच एका टप्प्यावरचा शोषित आहे. जर्मनीत असताना त्याच्यादेखत त्याच्या ज्यू पत्नीला– ‘मारा’ला– गेस्टापो ओढून घेऊन गेले. आडदांड प्रकृतीचा ग्लाड त्यांच्यासमोर पार हतबल ठरला होता; प्रतिकार करणे तर सोडाच, पण माराला सोडावे म्हणून तो त्यांच्यासमोर गयावया करत लीन झाला होता. इतके पुरेसे नव्हते; माराने त्याच्या भेकड लाचारीचा अधिक्षेप केला होता. यातून एक प्रकारे त्याच्यातल्या पौरुषाचा निर्णायक पराभव झालेला होता. त्याने त्याचा अहंकार दुखावला गेला.
ती खदखद घेऊनच तो भारतात आला आहे, मनातून सूडाने पेटलेला आहे. त्याच्या लाडक्या माराला ठार मारणार्या नाझींचा त्याला सूड घ्यायचा आहे. पण त्या वेळी नाझींशी दोन हात करणे त्याच्या कुवतीचा भाग नव्हते. तिथे शोषित असलेला ग्लाड आता शोषकाच्या भूमिकेत जाऊन त्याच्या हाती सापडलेल्या कैद्यांवर सूड उगवून आपल्या गमावलेल्या पौरुषाला पुन्हा पुन्हा आळवत राहातो. त्यातून ‘माराची हत्या करणार्या नाझींचाच जणू आपण सूड घेत आहोत’ अशी काहीशी भावना त्याच्या नेणिवेमध्ये निर्माण होत असावी.
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील क्रौर्य हे अनेकदा त्याच्या मनाच्या तळाशी असलेल्या वैफल्याचा, न्यूनगंडाचा अवतार असते. भाषिक संवादामध्ये कमकुवत बाजू असलेला ज्याप्रमाणे आवाज वाढवून वा समोरच्याची मुस्कटदाबी करुन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा आटापिटा करतो, त्याचप्रमाणे हा क्रूरपणा म्हणजे वास्तविक न्यूनगंडावर या तथाकथित शौर्याचे ढिगारे चढवून त्याला गाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.
सर्वसामान्य माणसेही ग्लाडसारखीच असतात. कुठे तरी झालेल्या अन्यायाचा कुठे तरी सूड घेतला याचे समाधान त्यांना पुरेसे असते. कुणीतरी केलेल्या गुन्ह्याची कुणाला तरी वा कुठे तरी शिक्षा मिळाली की ते आनंदी होतात. कुठल्याशा दुबळ्या धाग्याने का होईना– मूळ गुन्हेगाराशी ज्याचा संबंध लागतो अशा कुणाला शिक्षा देता आली तरी ते पुरेसे समजले जाते. ‘नाझी हे गुन्हेगार होते नि आपल्या हाती सापडलेलेही गुन्हेगारच आहेत’ हा धागा ग्लाडला पुरेसा वाटत असतो. हीच वृत्ती सामान्य नागरिकाचीही असते, मग ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातले असोत की भारतासारख्या देशातले. बहुसंख्या ही ‘अमुक गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे, म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते.
११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. पण अशा प्रकारच्या संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृत्यामधले मुख्य सूत्रधार सापडणे जवळजवळ अशक्यच असते. त्यामुळे मग ते नाही, निदान त्यांच्या गटाची– धर्माची माणसे मारून सूड घेतल्याचे समाधान तेथील जनतेला हवे होते. अध्यक्ष बुश यांनी ‘Weapons of Mass Destruction'ची भुमका उठवून इराकचा— एका मुस्लिम राष्ट्राचा! — विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान दिले. गुन्हा केला कुणी नि त्याची शिक्षा कुणाला मिळाली. पण लोकक्षोभ शांत झाला. (आणि बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले.)(१)
भारतातही अशा तात्कालिक सूडाच्या कथा भरपूर सापडतात. यातूनच ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ नावाची जमात निर्माण होते. लोकांना हा झटपट न्याय आवडतो... अर्थात जोवर तो आपल्या अंगाशी येत नाही तोवर! म्हणून मग हैदराबादमधील नृशंस बलात्काराने उठलेल्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी पोलिस चार फाटक्या जिवांना संशयित म्हणून समोर आणतात, त्यांना आरोपी म्हणून घोषित करतात आणि नंतर तथाकथित एन्काउंटरमध्ये त्यांचा निकालही लावतात. सर्वसामान्य तर सोडाच सेलेब्रिटी मंडळीही पोलिसांची स्तुती करताना थकत नाहीत. त्या पोलिसांवर पुष्पवृष्टी केली जाते. ज्यांच्याविरोधात अद्याप तपासही पूर्ण झालेला नाही अशा आरोपींच्या घरावर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे शासन सरळ बुलडोझर चालवते, आणि स्वत:ला संभावित म्हणवणारे या न्यायाबद्दल (?) शासनाचे कौतुक करताना थकत नाहीत.
हैदराबाद एन्काउंटर(?)मध्ये मारले गेलेले हे संशयित हे गुन्हेगार सोडा, अद्याप आरोपीही नव्हते. तीच बाब म.प्र. नि उ.प्र. मध्ये आपला निवारा गमावून बसलेलेही. मग खरेच गुन्हेगार होते का? असा प्रश्नही फारसा कुणाला पडत नाही. असले, तरी ‘त्यांना न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षा व्हायला हवी’ असा आग्रह कुणी धरला नाही. पोलिस म्हणाले म्हणजे ते गुन्हेगार होतेच असे समजणार्या या संभावितांनी ‘सर्वच गुन्ह्यांच्या केसेसमध्ये आपण असे मान्य करतो का?’ असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहिला नाही.
ज्या गटाने हैदराबादचे तथाकथित एन्काउंटर ‘पोलिस म्हणतात म्हणजे ते गुन्हेगार होते’ असा दावा केला होता, त्याच गटाने ‘त्यांच्यावर’ सूड घेतला गेला या आनंदात, आठ वर्षांच्या चिमुरडीवर अनेकांनी अनेकवार केलेला बलात्कार नि तिची हत्या अप्रत्यक्षरित्या समर्थनीय ठरवली होती. त्यावेळी मात्र पोलिसांनी जाहीर केलेल्या आरोपींना गुन्हेगार मानायची त्यांची तयारी नव्हती. उलट आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेले होते.
जनता ही अशी स्वार्थी नि नीच वृत्तीची असते. बहुसंख्य प्रत्यक्ष कृती करत नसले, तरी त्यांच्यात ती प्रवृत्ती जिवंत असते. म्हणून आठ वर्षांच्या असिफावर केलेल्या बलात्काराने ती तिला विकृत आनंद होतो, चार फाटक्या जिवांच्या एन्काउंटरने तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते; पण त्याचवेळी एखाद्या मद्यधुंद हिंदी हीरोने गाडीखाली चिरडलेल्या पाच जिवांना न्याय मिळावा यापेक्षा, त्याची सुखरूप सुटका व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसते...
... आणि हीच जनता जेलर ग्लाडने क्षुल्लक कारणाने बडवून काढलेल्या कैद्यांबद्दल काडीची सहानुभूती न राखता, ‘मग काय गुन्हेगारच तर आहेत’ म्हणत निर्लज्ज समर्थन करते! पण नेमक्या त्याच वेळी नक्षलवाद्याने केलेल्या तशाच प्रकारच्या कृतीला ती भयंकर समजते, ‘त्याला तातडीने फाशी दिली पाहिजे’ असे म्हणते. आणि आता हे एकदा सोयीचे झाले, की गैरसोयीची मते मांडणार्या कुणालाही ‘अर्बन नक्षलवादी’ असल्याचा शिक्का मारुन तुरुंगात घालू पाहाते... कारण ‘सध्या’ नक्षलवादी सत्ताधारी नाहीत; असते... तर त्यांचे मूल्यमापन वेगळे झाले असते !
दुसरीकडे ग्लाडसमोर उभा ठाकलेला वीरभूषण पटनाईक हा पोलिस चौकी उडवून सात पोलिस आणि एक सब-इन्स्पेक्टरची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी. मार्क्सवादाचा हा अतिआक्रमक अवतार नक्षलवाद मध्यपूर्व भारतात अजूनही मूळ धरुन आहे. नक्षलवादी लोकशाही व्यवस्था आपापत:च भांडवलशाहीची बटीक आणि म्हणून शोषक मानतात. या व्यवस्थेचे सर्व घटक हे शोषकांचे हस्तक आहेत असे ते मानतात. लोकशाही व्यवस्थेची उपव्यवस्था असलेल्या दंडव्यवस्थेचे नि न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधी असलेले पोलिस आणि अन्य सशस्त्र दले त्यांचे शत्रूच आहेत. इतकेच नव्हे तर लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासनातील लोक, त्यांच्या वतीने लोकाभिमुख कार्य करणारेही अप्रत्यक्षरित्या या ‘शोषक’ व्यवस्थेचे आधार असल्याने क्रांतीचे शत्रू आहेत असा त्यांचा दावा असतो.
ती लोकशाही व्यवस्था उलथून टाकून नवी लोकाभिमुख व्यवस्था उभी करण्याचा उद्देश असल्याचा दावा करतात. सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की या त्यांच्या तथाकथित ‘स्वातंत्र्यलढ्यात’ अगदी सामान्य व्यक्तीप्रती केलेल्या हिंसेचा वापरही ते त्याज्य मानत नाहीत. किंबहुना तेच त्यांचे मुख्य हत्यार आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला समांतर अशा ‘पीपल्स कोर्ट’ नामक व्यवस्थेकरवी त्यांचा निवाडा करण्याचा त्यांचा प्रघात आहे. आणि अशा क्रांतिशत्रूंना त्यांच्याकडे एकच शिक्षा आहे, देहदंड !
थोडक्यात आजच्या लोकशाहीमध्येही ‘कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम’ मानसिकतेच्या बहुसंख्येला अभिप्रेत असलेली व्यवस्थाच नक्षलवादालाही अभिप्रेत आहे. आणि म्हणून उद्या नक्षलवादी व्यवस्था प्रस्थापित झाली, तर ग्लाडप्रमाणेच देशभक्तीची जपमाळ पेटीत ठेवून, देशभक्तीचा झगा उतरवून, बहुसंख्य लोक लाल कफनी चढवतील आणि न पटणारी मते मांडणार्याला ‘देशद्रोही’ वा ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतिशत्रू’ किंवा ‘प्रतिक्रांतिवादी’ म्हणून हिणवू लागतील. त्यांच्या दृष्टीने फरक झाला तर इतकाच होईल... आणि म्हणून जेलर ग्लाड अशा जनतेचा डार्लिंग असतो.
जेलर ग्लाड हा ही नक्षलवाद्याप्रमाणेच आपल्या व्यवस्थेच्या अंतर्गत गुन्हेगारांविरोधात हिंसेचा सढळपणे वापर करणारा आहे. त्याअर्थी हे दोघे दोन विरोधी व्यवस्थांमधले एकमेकांचे प्रतिबिंबच म्हणावेत असे. तो तुरुंग म्हणजे ग्लाडसाहेबाचे साम्राज्य. तिथले कर्मचारीच काय पण त्या आसमंतातले सजीव-निर्जीव सारेच साहेबासमोर चळचळा कापणारे. नक्षलवादी प्रमुख तुरुंगाधिकारी असलेल्या ग्लाडला ‘जेलरसाहेब’ या उपाधीने न संबोधता सरळ ‘मि. ग्लाड’ म्हणून संबोधतो आहे. एक प्रकारे त्याच्या सत्तास्थानाला, अधिकाराला आणि पर्यायाने तो ज्या व्यवस्थेचा भाग आहे तिच्या सार्वभौमत्वाला आपण नाकारतो असा स्पष्ट संकेत देतो आहे.
ग्लाडची ख्याती पाहता सुरुवातीला एकतर्फी होईल असा सामान्य तर्क असलेला दोघांचा सामना पाहता-पाहता तुल्यबलांचा होऊन जातो. बाहुबळ, हिंसा ही प्रमुख हत्यार मानणार्या दोघांचा हा सामना मात्र मनोबलाचा सामना होऊन राहतो. आणि या कादंबरीचे तेच वैशिष्ट्य आहे. यात कुठेही लोकशाही आणि नक्षलवादाला अभिप्रेत असलेल्या व्यवस्थांचा, दृष्टिकोनाचा संघर्ष नाही. संघर्ष आहे तो दोन व्यक्तिंमधला. ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला!
संघर्षाच्या अखेरीस ग्लाडची मान किंचित झुकते. ब्रिटिशांची चाकरी करत असताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना त्याने गुन्हेगारांप्रमाणे निष्ठुरपणे वागवले होते. पण वीरभूषणला तो निव्वळ गुन्हेगार न मानता क्रांतिकारक म्हणून मान्यता देतो. अर्थात याचा अर्थ त्याला नक्षलवाद्याची विचारधारा पटली आहे असा नाही. व्हॉल्टेअरच्या उक्तीला अनुसरून आपल्याला न पटणार्या विचारधारेचा निष्ठावान पाईक म्हणून त्याला तो क्रांतिकारक म्हणतो आहे. आणि याला त्या नक्षलवाद्यामधल्या माणसाचे त्याला झालेले दर्शन अधिक कारणीभूत आहे. दुसरीकडे लोकशाही धिक्कारुन पर्यायी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी शस्त्र उचलणार्या नक्षलवाद्याचा स्वत:च्या स्थानाबद्दलचा भ्रमनिरासही ग्लाडमुळे होतो. त्याअर्थी त्याचा कणाही झुकतो आहे.
‘...ग्लाड’मध्ये वीरभूषणने जेनीची प्रसूती करण्याच्या आणि ताठ कण्याच्या कैद्याप्रती जेलरच्या मनात सहानुभूती निर्माण होण्याच्या प्रसंगांच्या आवृत्या पुढे नाटक-चित्रपटांत पुन्हा पुन्हा येत राहिल्या. ‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामधील प्रि. सहस्रबुद्धेंच्या मुलीच्या प्रसूतीचा क्लायमॅक्स आठवून पाहा. तशीच धुवांधर पावसाळी रात्र, तसेच तुंबलेले रस्ते, तसाच तुटलेला संपर्क आणि प्रिन्सिपलच्या नावडत्या विद्यार्थ्यानेच केलेली त्याच्या मुलीची प्रसूती ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ मध्ये वैचारिकदृष्ट्या दुसर्या अक्षावर असलेल्या- पण नक्षलवाद्याप्रमाणेच हिंसा हे हत्यार समर्थनीय मानणार्या नथुरामच्या व्यक्तिमत्वामध्ये नाटककाराने वीरभूषण पटनाईकचे बरेच रंग मिसळून दिलेले दिसतात. त्यातील जेलर शेखची तर वाक्येच्या वाक्ये ग्लाडची आठवण करुन देतात.
कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.
यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.
‘थँक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ‘वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...
...‘हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या ‘वैचारिक निष्ठेतून केली आहे’ असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी(?) बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे ‘पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी’ असणार्या वीरभूषणकडे ‘मला न पटणार्या विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून जेलर ग्लाड पाहू शकतो.
ग्लाड ‘बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ‘पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?
माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे ‘मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी’ नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.
निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे— दंडनीय आहे!
मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (super-system) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते.
मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ‘पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.
दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ‘न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. ‘फाशी देणे योग्य आहे का?’ ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला, तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे. आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.
यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. कारण नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.
जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ‘न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!
त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली – ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.
ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ‘माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ‘आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा त्याचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या, जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.
वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे— म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.
हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ‘पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.
याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्व-कल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो. पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.
या सार्याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल, तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.
- oOo -
(१) शिफारस: बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा