-
महाराष्ट्र देशीचे उत्तर भारतीय जामात श्री. विवेक अग्निहोत्री यांनी मराठी वरणभाताला नाके मुरडताना ‘हे कसलं गरीबाचं खाणं. मी दिल्लीचा आहे. तेलाचा थर असणारं तिखट, मांसाहारी खाणं मला आवडतं’ अशी मुक्ताफळे उधळली आणि महाराष्ट्रदेशी संताप उसळला. तांबडा-पांढरा, अख्खा मसूर, वडा-भात, वांगे-भरीत, शेव-भाजी, चकोल्या वगैरेंनी आपले नेहमीचे वरणभाताशी असलेली ईर्षा तात्पुरती म्यान करुन त्यांस बाहेरून पाठिंबा देऊ केला. आम्हीही लोणच्यापासून पोह्यांपर्यंत सर्वत्र साखरेचा वर्षाव करणार्या जमातीशी तात्पुरते जुळवून घेतले. एकुण महाराष्ट्रदेशी दुर्मीळ असा एकोपा दृश्यमान झाला.
मुळात अमुक खाणे हे फार शौर्याचे, तमुक खाणे दुय्यम अभिरुचीचे लक्षण वगैरे विनोदी समज नि त्यातून निर्माण झालेल्या अस्मिता हा केवळ महाराष्ट्रदेशीच नव्हे तर संपूर्ण भरतभूमीमध्ये पसरलेला मानसिक आजार आहे. तो असाध्य असाच आहे. त्यावर कुणाही धन्वंतर्याला आजवर उपाय सापडलेला नाही. ‘अमुक गावचा ढमुक पदार्थ टमुक गावातील पदार्थापेक्षा बेष्टं असतो’ हे अत्यंत निर्बुद्ध असे विधान अस्मितेच्या झेंड्यावर मिरवणारे माझ्या आसपास असंख्य आहेत.
सुरुवातीला मी त्यातील तार्किक विसंगती दाखवण्याचा प्रयत्न करत असे. पण याचा अर्थ ‘मी माझ्या गटाचे समर्थन करतो आहे’ असे सोयीने गृहित धरुन त्यावर आणखी हिणवत्तापूर्ण अशा अतार्किक दाव्यांची पुटे चढवली जात असत. क्वचित ‘गंमत आहे ही’ अशी पळवाट काढली जाई, पण खांद्यावरचा झेंडा उतरत नसे. अखेर मीच कंटाळून ‘शहाणे करून सोडावे...’ हा माझा मूर्ख कार्यक्रम आवरता घेतला.
मुळात हे असले अतार्किक, मूर्ख, अनेकदा द्वेषगर्भ दावे का केले जातात? याची कारणमीमांसा माणसाच्या टोळीजीवनातील प्रेरणांपर्यंत जाईल. माणसे जितकी खुजी तितकी ती आपली ओळख एखाद्या टोळीमध्ये शोधतात. वैय्यक्तिक काही दिवे लागत नाहीत तर निदान ‘एका कर्तृत्ववान टोळीचे आपण भाग आहोत नि वारशाने आपणही त्या कर्तृत्वाचे शिलेदार आहोत’ अशी बतावणी करण्याचा हा प्रयत्न असतो. मग ती टोळी देश/राज्य/गावाप्रमाणे भौगोलिक सीमांनी बांधलेली असो किंवा जात-धर्मादी वंश-वारसा वा अनुसरणाने. माणसे जितकी सामान्य कुवतीची, तितकी त्यांची बतावणी अधिकाधिक हास्यास्पद, अतार्किक होत जाते. अग्निहोत्रींचा त्रागा याच धर्तीचा.
तेलकट, तिखट, मसालेदार खाणे– त्यातही मांसाहार अधिक– हा अप्रत्यक्षपणे एक पौरुषाचा आविष्कार आहे, असा एक समज मनुष्यप्राण्यांत रुजलेला आहे. भले गावात मूळव्याधीवर सर्वाधिक उपचार होतात हे स्थानिक आरोग्याधिकारी, वैद्य वा डॉक्टर्स मान्य करत असतील, पण गावचे लोक ‘आपण तिखट खाण्यात कुणाला हार जाणार नाही’ ची शेखी मिरवतच राहातात. ते मिरवणे म्हणजे आपल्यातील पौरुषाचा आविष्कार आहे असे ही जनता समजत असते.
पण तिखट खाणे वा त्याबाबत सतत द्वाही फिरवणे ही एकच अभिव्यक्ती पौरुषाच्या कांगाव्याशी निगडित नाही. माझे काही अनुभवत मला आणखी काही नोंदी देऊन गेले आहेत.
काही वर्षांपूर्वी, मी जेव्हा सध्याच्या घरात नुकतेच राहायला आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी माझी दुचाकी पार्किंगमधून काढत होतो. पलिकडे आणखी एक सहनिवासी त्याची मोटरसायकल काढत होता. स्टँडवरून काढताना ती कलली नि याच्या अंगावर घसरली. त्याला ती सरळ करताच येईना. माझी गाडी बाजूला ठेवून मी त्याला मदत केली नि गाडी सरळ केली. आता त्या गाडीकडे नि काडीपैलवान म्हणता येईल अशा त्या बाप्याकडे पाहिल्यावर त्याने हा ‘उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका’ का घेतला असा प्रश्न कोणालाही पडत असे. कारण... जड, मोठी गाडी वापरणे हे काही पौरुषाचे, शौर्याचे लक्षण आहे असे मानले जाते! जावो बापडे. आपल्या शरीरयष्टीला झेपत असेल तर जरुर हे शौर्य दाखवावे. पण न झेपणार्या पौरुषाचे हे जगासमोर प्रदर्शन करताना धोक्याला आमंत्रण का द्यावे? बरे असली गाडी चालवण्याचे शौर्य(?) सहा महिने दाखवले म्हणून कुणी शौर्यपदक देणार आहे की पद्मश्री?
गाडीचे सोडा हो, त्याहून हास्यास्पद बाबी पौरुष-लक्षणे म्हणून नोंदल्या जातात. यातील अनेक मुद्दे तर पडताळणीस उपलब्धही नसतात. ‘बिग बँग थिअरी’ या प्रसिद्ध मालिकेतील हावर्ड हा किरकोळ प्रकृतीचा पुरुष. त्याचा सासरा चतकोर मिलिटरी सर्व्हिस केलेला. त्या जोरावर अर्थातच पौरुषाच्या डरकाळ्या फोडणारा. कुठल्याशा मुद्द्यावर हावर्ड ‘...doesn't bother me, because I sit (on the commode, while peeing)' असे म्हणतो. त्यावर सासरा अत्यंत कुत्सितपणे, ‘Yeah, that's why.' असे म्हणतो. थोडक्यात बसून मूत्रविसर्जन करणे हे बायकी काम आहे, पुरुषाला ते ‘माथा आळ लागे’ स्वरूपाचे आहे असे तो ध्वनित करत असतो.
हे ऐकून हसावे की रडावे कळेना मला. कमी जागेत कमोड्सपेक्षा अधिक संख्येने युरिनल्स बसू शकतात, जे उभ्याने मूत्रविसर्जन करु ‘शकणार्या’ पुरुषांना पुरेसे असते. तेव्हा पुरुषांसाठी युरिनल्स बांधणे हा केवळ सोयीचा भाग आहे. पण तेवढ्यावरुन स्त्री विरुद्ध पुरुष नि अमुक प्रकारचा पुरुष हा स्त्रैण आहे वगैरे निवाडे चालतात. वास्तविक उभ्याने मूत्रविसर्जन करणारे निष्काळजी पुरुष अनेकदा स्वच्छतागृहातील फरशी खराब करताना दिसतात. कमोडवर बसून कार्य उरकले तर ही शक्यता बरीच कमी होते. त्यामुळे ती कृती गैर तर काहीच, पण इतरांसाठी स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे.
अन्य एका मालिकेमध्ये धाकटा भाऊ (जो स्वत: किंचित बुद्धिमंद असतो, इंग्रजीत ज्याला simpleton असा शब्द आहे) थोरला भाऊ अजून आंघोळ करताना अंडरवेअरवरुनच आंघोळ करतो म्हणून हिणवतो. एका थोर वगैरे म्हणवल्या गेलेल्या नेत्याने एक प्रतिस्पर्धी नेता ‘रेनकोट घालून आंघोळ करतो’ अशी मुक्ताफळे उधळली होती. दोन्ही प्रसंगांत ‘नागवे होऊन आंघोळ करणे हे काहीतरी पौरूषाचे लक्षण आहे’ असे अप्रत्यक्षपणे ध्वनित केले जाते. तसे करणे ‘आरोग्यदायी आहे की नाही’ हा वेगळा मुद्दा आहे. ‘थंड पाण्याने आंघोळ करणे आरोग्यदायी की गरम पाण्याने?’ या वादाप्रमाणे (त्यातही हा पौरुषाचा कांगावा आहेच) ज्याला वाद घालायचा त्याने घालावा. माझा मुद्दा त्यात पौरूषाचा आढळ शोधण्याची गरज नाही एवढाच आहे.
पौरुषाची द्वाही फिरवण्याचे सर्वाधिक लोकप्रिय साधन म्हणजे शिव्या! कचाकच शिव्या देणे हे काहीतरी शौर्याचे नि पर्यायाने पौरुषाचे लक्षण असल्यासारखे शिव्या देण्यात भूषण मानणारे अनेक लोक आसपास दिसतात. त्यालाच जोडून येणारे अश्लील बोलणे हे असेच आणखी एक लक्षण.
वेषभूषादेखील यातून सुटलेली नाही. ‘मिश्या वाढवणे हे पौरुषाचे, तर मिश्या काढणे हे बायकी लक्षण’ हा जुना समज आता बॉलिवूडकृपेने थोडा कमी होत चालला आहे. फेटे बांधणे हा एक पौरुषाचा दागिना भलताच लोकप्रिय होत चालला आहे. इतका की हल्ली स्त्रियाही फेटे घालून मिरवणुकांमध्ये सहभागी होत आपल्यातील पौरुषाची, शौर्याची द्वाही फिरवताना दिसतात.
एकुणात काय, शौर्य वा पौरुष (बहुतेक सनातनी मनांत हे दोन्ही समानार्थी असतात) हे गाजवण्यापेक्षा मिरवण्याचे अधिक असते. श्रद्धांशी वा विचारव्यूहांशी निगडित कर्मकांडे वा पठडी असते, तशी पौरुषाच्या कांगाव्यासाठी वर उल्लेख केलेली काही कर्मकांडे असतात. ही कर्मकांडे अग्निहोत्रीसारख्यांसाठी नसलेल्या शौर्याला उद्दिपित करण्यासाठी निळ्या गोळीप्रमाणे काम करत असतात.
- oOo-
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
पौरुषाचा कांगावा
संबंधित लेखन
प्रासंगिक
संस्कृती
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा