Vechit Marquee

सूची: अनुक्रमे ▶ वर्गीकरण ▶ लेखमाला ▶ लक्षवेधी ◼

सोमवार, १५ जून, २०२६

हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ४. ट्रॉयचे युद्ध

  • पॅरिस आणि हेलन « मागील भाग

    अलेक्झांडर नावाचा एक तरुण मेंढपाळ माउंट आयडा येथे राहात होता. काही कामानिमित्ताने तो ट्रॉय शहरात आलेला असताना तिथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले त्याला दिसले. सहज म्हणून त्याने त्यात भाग घेतला नि राजपुत्र हेक्टर याला पराभूत करुन विजेताही ठरला. त्याचे कौशल्य पाहून राजा प्रायम नि राणी हेकुबा चांगलेच प्रभावित झाले. या विजेत्याला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मेंढपाळपुत्र अलेक्झांडर पॅरिस या नावाने राजाचा पुत्र म्हणून राजकुलामध्ये समाविष्ट झाला.


    पॅरिसचे धार्ष्ट्य

    पॅरिस याच्या ‘हेसिओनी’ (Hesione) या आत्येच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते, जिला काही ठिकाणी ‘ट्रॉयचे पहिले युद्ध’ असे म्हटले जाते. हेराक्लिस(१) याने ट्रॉयवर हल्ला करुन त्याचा राजा लीओमेडॉन (Leomedon) याची नि त्याच्या पुत्रांची हत्या केली. या दरम्यान युद्धाची लूट म्हणून मिळवलेली हेसिओनी त्याने आपल्या भावाला, सलामिस या ग्रीक राज्याचा राजा टेलमॉन (Telamon) याला दुसरी पत्नी म्हणून भेट दिली. टेलमॉनशी लग्नाला रुकार देताना तिने आपल्या एका भावाचा जीव वाचवला होता. हाच भाऊ प्रायम (अर्थ: गुलाम केलेला) नावाने पुढे ट्रॉयचा राजा झाला. हेक्टर नि पॅरिस ही याचीच मुले. राजेपदावर स्थिर झाल्यावर काही वर्षांनी त्याने आपल्या बहिणीला सन्मानाने आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु ग्रीकांनी तो उधळून लावला.

    असं म्हणतात, की या परत पाठवणीबाबत बोलणी करण्यास पॅरिस आणि एनिस हा त्याचा चुलतभाऊ गेले होते. पण हेसिओनी बाजूला राहिली आणि पॅरिस हेलनलाच घेऊन परतला. पुढे युद्ध अपरिहार्य दिसू लागल्यावर राजा प्रायमने हेलनला पॅरिसची पत्नी, ट्रॉयची राजकन्या म्हणून सामावून घेण्याचे हे ही एक कारण असावे असे मानले जाते.

    पण पॅरिसच्या कृत्याला एवढाच एक पूर्वाधार (precedent) नाही. खुद्द देव नि मर्त्यलोकाचा राजा झ्यूस हा अपहरण नि बलात्कारांबद्दल कुप्रसिद्धच आहे. त्याने मायसीनीहून आयोचे अपहरण केले. त्यानेच फीनिशिअन राजकन्या युरोपा हिचे बैलाच्या रूपात जाऊन अपहरण केले नि तिला क्रीट बेटावर घेऊन गेला. कोल्चिसची राजकन्या मेडिया हिचे कथानक हेलनच्या कथानकाशी थोडे अधिक जुळते आहे. इथे थेट अपहरण नाही. पण झ्यूसपत्नी हेरा हिने सौंदर्य नि प्रेमाची देवता असलेली आपली सावत्र मुलगी अफ्रोडाईटी (हिनेच पॅरिसलाही हेलनच्या प्राप्तीचे वचन दिले आहे) हिला मेडियावर फुंका (spell) घालून तिच्या मनात जेसनविषयी प्रेम उत्पन्न करण्यास सुचवले. त्या धुंदीतच तिने जेसनशी लग्न केले आहे.

    अशी आणखी काही उदाहरणे पॅरिसला ज्ञात होती. त्यामुळे हाती सत्ता असली की आपण हवी ती स्त्री मिळवू शकतो असा त्याचा समज झाला असावा.


    युद्धाचे बीज

    पॅरिस स्पार्टा भेटीवर असताना अचानक उद्भवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगामुळे मिनेलॉसला बाहेर जावे लागते. त्याच्या अनुपस्थितीत पॅरिस नि हेलन यांच्यात तथाकथित जवळीक निर्माण होते. ट्रॉयकडे परतत असताना तिनेही आपल्यासोबत यावे अशी गळ तो घालतो. हर्मायनी या पौगंडावस्थेतील मुलीची ही आई– त्या प्रेमाखातर(?) त्याच्या सोबत पळून जाते.

    उत्क्रांतीमध्ये मादीची/स्त्रियांची मुख्य प्रेरणा त्यांच्या पुढील पिढीचे हित सर्वोपरी ठेवणारी असते असे म्हटले जाते. हेलनचे हे वर्तन त्याला छेद देणारे दिसते. मी पाहिलेल्या त्या मालिकेमध्ये ती म्हणते, ‘प्रत्येकीची मातृत्वाची आस सारखी नसते.’ १४ व्या वर्षीच मातृत्वाचे ओझे तिच्या पदरी पडलेले असते. तारुण्यच काय पण पौगंडावस्थाही तिला पुरेशी उपभोगता आलेली नव्हती. इतक्या लहान वयात लादले गेलेल्या मातृत्वाबद्दल तिला आस्था असण्याऐवजी अढी निर्माण होणे शक्य आहे. ट्रॉयमध्ये दहा-अकरा वर्षे ती पॅरिसच्या सान्निध्यात राहिली, ट्रॉयच्या विनाशानंतर अनेक वर्षे मिनेलॉसची राणी म्हणून राहिली. पण या दोन्ही पतींपासून तिला मूल झालेले नाही.

    पती आणि मुलीबरोबरच तिने स्पार्टा सोडून येणे देखील विशेष उल्लेखनीय आहे. कारण तिचे बालपण तिथेच गेले आहे. मुळात ते तिच्या वडिलांचे राज्य, उपरी सासरवाडी नव्हे. थोडक्यात तिने केवळ कुटुंबच नव्हे तर पुरे आयुष्यच त्यागले आहे असे म्हणावे लागेल. पत्नीने धुडकावलेला, संतापलेला मिनेलॉस सूड घेण्याचा निश्चय करतो.

    जगभरातील राजकुलात बहुपत्नीकत्व अगदी सामान्य बाब असे. त्यापैकी एखादी स्त्री कुणी हिरावली वा स्वत:हून अन्य पुरुषाकडे गेली, तरी राजाच्या जनानखान्याला फार तोशीस पडायचे कारण नव्हते. पण एखाद्याच्या पत्नीचे अपहरण करणे वा तिने त्याला नाकारून दुसरी निवड करणे, हे त्याच्या क्षत्रियत्वाला दिलेले आव्हान समजले जाई. ते न स्वीकारणारा राजा हा कापुरुष समजला जाई. पण त्या एका स्त्रीसाठी जो संघर्ष उभा राही, तो काही दोन राजांच्या द्वंद्वाच्या स्वरूपात नव्हे, तर व्यापक युद्धाच्या स्वरूपात. त्यात सामान्य सैनिकांच्या असंख्य स्त्रिया विधवा होत, त्यांचे मुले अनाथ होत. पण त्याची फिकीर करण्याचे राजांना कारण नसे. एका दांपत्याच्या आत्मसन्मानासाठी अनेक कुटुंबांचे बलिदान वा आयुष्याची धूळदाण हे समर्थनीय मानले जाई. पॅरिस आणि हेलन यांच्या कृतीमुळे अनेकांचे जीव पणाला लागले.

    मिनेलॉसचा थोरला भाऊ अगामेम्नॉन हा अर्गोस या राज्याचा सर्वात बलिष्ठ असा ग्रीक राजा. हेलनला त्यानेच जिंकून आणून धाकट्या भावाशी तिचा विवाह लावून दिला होता. त्यामुळे पॅरिसने केलेले हेलनचे हे अपहरण(?) हा समस्त अकिअन्सच्या (ग्रीकांच्या) स्वाभिमानाला डिवचणे आहे असे तो मानतो नि ट्रॉयवर हल्ला करुन तिला पुन्हा जिंकून आणण्याचा निर्धार जाहीर करतो. तो इतर ग्रीक राज्यांना या कामी मदत करण्याचे आवाहन करतो. तब्बल २८ राज्यांचे राजे आपापल्या सैन्यासह या लढ्यामध्ये सहभागी होण्यास सहमती देतात. ही सारी फौज एका ट्रॉयवर चालून जाते.

    वास्तविक इथे ‘प्रश्न केवळ मिनेलॉसच्या सन्मानाचा होता, त्याची पत्नी पॅरिसने पळवली होती. मग इतर राजे अगामेम्नॉनच्या बाजूने का सामील झाले असावेत?’ असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. याची तीन ढोबळ कारणे सांगितली जातात.


    तीन कारणे

    या घटना जिथे घडतात त्या भूभागाकडे पाहिले, तर ग्रीस हा एजिअन समुद्राच्या पश्चिम तटाला वसलेल्या बेटांचा समूह, तर ट्रॉय हे त्याच्या पूर्वेच्या किनार्‍यावरचे महत्त्वाचे राज्य. साहजिक इथे संस्कृतीतील फरकही ध्यानात घ्यायला हवा. ट्रॉय हे आशिया मायनरचा (ग्रीक नाव ‘अनातोलिया’) भाग आहे. तर आक्रमण करणारे राजे हे अकिअन म्हणजे ग्रीक. म्हणजे ‘आपण विरुद्ध ते’ अशी मांडणी करण्यास एकदम सोपे.

    शत्रूलक्ष्यी मांडणी वा घोषणा माणसांच्या समूहांना चेतवण्यास सर्वांत सोपी. तेवढी लहानशी ठिणगी कितीही मोठ्या समूहाचा उद्रेक घडवण्यास पुरेशी असते. आजच्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्येसुद्धा एक माथेफिरू अशीच मांडणी करतो आहे. लोकशाही मूल्यांच्या रुजवणुकीचा विचार करता (संख्याबळाचा नव्हे; त्याच्या आधारे सर्वात मोठी म्हणवली जाते ती लोकशाही आता अस्तंगत होते आहे) सर्वांत मोठी लोकशाही नि सर्वात प्रगत समाज असलेल्या या देशातही ही ठिणगी ट्रम्पला अपेक्षित परिणाम घडवते आहे.

    या युद्धामध्ये ग्रीक राजे अगामेम्नॉनच्या पाठीशी एकवटण्याचे एक कारण सांस्कृतिक संघर्ष आहे. ग्रीक संस्कृतीनुसार पाहुण्याने यजमानाचा अपमान करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मिनेलॉसच्या आदरातिथ्याचा आस्वाद घेत असताना त्याच्या पत्नीशी पॅरिसने व्यभिचार करावा हा केवळ मिनेलॉसचा, नव्हे तर पुर्‍या ग्रीक (अकिअन) संस्कृतीचा अपमान आहे असा दावा अगामेम्नॉनने केला होता. पर्यायाने ट्रॉय या राज्यानेही ग्रीकांचा अपमान केला आहे. म्हणून ट्रॉयला धडा शिकवणे आवश्यक आहे असा युक्तिवाद त्याने ग्रीक राजांच्या गळी उतरवला.

    दुसरे कारण भौगोलिकच आहे. ट्रॉय हे अशा ठिकाणी वसलेले होते जिथून एजिअन समुद्रच नव्हे, तर ते काळ्या समुद्रामार्गे होणार्‍या व्यापारावरही नियंत्रण राखता येत होते. शिवाय इथे बळकट लष्करी ठाणे निर्माण केले, तर पुढे पूर्वेला आशिया नि दक्षिणेला सायप्रस, फीनिशियामार्गे थेट इजिप्तपर्यंत भूमध्य समुद्रावरही नियंत्रण ठेवणे शक्य होते. १०० गलबते घेऊन उतरलेला अगामेम्नॉन ट्रॉयमार्फत आपल्या महत्त्वाकांक्षेला नवी क्षितिजे देऊ पाहात होता. हे ओळखून असलेल्या इतर ग्रीक राजांनाही त्यातून निर्माण होणार्‍या संपत्तीमध्ये आपला वाटा हवा होता.

    तिसरे कारण हे काहीसे अविश्वसनीय, दुसर्‍या भागात म्हटले तसे ‘पुढील घटनांच्या समर्थनार्थ रचलेला पूर्वरंग’ म्हणता येईल असे. हे कारण म्हणजे ‘टिंडेरसची शपथ’. हे कथानक हेलनच्या विवाहाशी जोडले गेले आहे. हेलनच्या स्वयंवराची बातमी समजताच तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकलेले सारे ग्रीक राजे तिचा हात मागण्यासाठी स्पार्टामध्ये दाखल झाले. मोठा संघर्ष होणार असे दिसताच तिच्या वडिलांनी– टिंडेरस यांनी– इथाकाचा राजा ओडिसिअस याला मध्ये घालून ‘हेलनने कुणाचीही निवड केली तरी तिचे दांपत्यजीवन सुखाचे व्हावे यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची खात्री देतो’ अशी शपथ सर्व राजांना घ्यायला लावली. जेव्हा ट्रॉयच्या राजपुत्राने हेलनचे अपहरण केले तेव्हा तेव्हा घेतलेल्या या शपथेची आठवण अगामेम्नॉनने ग्रीक राजांना करुन दिली.


    युद्धाची अपरिहार्यता

    वरकरणी पाहाता एका स्त्रीसाठी झालेले हे युद्ध दिसते. (आपल्याकडे रामायणही सीतेच्या सुटकेसाठी झालेल्या युद्धाची कथा सांगते! त्याबाबत अधिक तपशील पुढे येतील) ग्रीक सेना ट्रॉयवर चालून येते आहे हे पाहून सुरुवातीला ट्रॉयचा राजा प्रायम (Priam) हेलेनला परत पाठवण्याचा नि भरपाई म्हणून देणग्या धाडण्याचा निर्णय घेतो. पण प्रत्यक्षात ग्रीक जेव्हा आपल्या मागण्या ट्रॉयसमोर ठेवतात, तेव्हा ‘हेलनची सन्मानाने परत पाठवणी’ एवढी एकच मागणी त्यात नसते. अगामेम्नॉनने ट्रॉयच्या राजासमोर समोर आणखी काही मागण्या ठेवल्या आहेत. त्या मान्य करणे याचा अर्थ आपले स्वातंत्र्य गमावणे असाच आहे हे पाहून प्रायमने त्या धुडकावून लावल्या नि युद्ध अपरिहार्य होऊन बसले.

    इतर ग्रीक राजे मिनेलॉस-अगामेम्नॉनच्या युद्धात सहभागी होण्याची जी तीन कारणे वर दिली आहेत, त्यांच्यामुळेही युद्ध अपरिहार्य ठरते आहे. ‘हेलनचे अपहरण’ हे अगामेम्नॉनला सर्व ग्रीक राज्यांची एकजूट बांधण्यास, त्या एकत्रित सैन्याला ट्रॉयवर हल्ला करण्यास उद्युक्त करण्यास मिळालेले चांगले निमित्तकारण होते. त्याच्या आधारे तो एजिअन समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करु शकत होता, दुसर्‍या किनार्‍यावरील बलशाली राज्याचे बळ खच्ची करण्याची अशी संधी पुन्हा मिळणे अवघड होते. त्यामुळॆ सन्मानाच्या कांगाव्याआडून सत्ताकारणाचे खेळही तो खेळणार होता.

    अगदी सैन्याच्या दृष्टीने पाहिले तरी युद्ध न करता रिकाम्या हाती परत जाणे म्हणजे शिंगरू येरझाऱ्यानेच दमल्यासारखे होणार होते. युद्धाला सज्ज झालेल्या सैनिकांना युद्धच द्यावे लागते. युद्धात त्यांची कमाईही होत असते. मायभूमीपासून दूर येऊन, जीव पणाला लावणार्‍यांना तेवढे तरी द्यावेच लागते. सैनिकांची निष्ठा नि मनोधैर्य टिकवून धरण्याचा, आपले बळ अजमावण्याचा तो एक सोपा मार्ग असतो.

    हे युद्ध अगामेम्नॉनच्या दृष्टीने किती महत्त्वाचे होते हे अधोरेखित करणारी त्याची एक कृती दाखवता येते. सैन्य जमा होऊनही सुरुवातीचे काही दिवस वारे अनुकूल नसल्यामुळे गलबतांना ट्रॉयच्या दिशेने कूच करता आले नव्हते. यावर अगामेम्नॉनने आर्टेमिस (Artemis) या देवतेचा कौल घेतला. त्यापूर्वीच्या त्याच्या कृत्यांनी नाराज झालेली ती देवता त्याच्या मुलीचाच बळी मागते... असे त्याचा भगत/भविष्यवेत्ता त्याला सांगतो(२). सन्मान नामक भ्रामक कल्पनेने पछाडलेला, सत्तेसाठी हपापलेला अगामेम्नॉन एखादे कोंबडे-बकरे बळी द्यावे तसा आपल्या पोटच्या मुलीचा बळी देतो(३).

    या युद्धात दोनही बाजूंनी प्रामुख्याने थोरले भाऊ नि त्यांनी उभे केलेले सैन्यच लढते. हेलनचे दोन्ही पती हे तुलनेने सुमार योद्धेच आहेत. त्यांचे कर्तृत्व शय्येवरच अधिक असावे. या युद्धातील प्रमुख योद्ध्यांमध्ये स्वत: अगामेम्नॉन, अकिलीस आणि ओडिसिअस हे ग्रीकांचे तीन योद्धे आणि ट्रॉयकडून पॅरिसचा थोरला भाऊ हेक्टर यांची नावे येतात.

    इतक्या प्रचंड सैन्यानिशी निघालेला नि ‘ट्रॉयचा चुटकीसरशी निकाल लावू नि हेलनला घेऊन परतू’ अशा वल्गना केलेला अगामेम्नॉन या सार्‍यांसह पुढची दहा वर्षे एका ट्रॉयशी झुंजत राहातो. अखेर रणांत न मिळालेले यश तो छद्म– म्हणजे फसवणुकीमार्फत साध्य करतो. ग्रीक सैन्य माघार घेत निघून गेल्याची बतावणी करते. त्यांची गलबते समुद्राकडे कूच करण्यापूर्वी एक लाकडी घोडा – त्यांच्या देवाला देणे म्हणून – किनार्‍यावर सोडून जातात. ट्रॉयचे सैनिक गाफीलपणे स्वत:च त्या घोड्याला नगरात घेऊन जातात. त्या रात्री त्यात लपलेले सैनिक बाहेर येतात नि नगरीचे दरवाजे उघडतात. दरम्यान माघारी गेल्याचे नाटक केलेली जहाजेही परत फिरून रात्रीतून हल्ला करतात नि दहा वर्षे चाललेले युद्ध अखेर संपते.

    युद्धलूट म्हणून अगामेम्नॉनने सोबत नेलेली कसाण्ड्रा आणि अकिलीसचा मुलगा निओटॉलिमस (जो पुढे हेलनची मुलगी हर्मायनीशी लग्न करतो) याने युद्धलूट म्हणून सोबत नेलेली हेक्टरपत्नी अ‍ॅण्ड्रॉमकी वगळता ट्रॉयचा पुरा निर्वंश(४) केला जातो. हेलन मात्र हेकुबा वा इतर राजस्त्रियांप्रमाणे आत्मघात न करता मिनेलॉससोबत परत जाते. पुढे कित्येक वर्षे त्याची (एक) राणी म्हणून वावरते नि त्याच्या मृत्युनंतर सावत्र मुलांकडून मारली जाते.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » काही बिंदू आणि एक आलेख

    टीपा :

    (१). आपल्याला अधिक परिचित असलेले रोमन नाव ‘हर्क्युलिस’! हा ही झ्यूसपुत्र, त्या अर्थी हेलनचा तथाकथित सावत्र भाऊ. [↑]

    (२). या असल्या तथाकथित देवतांच्या अशा अघोर मागण्या राजांपर्यंत पोहोचवणारे त्यांचे भगत, कदाचित राजाने कधीतरी केलेल्या अपमानाचा, अन्यायाचा वा नाकारलेल्या स्वार्गी मागणीचा सूड अशा तर्‍हेने घेत असावेत का? असा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण एखाद्या कार्यापूर्वी ‘अनुकूल’ की ‘प्रतिकूल’ एवढा कौल घेण्याची कृती मी समजू शकतो. पण इतकी तपशीलवार मागणी या देवता या पुरोहितांकडे कशा पोहोचवत असतील याबाबत मला कुतूहल आहे. या तपशीलामध्ये त्यांच्या वैय्यक्तिक इच्छांची भेसळ नक्कीच होत असणार असे मला वाटते. [↑]

    (३). अगामेम्नॉन ट्रॉयच्या युद्धाहून दहा वर्षांनी अर्गोसला परततो, तेव्हा त्याची पत्नी क्लायटीम्नेस्ट्रा (Clytemnestra) त्याची हत्या करते, तिच्या मुलीचा बळी दिल्याचा हा सूड असतो. ही हेलनची सावत्र बहीण, कारण ही देखील ‘झ्यूसपुत्री’. या दहा वर्षांमध्ये तिने मायसीनीवर राज्य केले आहे, सत्तेची चव चाखली आहे. आता पुन्हा राजाच्या अनेक राण्यांपैकी एक राणी होऊन अंत:पुरात कोंडून घेणे तिला नको आहे. अगामेम्नॉन दूर ट्रॉयमध्ये असताना तिने एजिस्थस या अगामेम्नॉनच्या चुलत भावाशी सूतही जुळवले आहे. त्यातच ट्रॉयवरुन परतताना युद्धलूट (spoils of war) म्हणून तो ट्रॉयची राजकन्या नि भविष्यवेत्ती कसाण्ड्रा हिला घेऊन आला आहे. अगामेम्नॉनची हत्या ही या अनेक कारणांचा एकत्रित परिणाम आहे.[↑]

    (४). पुढे त्याच्या चुलतभावाशी झालेल्या सत्तासंघर्षात निओटॉलिमसची हत्या होते. काही कथांतून निओटॉलिमसने हेक्टरचा भाऊ हेलेनस यालाही गुलाम म्हणून नेल्याचा उल्लेख आहे. निओटॉलिमसच्या हत्येनंतर त्याच्याशी लग्न करुन अ‍ॅण्ड्रॉमकी एपिरस राज्याची राणी म्हणून राज्य करते. [↑]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: