शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

वाचाळ तू मैत्रिणी

(रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.)

एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली.

एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्‍याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्‍यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला...

Kangana-Ranaut
भाष्यचित्रकार: सतीश आचार्य.
(काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून)
                   
झाशीवाली(१) नव्हेस कन्या, नव्हेस अंबामाय 
उसनवारीची कंठी मिरविसी रुंडमाळ की काय
प्याद्यासी(२) या म्हणेल राज्ञी, बॉलिवुडी का कुणी?
वाचाळ तू मैत्रिणी

बदनामीचे अस्त्र उपसले, मुळी न धरलीस चाड
तुला पाहता लावून घेतो, मम सदनाचे कवाड
नकोच दर्शन अंशमात्रही, मज हे कैदाशिणी
वाचाळ तू मैत्रिणी

कशांस पंगा घेतलास तू, पाय आणि खोलात
उर्मिलेस(३) त्या दूषण देता, कां नच झडले हात?
कित्येकांसी वैर घेतले, ट्विटरावरती, जनीं
वाचाळ तू मैत्रिणी

राणी(४) असुनि झालीस प्यादे, घरटे तुटले आज
पाठीवरचा हात दगा दे, उतरुन गेला माज
समर्थनासी परी धावले, झुंडीच्यासह कुणी
वाचाळ तू मैत्रिणी

तुला पाहता प्रदीप्त होते, मम शब्दांची धार
होईल शोभा पुन्हा म्हणुनि करत नाही मी वार
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा झणी
वाचाळ तू मैत्रिणी

मरुस्थलासम तव बुद्धीचे भान होई वैराण
कशास भांडुन तंडुन केले जन हे तू हैराण
ताळतंत्र हे पुरे सोडले, तुवा गतसाजणी
वाचाळ तू मैत्रिणी

भगिनी(५)सह शब्दांनी केले तूच वार अनेक
दुखावले जे तव शब्दांनी, दुरावले जे लोक
कुठल्या वचने तव सुहृदांची करशील समजावणी?
वाचाळ तू मैत्रिणी

चला राऊता(६), द्या सेनेला(७) एक आपुल्या हाक
नटीसंगती सुसज्ज असतील ट्विटर-ट्रोल हे लाख
तव पोस्टींच्या सवे असू दे ’सामना’ची(८) पुरवणी
वाचाळ तू मैत्रिणी

जमेल तेथे, जमेल तैसी करु काव्य-पैदास
हाच एकला ध्यास आणखी, हीच एकली आस
शब्दप्रभूचे काव्य विडंबी, कुंपणावरचा मुनी(९) 
वाचाळ तू मैत्रिणी

	- काव्यभुभू रमताराम

- oOo -

१. झाशीच्या राणीवरील चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. २. सत्तेच्या सारीपाटातील प्यादे. ३. उर्मिला मातोंडकर. ४. झाशीच्या राणीची भूमिका. ५. तिने उठवलेल्या वादांमध्ये बहिणीनेही उडी घेतली. ६. संजय राऊत. ७. शिवसेना. ८. शिवसेनेचे मुखपत्र. ९. बाबा रमताराम, म्हणजे खुद्द आम्हीच.


संबंधित लेखन

1 टिप्पणी: